पाभे की बात क्र. १०
माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!
पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे.
मितरों,
आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते.
मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!
का म्हणून?
कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!
पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!
एक बिअर प्यायला गेल्यावर:
- तणाव कमी होतो
- भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
- मित्र वाढतात
- आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!
मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती
फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!
मितरों,
परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे.
मितरों,
गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही.
मितरों,
ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.
पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.
खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
No comments:
Post a Comment