Saturday, December 19, 2020

संवेदनशील दातांसाठी उपायकारक दातखळ

संवेदनशील असणार्‍या दातांसाठी आपण दुरचित्रवाहीनीवर सोसोडायन वगैरे दातखळीच्या जाहिराती पाहत असतो.

(असल्या फसव्या जाहिराती पाहिल्या की एक तिव्र सणक डोक्यात जाते!)

या आजारावर दंतवैद्य साधारणत: एक संरक्षक लेप असलेला थर दातावर लावतात. तो थर वर्षभर टिकतो. नंतर परत थर लावणे असे करावे लागते.

हा आजार दातांच्या वरच्या आवरणाची झीज झाल्यामुळे होतो. 

काही वैद्यक या आजार्‍यांसाठी वैद्यकीय दृष्ट्या तयार केलेली दात घासण्यासाठीची खळ (पेस्ट) लिहून देतात. 
असल्या दात घासण्यासाठीच्या खळी फारच महाग असतात.

माझा वरील जबड्यातील एक दाढ अशीच संवेदनशील झालेली आहे. दंतवैद्यांनी यावर एक दोन वेळा संरक्षक लेप लावला होता तसेच त्यांनी वैद्य. रेड्डी या कारखान्याची वनतेज ही दातखळ कायम वापरायला सांगितलेली होती. गेले काही वर्ष मी ही दातखळ वापरत होतो. त्याने मला आरामही मिळालेला होता. तसेच दातदुखीही थांबलेली होती. (अर्थात तो दातावरील थराचा परिणाम होता. दातखळ केवळ तो थर अधीक लवकर नाश पावू नये यासाठी असावा असा माझा होरा आहे. )

वैद्य. रेड्डी या कारखान्याची वनतेज ही दातखळ इतर साधारण दातखळींपेक्षा फारच महाग आहे.  (यापेक्षाही काही महाग दातखळी असाव्यात, कारण महाग आहे म्हणून हि दातखळ वापरणे बंद करणारा मी काही एकटाच नव्हतो.  सौजन्य - म्हैस - पुल) 

उदाहरणार्थ: 
कोळसादार या  कारखान्याची १०० ग्राम साधी दातखळ ५२/- रूपयांत मिळते. 
तर वैद्य. रेड्डी या कारखान्याची वनतेज ही १०० ग्राम संवेदनशील दातखळ २६२/- रूपयांत मिळते. 
तसेच कोळसादार या कारखान्यात तयार केलेली १०० ग्रामची संवेदनशील दातखळ १३५ /- रूपयांत मिळते. 

हा किंमतीतला फरक फार मोठा आहे. 

आणखी एक जाणवलेली बाब म्हणजे, जर नेहमीच्या वापरात संवेदनशील असणार्‍या दातांसाठी वनतेज असेल अन एखादा आठवडा तुम्ही इतर दातखळी वापरल्या तर तुमचे दात परत संवेदनशील होऊ लागतात!

आणखी सांगायचे झाले तर कोणत्याही साधारण दातखळी वापरल्या तर लगेचच आपण पाण्याने चुळ भरली तर त्यातील असलेल्या घटकांमुळे दातांना ठणका बसतो किंवा ते पाणी जास्त थंडगार लागते. 

एकदा वैद्य. रेड्डी या कारखान्याची वनतेज ही दातखळ संपली असता, अजाणतेपणी पतंजळी दातशोभा दातखळ वापरली असता साधारण १५ दिवसानंतरही दात संवेदनशील जाणवला नाही. 

तसेच पतंजळी दातशोभा दातखळ १०० ग्राम ४५ रूपयांत  उपलब्ध आहे.
 
आता गेले सहा महिने मी केवळ पतंजळी दातशोभा दातखळ वापरतो आहे आणि त्यामुळे दाताच्या खाली क्षार जमा न होण्याची प्रक्रियादेखील थांबली आहे. 

आवश्यक नोंद: लक्षात घ्या की येथे लिहीलेल्या कोणत्याही आस्थापनांशी, दातखळींच्या कारखान्यांशी, त्यांच्या मालकांशी लेखकाचा काही संबंध नाही. हा केवळ अनुभव लिहीलेला आहे. व्यक्तीपरत्वे दुखणे कमीजास्त होवू शकते.

जनेरीक औषधेही निरनिराळ्या किंमतीत मिळू शकतात...

नुकतेच एक त्वचेवर उपाय असणारे व डॉक्टरांनी लिहून दिलेले ॲलोपॅथी क्रीम बाजारात ₹ ३४५/- ला मिळाले. एम आर पी तितकीच होती. (हे मेडीकल स्टोअर जनेरीक औषधांचे नव्हते.)

नंतर ते क्रीम संपल्यावर पुन्हा आणावे लागले असता एका जनेरिक मेडीकलमध्ये तेच कंटेट असणारे दुसर्या कंपनीचे क्रीम ₹ १५०/- (एमआरपी २५०/- ) ला मिळाले.

तिसर्‍यांदा परत डोस आणायचा असल्याने तेच कंटेट असणारे क्रीम दुसर्या जनेरिक स्ट्रोअर्स मध्ये ₹८०/- (एमआरपी १५०/-) ला मिळाले.

थोडक्यात, जनेरीक औषधांमध्ये दोन, तीन कंपन्यांची औषधे असतात व मेडीकल स्टोअर्सवालेही ती औषधे विक्रीस ठेवतात.

कमी किंमतीची औषधे हवी असल्यास त्याचा आग्रह धरून आपण कमी किंमतीची औषधे घेऊ शकतो.  

Friday, November 13, 2020

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली

 (पार्श्वभूमी: आमच्या मित्राने नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्याला ऐकवावी असे वाटले. )

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली

ख्यातनाम खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता.

खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता. खानसामा खारे दाणे, खिचडी खाद्यपदार्थ बनवून कंटाळत असे. 'खाई त्याला खवखवे' अशी स्थिती असल्याने खा-खा करणारा खादाडखाऊ खगेंद्र खाऊ खाऊन खो-खो खूप खेळत असे. खगेंद्राचा खून करून यंदाच्या खानेसुमारीत खासेपाटलांच्या खानदानीतून एक नाव कमी करण्यासाठी त्याने खडकसिंग खरबंदा या डाकूला पैसे दिले.

"खडकसिंग च्या खडकण्याने खडखडतात खिडक्या", असे खंकाळ (दुष्ट, रागीट, क्रृर, तिरसट), खुजा असलेला खडकसिंग वारंवार खोकलत बोले. खाल्ल्या पैशाला जागत खडकसिंग खबरदारीने खंदकातून बाहेर पडला. खास खेचरावर तो बसला अन खुरडत खुरडत खुशमस्कर्‍या खेळगडींसह खडकवाडीत आला.

खोडकिडीसारखा खालावलेला खडकसिंग खगोलात खूप तारे असतांना खडकेवाड्यातील खंदक ओलांडून खोलीत खोलवर शिरला तेव्हा खकाणा उडाला. एक खंगलेला दरवाजा खंगारातून (वीट, पक्की वीट) खिटी (अडसर, पाचर) नसल्याने उखडला होता. खट्याळ खुशमस्कर्यांनी खडकसिंगची खुशामत केली. खुशालचेंडू खडकसिंग खुशीत आला. खुन करण्याची खुणगाठ बांधलेला खडकसिंग खळखळून हसला.

खडकेवाडा खंगाळल्यानंतर त्याला खुलासा समजला की खगेंद्र खानदेशात खर्डे खरडतो आहे. या खीळ बसणार्‍या खात्रीलायक खबरीमुळे खूनाच्या कामाचा खेळखंडोबा झालेला खडकसिंग खुळ्यासारखा खचला आणि खासेपाटील खुदुखुदु हसून खदखदू लागले. खवळलेला खडकसिंग खुळा झाला.

खड्गांची खडाखड खणाणणारी खडाजंग झाल्यानंतर खासेरावांनी आपला खास खुपीया खबरी खंडू खोडके याचा खुबीने वापर करून खडकसिंगाच्या कामात खो दिला. खडकसिंगने खलबत करून खोड काढण्याच्या आत पोलीस खात्यात खडसावणारा खुंखार फौजदार ख्वाजा खुर्शीद खान तेथे आला. त्याने खडकसिंग आणि त्याच्या खोगीरभरतीचा खरपूस समाचार घेतला आणि खटल्याचा खलिता खंडन्यायालात रवाना केला.

खुन करण्याचे खूळ करणारा खानसामा खडकेवाड्याच्या शेजारी खाणीच्या खड्ड्यात असलेल्या एक खिडकी, एक खांबी खोलीत खितपत पडला.

खरोखर, खरे खडक खडकवासल्यासारख्या खोल खड्ड्यात खचत नाही व खोट्याची खोड खोड्यात पाडते.

Thursday, November 5, 2020

मिसळ विवेचन

 जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन तर्री यांच्यामधून स्वर्ग निर्माण करतो.

बाकीचे हाटेलवाल्यांना मिसळीसोबत काकडी, टोमॅटो, पापड, दही, मठ्ठा, फरसाण इत्यादींचे कडबोळे करून जगावे लागते.

अहो, कालपरवा एका हॉटेलात मिसळीबरोबर जिलबी दिली तेव्हा मला, 'तुच कारे तो भुतस्य', असा प्रश्न विचारावा वाटला.

मिसळथाळी हि खरी मिसळ नाहीच.
मिसळ खावी ती हातगाडीवरची अन जिथे जास्त रिक्षावाले थांबून खात असतात तिथली. तिथे उगाचच फिल्टर पाणी, हात पुसायला पेपर नॅपकीन, हॅन्डग्लोव्हज् घातलेले वेटर, स्वतंत्र ग्लास असली सरबराई नसते.
रिक्षावाला जसा भडकू असतो तशीच हातगाडीवाली मिसळ स्फोटक असते.

मिसळ खावी ती नाशकातली. भरपुर मोड आलेली मटकी नावापुरते शेव अन भरपुर रस्सा अन कसलाही अन्य पदार्थ न टाकता केलेली तर्री हे फक्त नाशकातल्या मिसळवाल्याकडेच मिळेल. अर्थात आता आता नाशकातही डेकोरेटिव्ह मिसळचे फॅड येते आहे. ते मुळ मिसळवाल्यांच्या मुळावर आहे.

कोल्हापूर मिसळ म्हणजे नऊवारी शिवलेली साडी घालून रेकॉर्डवर लावणी लाऊन केलेला नाच. अस्सल फडावरच्या लावणीची मजा त्यात नाही.

पुण्यातली मिसळ हि खरी मिसळ नव्हेच. जसे अमृततुल्य नावाच्या चहाने चहाची चव घालवली तशी पुणेरी मिसळने मिसळची इज्जत घालवली.

Saturday, October 31, 2020

मिसळ पाव मिसळ पाव

मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव

मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव

झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव

एकदाच खा अन ढेकर द्या
उगाच नंतर जेवायचे काम नाय
नको ते इडली सांबर
पुन्हा घ्याल का पराठे नंतर?
मिसळीत आहे सारे गुण
एकदा खाल तर व्हाल टुन्न
हातावरचे अन पोटावरचे
एकच झाले मिसळीवरचे
केवळ नाव तुम्ही घ्याल
मिसळ खाल मिसळ खाल
मिसळ पाव मिसळ पाव

- पाषाणभेद
०१/११/२०२०

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

पार्श्वभूमी: सदर गीत साधारण २००६-०७ च्या सुमारास दुरदर्शनवर पाहिले अन तेव्हापासून हे गीत मी आंतरजालावर शोधत होतो. कुठेही हे गाणे लिखीत अथवा चित्रीत स्वरूपात मिळाले नाही. नंतर एकदा हे गीत नाशिक आकाशवाणीवर ऐकायला मिळाले. ते गाणे तेथून मिळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मला नक्कीच खात्री होती की हे गीत वंदना विटणकरांचे आहे. खूप प्रयत्न केले असता सदरच्या गाण्याचा उल्लेख http://www.marathiworld.com/gani/list_action.php?ch=H&sort=1 येथे सापडला. (येथे ते गाणे 59 क्रमांकावर आहे.) (आता बहूदा हि साईट चालत नाहीये.)

पण त्यावेळी ही लिंक उघडत नव्हती. लिंक ब्रोकन असल्याबद्दल मी तेथील अ‍ॅडमीनला इमेल पाठवला. त्यांचा काही प्रतिसाद आला नाही पण काही दिवसांनंतर ही लिंक ओपन होवू लागली व माझी या गाण्यासाठीची खुप दिवसांपासूनची शोधाशोध थांबली. साधारण २०१२ साली हे गीत सापडले. परंतु ते ध्वनी स्वरूपात (गायलेले) आपले मिपाकर डॉक्टर इंद्रनील पाटील सरांंनी २०१९ साली दिले. खूप प्रतिक्षेअंती एका सुमधूर गीताचा शोध संपला. अर्थात या गाण्यावर चित्रीकरण असणारा विडीओ दुरदर्शनच्या लायब्ररीत असणार. पण तो मिळणे दुरापास्त आहे. पण जेव्हा तो मिळेल किंवा तो दाखवतील तेव्हा आपण जरूर पहा. अगदी छान चित्रीकरण असलेले हे गीत आहे. मनास आनंद देईल हे नक्की. एखादे चांगले गीत काळाच्या पडद्या आड जाऊ नये म्हणून हे गीत येथे देत आहे. ऑडीओ अपलोड केल्यास तो देखील देण्यात येईल. 

हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)

हिरवा हिरवा ॠतू, हिरवा हिरवा ॠतू,
अधिकच हें मन हिरवें, जवळीं असतां तूं ॥धृ ॥

विळखा घाली वारा, फुलतो वेलीवरी शहारा
लाटा येतां जवळीं होतो अधीर धुंद किनारा
भ्रमर चुंबितां कळीस, माझा वसंत फुलवी तूं ॥१॥

कोसळती जलधारा, नाचे मनांत मोरपिसारा
ओलेती ही धरा, देतसे हिरवा सृजन-इशारा
मेघ भेटतां तिला, प्रिया, मज दे आलिंगन तूं ॥२॥

हिरवी मस्ती रानीं, प्रणयी राघू उन्मन झाले
अशा निथळत्या वेळीं माझें तनमन हरपुन गेलें
चिंब मातल्या बेहोषीचें उधाण सांवर तूं ॥३॥

गीत - वंदना विटणकर
सं. - यशवंत देव
गा. - शोभा जोशी 

गायलेले गीत खालील लींकमध्ये ऐकता येईल.
https://voca.ro/12JlBPGIDPYN
(वरील लींक नाहीशी होऊ शकत असल्याने आपण डाऊनलोड करून घेवू शकतात.)

Monday, August 24, 2020

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

 (महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

(प्रस्तावना: कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल हे लेखकाच्या मनात आल्याने "इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट" हा पाठ लिहीला आहे. )

जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०१९ च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२० च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले. एप्रिल २०२० च्या मध्यानंतर हा आजार भारतात सर्वत्र पसरला होता.

या आजारात कोवीड विषाणू हवेतून तसेच स्पर्शामधून पसरत असत. त्या काळात या आजारावर कोणतेच औषध तसेच लस उपलब्ध नव्हती. लाखो लोक या आजारामुळे जगात दगावले. अनेक देशांनी आपल्या देशांतील सार्वजनीक व्यवहार अनेक महिने बंद ठेवले होते. जगभरातील विमानसेवा ठप्प होती. इतकेच नव्हे तर अनेक गावेच्या गावे एकमेकांपासून विलग केलेली होती. प्रशासनाच्या परवानगी विना कोणीही व्यक्ती दुसर्‍या गावात प्रवेश करु शकत नव्हता. भारतात देखील प्रशासनाने जिल्हाबंदी, गावबंदी असे उपाय अंमलात आणले होते. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना तोंडावर रुमाल किंवा मास्क लावणे सक्तीचे होते. दोन व्यक्तीत कमीतकमी तिन चार फुटांचे अंतर राखावे अशी अपेक्षा होती. कोरोना विषाणू स्पर्शाद्वारे पसरत असल्याने वरचेवर हात सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवावे असे वारंवार सांगितले जात होते.

त्या कालावधीत होणार्‍या परिक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेणे चालू केले होते. त्या वर्गात दहावी बारावी सारखे मोठे वर्ग तर होतेच पण अगदी बालवाडी, पहिली दुसरीचेही वर्ग होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींना नवे तंत्र शिकणे, इंटरनेटचा अभाव, मोबाईल, लॅपटॉप आदींची अनुपलब्धता अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर मात करत अनेक ठिकाणी शिक्षण चालू झाले होते.

त्या काळात कामगार वर्गाचे फार हाल झाले. लॉकडाऊनमुळे कित्येक कारखाने चार महिने बंद होते. अनेक व्यापारी दुकाने बंद पडली. कित्येकांनी आपले व्यवसाय बदलले. कारखान्यातले कामगार, मजूर आदी आपापल्या गावी परतू लागले. रेल्वे, बस सेवा बंद असल्याने कित्येक कामगार आपले कुटूंबाबरोबर पायी आपल्या गावी जात असणारे चित्र रस्त्यावर दिसत होते. अनेक जणांनी रस्त्यातंच प्राण गमावले. कित्येकांचे पगार होत नव्हते किंवा त्यात कपात केली जात होती. आर्थीक कुचंबणा होत होती. बाजारपेठेत पैशाचे चलनवलन थांबलेले होते. भारतातच नव्हे तर अनेक विकसीत देशांतही परिस्थीती काही निराळी नव्हती.

ऑगस्ट २०२० महिन्यात सार्वजनिक व्यवहार साधारणपणे चालू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. त्यामध्ये सुरूवातीला काही बाजारपेठा सम आणि विषम पद्धतीने चालू करणे, मोठे मॉल्स बंद ठेवणे, चित्रपट गृहे बंद ठेवणे, हॉटेल व्यवसाय बंद, बस सेवा चालू जरी असली तरी त्यात ई-पास आणि दोन प्रवासीदरम्यान अंतर राखणे आदी पद्धती अवलंबल्या गेल्या. 

जागतीक आरोग्य संघटना अर्थात डब्लू.एच.ओ. ने या आजाराविषयी विश्वासार्ह माहिती देण्याचे काम केले नव्हते. त्यांच्या वेळोवेळी प्रसारीत होणार्‍या बातम्यांबद्दल दुमत व्यक्त केले जात होते. जगात चीन देशानेच हा आजार मुद्दाम तयार केला आणि पसरवला याविषयी मत बनत चालले होते. अमेरीकेसहीत अनेक देशांनी याबाबत चीनविरूद्ध उघड भुमिका घेतल्याने जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंभरठ्याच्या दिशेने जात आहे की काय अशी शंका वेळोवेळी येत होती. संपूर्ण जगाचे राजकारण कोरोना या आजाराभोवतीच फिरत होते.

अनेक देशांतील औषधे निर्माण करणार्‍या किंवा संशोधन करणार्‍या संस्थांनी या आजारावर प्रतिबंधक लस निर्माण करण्याचे संशोधन सुरू केले होते. त्यात यश मिळण्याचे प्रमाण मात्र अगदी नगण्य होते. ऑगस्ट २०२० महिन्याच्या मध्यावर रशीया देशाने सर्वप्रथम कोरोना आजारवरची लस बनवल्याचे आणि ती लस बाजारात आणल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु या लशीच्या यशाच्याबाबत बरेच देश आणि जागतीक आरोग्य संघटनाच साशंक होत्या.

कोरोना या आजारानंतर सर्वसामान्य मानव समाजाची जिवन जगण्याची शैली बदलली होती. सार्वजनीक उत्सव, सण, समारंभ एवढेच नाही तर दुख:द प्रसंगी जमावाने एकत्र येणे टाळले जात होते. एकमेकांच्या घरी सहज जाणे, गप्पा मारणे आदी लक्षणीय रित्या कमी झालेले होते. बाजारात जातांना किंवा घराबाहेर पडतांना तोंडाला मास्क लावूनच पडावे लागत होते. हात साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे आदी सवयी लोकांच्या अंगवळणी पडले होते. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले. 

कोरोनासारखा आजार, निसर्ग वादळ या नावाचे महाराष्ट्रावर आलेले संकट, बेरोजगारी, व्यापार, व्यवसाय कमी होणे, नोकर्‍या जाणे, बंद शाळा, आर्थिक चणचण, बदललेली जीवनशैली अशा अनेक अर्थांनी साल २०२० हे एक वेगळेच वर्ष आहे हे जाणवत होते. जागतीक स्तरावरील ही स्थिती कशा प्रकारे बदलेल आणि पूर्वीचे जिवन कसे सुरळीत होईल याविषयी सर्वांच्याच मनात शंका होती.

Thursday, August 6, 2020

बारीश देखो हमे भिगोने आयी है

नायक एवं नायीका बरसात के मौसममे एक दुसरेसे मिलते है तो वह युगलगीत गाने लगते है!


बारीश देखो हमे भिगोने आयी है

रुत है सुहानी तुझसे बात करनी है

बारीश देखो हमे भिगोने आयी है

हात मे तेरा हात अब ना जुदा होना है

बारीश देखो हमे भिगोने आयी है


बूंदे पडनी लगी पानी बहने लगा
बहेते पानी मे तन भीगने लगा

मौसम का ये हाल हुआ तो अपना क्या होगा

अजी छोडो सारी बाते, जो होगा देखा जाएगा

कितने दिनो के बाद हम करीब आये है


वह दूर देखो एक झील वह कितनी गहरी है

झील क्यू देखें तुम्हारी गहरे नैना क्या कम है

उन्ही मे डूब जाना है तैरके क्या करना

भीग जायेंगे उनमे ना छोडेंगे उन्हे वर्ना

सागर जैसा पानी उस नैनोमें समाया है 

बारीश देखो हमे भिगोने आयी है


कितने करीब आये हम न दूर जाना है

बारीश देखो हमे भिगोने आयी है

रुत है सुहानी तुझसे बात करनी है

बारीश देखो हमे भिगोने आयी है

हात मे तेरा हात अब ना जुदा होना है

बारीश देखो हमे भिगोने आयी है


06/08/2020


Sunday, July 19, 2020

कथा: अधांतरी त्रिकोण

विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी
महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२
अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे.
विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे.
पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२)
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*
अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे.
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*

कथा: अधांतरी त्रिकोण

माझे नाव अमृत. आमचा मालेगावला कापडाचा कारखाना होता. निरनिराळ्या प्रकारचे कापड त्यात तयार होत असे. गावाच्या बाहेर मोठी जागा असल्याने आमचा कारखाना तेथे होता. गावात राहण्यापेक्षा आम्ही कारखान्याच्या आवारातच राहत असू. तेथे आमचा बंगला होता. बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर माझी खोली होती. तेथेच मी अभ्यास करत असे. एखाद्या वेळी तेथे अभ्यासाला रहिम येत असे. अभ्यास करण्याऐवजी आम्ही मस्तीच जास्त करत असू. बंगल्याच्या बाजूची चिंच आणि जांभळाचे झाड टेरेसच्या उंचीची असल्याने आम्ही ती फळे पाडण्याचा प्रयत्न करत असू. आम्हाला ते जमत नसे. मग आमचे माळी काका लांब बांबूला आकडा लावून आम्हाला चिंच आणि जांभळे काढून देत. 

एका बाजूला असलेल्या कारखान्याच्या मोठ्या पटांगणाच्या बाजूला काही कामगारांची घरे होती. त्या घरांत मोजके, जे गरजू कामगार होते त्यांचीच राहण्याची सोय वडीलांनी केलेली होती. इतर कामगार आसपासच्या वस्त्यांमधून येत. कामगार आणत असलेल्या सायकलीपैकी लहान सायकल घेवून मी ती चालवायला तेथेच शिकलो.  मैदानात मी आणि कामगारांची मुले खेळत असू. आताच्यासारखा अभ्यास तेवढा काही नव्हता. तेव्हा मी काय असेल सहावी सातवीत. दुपारी बारापर्यंत शाळा सुटली की पूर्ण संध्याकाळपर्यंत आम्ही निरनिराळे खेळ खेळत असू. पकडापकडी, चोर पोलीस आदी खेळण्यासाठी किंवा लपण्यासाठी कारखाना आणि आमचा बंगला तेथील विस्तीर्ण पटांगण अगदी योग्य जागा होती. त्यात करीमचाचा यांचा मुलगा असलेला रहिम आणि वडीलांविना पोरकी झालेली देवीका हमखास असे. तसे आम्ही तिघेही एकाच वयाचे होतो. देवीकाला आम्ही सारे देवू म्हणत असू. तिची आई आणि मावशी आमच्याच कारखान्यात रंगकाम करणार्‍या विभागात काम करत असत.

मधूनच आम्हाला आठवण झाली की आम्ही कारखान्यात चक्कर मारत असू. आम्हाला तेथे पाहून वडील रागवत. कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे. एकदा एक नवे मशीन कारखान्यात आणले आणि ते बसवतांना अपघात होवून करीमचाचा जायबंदी झाले. त्यांचा डावा पाय अधू झाला. त्या अपघातानंतर  ते कुबडी घेवून कारखान्यात हलके काम करायचे किंवा मेन गेटवर आल्या गेल्या मालाची नोंद ठेवायचे. कारखान्यातल्या वजन काट्यावर आम्ही वजन करणे, त्यात बसून झोका खेळणे आदी करत असू. मी मालकाचा मुलगा असल्याने कुणी हरकत घेत नसे. पण आता ते सारे आठवले की हसू येते. आम्हा लहान मुलांबरोबर नशीबाने कोणताही अपघात झाला नाही.

आमचा कारखाना एक प्रकारचे मोठे कुटूंबच होते. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांची रेलचेल असे. वडील हौसेने फटाके आणत आणि आम्ही लहान वयाची मुले फटाके फोडण्यास संध्याकाळपासून सुरूवात करत असू. रहिम तसा धिट होता. तो लहान फटाके हातामध्ये वात पेटवून फेकत असे. देवू तशी भित्री अन भोळी असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. ते पाहून देवूची आई त्याला रागवे. मग मात्र तो पण शांतपणे इतर ठिकाणी फटाके फोडत असे.

ईदच्या दिवशी रहिमची आई, अमीनाबी, आम्हाला घरी खिरखुर्मा पाठवत असे. मला मात्र त्यांच्या घरीच तो खायला आवडत असे. ईदच्या दिवशी त्यांच्या चाळीतील अनेक कुटूंबे तेथे आलेली असत. तेव्हा खिरखुर्मा सगळ्यांना देतांना तिची बिचारीची धांदल उडत असे. एकतर खिरखुर्मासाठी काचेच्या वाट्या कमी पडत आणि त्यात लोकांची गर्दी. मग माझी आई स्वत:च कपाटातून काचेच्या वाट्या घेवून येई आणि रहिमच्या आईला मदत करत असे. आज मी मोठा झालो असलो आणि इतर ठिकाणी खिरखुर्मा खाल्लेला असला तरी त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. तशी चव त्यानंतर कधीही चाखायला मिळालेली नाही. 
 
गणपतीच्या दिवसात रहिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती. दरवर्षी ते नव्या पद्धतीचा गणपती बनवत. मला आठवते, मी नववीत असतांना माझ्या आग्रहामुळे त्यांनी त्या वर्षी झुल्यावरचा गणपती केला होता. त्यांनी कारखान्यातले सामान वापरून तो झुला हलता केला होता. तो इतका आकर्षक झाला होता की तो देखावा पहायला अगदी सोयगाववरूनही लोक आले होते.

या दरम्यान आम्ही लहान मुले मोठी झाले होतो. दहावीला मला चांगले गुण मिळाले. आई तर अगदी आनंदून गेली होती. देवूला तर माझ्यापेक्षा कितीतरी अधीक गुण मिळाले होते. हुशारच होती ती. रहिम मात्र कमी गुण मिळाले म्हणून नाराज झाला होता. तसे त्याचे गुणही काही कमी नव्हते. चांगले ६२% होते ते. आणि गणितात तर त्याला दिडशे पैकी थोडेथोडके नव्हे तर १३५ गुण मिळाले होते. बिचार्‍याने इंग्रजीत मार खाल्ला होता.

माझा मोठा भाऊ अरिहंत हा वडीलांबरोबर कारखान्याचे काम बघत असल्याने मी सुद्धा कारखाना सांभाळण्याच्या कामाला आईचा तिव्र विरोध होता. मी शिकून काहीतरी वेगळे करावे अशी तिची इच्छा होती. तिच्या माहेरी, माझा मामाचा मुलगा पारस हा सीए झालेला होता. मी पण सीए च करावे असे त्याने आईला भरवलेले होते. सीए केले तर पुढे मी मोठा झाल्यावर कारखान्याच्या व्यापाला उपयोगात येईल असे त्याने वडीलांना सांगितले होतेच. आता आमचे अजून दोन कारखाने गावाच्या जवळ असणार्‍या एमआयडीसीत झाल्याने कामाचा ताणही वाढलेला होता. झालाच तर फायदाच होणार असल्याने माझी सीए होण्यास वडीलांची काहीच हरकत नव्हती. आईला देखील मी काहीतरी वेगळे करण्याचे समाधान लाभत होते.

या सर्व कारणांमुळे टीएनजे कॉलेजमध्ये मी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. माझ्याच वर्गात देवीकाही होती. रहिमने सायन्सला प्रवेश घेतला. त्याचा माझा वर्ग आता वेगळा झालेला होता.

लहाणपणापासून देवीका माझ्या सोबत असल्याने तिच्याकडे मी काहीसा आकर्षित झालेलो होतो. रहिमलादेखील ती आणि तिलाही रहिम आवडत असावा असे मला वाटायचे. एक दोन वेळा मी त्यांना एकत्र बघून रहिमचा मला राग आलेला होता. देवू मात्र माझ्या वर्गात असल्याने मला तिच्याबरोबर जास्त वेळ राहता येत असे. आम्ही दोघेही माझ्या स्कुटरवरून कॉलेजला जात असू. तिचा आणि माझा खाजगी क्लास एकच होता. देवू आणि मी जास्तीत जास्त वेळ एकत्रच राहत असू. कॉलेजमध्ये वर्गमित्र आम्हाला एकमेकांच्या नावाने बोलवून चेष्टादेखील करत असत. तिच्या मनात काय आहे याचा मला पत्ता नव्हता. बरे, ती मला आवडते म्हणजे ते प्रेमच आहे असे मला वाटत नव्हते. मुख्य म्हणजे ती अभ्यासू होती. गरीबी जवळून पाहिली असल्याने तिला अभ्यासाचे महत्व पहिल्यापासुन पटलेले होते. त्यात बारावीचे वर्ष म्हणजे मोठा अभ्यास होता. शिकून तिला प्राध्यापक व्हावेसे वाटते असे तिने मला कित्येकदा सांगितलेले होते.

रहिम त्याच्या प्रॅक्टीकल्स आणि कॉलेज, क्लासमधून जेव्हा वेळ मिळे तेव्हा आमच्या मिसळे. जेव्हा जेव्हा ती रहिमशी बोले तेव्हा माझ्या मनात आक्रंदन सुरू होई. त्यांची घरेही आजूबाजूलाच असल्याने ते दोघेही माझ्या व्यतिरीक्त एकत्र असत. रहिम जरी माझा मित्र होता तरी देवीकेच्या बाबतीत त्याची मला असूया वाटत असे. देवीकाने केवळ माझ्याशीच बोलावे असे मला वाटे. मी मोठ्या घरातला आणि ती एका सामान्य घरातली असल्याने ती मला आपल्या प्रेमाबद्दल हो म्हणणार नाही असेही मला मनात वाटे. या लहान मोठेपणाच्या समजानेच ती रहिमशी मैत्री राखून असावी असेही एक मन म्हणत असे.

बारावीची परीक्षा संपली. आम्हा दोघांना चांगलेच गुण मिळाले होते. आम्ही दोघांनी रितसर त्याच कॉलेजध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. रहिमला इंजिनीअरींगच्या सीईटी परिक्षेत उत्तम गुण मिळाल्याने पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला. करीमचाचा तर एकदम आनंदून गेले होते. त्याला होस्टेलवर सोडायला मी त्याच्याबरोबर पुण्याला गेलो असतांना रहिमने त्याचे मन मोकळे केले. देवीकाबद्दल माझे जसे प्रेम होते तसेच त्याचेही देवीकावर प्रेम होते. मी जसे तिला माझ्या प्रेमाबद्दल विचारू शकलो नाही तसे त्यानेही तिला कधी विचारले नव्हते की तसे भासू दिले नव्हते. देवू त्याच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल असलाच विचार करत असेल याची त्यालाही खात्री नव्हती. मी त्याला होस्टेलवर सोडून निघालो तेव्हा तो हमसून हमसून रडला. देवू बद्दल तो जास्तच भावनाशील होता. मी देखील माझे देवूबद्दलचे मत त्याला सांगितले. प्रेमात गरीब श्रीमंत असला प्रकार नसतो याबद्दल तो मला अन मी त्याला खात्री देत होतो.

रहिमला सोडून मी गावी परतलो. माझे आणि देवूचे कॉलेज सुरू झाले. ती आता माझ्याबरोबर कॉलेजला येत नसे. परंतु आमचे नेहमीसारखे सरळ आयुष्य चालू झाले. रहिम जरी तेथे नव्हता तरी देवू काही त्याच्याबद्दल बोलत नव्हती. त्यांचा संपर्क आता होत नव्हता. त्याच्याबद्दल ती माझ्याकडे चौकशी करत नव्हती. माझ्याशी ती हसून खेळून राहत असे. कॉलेजमधल्या अभ्यासाविषयी गप्पा मारत असे. मैत्रीच्या पलिकडे बोलायला ती चुकूनही तयार नसे.

त्यावर्षी बाहेर पाऊस पडत होता. देवू अन तिची आई पावसात भिजत आमच्या घरी आल्या. देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा मुलगा त्यांच्याच समाजातला, सरकारी नोकरीत, पीडब्ल्यूडीत वरिष्ठ इंजिनीअर या पदावर होता. मुख्य म्हणजे तो देवूला पुढे शिकायला मदतही करणार होता. तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती. माझ्या आईने साखर भरवून तिचे तोंड गोड केले. मला तर तो एक धक्काच होता.

त्या वर्षीच्या दिवाळीनंतर लगेचच देवूचे लग्न मुलाच्या गावीच लागणार होते.

फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती.

- पाषाणभेद
१९/०७/२०२०

+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
स्वाध्याय कृती
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
१) कृती करा.
(१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________
(२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________
(३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________
२) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत.
(२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.
(३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती.
(४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली.
३) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता?
(२) देवीका आनंदात का होती?
(३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या?
४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा.
(१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन)
(२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार)
(३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी)
५) व्याकरण
(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे.
(२) मला तर तो एक धक्काच होता.
(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(१) भोळीभाबडी
(२) पटांगण
६) स्वमत
(अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
७) उपक्रम
पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.
८) तोंडी परीक्षा
'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

Saturday, July 11, 2020

पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा

एका व्हाअ‍ॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील.  

आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
आपल्यापैकी बरेच जण असा वार्षिक देखभाल करार आपल्या वाहनासाठी करत असतील.

काही जण असा करार करण्याऐवजी आपल्याला आवडेल त्या खाजगी गॅरेज मध्ये कसलाही करार न करता मनाप्रमाणे प्रिव्हेंटीव सर्वीस करवून घेतात. अनेक जण तर वाहनाकडे दुर्लक्ष करून असली प्रिव्हेंटीव्ह सर्वीसकडे लक्ष न देता वाहन केवळ ब्रेकडाऊन झाल्यावरच गरज असेल तरच दुरुस्ती करवून घेतात किंवा आवश्यक तो स्पेअर जुगाड करून चालवून घेतात.

वॉरंटी संपल्यानंतरच्या कालावधीत वाहनाचा वार्षिक देखभाल करार करावा का? भले तो करार अथोराईज्ड सर्वीस सेंटर मध्ये नसेल पण वार्षिक करार असेल तर आपण तिन चार महिन्यात वाहनाची सर्वीस आपण बळजबरी का होईना करवून घेत असतो.

काही म्हणतील की असल्या देखभाल करार करण्यापेक्षा तो न करवून ते पैसे वाचवून वाहन आपण आपल्या मर्जीच्या सर्वीस स्टेशनला सर्वीस करु शकतो.

तर मंडळी, चर्चेचा मुद्दा हाच आहे. वाहन वॉरंटी कालावधी संपल्यानंतर कसे देखभाल करावे?
पिरिऑडीक देखभाल करार करावा का?
न केल्यास वाहन कसे मेंटेन करावे?

=================================

अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये गाडी दुरूस्त अथवा ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करारामुळे होणारे फायदे:-
- अथोराईज्ड सर्वीस सेंटर मध्ये (किंवा तत्सम ठिकाणी ) ठरावीक कंपनी किंवा मेकच्याच गाड्या येत असतात. ( उदा. टाटा च्या मोठ्या गाड्यांसाठी वेगळे अन लहान गाड्यांसाठी वेगळे सर्वीस सेंटर आहेत.)
- कंपनी प्रशिक्षीत कामगार, मेकॅनीक उपलब्ध असतात. एखादा नवीनच मेकॅनीक जरी असेल तरी तो त्याच त्याच गाड्यांवर काम करून त्याचा हात बसून जातो. 
- त्यांच्या कडच्या मेकेनीकला महिन्याचा पगार ठरलेला असल्याने कामे येवोत अथवा कमी येवोत त्यांना पगाराची शास्वती असते. 
- काही मोठी अडचण (प्रॉब्लेम) असलेल्या गाड्या त्यातील मेकॅनीकला अनुभवानुसार दुरूस्तीला दिल्या जातात. 
- गाडीच्या देखभालीसाठी सर्व टुल्स, स्पेअर्स हे एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे कामाचा उरक वाढतो. उदा. इंजीनचे काम कराचे असेल तर काही गिअर किंवा पार्ट काढण्यासाठी योग्य तेच टुल लागते.
- तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
- शक्यतो असे सेंटर स्वच्छ, प्रकाश असलेले, प्रसन्न असतात. जेवणाच्या वेळा, सुटीच्या वेळा, रजा आदी असल्याने त्याचा सुयोग्य परिणाम कामावर होतो.
- स्पेअर हे डुप्लीकेट असण्याचा प्रश्न येत नाही. किंमत ठरलेली असते. त्यामुळे ग्राहकाला फसवले गेल्याचा फील येत नाही. 
- ग्राहकाच्या सुविधेतेमध्ये चहा, पाणी, स्वच्छतागृह आदी सर्व असते. ( अर्थात याची किंमत बिलात वसूल होत असणार पण ती सर्व ग्राहकांमध्ये विभागली जाते.) 
- जे जे स्पेअर ठरावीक कालावधीत बदलावेच लागतात ते ते बदलल्या जातात किंवा तसा सल्ला तरी दिला जातो.
- वाहन दुरूस्तीचा इतिहास हा नोंद केला जातो. त्याचे किलोमिटर रंनींग, काय दुरूस्ती केली ते ते सारे नोंद असल्यामुळे वाहन खरेदी- विक्रीच्या वेळी हा उतारा पाहील्यास ग्राहकाचा फायदा होतो.
- देखभाल करार हा संपूर्ण भारतातील सर्वीस स्टेशन मध्ये लागू होत असल्याने प्रवासी वाहन भारतात कोठेही मेंटेन होवू शकते.
- रोड साईड असीस्टंट उपलब्ध असल्याने रस्त्यात कोठेही गरज असेल तर त्यांची माणसे वाहन दुरूस्तीला येवू शकतात.
- अपघातग्रस्त वाहनांची देखभाल आणि इंन्शूरंसची कामे अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये केल्यास ग्राहकाला मानसीक त्रास कमी होतो. 
- आजकालची वाहने ही कॉम्पूटराईज्ड किंवा सेंसर बेस्ड असल्याने त्याचे सॉप्टवेअर, ब्लॉक डायग्राम ह्या अथोराईज्ड ठिकाणीच उपलब्ध असतात.  

----------------------------------------------------
अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटरमध्ये गाडी दुरूस्त अथवा ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करारामुळे होणारे तोटे:-
- अथोराईज्ड सर्वीस सेंटरमध्ये केवळ चालू काम केले जाते असा ग्राहकाचा समज होवू शकतो.
- वाहन आपल्या परोक्ष देखभाल, दुरूस्त केले जाते. वाहनाच्या अगदी जवळ उभे राहू दिले जात नाही. काचेपलीकडून पहावे लागते. 
- स्पेअर, ऑईल आदींच्या किंमती बाजारापेक्षा महाग वाटू शकतात. ( परत त्यात टॅक्स पेड बील असते.)
- दुरूस्ती करणारे मेकॅनीक्स पगारी असल्याने ग्राहक पुन्हा आला नाही तरी त्यांचा पगार चालू असतो.
- एखादा स्पेअर किंवा पार्ट गरज असल्यास संपूर्णच बदलावा लागतो. (उदा. वायरींग मध्ये काही प्रश्न असेल तर संपूर्ण वायरींग सेट किंवा वायर हारनेसच बदलावा लागतो. वायर जोडणे, टेप मारून चिकटवणे आदी प्रकार सहसा होत नाहीत. यामुळे दुरूस्तीची किंमत वाढते.)
- देखभाल करण्यासाठी वाहन ठरावीक जागीच (अर्थात शहरात किंवा संपूर्ण देशात त्यांची साखळी-चेन असते) न्यावे लागते. त्यातही वेटींग लिस्ट आदी प्रकार क्वचित होत असतील.
------------------------------------
आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये वाहन ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करार न करता दुरुस्तीचे फायदे:

- आपल्या ओळखीचे रिपेअर सेंटर/ गॅरेज असल्यामुळे मित्राच्या नात्याने देखभालीत सल्ला मिळू शकतो.
- आपल्या डोळ्यासमोर वाहन दुरूस्त होते.
-  एखादा स्पेअर किंवा पार्ट गरज असल्यास त्यातील काही भागच दुरूस्त करून दिला जातो. त्याने खर्चात बचत होते.
- बाजारभावापेक्षा कमी भावात स्पेअर, पार्टस यांच्या किंमती असू शकतात.
- रोडसाईड गॅरेज कोठेही उपलब्ध असल्याने आपण आपल्या मर्जीनुसार तेथे वाहन नेवू शकतो.
- मेंटेनंस करार केलेला नसल्याने तो करार करण्याची किंमत वाचू शकते.
--------------------------------------------
आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये वाहन ठरावीक कालावधीच्या मेंटेंनंस करार न करता दुरुस्तीचे तोटे:

- आपल्या ओळखीच्या किंवा रोड साईडच्या सेंटर/ गॅरेजमध्ये अनेक कंपनी किंवा अनेक मेकच्या गाड्या येत असतात. त्यामुळे तेथे कंपनी प्रशिक्षीत कामगार, मेकॅनीक उपलब्ध असेलच असे नाही. एखादा नवीनच मेकॅनीक असेल तर त्याला एखादे तंत्र किंवा एखादी गाडी नवी वाटू शकते.  
- त्यांच्या कडच्या मेकेनीकला महिन्याचा पगार ठरलेला नसल्याने कामे येवोत अथवा कमी येवोत त्यांना पगाराची शास्वती नसू शकते. बहूदा एखादाच मेकॅनीक सगळ्या गॅरेजची मदार सांभाळतो. 
- त्यातील मेकॅनीकला देखील काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असल्यास दुसर्‍याची मदत घेण्यावर मर्यादा येतात. 
- गाडीच्या देखभालीसाठी सर्व टुल्स, स्पेअर्स हे एकाच छताखाली न मिळाल्याने चालढकल केली जाते. त्यामुळे कामात दिरंगाई, स्पेअरमध्ये चालढकल केली जाते.
- रोडसाईड गॅरेजवाल्यांकडे योग्य ते टुल्स असतातच असे नाही.
- शक्यतो असे सेंटर अस्वच्छ, प्रकाश नसलेले, कळकट असतात. जेवणाच्या वेळा, सुटीच्या वेळा, रजा आदी  नसल्याने त्याचा अयोग्य परिणाम कामावर होतो.
- स्पेअर हे डुप्लीकेट असण्याचा संभव होवू शकतो. किंमत ठरलेली नसते. त्यामुळे ग्राहकाला फसवले गेल्याचा फील येवू शकतो. 
- ग्राहकाच्या सुविधेतेमध्ये चहा, पाणी, स्वच्छतागृह आदी नसते.
- जे जे स्पेअर ठरावीक कालावधीत बदलावेच लागतात ते ते बदलल्या जातीलच याची खात्री नसते.
- "चलता है", ही प्रवूत्ती या ठिकाणी पहायला मिळते. 
- वाहन दुरूस्तीचा इतिहास नोंद केला जात नाही.
- देखभाल करार केल्यास हा फक्त त्याच सर्वीस स्टेशन मध्ये लागू होत असल्याने आपले वाहन इतर ठिकाणी दुरूस्त केल्यास आर्थीक बोजा ग्राहकावर पडतो.
- रोड साईड असीस्टंट उपलब्ध  नसल्याने रस्त्यात कोठेही गरज असेल तर त्यांची माणसे वाहन दुरूस्तीला येवू शकत नाहीत.
- अपघातग्रस्त वाहनांची देखभाल आणि इंन्शूरंसची कामे तेथे होत नसल्यास दुसरीकडे नेवून दुरूस्ती करावी लागते.
- आजकालची वाहने ही कॉम्पूटराईज्ड किंवा सेंसर बेस्ड असल्याने त्याचे सॉप्टवेअर, ब्लॉक डायग्राम तेथे उपलब्ध असतीलच असे नाही. 

--------------------------------------------
काही सदस्यांचे प्रतिसाद (नामोल्लेख टाळलेला आहे.):

गाडीने आवाज केला की डॉक्टर कडे न्यावं ह्या मताचा मी आहे

कुठल्याही पॅकेज मध्ये ते घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याचा जास्त फायदा असतो.
त्यापेक्षा फायरिंग नीट ऐकावं, चार चाकी असेल तर Malfunction light लागतोच, तो लागला की न्यावं गॅरेजमध्ये ह्या मताचा आहे मी

गाडीचं आयडलिंग, फायरिंग रोज ऐकत असू तर बिनसल्यावर लगेच जाणवतं. 

प्रायव्हेट garage वाला आपल्या दोस्ती खात्यात घेतलेला आहे. तो योग्य वेळी योग्य सल्ला देतो

--------------------------------------------
हे झाले ब्रेकडाऊन मेंटेनन्स.

प्रिव्हेंटिव मेंटेनन्स असेल तर वाहन रात्रीतून कधीही बाहेर चालवायला छातीठोक काढता येते.  

वेळोवेळी स्पेअर जसे  स्पार्क प्लग, टायर रोटेट बॅलसींग, दुचाकीमध्ये कार्बोरेटर साफ करणे, गाडी धुणे आदी कामे होवून जातात.

अन तुम्हाला जसा मित्र गॅरेजवाला मिळाला तसे सगळ्यांनाच मिळेल असे नाही. 

--------------------------------------------
>>> गाडीने आवाज केला की डॉक्टर कडे न्यावं ह्या मताचा मी आहे

असहमत

>>> प्रायव्हेट garage वाला आपल्या दोस्ती खात्यात घेतलेला आहे. तो योग्य वेळी योग्य सल्ला देतो

सहमत

वकील, डॉक्टर प्रमाणे विश्वासू गॅरेज वाला पकडायचा... चुकीचा सल्ला देणार नाही इतपत विश्वास त्याने कमावला पाहिजे. आणि आपल्याकडून आळस झाला तर त्याने चार शिव्या दिल्या पाहिजेत इतका अधिकार त्याला दिला पाहिजे.

मित्र आहे, ओळखीचा आहे म्हणून कधीही रेटमध्ये घासाघीस करू नये, हवे तर त्याच्याकडून एखादेवेळी हक्काने पार्टी घ्यायची पण तो सांगेल तितके पैसे द्यायचे आणि वर थोडे पैसे त्याच्याकडे काम करणाऱ्याला न विसरता द्यायचे.
--------------------------------------------
येस, पैशांच्या बाबतीत मी कधीच घासाघीस करत नाही,

म्हणून मी घरी नसेन तर गाडी  घरून पिकप आणि ड्रॉप केली जाते

शिवाय 
preventive maintenance चं म्हणाल तर मी प्रत्येक मोठ्या ट्रिप पूर्वी गाडी त्याच्याकडे देतो, एक चेकअप होतं, break oil, coolant topup वगैरे. 

जोडीला दर 6 महिन्याने मी स्वतःच गाडी नेऊन देतो आणि सांगतो चालवून बघ, जे गरजेचं वाटेल ते कर

झालंच तर तो करतो, काम नाही केलं तर consultation चार्जेस घेतो
त्यामुळे नातं नीट राहिलेलं आहे
--------------------------------------------
गॅरेजवाल्यांचा, वाहन दुरुस्त करणार्यांचा स्वभाव हा सर्वांशी मैत्री करणारा असाच असतो. 
तो अनेकांचा मित्र असतो. मग आपल्यालाही तो जवळचा वाटू शकतो.

अन आपण जसा गॅरेजवाल्याचा विचार करतो तसा तो त्याच्या ग्राहकांचाही करतच असेल ना?
मला तर कित्येकदा नायट्रोजन भरण्याचेही पैसे अथोराईज्ड वाल्यांनी अशा देखभाल करारामुळे लावलेले नाहीत.

-------------------------------------------- 
एकाचा अनुभव:

मारुती स्विफ्ट डिझायर ची फ्री सर्व्हिस संपल्यावर विक्रेत्याने बरीच विनवणी केली की वार्षिक देखभाल चा करार करा, पण माझा विक्रेत्याच्या गॅरेज मधला अनुभव होता तो चांगला नव्हता, खूप गाड्या असल्यामुळे आणि सगळे पगारी नोकर असल्यामुळे गाडीची व्यवस्थित देखभाल आणि सर्व्हिसिंग होत नव्हती, 
फक्त बिल वाढवण्याकडे कल होता, मग मी माझ्याच ओळखीच्या मारुती मकेनिक ला घरी बोलावून किंवा त्याच्या गॅरेज मध्ये जाऊन सर्व्हिसिंग करू लागलो, त्यात वेळ वाचत होताच, पैसेही वाचत होते आणि आपल्यादेखत काम होत होते.

बुलेट च्या बाबतीत तीच परिस्थिती होती, एका दिवशी 70 ते 80 गाड्या सर्व्हिसिंग करायचा त्यांचा प्रयत्न असायचा, जो कधीच सफल  होत नसे, मग गाडी फक्त धुवून परत करणे वगैरे होऊ लागले,
माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळताच मी माझ्या बुलेट मकेनिक कडे जाण्यास सुरवात केली, आता तो व्यवस्थित काम करतो, माझ्या प्रश्नांची उत्तरे देतो, अनुभवी आहे
--------------------------------------------
एकाचा प्रश्न: अगदीच ब्रेकडाऊन झाली तर गॅरेजमध्ये जाणारे यांचा अनुभव काय?

त्याला आलेले उत्तर: नियमित देखभाल केली तर गाडी ब्रेक डाउन होण्याचे प्रमाण नगण्य असते.

आणखी दुसरे उत्तर: ब्रेक डाउन होई पर्यन्त वाट का म्हणून पहायची? गाड़ी वर बसलात कि तुमचा जीव त्या गाडीच्या भरविष्या वर असतो। 50 रुपये वाचवून हात पाय तुटलेले अनेक पाहिलेत.
250 रुपये खर्च करून गाड़ी नीट ठेवणे चांगले कि ब्रेक डाउन नंतर 25000 खर्च करावे हे चांगले?

आणि हेल्मेट न वापरून हार घालून घेतलेले ...
--------------------------------------------
माझ्या मते,
आपली गाडी म्हणजे
चार चाकी / दुचाकी किती रनिंग झाल्यावर सर्व्हिसिंग करायची गरज आहे , याची माहिती आपल्या विश्वासू माणसाकडून करून घ्यावी.
उगाच रनिंग नाही, पण एक वर्षे झाले म्हणून सर्व्हिसिंग करू नये.
तसेच खाजगी, चांगल्या ओळखीच्या माणसाकडून सल्ला घेणे आणि त्या प्रमाणे योग्य मोबदला देऊन काम करणे, हे ठीक राहील.
--------------------------------------------
प्रिवेंटिव मेंटेनेंस चे शेड्यूल ओनर्स मैन्युअल ला दिलेले असतात. तेव्हड़े जरी पाळले तरी आपले वाहन कुठलाच त्रास देत नाही. स्वानुभव आहे.

निव्वळ प्रीवेंटिव मेंटेनेंस मुळे माझी "यक्षज्ञ" वाहन आज 21 व्या वर्षी ही मस्त चालत आहे. नुकताच (कोरोना लॉक डाउन पूर्वी) 4 दिवसात 1800 किलोमीटर फिरून आलो. नियमित ऑयल चेंज, टायर रोटेशन, रेगुलर सर्विसिंग मुळे हे शक्य झाले.
--------------------------------------------
एकदम बरोबर...
पैशासाठी कटकट केली नाही की मालक आणि कारागीर पण खुष असतात...
आणि अनावश्यक दुरूस्ती सांगत नाहीत आणि आवश्यक टाळत नाहीत....
माझा गेरेज वाला पण सांगतो

ये बदलना पडेगा...
तर कधी अभी चार छे महीना चलाओ फीर देखते है
वेळी अवेळी धाऊन पण येतात.
------------------------------------------- चर्चा समाप्त ---------------------------------------


वाहनाचे मालक आपण जरी असलो तरी वाहन हे एक यंत्र आहे असे समजून त्याची योग्य ती काळजी एका यंत्राप्रमाणे घेतली तर वाहन आपल्याला चांगला अनुभव देवू शकते. ते कोठे दुरूस्त करायचे हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

( सदर लेखाच्या लेखकाचा कोणत्याही वाहन कंपनीशी किंवा अथोराईज्ड सर्वीस किंवा तत्सम सेंटर अथवा गॅरेजशी संबंध नाही.) 

माझा प्रश्न: भारतात किंवा परदेशात, विकसीत देशात वाहन धारक ग्राहक आणि वाहन विक्रेते, रिपेअर करणारे यांच्या बाबतीत जी काही मानसीकता असते त्याचा पद्धतशीर अभ्यास करवणारी अभ्यास शाखा किंवा अभ्यासक्रम विकसीत झाला आहे काय? किंवा एखादा विषय, किंवा असा अभ्यास लेखन करणारे पुस्तक अभ्यासक्रमात आहे काय?  

- पाषाणभेद
११/०७/२०२०

Wednesday, June 10, 2020

बालकथा: रामूची हुशारी

बालकथा: रामूची हुशारी

एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्‍या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता.

असेच एकदा त्याला एका आजीने जळणासाठी लाकडे तोडून आणण्यास सांगितले. तिने एका फडक्यात चटणी भाकरी बांधून दिली अन रामू आपली कुर्‍हाड घेवून जंगलात निघाला. एखादे वठलेले, वाळलेले झाड दिसते का ते पाहत तो  निबीड जंगलात पोहोचला. एका जागी दोन तीन झाडे फांद्या छाटण्याजोगी असलेली होती. एका आठवड्याचा लाकूडफाटा होईल अशा रितीने लाकडे तोडून मोळी बांधू त्यानंतर घरी परतू असा विचार त्याने केला अन तो त्यातील एका झाडावर चढला. तो फांद्यांवर घाव घालणार तोच तेथे एक साधू अवतिर्ण झाला. 

"काय करतो आहेस तू मुला", साधूने रामूला प्रश्न विचारला.

रामूने साधूला नमस्कार केला आणि, "आजीबाईसाठी जळणाचा लाकूडफाटा घेतो आहे" असे उत्तर दिले.

"अरे बाबा, ही येथली झाडे नको तोडू. माझा वावर नेहमीच येथे असतो. तू दुसरीकडे का जात नाही? अन तुझे नाव गाव काय आहे?" साधूबाबांनी रामूला प्रश्न विचारले.

"महाराज, मी रामू, जवळच्याच गावात राहतो. मी काही हिरवीगार झाडे तोडत नसतो. अन हे पहा महाराज, या झाडाच्या बारक्या फांद्याच तोडतो आहे. त्यामुळे झाला तर झाडाच्या वाढीसाठी त्याचा फायदाच होईल."

"रामू, तू आधी झाडावरून खाली उतर कसा. उगाच ही झाडे तोडू नको. तू आपला दुसरीकडे झाडे शोध."

"साधू महाराज, आता एवढ्या वर आलो आहे तर घेतो चार पाच फांद्या अन मग दुसरीकडे जातो."

"नको, नको. तू येथले एक पानही तोडू नको. तू आधी खाली उतर मग मी तुला एक गोष्ट देतो. त्याने तुला कामे करण्यास मदत होईल."

आता साधू बाबा एवढी विनवणी करत आहेत तेव्हा आपण खाली उतरू अन ते काय गोष्ट देतात ते पाहूया असा विचार करून रामू झाडावरून खाली उतरला.

साधूमहाराजांनी रामूला आपल्याकडील एक रुमाल दिला.

"मुला, हा जादूचा रुमाल घे. हा असा हलवला की तुझ्या मनात जे विचार आहे त्यानुसार तुला तो मदत करेल. एखादे तोडण्याजोगे झाड आहे का असा विचार तुझ्या मनात आला अन तू रुमाल हलवला की तो तुला झाडाची दिशा दाखवेल"

"अरे वा! फारच उपयोगी आहे हा रुमाल." 

"अरे, एक सांगायचे राहीलेच बघ. हा रुमाल तू येथून अर्धा फर्लांग गेला की मगच फडकव, बरं का रामू."

"बरं साधूमहाराज", असे म्हणूत रामूने तो रुमाल घेतला. साधूबाबांचे आभार मानून शिदोरी कुर्‍हाडीला बांधली अन तो तेथून निघाला. 

थोडे दुरवर आल्यावर आता आपण तोडण्यासाठीचे झाड शोधूया असा विचार करून त्याने रुमाल हातात घेतला अन उघडून हवेमध्ये फडकावला. रुमालाकडून काहीच हालचाल झाली नाही अन काही नाही. रामूने पुन्हा प्रयत्न केला. नंतर त्याने वेगवेगळ्या प्रकारे रुमाल हलवला. वर फेकला. हाताने गोल गोल फिरवला. हातात उघडून ठेवला. परंतु रुमालाने झाडासाठी कोणतीच दिशा दाखवली नाही. 

नाराज रामू पुन्हा साधू महाराजांकडे जाण्यास निघाला.

थोड्या दुरवरून त्याला साधूमहाराज चपळाईने एक मोठे गाठोडे घेवून त्या झाडाकडून दुसर्‍या झाडाकडे जातांना दिसले. 

"अहो महाराज, हा रुमाल तर काहीच कामाचा नाही. याने तर मला कोणतीच दिशा किंवा झाड दाखवले नाही." घामाघूम झालेल्या साधूला रामूने सांगितले.

"अरे असे कसे होईल. आहेच तो रुमाल जादूचा. दाखव बघू तो इकडे." साधू महाराज उत्तरले.

रामूकडून साधू महाराजांनी रुमाल घेतला अन त्याला ते म्हणाले, "हे बघ रामू, एखादे फांद्या तोडण्याजोगे झाड आसपास आहे का याचा विचार मी आता मनात करतो आहे."

मग तो रुमाल त्यांनी उघडून हवेत फडकावला. रामू ज्या झाडावर आधी चढला होता त्याकडे त्यांचा रुमाल असलेला हात वळला अन ते म्हणाले, "अरे बेटा, हे बघ समोरच झाड आहे. त्याच्या फांद्या तू तोडू शकतोस."

"अहो बाबा, काय चेष्टा करता माझी? अहो, तुम्हीच हात झाडाकडे वळवला अन मी आधी ज्या झाडावर चढलो तेच तर झाड दाखवत आहात तुम्ही. हा रुमाल काही कामाचा नाही. तुम्ही तुमचा रुमाल तुमच्याकडेच ठेवा. मला नको हा असला रुमाल. मी आता इतक्या लांब आलो आहे तर याच झाडाच्या फांद्या तोडतो अन जातो." रामूने शिदोरी खाली ठेवली अन कुर्‍हाड घेत झाडावर चढत तो बोलला. 

साधूमहाराज शांतपणे रामू काय करतो आहे ते पहात बसले. रामू आपला सरसर झाडावर चढला अन शेंड्याकडील फांद्या छाटायला सुरूवात केली. एक मोळी होईल इतपत त्याने फांद्या तोडल्या अन तो खाली उतरायला लागला. झाडावरून उतरतांना त्याला दोन फांद्यांच्या बेचक्यात एक सोन्याची माळ अन एक दोन सोन्याची नाणी दिसली. रामूच्या डोक्यात काहीतरी वेगळे पाहिल्याचा विचार आला. 

'लांबून पाहतांना मला साधूमहाराज धावपळ करत त्यांचे बोचके या झाडाकडूनच घेवून जातांना दिसले होते. एक तर ते मला या झाडावर चढूच नको असे सांगत होते. दुसरे म्हणजे जादूचा रुमाल देतो असे सांगून माझी फसवणूकही केली. तिसरे म्हणजे मला पुन्हा हेच झाड दाखवून फांद्या तोडायलाही मनाई केली नाही. नक्कीच साधूमहाराज खोटे वागत आहेत.'    
       
साधूमहाराजांविषयी रामूला शंका आली परंतु ती व्यक्त केली नाही. आपण काही वावगे पाहीले हे त्याने भासवले नाही. न बोलता त्याने खाली पडलेल्या फांद्यांची मोळी बनवली अन साधूबाबांचा निरोप घेवून तेथून तो गावात परतला. 

साधूविषयी कुणाला सांगावे की नको या द्विधा मनस्थितीत त्याने दुपार काढली. जेवतांना शिदोरीतली भाकरीदेखील गोड लागली नाही. संध्याकाळ झाली अन तो पुन्हा एकदा त्या झाडाजवळ जाण्यास तो निघाला. पूर्ण खात्री झाली की मगच साधूविषयी इतरांना सांगावे असा विचार त्याने केला. अंधारात तो त्या जागेपासून दुर एका उंचवट्यावर लपून बसला. तेथून त्याला ते झाड अन आजूबाजूची जागा चांगली दिसत होती. 

रात्र जशी चढली तसे चांदण्याच्या प्रकाशात त्या जागी त्याला मशालींच्या उजेडात चार व्यक्ती येतांना दिसल्या. त्या चारही व्यक्तींनी डोईवरच्या फेट्याच्या सोग्याने तोंड झाकलेले होते. सकाळचा साधूही त्यात होताच. आल्यानंतर त्यातील एकाने समोरील झाडावर लपवलेल्या तलवारी काढल्या आणि आपसात वाटल्या. मशालींच्या उजेडात तळपत्या तलवारी चकाकत होत्या. नक्कीच चोरी-दरोड्याच्या उद्देशाने ते एकत्र आले होते. 

'अरे बापरे! सकाळचा साधू म्हणजे अट्टल दरोडेखोर आहे तर! मला आता सावधगिरी बाळगली पाहीजे. या दरोडेखोरांना अद्दल घडवलीच पाहीजे. मला झाड तोडू नको असे सांगतो अन स्वत: त्याच झाडावर चोरीचा माल अन शस्त्रे लपवतो काय! थांबा! तुम्हाला तुमच्या चोरीची शिक्षा कशी मिळेल तेच बघतो.'

रामूने गावातल्या राजाच्या अंमलदाराला ही हकीकत सांगण्याचा विचार केला. सावकाश, लपतछपत रामू कसलीही घाई न करता गावात परतला. दिवसभराचे श्रम, मनातले विचार अन दोन वेळा जंगलात जाण्यामुळे खरे तर रामू दमला होता. रात्रीच्या जेवणाचाही विचार न करता रामू गावातल्या अंमलदाराच्या घरी तडक पोहोचला. अंमलदार जेवण करून आराम करत होते. रामूने त्यांना भेटून सकाळपासून आतापर्यंत जे जे घडले ते ते कथन केले. एका मुलावर विश्वास कसा ठेवायचा असा अंमलदारांच्या मनात विचार आला परंतु गेल्या महिन्यापासून दर दोन एक दिवसात आसपास चोरीची घटना घडल्याची वर्दी त्यांच्यापर्यंत येतच होती. रामूच्या माहितीची झाली तर त्यांना मदतच होणार होती.
 
अंमलदारांनी तातडीने हालचाल केली आणि आपल्या शिपायाला हवालदार तसेच सात आठ सैनीकांना बोलावणे धाडले. दरम्यान त्यांनी रामूच्या प्रकृतीची अन जेवणाची चौकशी केली. रामूने जेवण न केल्याचे समजताच त्यांनी त्याला घरात जेवायला बसवले. 

हवालदार, सैनीक आल्यानंतर स्वत: अंमलदार आणि रामू अशी फौज जंगलाच्या दिशेने त्वरीत निघाली. रामूने ज्या ठिकाणापासून साधूची वर्दळ पाहिली तेथपर्यंत ते आले. अजूनही मशालींचा उजेड तेथे होताच. म्हणजेच ते चारही दरोडेखोर तेथे होते. हवालदारांच्या इशार्‍यानिशी दबक्या पावलांनी सैनीकांनी तेथील झाडांभोवती वेढा टाकला. दरोडेखोरांनी त्यांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला परंतु सैनीकांनी चपळाई करून चारही जणांना पकडले. झाडावर लपवलेले दागीन्यांचे गाठोडे सैनीकांनी हस्तगत केले व चारही जणांना बांधून गावात आणले.

रामूच्या हुशारीने अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात अंमलदारांना यश मिळाले होते. रामूचे वय, हुशारी अन त्याच्या एकटेपणाची परिस्थिती पाहून अंमलदारांनी रामूच्या शिक्षणाची सोय राजाकडे केली अन मोठा झाल्यानंतर राजदरबारात नोकरी लावून देण्याचे त्याला आश्वासन दिले. 

Friday, May 29, 2020

ढासळला वाडा: कथा

ढासळला वाडा: कथा

नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे. 

असाच एकदा नागपूरला आलो असता या वेळी मात्र मुद्दामच गावी चक्कर मारावी लागली. एका नातेवाईकाच्या मुलीसाठी स्थळ सोधण्याचे काम होते. ते गाव आमच्या मुळ गावाच्या नदीच्या पलीकडे एक किलोमीटर अंतरावर होते. मी नागपूरला आलेलोच होतो. पुढे दोन दिवस गुडफ्रायडे, शनिवार, रविवार अन माझी रजा अशी पाच एक दिवसाची सुट्टी होती. त्याच्या मुलीला पहायला आलेल्या मुलाच्या स्थळाची चौकशीसाठी त्याला गावी जाणे भाग होते. मी त्याच भागातला असल्याने माझी झालीच तर मदतच होईल अशा अर्थाने त्याने मला तिकडे येण्याविषयी त्याने आग्रह धरला होता. मी तयारच होतो. वेळ मिळाला तर गावाकडच्या घराकडे चक्कर मारता येईल असा विचार होताच. त्याचे काम झाल्यावर मी स्वतंत्रपणे नागपूरला येईल असे त्याला सांगितले. सकाळीच आम्ही नागपूर सोडले अन त्याच्या खाजगी कारने गावी निघालो.

गावी आता फार काही राहीले नाही आमचे. एक मोठा वाडा आमच्या कुटूंबाचा होता. लहाणपणी माझे वडील, त्यांचे सख्खे चार भाऊ, तिन बहिणी, त्यांचे दोन चुलत भाऊ त्या वाड्यात राहत असत. वाडा भला थोरला दोन मजली होता. बाजूलाच त्यांचा सावत्र चुलत भाऊ अन त्याचा परिवार राहत होता. झालेच तर नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक असे सारे त्या गावात होते. गावी आमच्या समाजाच्या नावाची गल्लीच होती. मध्यवर्ती असल्याने मुख्य बाजार आमच्याच गल्लीत भरायचा. समाजाची मालकी असलेल्या लाकडी कोरीव काम असलेल्या मोठ्या विठ्ठल मंदीरात लग्न कार्ये होत.    

लहाणपणी काय असेल ते असो पण मोठ्या माणसांतली भाऊबंदकी आणि त्यावरून होणारी भांडणे मला समजायची नाही. एकतर माझ्या वडीलांचीही बदली होत असे. त्यामुळे गावी वाड्यावर जाणे अन राहणे हे शालेय सुट्या अन काही कार्य असेल तरच होई. इतर वेळी आम्ही त्यांच्या बदलीच्याच गावी राहत असू. नाही म्हणायला गावातून कोणी आमच्या घरी आले तर ते शेतातले धान्य, भाज्या किंवा तत्सम वस्तू आणत. तेवढाच गावाचा संबंध. बाकी गावाची शेती वडील आणि त्यांच्या भावांच्या एकमेकातल्या भांडणात, चुलत भावांच्या व्यसनाधीनतेत कमी कमी होत गेली. मी, माझे चुलत भाऊ नोकर्‍यांमुळे गावातून बाहेर पडलो होतो. वडिलांची पिढी खपल्यानंतर गावाच्या जमीनीचा वारस कोण किंवा वाडा आहे की पडला याचीही काही खबरबात मला नव्हती. एकप्रकारे गावापासून मी तरी नोकरीमुळे तुटलो होतो. नाही म्हणायला अधून मधून गावाकडून एखादी लग्नपत्रीका किंवा कुणी नातेवाईक गेल्याची बातमी यायची. तेवढाच गावाशी संबंध. 

ड्रायव्हरने रस्त्यात चहा पिण्यासाठी गाडी रस्त्यात एका हॉटेलपुढे थांबवली अन मी माझ्या जुन्या विचारांतून बाहेर पडलो. आता यापुढील रस्ता कच्चा असल्याने स्थळ असलेल्या गावी पोहोचायला कमीत कमी एक तास तरी लागेल असे त्याने बोलून दाखवले. आम्ही सार्‍यांनी नाश्टा चहा घेतला अन निघालो. उरलेल्या प्रवासात मला छान झोप लागली. साधारण अकराच्या सुमारास आम्ही नातेवाईकाच्या स्थळाच्या गावी पोहोचलो. चहा पाणी होईपर्यंत बोलण्यातून आमची ओळख निघाली. जुने संदर्भ, धागे जुळले. बरोबरच्या नातेवाईकाने मुलाची चौकशी केली. त्यांचे पुढे एकदोन बैठका घेण्याचे ठरले अन जेवण करण्याची वेळ झाल्याने आम्ही तेथेच जेवणे केली. नातेवाईक तेथे थोडा वेळ अजून थांबणार असल्याने मी सर्वांचा निरोप घेवून मी गावी जाण्यास निघालो.

मधली नदी अन त्यावरील पुल ओलांडला की लगेचच माझ्या गावी पोहोचणे होणार होते. केवळ एखाद किलोमीटरचा प्रश्न होता. परंतु तेवढ्या अंतरासाठीही प्रवासी रिक्शा तेथे हजर होत्या. वास्तविक हा पुल आणि रस्त्याचा हा भाग म्हणजे माझ्या गावाच्या मागचा भाग होता. गावाच्या समोरून जाणारा व तालूक्याला जोडणारा रहदारीचा मुख्य रस्ता बरोबर या पुलाच्या विरूद्ध दिशेला होता. तिकडेच बस स्टॅंड होता. मी जर बसने गावी गेलो असतो तर मला त्या बाजूलाच उतरावे लागले असते. पण एका बस स्थानकाभोवती जशी गर्दी असते तशी वाहन-दुकानांची गर्दी या पुलाकडच्या रस्त्यावर झालेली होती. 

मला आठवते, आता असलेला हा पुल पूर्वी नव्हता. नदी काही बारोमास वाहणारी तेव्हाही नव्हती आताही नाही. तेव्हा मात्र पावसाळा अन हिवाळा असे दोन ऋतू तरी नदीला पाणी असायचे हे नक्की. माझ्या चुलत भावंडांबरोबर मी नदीला पाणी असतांना त्यात खेळलोही होतो. मला पोहोता येत नसल्याने काठावर असलेल्या थोड्या पाण्यात मी पडून राही. गावातल्या स्त्रीया नदीवर घुणे धुत. नदीत दगड वगैरे असे काही नव्हते. मऊशार वाळूच वाळू होती. तेव्हा नदीतून वाळू काढण्याचे प्रकार होत नसत. नदीचे सर्व पात्र पावसाळ्यात पाण्याने भरलेले असे. त्या नदीपात्रातच गावाची यात्रा भरत असे. उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही त्या पात्रात पाणी नसल्याने पतंग उडवणे किंवा क्रिकेटचा डाव आदी खेळत असू. आताच्या काळासारखे त्या काळी क्रिकेटचे प्रस्थ नव्हते. गावातल्या सोनार कुटूंबात असलेल्या मुलाकडे क्रिकेटची बॅट होती. त्यामुळे त्याला खेळात घेतले जाई. काहीच खेळ जरी नसला तरी केवळ भटकायला म्हणून आम्ही लहान मुले नदी किंवा आसपास फिरत असू.

मी पुलावरून चालत गेलो. नदीला अर्थातच आताही पाणी नव्हते. आजूबाजूचा बराचसा भाग पूर्वीपेक्षा जास्त  रखरखीत, भकास वाटला. रस्त्यातील शेतं, त्यातली घरे, विहीरी यांची पूर्वीची ओळख पुसल्यासारखी झाली. दोन गावाच्या जवळील रस्ता असल्याने आजूबाजूला आता घरे झाली होती. पूर्वी याच भागात शेते किंवा खळे होती. रस्ता सुनसान असायचा. आमच्या गावाला येण्यासाठी नदीतून वर चढावे लागे. त्या चढावाच्या रस्त्यावर बैलगाडी चढतांना बैलांची दमछाक होत असे. आता मी पुलावरून आमच्या गावात शिरलो तेव्हा त्या चढाचे नामोनिशाणदेखील राहीले नव्हते. अगदी सपाट रस्त्याने काहीही श्रम न पडता मी गावात शिरलो होतो. गावात शिरतांना लागायचे ते वडाचे झाड होते तसेच होते. मात्र त्या खाली आता टपर्‍या अन हातगाड्यांनी वेढा दिला होता. माझ्या लहाणपणी तेथे सायकल रिपेअरचे मुसलमान चाचाचे केवळ एकच दुकान होते. मला आठवते, त्या दुकानातून आम्ही भावंडे लहान सायकली तासावर भाड्याने घेत असू. भाड्याने देण्यासाठी असलेल्या इतर मोठ्या सायकली देखील रांगेने तेथे लावलेल्या असत. गावातील गरजू किंवा फिरते विक्रेते अशा सायकली भाड्याने घेत. त्या दुकानाचा बहुदा मालक किंवा वरीष्ठ असलेला तो पांढरी दाढीधारी चाचा एका साधूप्रमाणे डोळे झाकून स्वस्थ बसलेला असे. केवळ पैसे घेणे-देण्याचेच काम तो करी. सायकली दुरूस्त करणारे त्याचे भाऊबंद त्याला ओरडून गिर्‍हाईकांचे किती पैसे घ्यायचे ते सांगत. आता ते दुकान होते त्या पेक्षा छोटे झालेले दिसले. भाड्याने देण्याच्या मोठ्या सायकली दिसल्या नाहीत. मोटरसायकलींच्या जमान्यात आजकाल कोण सायकल अन ती सुद्धा भाड्याची असलेली वापरणार? गल्यावर बसणारे दाढीधारी चाचा काही दिसले नाहीत. अर्थात ते केव्हाच निवर्तले असावे. ते तेथे असण्याची अपेक्षाच चुकीची होती. मध्ये पन्नास एक वर्षांचा कालावधी गेलेला होता. जुन्या ओळखीच्या खुणा बदलल्या असणारच. 

वडाच्या झाडाखाली बकाल परिस्थिती झालेली दिसली. तेथली हॉटेले, हातगाड्या, कटिंगची दुकाने आदी सारे सारे इतर गावांच्या सुरूवातीला असते तसे वातावरण तयार करत होते. त्या देखाव्याला एकजिनशीपणा म्हणाल तर होता किंवा नव्हता. नव्हता अशा अर्थाने की तेथेल्या टपर्‍या अन दुकानांमुळे नदीकाठाच्या माझ्या मनात असलेल्या दृष्याला कोठेतरी तडा गेल्याचे मला जाणवले. वडाच्या झाडाच्या आजूबाजूला बरेच मोकळे वातावरण पूर्वी होते. तेथून चारशे पाचशे मीटर अंतरावर एका साधूच्या समाधीचे मंदीर आधी होते त्या पेक्षा मोठे केलेले दिसले. आधीचे मंदीर लाकडी अन छोटेखानी होते. आता ते आधूनिक पद्धतीने विटा-सिमेंटमध्ये बांधलेले होते. मंदीरावरील कळस, कंपाऊंडची भिंत लांबूनही दिसत होती. त्या मंदीराच्या बाजूला एक मोठी विहीर होती. आताही असावी. तिचे पाणी त्या महात्म्याच्या पुण्याईने कधी न आटणारे समजले जाई. पण एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो असता ती विहीर कोरडी पडल्याचे मी पाहीले होते.

तेथून जवळच एका मोकळ्या जागी ग्रामपंचायतीने तयार केलेली व्यायामशाळा तेव्हा होती. तेव्हाची ती बैठी खोली तेथेच होती पण तिची बरीच पडझड झालेली दिसली. तेथे त्या काळी लहान असलेले पिंपळाचे झाड मात्र मोठे झालेले दिसले. थोडे पुढे आल्यानंतर माझ्या मोठ्या चुलत्यांच्या मित्राचे ‘उपाध्ये हॉटेल’ आणि त्यांचे घर असलेली इमारत लागे. त्या इमारतीपासूनच खरे गाव सुरू होत असे. हॉटेलीत पेढे बनवतांना जो कुंदा तयार होत असे तेव्हा माझे चुलते आम्हा लहानांना तेथे नेत असत. आम्ही सारे लहान भावंड डुगडुगणार्‍या टेबल बाकड्यांवर बसून तो गरम कुंदा खात असू. काका तसे हौशी होते. यात्रेत सर्कस पाहण्यास तेच नेत. निरनिराळी खेळणी मागीतली असता त्यांचा नकार आलेला कधी पाहीला नव्हता. फार लवकर गेले बिचारे. आताही ते हॉटेल तेथे होते. रस्ता आता उंच झाल्याने ते हॉटेल असलेली इमारत खुजी दिसत होती. हॉटेलची पाटी जुन्याच पद्धतीने ऑईल पेंटमध्ये रंगवलेली पत्र्याची होती. आधूनिक फ्लेक्सच्या जमान्यात ती अगदीच विजोड वाटत होती. दुकानाची रयाही गेलेली दिसली. माडीवर लोखंडी ग्रील टाकून इमारत विभागली गेलेली दिसली. एका बाजूला लाकडी जीना होताच पण दुसर्‍या बाजूने लोखंडी जीना तयार केलेला दिसला. वाढत्या संसाराबरोबर उपाध्यांच्या वारसांनी इमारतीची वाटणी केल्याचे पाहताक्षणीच समजत होते. हॉटेलात जावून जुनी ओळख वगैरे दाखवावी हा विचार मनात होता. पण का कोण जाणे एकप्रकारे अनोळखी किंवा अलिप्त राहत गावात जे जे पहायला मिळेल ते ते पहावे असा विचार बळकत होत गेला आणि मी तेथे न थांबता पुढे निघालो. 

पुढे एक शाळेची इमारत होती. तेथे बाजूलाच बैठ्या खोलीत त्या काळी दहा बारा विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय संस्थेने केलेली होती. आता त्या शाळेच्या इमारतीच्या वर एक मजला चढवून त्यावर पत्रे टाकलेले दिसले. खाली जुने दगडी बांधकाम आणि वरचा मजला वीटकामातला अशी ती इमारत डोळ्यांना अजिबात चांगली दिसत नव्हती. त्यातच वीटकामाला साधे प्लास्टरही केलेले नव्हते. शाळेसमोर मोठे मातीचे पटांगण होते त्या काळी. लहाणपणी तेथे खो-खो चे खांब रोवलेले आणि कबड्डी साठीचे मातीचे रेखीव मैदान होते. आता तेथे आजूबाजूला घरे आली. पटांगणात तर वाळू, वाहनतळ समजून पार्क केलेल्या गाड्या अन छोटे टेंपो यांची गर्दी झालेली होती. रस्त्याच्या बाजूने चार पाच दुकानांसाठी गाळे काढून ते भाड्याने देऊन संस्थेने कायमस्परूपी उत्पन्नाची सोय केलेली दिसली. एकुणच समाजसंस्था व्यावसायीक झाल्याचे ते द्योतक होते. वास्तवीक आहे तीच इमारत छान बांधता आली असती. मैदानाची देखभाल करून राखून ठेवता आले असते. संस्थेने सरकारी अनुदान कल्पकतेने वापरले पाहीजे होते.

त्याच्याच पुढे जिल्हा परिषदेने बांधलेली वर्ग एक ते चारची कौलारू इमारत आहे तशीच होती. आताचा दिसणारा बदल म्हणजे शाळेच्या आजूबाजूला बांधलेले दगडी कंपाऊंड. माझे चुलत भावंड याच शाळेत शिकून मोठे झाले होते. एक दोन भावंडांना मी मोठा म्हणून त्यांना शाळेत सोडायला देखील गेलेलो होतो. का कोण जाणे पण मला ती शाळा कधीच आवडलेली नव्हती. त्या भावंडांना शेण गोळा करून शाळा सारवायला देखील लागे. बदलीच्या गावी माझी शाळा या शाळेपेक्षा कितीतरी पटींनी चांगली होती. लहाणपणी शाळेची तुलना करायचो तशी तुलना आताही माझ्या डोक्यात होत होती. 

डाव्या हाताला वळून आता मी गावाच्या मुख्य भागाकडे वळलो. सुरूवातीलाच होत्या त्याच जागी ग्रामपंचायतीची इमारत आता सिमेंट मध्ये बांधलेली दिसली. इमारतीच्या वरतीच तलाठी कार्यालायाचादेखील   फलक लावलेला दिसला. माणसांच्या गर्दीने ती इमारत व्यापलेली होती. आजूबाजूला एक दोन हॉटेल आणि किराणा दुकान होती. झेरॉक्स काढून मिळेल अशा अर्थाचे पिवळे बोर्ड उन्हात नजरेला त्रास देत होते. एका अर्थाने माझे हे गाव आजूबाजूच्या पंचक्रोषीत मोठे अन टुमदार होते. नदीच्या पाण्याने आजूबाजूला बागायती होती. गावाच्या ग्रामपंचायतीला आजूबाजूची चार एक खेडीही जोडलेली होती. शेतीमाल, भाजीपाला अन अन्यधान्य यांनी शनिवारी भरणारा आठवडी बाजार गजबजून जाई.
 
आठवडे बाजाराचे मैदान सोडून मी सरळ निघालो अन आमचा वाडा असणार्‍या गल्लीत शिरलो. गल्ली खूपच बदलेली दिसली. सुरूवातीच्या दोन घरांमध्ये असलेले शिंपीकामाचे दुकान आता तेथे नव्हते. त्या काळी हे दुकान खूपच उंचावर होते. लाकडी पायर्‍या चढून आत शिरावे लागे. माझ्या आजोबांच्या काळात मला एकदा तेथूनच शाळेचा गणवेश शिवला होता. आता केवळ ते दुकानच नव्हे तर सगळी गल्लीच बुटकी वाटायला लागलेली होती. खूप दिवसांनंतर एखादी वस्तू पाहील्यावर ओळख पटेनाशी होते तसे माझे झाले होते. त्या घराशेजारीच आमच्या एका नातेवाईकाचे घर होते. त्या काळी ते नातेवाईक गावचे मोठे प्रस्थ होते. शेतजमीन भरपूर असल्याने त्यांच्या लाकडी इमारतीच्या दर्शनी भागात धान्याने भरलेल्या पोत्यांच्या थप्या लागत. इमारत देखील गेरू अन चुन्याच्या रंगाने रंगवलेली दिसे. आता आहे त्या इमारतीला गेल्या कित्येक दिवसांत रंग तर सोडाच पण तेथे झाडलेले देखील जाणवत नव्हते. पुर्वीची लाकडी दारे जावून आता तेथे लोखंडी दरवाजे दिसत होते. त्या सलग चार एक खोल्या होत्या. कधी काळी मी त्या खोल्यांमध्ये गेलोही होतो. आता तेथे जाण्याचे काहीच कारण नव्हते. 

लांबून पाहीले असता आमची गल्ली तिरपी तिरपी पुढे गेल्याचे तुम्हाला आढळेल. पूर्वी गाव वसेल तसे वसत असे. ज्याची जशी जागा आणि ऐपत तसे बांधकाम ज्याने त्याने केलेले असे. आताही पूर्वी होते तेच घरे, वाडे कुणी सांभाळले होते किंवा पडले, लक्ष न देता आले म्हणून बख्खळ सोडले होते. पूर्वी होत्या त्या घरांसमोरील सांडपाण्याच्या गटारी होत्या तशाच होत्या. फक्त त्या वेळचे मातीचे रस्ते जाऊन आता सिमेंटचे रस्ते आलेले होते. त्या रस्त्यांच्या भर टाकण्यामुळे आहे ती घरे रस्त्याच्या खाली गेलेली होती. आधी घरांत शिरतेवेळी कमीतकमी तिन चार पायर्‍या चढाव्या लागत. आता पायर्‍या चढणे दुरच उलट काही घरात शिरण्यासाठी खोल पायर्‍या केलेल्या आढळल्या. एका मोकळ्या जागी पाण्यासाठी हातपंप त्या वेळी होता. आता तेथे हातपंप काढून जलपरी असलेली मोटर लावून ते पाणी नळाद्वारे पुढे नेलेले दिसले. बहूदा नळाच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीने तेथूनच केलेली असावी. पुढे आलो असता आमचा पडका वाडा दिसला. वाड्याची सद्यस्थिती पाहून नकळत डोळ्यात आसवे दाटून आली. 

एकेकाळी याच वाड्यात आम्ही राहीलो, खेळलो होतो. वर्षाचा दिवाळीसारखा सण सारे काका चुलते, भावंड एकत्र साजरे करत असू तेव्हा गल्लीत आमच्यासारखी शोभा कुणाचीच नसे. मोठ्या काकांना फटाके फोडण्याचा मोठा शोक. त्या काळीही ते हजार हजार रुपयांचे नव्या फॅशनचे फटाके निवडून निवडून आणत. आमच्या वाड्याच्या एका तुळईला दोर्‍याचे एक टोक अन थोडे पुढे असलेल्या रस्त्यावरील विजेच्या खांबाला दुसरे टोक बांधून त्यावर आगगाडी असलेला फटाक्याचा प्रकार ते लावत. ती आगगाडी असलेला फटाका या टोकापासून सुरू होवून समोरील विजेच्या खांबाला धडकून पुन्हा आमच्या वाड्यापर्यंत आला की आम्ही लहानगे जल्लोष करत असू. संपुर्ण गल्ली फटाक्याचा हा प्रकार पाहण्यासाठी आमच्या वाड्यापुढे जमे. त्यामुळे चुलते हा प्रकार सर्वात शेवटी पेटवत. त्या आधी आम्ही लहान मुले लवंगी आणि लक्ष्मी फटाके फोडत असू. एके दिवाळीला चुलत्यांनी फुलझाड असणारा नविन प्रकार आणला होता. एका नळकांड्यच्या आकाराचा तो फटाका आधी फुलझाड म्हणून पेटे आणि ते फुलझाड संपले की त्याचा फटाक्यासारखा स्फोट होई. त्या ऐन लक्ष्मीपुजनाच्या  दिवशी तसले एक दोन फुलझाड व्यवस्थित पेटले अन फुटले. चौथा फटाक्याचे फुलझाडही पेटले पण फुलझाड संपत आले तेव्हा त्या फटाक्याचे नळकांडे आडवे झाले आणि त्याचा पुढचा प्रकार असणारा फटाका जोरात फुटला. तो जसा फुटला त्याच्या ठिणग्या समोरील घराच्या व्हरंड्यात खेळणार्‍या लहान मुलीच्या नव्या फ्रॉकला भिडल्या. फ्रॉकने पेट घेतला. आम्ही लहान तर घाबरलोच. लगोलग इतर चुलते, त्या मुलीचे पालक पळत गेले आणि त्यांनी ती आग विझवली. त्या मुलीला काही इजा झाली नव्हती म्हणून अगदी थोडक्यात निभावले. त्या वेळेपासून काकांनी असले नव्या प्रकाराचे फटाके आणणे बंद केले. 

आता त्या वाड्यात दिवाळी साजरी करणारे कुणीच उरले नसल्याचे माझ्या लक्षात आले. उमाळा येवून तेथेच रडे फुटते काय असा भास मला झाला. मी स्वत:ला सावरले. काळ किती निष्ठूर असतो याची प्रचीती मला येत होती. तिन पिढ्या आनंदाने नांदवणारा वाडा आता पोरका झाला होता. त्याची देखभालदेखील करणारा आता कुणीच उरला नव्हता. चुलत भावडांपैकी आता कुणीही त्या वाड्यात राहत नव्हते. प्रपंच चालवण्यासाठी शेतावरील घरात राहणे त्यांना भाग होते. भावकीच्या वाटणीत माझ्या वडीलांच्या वाट्याला काही न आल्याने, पर्यायाने मी तेथला कागदोपत्री वारस नसल्याने तो एवढा मोठा वाडा मला असून नसल्यासारखा झाला होता. वाड्याचा वरचा मजला कधीच पडलेला असावा. होते ते सागवान लुटल्या गेलेले दिसले. जर होता तोच वाड्याचा साठा निट उतरवला असता तर कुणी त्या लाकडाला खरेदीदारही भेटला असता. परंतु भाऊबंदकी फार वाईट. मला मिळाले नाही तरी चालेल पण इतरांना मिळू देणार नाही ही वृत्ती त्या भरलेल्या वाड्याच्या नाशाला कारणीभूत ठरली होती. वाड्याचा दर्शनी भाग थोडाफार शाबूत होता. मुख्य दरवाजाला कुलूप जरी लावलेले दिसत असले तरी बाजूच्या भिंती पडक्या होत्या. मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या खोलीला देखील कुलूप होते. परंतु त्या खोलीत चुलतभावांचा वावर असावा. बाहेर एक सायकल उभी होती. झालेच तर झोपण्यासाठीची एक खाटही तेथे होती. वाड्याच्या आतमध्ये मात्र बरीच पडकी माती, घराचे काही भाग तसेच एक बाभळीचे झाडही होते. कधी काळी माझ्या आजोबा आजीने वाड्यासाठी कष्टाने उचलेले दगड भिंतीतून निखळले होते. काही दगडांचीही उनपाऊस खाऊन माती झाली होती. होती ती लाकडे कुजली होती. जळणासाठी चोरून नेण्याच्याही लायकीची ती उरली नव्हती. कधी काळी लग्न कार्यात शे-दोनशे पाने उठवणारा वाडा आज सुना झालेला होता. कित्येक वेळा शेतातली गडी माणसे रात्रीच्या वेळी आधार म्हणून वाड्यात मुक्कामाला राहीली होती त्याच वाड्यात आता उंदीर घूस यांनी घरे केली होती. वाड्याचा साठाच तुटका झाला होता. ज्या कोनाड्यांमध्ये दिवाळीच्या पणत्या तेवल्या होत्या तेथे काजळीचा अंधार पसरला होता. एक भग्न वास्तू पाहून मन विषण्ण होत होते. तिकडे न पाहताच तेथून निघून जाण्याचे मन करत होते. डोळ्यात आसवे साठलेलीच होती. ती खळ्ळकन गालावर कधी आली ते मलाच समजले नाही. कमीतकमी एक विधवा आत्या तरी तेथे असावी अशी माझी अपेक्षा फोल ठरली होती. एकटी बाईमाणूस या पडक्या पसार्‍याला कोठे पुरे पडणार होती? ती देखील आता या वयात या वाड्यासारखीच विदिर्ण, उध्वस्त झाली असावी. तो वाडा म्हणजे एक सांधता पुल होता. जुन्या-नव्या पिढीला सांधणारा. तो तर कोसळलाच होता. आमच्यासारखी नोकरी करणारी भावंडे पांगली गेली होती. आपुलकीचे वस्त्र असणारे आठवणींचे धागे उसवले होते. वेळीच सावरायला कुणीच कसे पुढे आले नाही याची खंत मनात होती. वाडा लयाला जाण्यामागे प्रत्येकाचे संसार- पाश, भांडण, कमाईचे स्त्रोत कमी होत जाणे, शारिरिक दुखणी, त्यापायी होणारा खर्च, एकमेकांतला दुरावा आदी कारणे निश्चितच कारणीभूत होती. आता कितीही ठरवले तरी तो वाडा उभा राहणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे नव्या नातवंडांच्या पिढीला ते आवश्यकही नव्हते. जे जुन्या पानावर आहे तेच पुढल्या पानावर चालू ठेवणे हेच सध्याच्या घडीला हितकारक ठरू पाहत होते. उगाचच फुकाचा बडेजाव करण्यात काही अर्थ नव्हता. तरी पण एखाद्या जीवंत माणसाप्रमाणेच तो वाडा आता खंगून खंगून कणाकणाने मरत होता. वास्तूमध्येही जीव असतो असे म्हणतात. खरेच असावे ते. कारण वाड्याच्या कण्हणे जणू मला ऐकू येत होते. 

त्या वाड्यासमोर मी किती वेळ उभा होतो याचे मला भान नव्हते. एवढ्या उन्हात दुपारच्या वेळी कुणी बाहेर नव्हते म्हणून बरे झाले. मलाही माझी ओळख करवून द्यायची इच्छा नव्हती. मनाचे पाश तोडून मी तेथून पुढे निघालो. थोडे दुरवर असलेल्या चुलत भावाच्या घराकडे नजर टाकली. तो तेथेच राहत असावा अन त्याचे एकूण बरे चालले असावे. घराबाहेर एक मोटरसायकल होती. एक पाळणाही हालत असल्याचा आवाज येत होता. आजूबाजूची घरेही एका वेगळ्याच तंद्रीत असल्यासारखी ढेपाळली होती. एक दोन घरांना नवा रंग दिला जरी असला तरी घरांची ठेवण काही वर्षे मागची होती. कुणी आहे त्याच खोलीचे दोन भाग केले होते. कुणाचा आहे तो जीना पाडून दुसरा लोखंडी जीना तयार केला होता. काही घरे पडीक झालेली होती तर ज्यांची ऐपत होती आणि गरज होती त्यांनी जुनी घरे पाडून नवी केलेली होती. 

मनात विचारांची जंत्री चालू होती. आठवणींचे कढ बाहेर पडत होते. येथे आलो नसतो ते बरे झाले असते असे एक मन सांगत होते. मला थोडे थकल्यासारखे झाले होते. चुलत भावाच्या घरी जाऊन ओळख काढून पाणी तरी प्यावे असे वाटत होते. पण न जाणो ते घर त्याने भाड्याने दिले असेल अन तो स्वत: शेतात राहत असेल असाही विचार माझ्या मनात आला. मी थोडा मानसिकदृष्ट्या स्थिरावलो आणि त्या शांत गल्लीच्या दुसर्‍या टोकाने मी बाहेर पडलो. 

आता त्या लहानशा गावात फिरण्यात काही अर्थ नव्हता. एकतर ऐन एप्रिल महिन्यातील उन्हाळ्याचे दुपारचे उन आता चांगलेच जाणवू लागलेले होते. त्यात मी किमान अडीच एक किलोमीटर तरी चाललो असेल. मुख्य  म्हणजे मनानेही मी खचलो होतो. कोठेतरी थांबण्यापेक्षा सरळ बसस्टॅंडकडे जावे असा विचार केला. मुख्य बाजारपेठेत दुकानांची गर्दी होती. पुढे दुकान आणि मागे घर अशी प्रत्येक खेड्यात असते तशी रचना येथेही होती. शहरात असतात तसलेच फ्लेक्सवर छापलेले दुकानांचे बोर्ड वर लावलेले होते. तेथेच एक सहकारी आणि एक राष्ट्रीयकृत बॅंकही होती. एखाद्या बॅंकेत जावून विश्रांती घेण्याचा मोह मी टाळला. तेथून बसस्टॅंड जवळच होता. बसस्टॅंडवर पोहोचताच एका फळविक्रेत्याकडून नारळपाणी प्यायला घेतले. थोडे बरे वाटून अंगात हुशारी आली. नागपूरला परत जाण्यासाठी तालूक्याच्या गावाला जाणार्‍या बसची वाट पाहत बसस्टॅंडवर एका बाकावर बसलो.

एका अर्थाने माझे एक दुखरे स्वप्न संपले होते.

- पाषाणभेद
२९/०५/२०२०  

Wednesday, March 11, 2020

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

कितीक आजार आले अन गेले
स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले
चांगले खा प्या अन निट फिरा
सांभाळून आपल्या आरोग्याला
मंत्र हाच असे नाही दुसरे काही
व्हायरसपासून दूर रहायला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||३||
- पाषाणभेद
१०/०३/२०२०

पूर्वप्रकाशीत

Thursday, March 5, 2020

ढासळला वाडा

खालील फोटो पाहून सुचलेली कविता:




फोटो सौजन्य: ALDM Photography, Pune, 

ढासळला वाडा

ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती

सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या
दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या

टणक होते जूनेर लाकूड, उन वारा पाऊस खाऊन
भुगा केव्हाच झाला त्यांचा, अंगी खांदी वाळवी लेवून

भक्कम चिर्‍या दगडांची ढिसळली छाती
लेपलेल्या चूना पत्थरांची झडली माती

पक्षी उडाले गडी माणसे गोतावळा गेला
कुबट भयाण गूढ अंधार काळा उरला

जुन्या पिढीने भोगले जूनेच वैभव लयास गेले
नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे आले

- पाषाणभेद
०६/०३/२०२०

Sunday, March 1, 2020

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Review)

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

पार्श्वभुमी:
माझ्या एका रूममधल्या सिलिंग फॅनचा खूप आवाज येत होता. तो पोलर कंपनीचा होता. तो चालू केल्यानंतर घर्रघर्र असा आवाज करायचा. त्याला दोन वेळेस दुरूस्तही केले गेले होते. पण आता उन्हाळा सुरू होणार अन त्यात त्याचा न सहन होणारा आवाज ऐकून तो फॅन बदलायचा निर्णय घेतला.

बाजारात अनेक प्रकारचे सिलींग फॅन्स उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती अगदी ९०० रूपयांपासून सुरू होतात.

नवा फॅन घेण्यासाठी मी मार्केट मध्ये फिरलो. त्याचप्रमाणे इंटरनेटवरही सर्च केले. त्यात BLDC Motor असणारे नवे तंत्र असणारे सिलींग फॅन्स देखील आले आहेत.

घरात दुसर्‍या रूम मध्ये ओरीएंट कंपनीचा चांगला चालणारा फॅन असल्याने ओरीएंट चे फॅन्स बघीतले. इतर कंपन्यांचेही फॅन्स उपलब्ध आहेत आणि ते चांगले आहेतच. तर बीएलडीसी मोटर असणारा पोलर कंपनीचा फॅन हा ३२ वॅट मध्ये १२०० एमएम अ‍ॅल्यूमीनीअम पाती असणारा, कॉपर वायंडींग मध्ये उपलब्ध होता. हा फॅन रिमोट कंट्रोल करून वापरता येतो. त्याची किंमत २९५०/- इतकी सांगितली गेली. वॉरंटी २ वर्षे. (इलेक्ट्रीक प्रॉडक्टसमध्ये एमआरपी वेगळी आणि जास्त असते. एमआरपीला काही अर्थ नसतो.)

दुसर्‍या दुकानात क्रॉम्टन कंपनीचे बीएलडीसी मोटर सोडून इतर फॅन्स होते. त्यांच्या किंमती साधारण १२००/- रुपयांपासून पुढे होत्या.

आणखी एक दुकान पाहिले असता तेथे एक ग्राहक बीएलडीसी मोटर आणि रिमोट कंट्रोल असलेले क्रॉम्टन कंपनीचे दोन फॅन्स घेवून जात असतांना दिसला. मलाही त्या फॅन्सबाबत उत्सूकता होतीच. मी त्या फॅन बाबत दुकानदाराला विचारले. त्यात सध्या क्रॉम्टन Energion HS (रिमोट कंट्रोल सहीत) हे एकच मॉडेल बीएलडीसी मध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. त्याची किंमत रुपये ३०००/- होती. या फॅनवर वॉरंटी पाच वर्षांची आहे. मी तो फॅन घेणार असे त्या दुकानदाराला सांगितले. त्याचेकडे केवळ आयव्हरी रंगात तो फॅन उपलब्ध होता. मला तपकिरी - ब्राऊन रंगात फॅन हवा होता. मला थोडा वेळ असल्याने अन फॅन घेवूनच घरी जायचे असल्याने मी तो त्यांना उपलब्ध करून द्यायला सांगितला. त्या मालकाने होकार दिला. ग्राहकाने आग्रह केल्यास दुकानदार शेजारपाजारच्या त्याच्या ओळखीतून ती वस्तू अ‍ॅरेंज करून देतो. तो कुठून आणतो याबाबत मला काही घेणे नव्हते. मला वस्तू हवी होती आणि दुपारच्या उन्हात आणखी दुसरे दुकान पाहण्याची माझी इच्छा नव्हती. अर्थात या दुकानापासून थोडे दूर - समोरच माझ्या कॉलेज मित्राचे असलेच फॅन, कूलर, कूकर, ओव्हन, मिक्सर इत्यादी विकण्याचे दुकान आहे पण मी ते टाळले. आणि त्याचेकडे हे मॉडेल उपलब्ध असेलच असे नव्हते.

मला हव्या असलेल्या रंगाचा फॅन येईपर्यंत मग मी तेथल्या काउंटरवरील विक्रेत्याशी त्या फॅन बाबत चौकशी केली. त्याला वॅटेज विचारले असता तो ५० वॅटचा फॅन असल्याचे सांगितले. पण मला विश्वास बसला नाही. कारण रेग्यूलर फॅन्स हे साधारण ७५-८० वॅट असतात आणि आधीच्या दुकानात ओरीएंट कंपनीचा बीएलडीसी मोटर असणारा फॅन हा ३२ वॅट मध्ये उपलब्ध होता तर या क्रॉम्टन Energion HS फॅनचे वॅटेज जवळपास तितकेच असायला हवे होते. बीएलडीसी मोटर असणारा फॅन वीजेची बचत ५०% पर्यंत करतो.


माझा गोंधळ पाहून दुकानाचा मालक तेथे आला. त्याने मोबाईलमध्ये क्रॉम्टन Energion HS चे स्पेसीफिकेशन पाहून या मॉडेलचे इनपूट वॅटेज हे ३५ वॅट असल्याचे मला दाखवले. माझी खात्री पटली. तो तेथे येईपर्यंत मी देखील माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटवर या मॉडेलचे वॅटेज किती हे पाहिले. तेच दुकानमालकाने दाखवल्याने मला समाधान वाटले. या फॅनची एमआरपी रु. ३८००/- आहे.

माझ्या आवडीच्या रंगाचा फॅन येईपर्यंत त्या मालकाने मला त्याच्या डोक्यावर गरगरणारा फॅन दाखवला. तो फॅन (कंपनीचे नाव विसरलो) साध्या मोटरमध्ये होता पण तो फॅन मोबाईलमधल्या अ‍ॅपवर कंट्रोल करता येणारा होता. त्यात १ ते १०० पर्यंत फॅन स्पिड कंट्रोल करता येतो. त्यात क्वाडकोर असलेला क्वालकॉम्पचा मायक्रोप्रोसेसर होता. त्यात असंख्य सेटींग्ज होत्या जेणे करून फॅन ब्रीझ मोडवर जाणे, थांबून थांबून चालवणे, टायमर लावून चालवणे इत्यादी सोई होत्या. त्याची किंमत ४९०० रुपये होती. त्याच्याच खालचे मॉडेल ३५०० रुपयांत होते पण त्यात स्मार्ट मायक्रोप्रोसेसर नव्हता. तो नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा रुपये १५००/- मध्ये जोडून मिळण्याची सोयही होती.

माझ्या आवडीचा क्रॉम्टन Energion HS फॅन आला आणि मग मी तो पैसे देवून घरी घेवून आलो.

अनबॉक्सींग क्रॉम्टन Energion HS फॅन:
फॅनची मोटर आणि तीन पाती दोन वेगवेगळ्या बॉक्स मध्ये होती. पात्यांचे बॉक्स उघडून पाती निराळी ठेवली.

फॅनचे बॉक्स उघडल्यानंतर त्यात फॅनचे मोटर असणारा मुख्य भाग होता. त्याबरोबरच एक दांडी, हुकला टांगायचे रबरी बूश, त्याला असणार्‍या क्लॅम्स, नट बोल्ट्स, वॉशर, लॉकींग पीन्स इत्यादी होते. मुख्य म्हणजे रिमोट होता. रिमोटमध्ये बॅटरी-सेल्स नव्हत्या. ते दोन सेल्स मी बाहेरून घेतले.



फॅनची जोडणी:
बॉक्समधले सर्व पार्टस मी टेबलावर काढून ठेवले. सर्वात आधी आवाज करणारा जुना फॅन सिलींगमधून काढून घेतला. (मेन एमसीबी अर्थातच बंद केला होता.) त्या जुन्या फॅनच्या दांडीमधून असणारी पाऊण-एक फुटाचीच वायर मला नव्या फॅनमध्ये बसवायची असल्याने मी ती आधी काढून घेतली.  सर्वात प्रथम नव्या फॅनच्या दांडीमध्ये ती वायर ओवून घेतली. नंतर मोटर असणार्‍या मुख्य भागाला तीन पाते जोडून त्यांना नट आवळून टाईट केले. फॅनला दांडी जोडून खाली नट टाईट केले. दांडीतून खाली आलेल्या वायर्स फॅनच्या इनपूटला जोडल्या. पण मोटर आणि छताला असणारे दोन कप मी त्या दांडीत टाकायचे विसरलो. लक्षात आल्यानंतर पुन्हा दांडीच्या वरच्या बाजूला मी वायरला जोडणे सोपे जावे म्हणून कपलींग लावतो ते काढावे लागले. त्यानंतर ते दोन कप दांडीत टाकले. (वाळूचे घड्याळ कसे असते तसे ते कप दिसतात. येथे फोटो टाकत नाही पण आपल्याला कल्पना यावी म्हणून हे लिहीले आहे.) पुन्हा वायरच्या वरच्या बाजूला कपलींग लावले.

फॅनची छताला जोडणी:
या बीएलडीसी फॅनला भिंतीवरच्या रेग्यूलेटरची गरज नसते. रिमोटवरच हे फॅन चालतात. तशी सुचना ऑपरेटींग मॅन्यूअल मध्ये आणि रिमोटवरही लिहीलेली आहे. ऑपरेटींग मॅन्यूअलमध्ये असेही लिहीलेले होते की तुम्ही भिंतीवरचे रेग्यूलेटर जरी काढले नाही तरी ते कायम फूल स्पिडच्या सेटींगवर ठेवा. भिंतीवरचे रेग्यूलेटर काढायचे ठरवले असते तर आणखी काम वाढले असते. त्यामुळे मी भिंतीवरचे इलेक्ट्रॉनीक रेग्यूलेटर तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला.

नंतर शिडीवर उभे राहून नवा फॅन मी बूश सहीत छताच्या हूकला टांगला. नट थोडे लूजच सोडले. कारण मला पहिल्यांदा फॅनची ट्रायल घ्यायची होती. आधीच नट टाईट करून नंतर काही झाले अन फॅन चालला नाही तर शिडीवर उभे राहून वरचे नट खोलणे किती त्रासदायक असते अन ते देखील उन्हाळ्यात वीज/ फॅन बंद करून - ते आपण अनूभवले असेलच. (आपण हवेसाठीच फॅन लावत असतो तर मग आपल्याला उंचावर काम करतांना हवा देणार कोण?) असो.

त्यानंतर एमसीबी चालू केला असता फॅन लगेचच गोल फिरायला लागला! (भिंतीवरचे इलेक्ट्रॉनीक रेग्यूलेटर फूल स्पिडच्या सेटींगवर होते.) नंतर रेग्यूलेटर बंद करून शीडीवर चढून छताच्या हूकला टांगलेल्या फॅनचे सगळे बोल्ट्स टाईट केले. दोन कप्स फॅनची मोटरची असेंब्ली अन छताची हूकची जोडणी झाकतील असे सरकवले.

त्यानंतर भिंतीवरचे रेग्यूलेटर फूल स्पीडला ठेवून फॅन चालू केला.

फॅनचे रिमोट कंट्रोल टेस्टींग:
बीएलडीसी फॅनला भिंतीवरचे रेग्यूलेटरची गरज नसते हे आधीच सांगितले आहे. रिमोट कंट्रोल ने सर्वात प्रथम मी फॅन ऑफ बटन दाबून थांबवला. नंतर तो ऑन बटन दाबून चालू केला. तो पाच या सेटींगवर फूल स्पीडमध्ये फिरत होता. नंतर मी एक नंबर स्पीडचे बटन दाबून पाहिले. फॅनचा स्पीड कमी झालेला होता. नंतर २, ३, ४ असे सर्व रिमोटवरील बटन दाबून फॅन टेस्ट केला. फॅन त्या त्या स्पीडला योग्य रितीने फिरत होता.
त्या रिमोटवरच १ तास, २ तास, ३ तास आणि ४ तास असे बटन आहे. म्हणजे ते दाबले असता फॅन त्या त्या तासांपूरता चालून आपोआप थांबतो. अर्थात मला त्याची टेस्टींग करायची नव्हती. हा एक रिमोट दोन क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन कंट्रोल करण्याकरता वापरता येतो असे मॅन्यूअल मध्ये लिहीलेले आहे. त्यासाठी एक नंबरचे बटन दहा सेकंद दाबून ठेवल्यास बीप असा आवाज होतो आणि तो रिमोट त्या त्या फॅनला सेट होतो.

निष्कर्ष:
बीएलडीसी फॅन हे तुलनेने नव्या टेक्नॉलॉजीचे फॅन आहेत. हे फॅन कन्व्हेंशनल फॅनच्या तुलनेत ५०% वीज वाचवतात. (असे स्पेसीफीकेशन मध्ये लिहीलेले आहे. मी घेतलेल्या क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅनचे बॉक्स पॅकींग व्यवस्थित होते. त्यावर सर्व सूचना आहेत.

ऑपरेटींग मॅन्यूअल सुचनांमधील तृटी:
* २३० व्होल्ट इनपूट वायर्स कोठे जोडाव्यात हे कोठेही लिहीलेले नाही.
* दोन कप्स आधीच दांडीत टाकून घ्यावेत हि सुचना किंवा चित्र देखील नाही.
या दोन बाबी खटकल्या.

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन वापरल्यानंतर योग्य हवा देतो असे आढळले. फॅन रूममध्ये सर्वदूर हवा फेकत होता. रिमोटने फॅन कंट्रोल करणे सुखदायक आहे. हा रिमोट फॅनकडे वळवायलाच हवा असे नाही. कुठल्याही अँगलमध्ये (जमीनीकडे सुद्धा) बटन दाबून फॅन कंट्रोल करता येतो. यात इन्फारेड टेक्नॉलॉजी आहे. (दुकानमालक वाय-फाय आहे असे सांगत होता. आपण ऐकून घ्यायचे.)

या फॅनची बाजारात तुलनात्मक किंमत योग्य आहे. फॅनवर डिजाईन वगैरे काही नाही. एकदम सोबर दिसतो.

सुचना:
* क्रॉम्टन कंपनीचा आणि माझा फॅन विकत घेण्याशिवाय काहीही संबंध नाही.
* हा रिह्यू (समीक्षा - review) लिहीण्यासाठी मला कुणाकडूनही आर्थिक प्राप्ती झालेली नाही.
* फॅनच्या जोडणीबाबत व्यक्तीपरत्वे निराळे अनूभव येवू शकतात.
* कोणत्याही इलेक्ट्रीकल वस्तू हाताळतांना वीजेचा मुख्य प्रवाह मेन स्विच किंवा एमसीबी बंद करावा.
* जरूर तेथे तांत्रीक भाषेतले इंग्रजी प्रतीशब्दच लेख लिहीतांना वापरले आहेत.

- पाषाणभेद
०२/०३/२०२०

पूर्वप्रकाशित