Saturday, May 29, 2010

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे
सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी
चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी

तो:
गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग
पदर कमरेला विळखा घाली
असती आपल्यातच दंग
चाल तुझी मोरावानी
हरणापरी चपळ अंग
कुठं जाशी कुठून येशी
सांग सांग सांग पोरी
सांग सांग सांग

ती:
गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद
शिंप्याची चुक झाली
केली चोळी त्याने तंग
मोर हरणावानी चाल चपळ
न्हाई तुझ्यागत फोपशी अंग
नसत्या चौकशा करू नगं
लांब लांब लांब हो पोरा
लांब लांब लांब

तो:
कवळी कवळी काकडी पाहिली
कच्ची तोडावी का नको
पिकली तर जास्त चांगली
पर त्यात वेळ दवडाया नको
कोनतं फळ झाडाचं खरं
आसतं तोडायला बरं
सांग सांग सांग पोरी
सांग सांग सांग

ती:
फळ झाडाचं मुल आसतं
त्याचं त्याला प्यारं
कच्च अन पिकलेलं
काय भलं काय बुरं
जे बी फळ मिळतंया
आनंदानं खावून घे तू रं
जान जान जान पोरा
जान जान जान

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०५/२०१०

Thursday, May 27, 2010

पोवाडा मर्द मावळ्याचा

पोवाडा मर्द मावळ्याचा

खण खण खणाण खण खण खण
खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार
शिवाजीचा अवतरला अवतार
शत्रूंना दिले उत्तर बाणेदार
साथ दिली मावळ्यांनी भरपूर
अशा राजा शिवाजीस करूनी नमन
शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा
मर्द मावळ्याचा
जीर हा जी जी जी जी जी
...
अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले
अनेक किल्ले राजांनी जिंकीले
अनेक शत्रू त्यांनी मारीले
मराठी राज्य त्यांनी स्थापिले
शिवाजीमहाराज छत्रपती जाहले
याकारणे साथ दिली अनेकांनी
तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी

अहा
...
{ गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले. यात त्यांना तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा अनेक ज्ञात लढावू मर्दांची साथ लाभली. परंतु सैन्यात असणार्‍या अनेक सैनिकांपैकी एक असणार्‍या एका मर्द मावळ्याची कहाणी या पोवाड्यात ऐका....}

असे एक मावळा महाराजांच्या सैन्यात
तयार होता लढाईत
पाठवूनी त्यास रणांगणात
केली शर्थ त्याने हातघाईत
कहाणी ऐका त्याची पोवाड्यात
जीर हा जी जी जी जी जी
...

अशाच एके संकटाचे वेळी
महाराजांनी आज्ञा ती केली
तयार करावे सैन्य तुम्ही
रहावे हुशार युद्धास जाण्यावरी
सरनोबत घ्या लढाईचे सुत्र
व्युव्ह रचा तुम्ही दुरूस्त
हत्ती, घोडे ठेवा चुस्त
शत्र्रूस करण्या परास्त
पाजळा सगळी आपापली शत्र
चढवा आता रणांगची वस्त्र.....जीर हा जी जी जी जी जी

अशा या समर प्रसंगी तयार मावळा हा
घरा दाराला सोडुनी आला आला किल्याला
घरधनी निरोप देई अशृ डोळ्याला
कवटाळी चिल्लेपिल्ले आपल्या उराला
धिर देवून मावळा निघे लढाईला.....जीर हा जी जी जी जी जी

नाईकास भेटूनी सांगे तयार लढाईला
जुमलेदारास सांगूनी जाई आपल्या मोक्याला
हवालदार अन बाकी मावळे असती संगतीला.....जीर हा जी जी जी जी जी

{गद्य: असा हा मावळा लढाईस तयार होवून आपल्या मोक्याला चालला गेला. अशा या वेळी किल्यावर काय वातावरण होते ते पहा...} अहा....


रात्रीचे समयी रातकिडे किरकिरती
अंधार दाटूनी आला घुबडे हुंकारती
भयवाटावे असले लक्षण आहे सगळीकडे
मेघ दाटूनी आले सहस्त्रधारा वर्षावे
त्याच समयाला शत्रू हल्ला ते करती
या अल्ला तोबा करूनी किल्यावर धडकती
हुश्शार मावळा जागा होता ढाला चढवून
हाता सुर्‍या, आडहत्यारे, धनुष्य, बरची अन पट्टा घेवून
गोलंदाजही तयार होते त्याच समयाला
गोळे घेवुनी दारूचे ते फिरवीती तोफेला.....जीर हा जी जी जी जी जी

रक्षण करण्या मावळा दक्ष असे
मुख्य गणेश दरवाजाचे
लक्ष असे त्याचे शत्रूच्या येण्याचे
ठावूक असे त्याजला काम मोर्चाचे
शिकारी शिकार ठिपण्या सावध असे.....जीर हा जी जी जी जी जी

{गद्य: शत्रू असल्या पावसात चालून आला. किल्याच्या मुख्यदरवाजाला त्याने धडक दिली अन }

चाहूल लागली गनिमाची चालून येण्याची
पावसातल्या आवाजात अल्ला अल्ला ते गर्जीती
धडक बसली गणेश दरवाजाला मत्त हत्तीची
भक्कम दरवाजा त्यास काय फिकीर करण्याची
शेवटला उपाय म्हणूनी तयारी सुरूंग लावण्याची
अशा पावसात काम करीना दारू सुंरूगाची
मग तयारी झाली तोफगोळे बरसविण्याची.....जीर हा जी जी जी जी जी

एकाएकी मग हल्ला की हो झाला
कुलूपी गोळा दरवाजावर की हो आदळला
त्या गोळ्याने मग आपले काम फत्ते केले
भक्कम सागवानी लाकूड काम की हो तोडीले
लगबग करूनी सात वैरी मग चालूनी आले.....जीर हा जी जी जी जी जी

मुख्य दरवाजापाशी होते पाच शुरवीर दारवान
हातघाईची लढाई केली त्यांनी ताकदवान
अन मारीले सातही मुजोर हैवान.....जीर हा जी जी जी जी जी

दरवजापाशी आता आली आणीक कुमक
आपला मावळा होता त्यात एक
मागाहून शंभर पठाण आले ते अल्ला खुदा गर्जीत
दोन्ही फौजा मग तेथेच भिडल्या एकमेकांस.....जीर हा जी जी जी जी जी

हरहर महादेव, शिव हर शंभो, मारा, कापा गजर तो झाला
कोणी पट्टा चालवी, कोणी कांडा चालवी कोणी चालवी जांबीयाला
मावळ्याने आपल्या घेतली हाती ढाल तलवारीला
त्वेशाने तुटून पडे तो गेला सामोरीला
दातओठ खावूनी गरगर फिरवी हत्याराला
तलवारीची धार तेज असे पाजली कालच्याला
घाबरूनी शत्रू मागे फिरी लांब होई पल्याला
अशा तर्‍हेचे युद्ध करीती दोन्ही त्या समयाला
वरतून पाऊस झोडी खाली मावळा झोडी गनिमाला
खंड नव्हता पडला काही त्याच्या मेहनतीला
शर्थ नव्हती पडली त्याच्या पराक्रमाला
एकट्याने बारा मोगल कापीयला
होते हत्यार बल्लम लटकाविलेले कमरेला
तलवार लावली म्यानाला अन हाती घेतले बल्लमाला
आता तिन अरबांनी कोंडाळले त्याला
तयारी केली त्यांनी खाली पाडण्या मावळ्याला
दिन दिन खुदा खुदा करूनी घेरती पिंजर्‍यातला वाघाला.....जीर हा जी जी जी जी जी

रणमर्द तो मावळा एकटा झुंजला
वार झेलून झेलून रक्ताने तो माखला
रक्त पाहून त्वेशाने तो हल्ला परतवू लागला
सरसर सरसर तो फिरवी बल्लमाला
डोक्यात मारी वार करी, एक अरब पाडला
राहीले दोन आता खुन डोळ्यात चढला.....जीर हा जी जी जी जी जी

एक छाती पुढे येई अन एक राही पाठीला
हवालदार तो बाजूस होता पाही लढाईला
पराक्रम बघूनी मावळ्याचा तो घाली बोटे तोंडाला
"ध्यान देवूनी लढ आता" त्याने आवाज की दिला
अन बाकी मोगलांचा समाचार घेण्या तो चालता झाला.....जीर हा जी जी जी जी जी

विज चकाकली, आवाज झाला, हरहर महादेव मावळा बोलला
विजेसारखा चमकूनी त्याने जोरदार मारा केला
दोन्ही अरबांना चार वारात लोळवी धरणीला
एक बोलतसे खुदा खुदा एक बोली या अल्ला
तडफड तडफड करूनी सोडी ते प्राणांना
वेदनेने चमकूनी पाही मावळा आपल्या तुटल्या हाताला
असा हा एकटा मावळा रणात झुंजला
गनीम पंधरा लोळवीले पाठविले स्वर्गाला.....जीर हा जी जी जी जी जी

हुषार व्हा सारे! सार्‍या मोगलांचा नाश झाला
ओरडूनी सांगे सरहवालदार सगळ्यांना
आपलीही आपली तेरा डोकी फुटली गमावीले विसांना
तुम्ही बाकी सारे आता बसा पहार्‍याला
येवू नका देवू आता कोणी शत्रू दरवाज्याला
आणखी कुमक घेवोनी येतो मी तुमच्या मदतीला
"भले बहाद्दर लढाई गाजवली", शाब्बासी देती ते मावळ्याला
किल्लेदार धावत येती त्याच समयाला
सोन्याचे कडे देवूनी गौरवीती त्याला
गौरवूनी निघती ते अधिकारी, मावळा संगती उपचाराला.....जीर हा जी जी जी जी जी

अशी लढाई अशी मर्दूमकी गाजवली त्या कारणाला
मारूनी शंभर शत्रू मावळ्यांनी वाचवीले किल्याला.....जीर हा जी जी जी जी जी

शुरमर्दाचा फोवाडा शुरमर्दांनी सांगावा
शुरमर्दांनी ऐकावा शुरमर्दांनी आचरणावा
असा हा पोवाडा शुरमर्द मावळ्याचा
महाराजांच्या पुराणकालीन काळाचा.....जीर हा जी जी जी जी जी

प्रस्तूत शाहिर असे नाशिक वस्तीला
सचिन बोरसे नाव ल्यालेला
लेखणी घेवून पहाटेच्या मंगल समयाला
पोवाडा पुढल्या पिढीसाठी रचिला
सत्ताविस मे २०१० सालाच्या गुरूवाराला
वेळ झाली पोवाडा पुर्ण करण्याला.....जीर हा जी जी जी जी जी

वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना
जांच्यामुळे आज आपण या वेळेला
धर्माची भाकरी खातो पोटाला
वंदन करतो शिवाजी राजांना
सत्य युगाच्या योगी पुरूषाला
भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी

-पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०५/२०१०

मधूमेहाविरुद्ध लढा

मधूमेहाविरुद्ध लढा

अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले.

मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं.

त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे. (अन्यथा मी कविता केली असती. पण अदिती ताई कविता केवळ विडंबन तयार करण्यासाठी वाचतात व त्यांनी डायबेटीस ची कविता वाचली नसती. असो. इथे चेष्टा मस्करी फार झाली हं.) असो.

तर माझी सही म्हणजे एक मोठा निळं वर्तूळ आहे. त्याखाली इंगजीत Unite for Diabetes असे अन मराठीत 'डायबेटीस विरूद्ध लढा' असे लिहीले आहे.
माझ्या घरात वडिलांना डायबेटीस आहे. तो अनूवंशीक नाही. पण त्यांच्या उपचाराच्या दरम्यान मी डायबेटीस बाबत जागरूक झालो. नंतर माध्यमांतून असेही समजले की काही वर्षांत भारत हा डायबेटीस असणार्‍यांचा देश होवू शकतो.

तो कसा अन का होतो, त्याबाबतची काळजी कशी घ्यायची वैगेरे चर्चा नंतर होईलच पण सहीमध्ये असले वर्तूळ हे 'जागतिक डायबेटिस शिखर संघटना ' (International Diabetes Federation (IDF)) यांचा लोगो आहे. डायबेटीस विरूद्ध जागरूकता आणण्यासाठी, संघटनेच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी अन मधूमेहा विरूद्ध लढा देण्यासाठी संकेत म्हणून हा लोगो वापरला जातो. हा लोगो कुणीही वरील कारणांसाठी वापरू शकतो.

डायबेटीस होवो न होवो, कमीतकमी दोन लोकांनी हे काय आहे म्हणून विचारावे अन मी सांगावे या साठी हा लोगो मी सहीत वापरत आहे. आपल्यातले बरेचसे बैठे काम करतात. कमीतकमी त्यांनी जागरूक व्हावे हा हेतू.

बाकी अदितीबाईंच्या सांगण्यावरून माझ्या सहीतले 'डायबेटीस विरुद्ध लढा' चे मी 'मधूमेहाविरुद्ध लढा' असे केले आहे.

The universal symbol for diabetes
'मधूमेहाविरुद्ध लढा'

Tuesday, May 25, 2010

काय अपशकून घडला

काय अपशकून घडला


महाराजांकडचा एक सैनिक उत्तरेला लढाईला जातो अन तो तेथे अडकून पडतो. इकडे त्याच्या घरी काय होते ते पहा:
(कोरस तसा अनावश्यक वाटतो आहे. तोडा विरस होतो आहे. पण म्हणायचा असेल तर म्हणा नाहीतर राहू द्या.)

असा ग बाई काय अपशकून घडला
माझा हिरवा चुडा की ग फुटला ||धृ||

धनी हे माझं मोठं सरदार
महारांजांचं आहे ते चाकर
पराक्रम त्यांचा काय सांगावा
आसंलं का ग मार्ग तयांचा खुटला?
असा ग बाई काय अपशकून घडला ||१||

कोरस: तुच सावर बाई ग आता आमचंबी काळीज तुटे तटतटा
सखे ग बाई हिरवा चुडा हिचा फुटला


उत्तरेला गेले कराया मुलूखगिरी
म्हैना झाला आलं नाही घरी
कुठं आसलं माझा शिरीहरी
दिस जावूनी अंधार की ग दाटला
असा ग बाई काय अपशकून घडला ||२||

कसलं धनी आहे माझं कसं मी सांगू
सांगता गोष्टी त्यांच्या लाज नका आनू
निरोप नाही अजूनी कसला
डोल्यात समिंदर हा साठला
असा ग बाई काय अपशकून घडला ||३||

म्हनलं व्हतं त्ये लौकर येतो
भर्जरी बनारसी शालू आणीतो
नको मला आता शालू लुगडं (तिला आता भरजरी शालूही केवळ लुगडे वाटत आहे.)
धन्याचं दर्शन घडवा मजला
असा ग बाई काय अपशकून घडला
माझा हिरवा चुडा की ग फुटला ||४||

कोरस: तुच सावर बाई ग आता आमचंबी काळीज तुटे तटतटा
सखे ग बाई हिरवा चुडा हिचा फुटला


- पाषाणभेद (दगडफोड्या)
२५/०५/२०१०

Monday, May 24, 2010

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)
सिच्यूऐशन: हिरो्+ हिरॉइन. दोघे बाहेर निसर्गरम्य वातावरणात आलेले आहेत.

चालः लावलेली आहे. एखाद्या वेळी युनळी वर टाकेन.

(खालील गाण्यात तो अन ती च्या जागा बदलल्या तरी काही अर्थात फरक पडत नाही. )
गाण्याच्या दुसर्‍या आवृत्तीत जाणीवपुर्वक काही बदल आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. त्यातच तो अन ती च्या जागा उदाहरणादाखल बदललेल्या आहेत.

कॅमेरा रोलींग....साँग आवृत्ती नं वन....स्टार्ट......अ‍ॅक्शन......
--------------------------------------------------

तो: चल दुर दुर दुर दुर ग जावू
ती: हो ना! मग एकमेका जाणूनी घेवू
तो: टेकडी बुटकी लांब जराशी तेथपर्यंत का जावू
ती: हो ना! दुर दुर दुर दुर रे जावू ||धृ||

तो: शितल जल हे चमके चमचम (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)
ती: निळेच आभाळ बघ दिसे त्या निळाईतून (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: हिरवे गवततृण जणू भासे मखमल
ती: रानफुले बघ कितीक डोलती त्यातून
तो: असल्याच निसर्गी तृप्त होवोनी न्हावू

ती: हो रे! चल दुर दुर दुर दुर मग जावू ||१||

तो: कसले जग उरले आता अन कसल्या भिंती (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)
ती: तोडोनी नच का आलो त्या आता कसली भीती (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: दुरवरी होते तेथे आभाळधरती मिलन
ती: घर दोघांचे ते क्षितीजापर्यंत असे अंगण
तो: चल वेगाने चल, थांबलीस का? आता लाग तू धावू

दोघे: चल दुर दुर दुर दुर आता जावू ||२||

---------------------------------------------------------------------

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (आवृत्ती क्र. २)

ती: चल दुर दुर दुर दुर रे जावू
तो: हो ना! दुर दुर दुर दुर ग जावू
ती: टेकडी बुटकी लांब जराशी तेथपर्यंत का जावू
तो: हो ना! मग अधिकच जवळी येवू ||धृ||

ती: शितल जल हे चमके चमचम (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: निळेच आभाळ बघ त्या निळाईतून (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)
ती: हिरवे गवततृण जणू भासे मखमल
तो: रानफुले बघ लाल पिवळी डोकावती त्यातून
ती: असल्याच निसर्गी तुडूंब आपण न्हावू

तो: हो ग! चल दुर दुर दुर दुर मग जावू ||१||

ती: कसले जग उरले आता अन कसल्या भिंती (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: सोडोनी नच का आलो ते आता कसली भीती (तान(स्री स्वर): आआआआआआआआ)
ती: बघ तेथे होते तेथे आभाळधरती मिलन
तो: घर दोघांचे ते क्षितीज म्हणती सारे जन
ती: चल वेगाने चल, थांबलास का? आता लाग तू धावू

दोघे: चल दुर दुर दुर दुर आता जावू ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०५/२०१०

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा
जवळी मज करा
होवू निसंग
आता बाजूस करा हो कमरबंद ||धृ||

कितीक दिसानं येता आज घरा
डोळं लावूनी वाटं उभी अशृ नाही थारा
कसर काढा आता जल्माभरची
मी संगती असता करा लढाई बेधूंद

आता बाजूस करा हो कमरबंद ||१||

तुम्ही जरी शत्रू मारीले, धुळ चारीले
तुरे खोवीले, बिल्ले लाविले छातीवरी
काय कामाची अशी मुलूखगिरी
होईल सवत करील दोघात अंतर रूंद

आता बाजूस करा हो कमरबंद ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०५/२०१०

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे
लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे.
प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे.
मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे.
प्रकाशित: १९८३
मुल्य: रू. ६५/-

छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती.
या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत. त्यात इतिहासाचार्य राजवाडे यांचा उल्लेख आहे.
दिर्घ प्रस्तावनेत लेखकाने त्या पत्रांचा समावेश का केला, पत्रे लिहीण्याची पध्दती, मुसलमान कालगणना, फारसी शब्द, अधिकार्‍यांचा हुद्दा, शक गणना, महाराजांची दुरदृष्टी, मुद्रा, शिक्का, मोर्तब आदींचा उहापोह केलेला आहे. बरीचशी मुळ पत्र ही मोडी भाषेत होती. लेखकाने ती मराठी लिपीत लिहीली आहे. परंतू भाषा तत्कालीन आहे.

बरीचशी पत्रे ही वतनदारांच्या वतनदारीतील झगडा मिटवण्यासाठी, समझोता करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी, शिक्षा फर्मावण्यासाठी, लढाईत मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटूंबाच्या सांत्वनेसाठी, देव देवळे तसेच मशीदी/ दर्गे (होय मशीदी/ दर्गे सुद्धा!) यांचे अनुष्ठान चालू राखण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारांपैकी आहेत. त्यात राजाराम, समर्थ रामदास, मिर्झा राजे, औंरंगजेब, बाजीप्रभू देशपांडे आदिंसाठी लिहीलेली देखील पत्रे आहेत. त्यात चिंचवडच्या देवस्थानाचे भट, पर्वती देवस्थानाचे भट, पिंपरी येथील पत्रव्यवहार आदी उल्लेख आहेत. याच पत्रात दादोजी कोंडदेव यांच्याकडून शिवाजी महाराजांना शिक्षण द्यावे हा उल्लेख पुराव्यानीशी सापडतो हे महत्वाचे.

एका पत्रात शिवाजी महाराजांनी शत्रू चालून आल्यावर काय करायचे, रयतेस घाटाखाली कसे आधीच हलवायचे, गनिमाने चढाई केल्यास कसे पळायचे या सुचना आहेत, तर एक किल्ला बांधतांना पावसाळ्यात हाल होवू नये म्हणून घरांची कशी काळजी घ्यावी ते लिहीलेले आहे. दोन एक पत्रव्यवहार इंग्रजांशी केलेले देखील सापडतात.

शिवाजीराजेंचे विचार धर्मातीत होते तरीही आपले स्व: ताचे स्वराज्य उभे रहावे या मागची त्यांची तळमळ, सहिष्णू वृत्ती पत्रांमधून पुराव्यानिशी दिसून येते.

एक ऐतिहासीक ठेवा म्हणून पुस्तकाचे मुल्य अमुल्य आहे.

देवपुरूष शिवाजी राजांना वंदन!
जय शिवराय!

Sunday, May 23, 2010

न्हाउन ओले केस घेवून

न्हाउन ओले केस घेवून


न्हाउन ओले केस घेवून
का सतावीतेस तू मला
हसवणूक बरी जमते तूला
ओले ते केस झटकून ||धृ||

प्रात:समयी दृष्य दिसे
मनावरती फिरते पिसे
हलकेच उडे मनपाखरू
पिसारा फिरता अंगावरून

न्हाउन ओले केस घेवून ||१||

कांता तू ग आहेस सुंदर
समयी असल्या कसला अव्हेर
वेळ कसला कसा जातसे
ओल्या त्या केसात गुरफटून

न्हाउन ओले केस घेवून ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०१०

नकोस माझी आठवण काढू

नकोस माझी आठवण काढू
नकोस मजला मोही पाडू
भोगले क्षण ते ओले
नकोच त्यांना आता कुरवाळू ||

ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते
शब्दही त्यातून नच फुटी ते
कढ दु:खाचे बाहेर काढण्या
हुंदकाही नकोच सांडू ||

उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात
लाव्ह्यापरी जाळे तो मनास
काय राहीली शेवटली बाकी
गणितही त्याचे नकोच करू ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०१०

Thursday, May 20, 2010

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो. मोठ्या पटांगणात तयारी केली आहे अन गल्लीतली सगळी पोरे घेवून हिरो नाचत आहे.
(या सिन नंतर लगेचच एक फायटिंग चा सिन असल्याने साईड हिरो पण या गाण्यात आहे.)
चाल: नेहमीचीच

(भक्तिरसपुर्ण गाण्यास अशा फालतू सिन मध्ये टाकल्याने गणपती बाप्पा मला माफ कर.)


हिरो नं १ :
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया ||धृ||

हिरो नं १ :
ढोल ताशे हे असे जोरात वाजती
रंगात येवूनी पोरे ही नाचती
पुढे होवूनी सारे एका ओळीत या रे
मखरात ठेवायला मुर्ती उचला रे
आरास केली अन आता मंडप सजवू या ||१||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

साईड हिरो:
आरती आता करूया अन देवाला आळवू या
प्रसाद खावू या अन सार्‍या गल्लीमध्ये वाटूया
नाचात दंग आता सारे झाले बेधुंद
गुलाल उधळू अंगावर घेवू या रंग
श्रींचे पुजन करून भक्तिरसात सारे न्हावूया ||२||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

हिरवीन:
गणपती असे ही विद्येची देवता
भजता मनोभावे पावे तो सर्वथा
आनंदी जग झाले गणपती येता
कल्याण होई तो आशिर्वाद देता
पुढल्या वर्षी बाप्पा लवकर आणूया ||३||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

कोरस:
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया

नाशिक ढोल:
धडदंग...धडदंग...धडदंग...दंग

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०५/२०१०

जावा तिकडे

जावा तिकडे

उं.. जावा तिकडे
मी नाही येत, तुम्ही ना गडे
सोडा मला आता, जवळ कशाला ओढता
तुम्ही गडे ||धृ||

शौकिन तुम्ही हे आसलं,
नाही म्हणत नाही कधी
हौस जीवाची करता,
सोडत नाही एकही संधी
अंहं... हात नका धरू,
होवू नका सुरू,
जावा तिकडे ||

सोडा मला आता, जवळ कशाला ओढता
तुम्ही गडे ||१||

परवा तुम्ही आणली साडी,
त्यासाठी करावी लागली लाडीगोडी
आजच नेसूनी दाखवते तुम्हां,
कोर्‍या साडीची मोडूनी घडी
दिसते कशी सांगा तुम्ही
येते मी तुमच्या पुढे ||

आतातरी सोडा मला,
जवळ कशाला ओढता
तुम्ही गडे ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०५/२०१०

Monday, May 17, 2010

पोरी पदर घे उन लागलं

पोरी पदर घे उन लागलं
चाल: येथे ऐका

आगं पोरीsss पदर घे ग
उन लागलं गssss
रंग काळल गss

आता ग पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं
उन लागलं ग
रंग काळल
पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं

बाहेर पडती तू गं दुपारमधनं
वेगी चाल रस्ता सारा पायाखालनं
उन आहे जाळ आसं चैत्रातलं
पोरी पदर घे ग उन लागलं
आता ग पोरी पदर घे उन लागलं

माती उडतीया आशी गं वार्‍यावर
डोळा जाईल धुळ ss अन होईल येळ
वाट पाहायची आता उगा किती काळ
आता तरी सांग सारं मनातलं
ग पोरी पदर घे ग उन लागलं

आता ग पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं
उन लागलं ग
रंग काळल
पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं

Sunday, May 16, 2010

अशी लाजू नको

अशी लाजू नको


अशी लाजू नको अशी मुरडू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ||

स्वप्नातले रुप आज सत्यात आले
हातात घेवून मी ते पारखले
सहवासात तुझ्या विसरलो जगा
अशा समयी वेळेची फिकीर नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१||

फुलापरी तुझा सुगंधीत गंघ असे
तसाच गुलाबी रंग रूपास दिसे
रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके
दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना
लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०५/२०१०

Saturday, May 15, 2010

मोहविते मज तव गंधीत कांती

मोहविते मज तव गंधीत कांती


चालः एखादे नाट्यपद असावे अशी चाल आहे. आपण ती चाल येथे ऐकू शकतात.
(मी काही गायक नाही. फक्त चाल ऐकण्यासाठी गाणे ऐका.)

मोहविते मज तव गंधीत कांती
रूपांग ते सुंदर दे मज हाती
मोहविते मज तव गंधीत कांती ||धृ||

लक्ष लक्ष या तारका समोर असती
वायू हे शितल आनंदे वाहती
अशा समयी राजहंस जळात पोहती
मोहविते मज तव गंधीत कांती ||१||

समीप असता यौवन हे असले
भान हे हरपले मन गुंतले
राजा अन राणी असती एकांती
मोहविते मज तव गंधीत कांती ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/०५/२०१०

Thursday, May 13, 2010

वर्तूळ

वर्तूळ


घाटदार घाट रस्ता नागमोडी
चढावा कोणी

हिरकंच जंगलात जाई पायवाट
बारीकशी त्यात

उत्तूंग मंदिराचा डेरेदार कळस
जाई नभात

नभात निळ्या जलद सावळा
एकटा भटका

आरसपानी तलावात न्याहळे स्व:ताला
पुर्ण करी एका वर्तूळाला

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०५/२०१०

ज्वालामुखीचे कवन

ज्वालामुखीचे कवन

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. त्या ज्वालामुखीची माहिती आपण कवनात पाहुयात.
इतर काही आकृत्या ज्यामुळे आपणास हा भुगोलाचा भाग निट समजून घेता येईल:
http://www.didcotgirls.oxon.sch.uk/depts/geog/bcs_geography/earth_structure.htm
http://www.ifa.hawaii.edu/~barnes/ast110_06/quizzes/disc04.html
http://visual.merriam-webster.com/images/earth/geology/structure-earth.jpg

भुगोल इ. ८ वी (महाराष्ट्र एस. एस. सी. बोर्ड, मराठी माध्यम) या पुस्तकाचे आभार.
-----------------------------------------------------------


१४ एप्रिल २०१० ला आईसलँडमध्ये ज्वालामुखी झाला
'एय्जाफ्जाल्लाज्योकुल' असे नाव दिले लोकांनी त्याला ||१||

आगडोंब तो गगनी उद्रेकला धरतीच्या प्रावरणातूनी
लपलपल्या हजार जीव्हा ओसांडूनी धावती ज्वालामुखीतूनी ||२||

सभोवताली शीतप्रदेश असूनी वाहे ज्वाला धरतीतून
निसर्गाची किमया बघती आपण सारे जन ||४||

केवळ काही दिसांचे नाटक सारे घडविले निसर्गाने
युरोपखंडीय जीवन सारे कवेत घेतले त्याने ||५||

लाव्हा तो उसळे उष्ण, लाल, भेदक जणू रवी उगवला धरतीचा
का कुणी मारीला तीर हृदयी जणू फुटे झरा रक्ताचा ||६||

असे कसे घडते हे सारे जाणून घ्या तुम्ही जन
म्हणजे समजेल तुम्हा मानव असे निसर्गापुढे लहान ||७||

प्रावरणामध्ये १००/२०० कि.मी. खोल भागात
उष्णतेमुळे आतील सारे खडक वितळतात ||८||

भुपृष्ठाखाली वितळलेल्या असल्या या स्थितीत
तप्त स्वरूपात असतो पदार्थ एक, म्हणती शिलारस ||९||

या शिलारसामुळे शिलारसकोठी तयार या भागात
ज्वालामुखीय क्रियेत भुपृष्ठावर शिलारस येई अर्धप्रवाही स्वरूपात ||१०||

भुकवचात शिलारस थंड होवोनी आंतरनिर्मीत अग्नीज खडक बनती
हाच लाव्हा भुपृष्ठावर थंड होवोनी बहिनिर्मीत अग्नीज खडक होती ||११||

ज्वालामुखीय क्रिया म्हणजे शिलारस येई भुपृष्ठावर पृथ्वीच्या प्रावरणातून
दृष्य स्वरूपात सारे रूप त्याचे असे वायू, द्रव अन घन ||१२||

या उद्रेकातूनी बाहेर पडती राख, वाफ अन अनेक वायू तप्त
तसाच लाव्हाही बाहेर येई उष्ण विरघळलेल्या खडकांच्या स्वरूपात ||१३||

ज्वालामुखी फुटण्याचे दोन प्रकार असती
एकास केंद्रिय अन दुसर्‍यास भेगीय म्हणती ||१४||

केंद्रिय ज्वालामुखीतून लाव्हा, राख अन वायू एकाच ठिकाणातून येती
भेगीय ज्वालामुखीत हेच सारे निरनिराळ्या भेगांतूनी येती ||१५||

असेच असते निसर्गाचे वर्तन ज्वालामुखीसाठी
सच्च्या पाषाणाने वर्णन केले हे सारे तुमच्यासाठी ||१६||

आगामी कवनांतूनी जाणूनी घेवू इतरही भुगोल सारा
जो वाचील अन परीक्षेत लिहील तोची विद्यार्थी उत्तीर्ण होईल खरा ||१७||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०५/२०१०

Tuesday, May 11, 2010

हळू हळू...चालव तुझी फटफटी

हळू हळू...चालव तुझी फटफटी

तुझ्या मागे बसायची वाटत नाही भिती
तरीही तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू
चालव तुझी फटफटी ||धृ||

घरी न बोलता आले निघून
केवळ तूझ्या सांगाव्या वरून
कॉलेजला जाते खोटं बोलता
घरी संशय न कसला आता
मोकळी झाले मी, न पाठी कटकटी ||१||

आता तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू
चालव तुझी फटफटी

तोंड झाकले रुमालाने रे
न चेहेरा दिसे माझा कूणाला
बापही जरी आला समोरी
तो न ओळखी मला
आता घाई कशाला, नको त्या कसल्या लटपटी ||२||

म्हणून तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू
चालव तुझी फटफटी

आडव्या तिरप्या रस्त्यांनी जावूनी
फिरव मला सारे गाव
ओळखीचे भेटले कुणी तर
ओळखलेच नाही असे दाव
त्यासाठी चिकटून बसले, हात असे तुझ्या कटी ||३||

अर्रे तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू
चालव तुझी फटफटी

बागेमध्ये नसे एकांत
तसाच नसे बसस्टॉप एकांत
पिक्चरमध्ये तर गर्दीच फार
अन आजकाल मॉलही नसे शांत
तूझ्या मित्राकडेच जावू, रुम असे त्याची एकटी ||४||

तू हळू हळू...हळू हळू...हळू हळू
चालव तुझी फटफटी

ला ला ला ला...ला ला ला ला...
हुं हुं हुं हुं...हुं हुं हुं
ढिंग च्याक..ढिंग च्याक..ढिंग च्याक..ढिंग

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०५/२०१०

Thursday, May 6, 2010

आज अचानक उदास का वाटे

आज अचानक उदास का वाटे

आज अचानक उदास का वाटे
न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ||

ईकडे पाहून तिकडे पाहून
वेळ घालवू किती
कसे कोण जाणे
कितीक वेळ माझी जाते
आज अचानक उदास का वाटे ||१||

किती मी चेहर्‍यांना वाचू
किती अनूभव लेखू
आवाज जवळी नसतांना
साथीचे शब्दही पडत आहे थिटे
आज अचानक उदास का वाटे ||२||

दुर अंतरावरी असता तू
कसा निरोप देवू
येथला निरोपही घेण्या
मन माझे आक्रंदूनी उठे
आज अचानक उदास का वाटे ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०५/२०१०

वार्‍यावरती भुरभुरती केस

वार्‍यावरती भुरभुरती केस


तू समोर अचानक उभी, वार्‍यावरती भुरभुरती केस
पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ||


तसाच बांधा अन रंगही कांतीचा
गतस्मृतीत रममाण, विसरलो मी जग
काय अवस्था केलीस? ||१||

वार्‍यावरती भुरभुरती केस....

ओळखीचे ते रूप मनामध्ये खोल
आवेग अनावर, खेचतो मज तुजसमीप
ताबा न मनावर ||२||

वार्‍यावरती भुरभुरती केस....


कशास जुने काढावे, नवे आचरावे
एकदा वळून बघ, समजते मज जरी
तू तीच नसतेस ||३||

वार्‍यावरती भुरभुरती केस....
पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ||

०४/०५/२०१०
- पाषाणभेद (दगडफोड्या)

Tuesday, May 4, 2010

कामगार आम्ही कामगार असतो

कामगार आम्ही कामगार असतो

कामगार आम्ही कामगार असतो
ठिणगी ठिणगी एक होतो
धमन्यातले रक्त जाळतो
मोठ्या आगीचे एकक असतो

कामगार आम्ही कामगार असतो
देशाच्या प्रगतीची ओळख असतो
वेगवेगळे हात एकवटतो
तुकड्यातुकड्यांचे एकसंध निर्मीतो

कामगार आम्ही कामगार असतो
श्रमांचे आम्ही मोल असतो
कपाळावरच्या भाग्यरेषांतूनी
घामाच्या नद्या वाहवतो

कामगार आम्ही कामगार असतो
भक्कम हातांच्या मुठी वळवतो
वज्रालाही पिघळवतो
मनगटासारखे कांबवतो

विश्वकुटूंबातील घटक असतो
भिन्न देश अन भाषा जरी असो
संकेतांना अनुसरतो
विचार कृतीत रुपांतरतो

अजस्र यंत्राचा एक भाग असतो
आम्ही हलतो, विश्व तोलतो
समुहाच्या नात्यातून
कामगारांतील माणूसपण जपतो

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०५/२०१०
जागतिक कामगारदिन

धनी माझं कसं येईना अजून

धनी माझं कसं येईना अजून

दिस हा गेला रात चढली
कितीक बसावं सजून धजून
वाट पाहूनी डोळं थकलं
धनी माझं कसं येईना अजून ||धृ||


रातीचा मी शिणगार केला
शेज सजवूनी गजरा माळला
शालू नेसूनी तयार झाले
कुंकू ल्याले भांगातून ||१||

धनी माझं कसं येईना अजून

सांगून गेलं आठदिस झालं
कुठं आसलं कुना ठावं
लवकर येतो म्हनलं होतं
लढाईतून परतून ||२||

धनी माझं कसं येईना अजून


काळीज माझं चिमनी जसं
नाही काही थार्‍यावर
फोलपणा हा सजण्याचा
न जाई मनातून ||३||

धनी माझं कसं येईना अजून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०४/२०१०

समोर आता येते कशाला

समोर आता येते कशाला

समोर आता येते कशाला ||धृ||

समोर आता येते कशाला, तिर नजरेचा
मारतेस मला
मदनबाण लागतो ग उरी, जखम खोलवरी
ठाव नाही ग तुला ||

समोर आता येते कशाला ||१||

याद असतीस मनी राहूनीया दुरी
काळीज धडधडता
काय न कळे ग मला होईल वेडा
असेच वाटे ग मला ||

समोर आता येते कशाला ||२||

वाटे संगती असावीस सदा, नयनी माझ्या
न गाळावे आसवांना
कितीदा तरी हसलो समोरी, तू ग उभी
तरीही न कळावे का तुला ||

समोर आता येते कशाला ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०४/२०१०