Tuesday, May 4, 2010

धनी माझं कसं येईना अजून

धनी माझं कसं येईना अजून

दिस हा गेला रात चढली
कितीक बसावं सजून धजून
वाट पाहूनी डोळं थकलं
धनी माझं कसं येईना अजून ||धृ||


रातीचा मी शिणगार केला
शेज सजवूनी गजरा माळला
शालू नेसूनी तयार झाले
कुंकू ल्याले भांगातून ||१||

धनी माझं कसं येईना अजून

सांगून गेलं आठदिस झालं
कुठं आसलं कुना ठावं
लवकर येतो म्हनलं होतं
लढाईतून परतून ||२||

धनी माझं कसं येईना अजून


काळीज माझं चिमनी जसं
नाही काही थार्‍यावर
फोलपणा हा सजण्याचा
न जाई मनातून ||३||

धनी माझं कसं येईना अजून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०४/२०१०

No comments: