खराब रस्त्यांचे फायदे
भारतातील रस्ते अन त्यांची स्थिती यावर मी पिएचडी करायची ठरवीलेली आहे. भारतात कोठेही जा. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्विम बंगाल, उत्तरप्रदेश, तमिळनाडू. सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गुजरात मध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे. ग्रामिण भागात तर रस्ता १० चा २० होतो. काही ठिकाणी बरा रस्ता असल्याने तो १० चा १५ होतो. १० चा १० असणारे रस्ते फारच दुर्मीळ. (१० चा x असणे हे रस्त्याची परिस्थिती मोजण्याचे आमच्याकडचे परिमाण आहे. १० चा १० म्हणजे एखाद्या गाडीला १० किमी जायला नॉर्मल वेळ लागत असेल तर तेच १० चा २० म्हणजे त्याच वेगाने १० किमी जायला गाडीला दुप्पट वेळ लागेल.)
परदेशात (म्हणजे अमेरीका आदी आदी.) अगदी गुळगुळीत रस्ते असतात. ते आपण टिव्ही, आंतरजालावर बघतोच. इतरही देशात चांगले रस्ते असतात. आफ्रिका खंडातल्या पुढारलेल्या देशातही चांगले रस्ते आहेत. जपान, सिंगापुर, चीन, रशीया, इटली, डेन्मार्क येथे व्यापारी मार्ग आहेत. जर्मनीत असल्या रस्त्यांना अॅटोबान असे म्हणतात. म्हणजेच आपल्याकडचा मुंबई पुणे फ्रि वे.
अमेरीका, ब्रिटन, डेन्मार्क, कॅनडा, दक्षीण आफ्रिका, आस्ट्रेलीया, जपान आदी देशात आपल्यासारखे सम हवामान नाही. काही ठिकाणी कायम बर्फ असतो तर काही ठिकाणी कायम पाउस असतो. काही ठिकाणी वाळवंट आहे तर काही देशात कधी बर्फ पडतो तर कधी उन. पाउस तर आपल्यापेक्षा जास्तच पडतो. तोही संततधार असतो. म्हणजेच आपल्या दोन चेरापुंजी इतका किंवा तिन महाबळेश्वर इतका पाउस एकाच हंगामत पडत असेल. थोडक्यात आपल्या देशातल्यासारखे हवामान तेथे नाही. आपल्या देशात गणपती, नवरात्रोत्सव, लग्नकार्य, सभा आदि रस्त्यावर घ्यायच्या असल्यास त्यांच्या मंडपांना खिळे, पहारी, बांबू ठोकण्यासाठी नगरपालीकेची परवानगी घ्यावी लागत नाही. परदेशात असले ठोकाठोकीचे प्रकार रस्त्यावर होत नसावे. म्हणजे तेथील रस्ते हवामान किंवा मानवप्राण्यामुळे उखडले जात नाही. पाउस पडो, बर्फ साचून राहो, भुकंपात रस्त्यांची हानी होवो. लगेचच तेथील यंत्रणा रस्ते परत गुळगुळीत करतात.
आपल्याकडे थोडाही पाउस पडला की रस्ते खड्डेमय होतात. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही.
अगदी थोड्या पावसातही रस्ते कसे खराब होतात याचा शोध आपल्या कडच्या संशोधकांना लावावा वाटत नाही की 'राष्ट्रीय प्रयोगशाळांना' वाटत नाही की अधेमधे जनसामान्यांसाठी वटहुकुम काढणार्या सर्वोच्च न्यायालयाला वाटत नाही. बहूतेक त्यांना तसे करायला सांगत नसतील म्हणून ते तसे करत नसतील. जे साहित्य परदेशात वापरतात, जे रस्ता बांधणी तंत्र परदेशात वापरतात ते सगळे आपल्याकडे उपलब्ध असतांना रस्ता बिचारा हालाखीतच असतो. अमेरीका, इंग्लंड मध्ये आपलेच अभियंते मोठ्या पदावर आहेत. भारतात मात्र त्यांचेच भाउबंद असतांनाही असली परिस्थीती रस्त्यांची असते.
खड्डेदुरूस्ती करण्याचे काम कमी अनुभवाच्या किंवा नुकताच अभियंतागीरी चालू केलेल्या एखाद्या कंत्राटदाराला मिळते. टेंडर पास करण्यात अधिकारीवर्ग या उमेदवार कंत्राटदारांकडून फारच जास्त लाच मिळेल अशी अपेक्षा ठेवून असत नाही. अगदीच मामूली काम असल्याने त्याकडे कमी दर्जाचा अधीकारी बघतो. खड्डेदुरूस्तीसाठी जास्त काही यंत्रणा कंत्राटदाराला लागत नाही. एखादा रोलर, ४/५ कामगार यांवर काम भागते. असले कंत्राट महानगरपालीकेकडून, PWD कडून मिळणे सोपे असते. त्यात जास्त काही आर्थीक फायदा (दोघांच्याही दृष्टीने) नसतो. त्यामुळे कामही त्याच दर्जाचे असते. असले कामे करणारा कंत्राटदार पुढे मोठे कामे मिळवत जातो अन मोठा होतो.
पावसाळ्यात खराब झालेले रस्ते पुन्हा बनविण्यात फारच मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. असली कामे दोन एक वर्षातून निघतात. त्यातही काही किमी किंवा नगरपालीकेतील ठरावीक रस्तेच दुरूस्त होतात. यात अधिकार्यांची साखळीच कामाला लागते. महापौर, उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्ष नेता, नगरसेवक आदी ठराव पास करवून घेणे, टेंडर काढणे, आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला टेंडर देणे आदी कामात व्यस्त होतात. कंत्राटदारही मोठे प्रस्त असते. बर्याचदा तो महापौर किंवा अन्य व्यक्तिचा नातेवाईकच निघतो. यात आर्थीक देवाणघेवाणही मोठी असते. आमच्या गावी एके वर्षी मोजून ३०० मिटरचा रस्ता हा 'अमेरीकेच्या रस्त्यांच्या धर्तीवर' बनवला गेला. पेप्रात अगदी गाजावाजा करून, फोटो छापून त्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तुकडपट्टीचा रस्ता तयार झाला. पुढच्याच पावसाळ्यात त्या रस्त्यावरून वाहने चालवता येत नव्हते! पुढचे वर्ष तसेच गेले. त्या नंतर कधीतरी नवीन डांबराचा थर त्यावर टाकण्यात आला. तो भारतीय पद्धतीने टाकण्यात आला. असो.
असल्या खराब रस्त्यात आपल्याकडचे राजकीय पक्ष वृक्षारोपण करतात. बहूतेक वेळा हे काम विरोधी पक्षाचे लोक करतात किंवा 'नागरीक आघाडी', 'युवक मित्र मंडळ' असल्या रिकामपणाच्या कामगिर्या करणारे लोकं करतात. बहूतेक वेळा उद्देश हा राजकीय हेतूने प्रसिद्ध पावण्याचा असतो. आता रस्त्यातल्या खड्यात झाड कधी जगेल काय? किंवा जगलेच तर त्याची देखभाल होवून त्याचा वृक्ष होईल काय? नाही. आपली वर्तमानपत्रात फोटोची हौस भागवली जाते. यातूनच नविन पुढारी घडविले जातात. नेतृत्वगुणाची कसोटी लागून नेतृत्व करणार्या पुढार्याला पैलू पडतात. त्याच्या केलेल्या कामांच्या यादीत एका आंदोलनाची भर पडते. कोपर्यावर एखादे बॅनर लावले जाते. हा एक फायदाच.
मागच्याच महिन्यात मुंबईत एक निरीक्षण मांडले गेले होते. निरीक्षण स्त्रीरोग तज्ञांचे होते. 'खराब रस्त्यांवरून वाहनांतून प्रवास करण्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे' या अर्थाचे. एकदम खरे आहे. माझा एक नातेवाईक त्याच्या गर्भार बायकोला मोटरसायकलवर घेवून लांब देवदर्शनाला गेला. दुर्दैवाने त्याचे फळ त्याला त्याच्या होणार्या बाळाच्या गर्भपातात मिळाले.
असल्या खराब रस्त्यांवर जरी गर्भपात झाले तर उमेदवार जोडप्यांना नविन परिश्रम करण्याचे बळ मिळते. अवांतर खर्च वाचतो. स्त्रीरोग तज्ञांना जास्तीचे काम मिळते. त्यांच्या दवाखान्यातील परिचारीका, मावश्या, वार्डबॉय यांना कामे मिळतात. औषधे बनविणार्या कंपन्याना फायदा होतो. त्यांचे शेअर्स चे भाव वाढतात. हा एक फायदाच आहे.
खराब रस्त्यांवर वाहने चालवून वाहनचालकांना पाठदुखी, अंगदुखी, मणका मोडणे, मानेचे आजार होणे आदी त्रास होतात. हे त्रास झाले तर मस्तपैकी ऑफीसला दांडी घ्यावी. आराम करावा. रस्त्यानेच आपल्याला सुटी दिली आहे. त्यामुळेच आपले मेडीकलच्या बिलाचे वाढीव पैसे मिळतील हा आनंद मानावा. मेडीकलची बिले मंजूर करण्यात मोठी साखळी असते. त्या साखळीला काम मिळते, पैसा मिळतो. दवाखान्यात भरती होण्यामुळे हाडांच्या डॉक्टरांना कामे मिळतात. त्यावर अवलंबून असणार्यांचा रोजगार भागवला जातो हा एक फायदाच आहे, नाही का?
असल्याच खराब रस्त्यांवरून वाहने चालवून वाहनांत दोष निर्माण होतात. वाहनांची धक्केशोषण यंत्रणा (शॉकाअॅसॉर्ब ) बिघडते. वाहनांच्या टायरमध्ये खराबी येते, टायर लवकर घासले जातात. रिंग्ज आउट होतात. ट्युब पंक्चर होते. असल्या प्रकारांमुळे टायरदुरूस्ती करणारा आण्णा आनंदून जात असेल. तो लगोलग आपल्या भाउबंदाना केरळ, बिहारातून जास्तीचे काम करण्यासाठी बोलावून घेतो. त्यांना रोजगार मिळतो. टायरचा ट्युबचा खप वाढतो. टायरच्या कंपन्या तेजीत जातात. त्यांचे शेअर्स वधारतात. ते शेअर्स घेणार्यांना फायदा होतो. टायरट्युबच्या कंपनीच्या शेअर धारकांना डिव्हीडंड मिळतो. वाहनांचे शॉकाअॅसॉर्ब तयार करणार्या कंपन्यांना कामे मिळतात. वाहनांच्या कंपन्याना स्पेअरपार्ट साठी कामे मिळतात. त्यांचे वितरक, व्यापारी यांना कामे मिळतात. रस्त्यावरील वाहनदुरूस्ती दवाखाना चालकांना कामे मिळतात. याच खराब रस्त्यांवरून असले स्पेअरपार्ट घेवून जाणारे ट्रक चालतात. त्यांची रस्त्यात दुरूस्ती होते. आरटीओ, ट्रॅफीक हवालदार यांना असल्या वाहनधारकांकडून चहापाणी मिळतो. चहापाण्याची उलाढाल पोलीसांच्या अधिकार्यांच्या साखळीते होते.
यात करोडो रुपयांची उलाढाल असू शकते. त्याचा विचार आपण सामान्यलोकं करतच नाही. या फायद्याचा विचार सोडून आपण फक्त खराब रस्त्यांविरूद्ध ओरड करतो.
कोणत्याही देशात तेथील रस्ते म्हणजे 'रक्तवाहीन्या' ओळखल्या जातात. व्यापार, आर्थीक उलाढाल आदी रस्त्यांवरून होतात. सैन्य हालचालीतही रस्ते महत्वाची भुमीका वठवतात. रस्ते म्हणजे एकप्रकारे कोरड्या नद्याच. त्यातून वाहने, त्यातील माल, त्यातील माणसे अन त्यांची स्वप्ने वाहत असतात. या भारतातील आधूनीक प्रदुषीत सरीता खरोखर व्यापारी, आर्थीक उलाढाल करतात हे मान्य करावेच लागेल.