Monday, June 22, 2009

झाले गेले विसरुनी जाऊन

झाले गेले विसरुनी जाऊन

झाले गेले विसरुनी जाऊन,
सांग तू माफ करशील का? करशील का? || ध्रु ||

न जुळू शकल्या आपूल्या तारा
न फुलू शकला मनमोर पिसारा
माणूस म्हणूनी ओळखशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || १ ||

उलटे सुलटे पडले फासे
दान दैवाचे हातात न गवसे
रिते हात पकडशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || २ ||

न लागली मेंदी हाती
न लागले कुंकू माथी
अखेरचे तू बघशील का?
सांग तू माफ करशील का? करशील का? || ३ ||

- पाषाणभेद
१५/०३/१९९८

खेड्यातला आणि शहरी मुलगा

खेड्यातला आणि शहरी मुलगा

असशील बघत टिव्ही जरी तू
विटीदांडू कधी खेळलास काय? खेळलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खॉत असशील ऑईस्क्रीम तू
बांधॉवरची बोरं तू खॉल्लीस कॉय? खॉल्लीस कॉय?

नाय बॉ नाय नाय बॉ नाय

खेळत असशील बुध्दिबळ तू
कब्बड्डी कधी खेळलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

येत असशील कराटे तूला तरी
कुस्ती माझ्याशी खेळतोस काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

असशील स्विमींग करत जरी
नदीच्या डोहात डुंबला काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खातो आंबे मंडईतले जरी
चोरून जांभळे पाडली काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

पितोस दुध पिशवीतले
त्याला ताज्या दुधाची चव काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

दिमाख दाखवतोस शहराचा मोठा
खेड्यात एकदा राहतोस काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

- पाषाणभेद
७/०३/१९९८