Tuesday, July 16, 2019

निर्झर

निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||


- पाषाणभेद
१५/०७/२०१९

पावसाविषयी असूया

पावसाविषयी असूया

पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले

गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग

पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली

ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला

गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले

- पाषाणभेद
०७/०७/२०१९