हिरवा हिरवा ॠतू (गीत - वंदना विटणकर)
पार्श्वभूमी: सदर गीत साधारण २००६-०७ च्या सुमारास दुरदर्शनवर पाहिले अन तेव्हापासून हे गीत मी आंतरजालावर शोधत होतो. कुठेही हे गाणे लिखीत अथवा चित्रीत स्वरूपात मिळाले नाही. नंतर एकदा हे गीत नाशिक आकाशवाणीवर ऐकायला मिळाले. ते गाणे तेथून मिळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. मला नक्कीच खात्री होती की हे गीत वंदना विटणकरांचे आहे. खूप प्रयत्न केले असता सदरच्या गाण्याचा उल्लेख http://www.marathiworld.com/gani/list_action.php?ch=H&sort=1 येथे सापडला. (येथे ते गाणे 59 क्रमांकावर आहे.) (आता बहूदा हि साईट चालत नाहीये.)
पण त्यावेळी ही लिंक उघडत नव्हती. लिंक ब्रोकन असल्याबद्दल मी तेथील अॅडमीनला इमेल पाठवला. त्यांचा काही प्रतिसाद आला नाही पण काही दिवसांनंतर ही लिंक ओपन होवू लागली व माझी या गाण्यासाठीची खुप दिवसांपासूनची शोधाशोध थांबली. साधारण २०१२ साली हे गीत सापडले. परंतु ते ध्वनी स्वरूपात (गायलेले) आपले मिपाकर डॉक्टर इंद्रनील पाटील सरांंनी २०१९ साली दिले. खूप प्रतिक्षेअंती एका सुमधूर गीताचा शोध संपला. अर्थात या गाण्यावर चित्रीकरण असणारा विडीओ दुरदर्शनच्या लायब्ररीत असणार. पण तो मिळणे दुरापास्त आहे. पण जेव्हा तो मिळेल किंवा तो दाखवतील तेव्हा आपण जरूर पहा. अगदी छान चित्रीकरण असलेले हे गीत आहे. मनास आनंद देईल हे नक्की. एखादे चांगले गीत काळाच्या पडद्या आड जाऊ नये म्हणून हे गीत येथे देत आहे. ऑडीओ अपलोड केल्यास तो देखील देण्यात येईल.
हिरवा हिरवा ॠतू, हिरवा हिरवा ॠतू,
अधिकच हें मन हिरवें, जवळीं असतां तूं ॥धृ ॥
विळखा घाली वारा, फुलतो वेलीवरी शहारा
लाटा येतां जवळीं होतो अधीर धुंद किनारा
भ्रमर चुंबितां कळीस, माझा वसंत फुलवी तूं ॥१॥
कोसळती जलधारा, नाचे मनांत मोरपिसारा
ओलेती ही धरा, देतसे हिरवा सृजन-इशारा
मेघ भेटतां तिला, प्रिया, मज दे आलिंगन तूं ॥२॥
हिरवी मस्ती रानीं, प्रणयी राघू उन्मन झाले
अशा निथळत्या वेळीं माझें तनमन हरपुन गेलें
चिंब मातल्या बेहोषीचें उधाण सांवर तूं ॥३॥
गीत - वंदना विटणकर
सं. - यशवंत देव
गा. - शोभा जोशी
https://voca.ro/12JlBPGIDPYN
No comments:
Post a Comment