Wednesday, March 9, 2011

गणेशा वंदन तुजला आता


गणेशा वंदन तुजला आता

गणेशा वंदन तुजला आता
तुझ्या चरणी ठेवीतो माथा                                               ||धृ||

कुशल बुद्धीचे दैवत तू रे
आम्हां मुढास सुबुद्धी दे रे
सुगम होवूदे गौळण वग कथा
गणेशा वंदन तुजला आता                                               ||१||

मुर्ती तुझी तुंदील तनू हासरी
आनंदे भरती येई बघता नाचरी
नृत्य गायने हरू दे रसीक व्यथा
गणेशा वंदन तुजला आता                                               ||२||

कला चौसष्ट चौदा विद्या
पारंगत असशी विघ्नहर्ता
सफल कार्य होई गण तुला अर्पीता
गणेशा वंदन तुजला आता                                               ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०८/२०१०

Monday, February 28, 2011

पोवाडा मराठी भाषेचा


पोवाडा मराठी भाषेचा


मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता? ऐका तर मग...

ही भाषा असे कुणाकुणाची?
अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

अहो ही भाषा असे चक्रधरांची
ही भाषा असे झानदेवांची
ही भाषा असे तुकोबांची
नामदेव, सोपान, मुक्ताबाईची
गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनाराची
हि भाषा असे रामदासांची
ही भाषा असे जीजाउंची
ही भाषा असे दादोजी कोंडदेवांची
हि भाषा असे मर्द मावळ्यांची
हि भाषा असे शुर शिवाजी राजांची
ही भाषा असे बेधडक मुरारबाजीची
ही भाषा असे विर तानाजीची, बाजीप्रभुंची
ही भाषा असे कान्होजी आंग्र्यांची
ही भाषा असे पेशव्यांची
ही भाषा असे विश्वासरावांची
हि भाषा असे आहिल्यादेवींची
ही भाषा असे शाहुमहाराजांची
ही भाषा असे टिळकांची
ही भाषा असे सावरकरांची
ही भाषा असे फुले, आंबेडकरांची
हि भाषा असे बाळासाहेबांची
हि भाषा असे राजठाकरेंची
हि भाषा असे तळागाळातल्या लोकांची
सह्याद्रीच्या मुलांची
सागराच्या लेकरांची
विदर्भातल्या लेकीसुनांची
मराठवाड्यातल्या पोरांची
खानदेशातल्या वडिलधार्‍यांची
हि भाषा असे सगळ्या मराठी प्रेमींची

अशी ही भाषा कित्येक मर्दांची
ज्यांनी तळी उचलली मराठीची जी जी जी

लेखक, कवी, खेळाडू, साहित्यीक,
नाटककार, संगीतकार, गायक,
डॉक्टर, वकिल, कामगार, संशोधक,
राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी,
रणरागिणी, महिला, लढवय्या, सैनिक, अन शेतकरी,
किती येथील महान व्यक्ती, असली नावे तरी घ्यावी किती!

कवी कुसूमाग्रज, आचार्य अत्रे, पुल देशपांडे, विभावरी शिरूरकर, हमिद दलवाई, आण्णा भाऊ साठे, शाहिर अमर शेख,  बा भ बोरकर, यु म पठाण, सरोजीनी बाबर, विद्या बाळ, चिं त्र खानोलकर, जी ए कुलकर्णी, भा रा तांबे, गोविंद बल्लाळ देवल, लक्ष्मण गायकवाड, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सचिन तेंडूलकर, लक्ष्मण माने, दादासाहेब फाळके, प्रतिभाताई पाटिल, तुकडोजी महाराज, साने गुरूजी, गाडगे महाराज, गोंदवले महाराज, संत चोखामेळा, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन, राजा ढाले,  दत्ता सामंत, उद्धव ठाकरे, वसंतदादा पाटिल, शरद पवार, चिंतामणराव देशमुख, गोळवलकर गुरूजी, नामदेव ढसाळ, आण्णा हजारे, शांताबाई कांबळे, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, राणी बंग, नरेंद्र दाभोळकर, विनोबा भावे, श्रीपाद डांगे, रामदास आठवले, पंडीता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, भिमसेन जोशी, धोंडो केशव कर्वे, पांडूरंग शात्री आठवले, डॉ. विजय भाटकर, अनिल काकोडकर, डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर, कृष्णा कांबळे,  डॉ. श्रीराम लागू, दादा कोंडके, अमोल पालेकर, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, रजनीकांत, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ, सुलोचना, अरूण दाते, अजीत कडकडे, सुरेश भट, अनुराधा पौडवाल, बाबूराव बागुल, अवधुत गुप्ते, अजय अतूल, वैशाली सामंत, सुरेखा पुणेकर, दिलीप सरदेसाई, वेंगसरकर, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, गंगाधर पानतावणे, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, बा सी मर्ढेकर, बालकवी, गुरू ठाकुर......
कितीतरी नावे घेतली तर त्यास दिवसही पुरायचा नाही*. या दैधिप्यमान रत्नांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले आहे.

सारे जण महाराष्ट्री जन्मती
अन सारे जण मराठी बोलती
किती वाटे अभिमान, किती वाढतो आमचा मान
भारत देशाचा वाढविती शान
असे मराठी नरनारी आहे जगती जी जी जी

१९१२, फेब्रूवारी २७,
जन्मले कवी कुसुमाग्रज
साजरा करती हाच मराठी भाषा दिवस
करा प्रतिज्ञा याच दिनी
मराठीच बोलायाचे ठेवा ध्यानी
मागे नाही कधी हटायाचे
सारे काही मराठीसाठी करायचे जी जी जी

खानदेशी, माणदेशी
आहिराणी, कोकणी
वर्‍हाडी, मालवणी
या सार्‍या बोलीभाषा
बहिणी बहिणी
सार्‍यांमुखी नांदती
सुखाने संसार करती
वंश त्यांचा बहरत राहे भुवरी जी जी जी

कित्येक पुस्तके मराठीत प्रकाशीत होती
कित्येक वर्तमानपत्रे मराठीत वाचली जाती
आंतरजालावरही मराठीचा झेंडा फडकतो जोरदार
रोजरोज नवे लेख येती, धुमाकुळ घालती फार जी जी जी

मराठी भाषा असे जगन्मान्य
तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य
तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य
त्या मराठीस त्रिवार मुजरा करून
मराठी भाषिकांना
शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी

* वरती काही मान्यवर मराठी भाषिकांची नावे आली आहेत. त्या व्यतिरिक्तही अनेक महनिय व्यक्ती मराठी भाषिक आहेत. त्यांचीही नावे मराठीच्या इतिहासात आदराने घेतली जातात

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११

नाचत नाचत येई मयुरा


नाचत नाचत येई मयुरा
नाचत नाचत येई मयुरा
वर्षा आली फुलव पिसारा                                 ||धृ||

मेघ वाजती धडधडधड धुम
थेंब जलाचे पडती सरसून
साथ देई घोंगावत वारा
नाचत नाचत येई मयुरा                                 ||१||

रान अवघे हिरवे होईल
पिसार्‍यापरी सारे फुलवील
आनंदूनी नाचवी डोई तुरा
नाचत नाचत येई मयुरा                                 ||२||

लयीत पावले तूझी टाकूनी
डौलाने बघ मान उंचाउनी
सुर केकाउनी कर पुकारा
नाचत नाचत येई मयुरा                                 ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०८/२०१०

Wednesday, February 23, 2011

मै तो हुं शम्मो शहाबादी

मै तो हुं शम्मो शहाबादी

तुम रोक लो खुद को वही, ना आगे आना कभी
मै तो हुं शम्मो शहाबादी, हात लगी तो होगी बरबादी ||धृ||

मेरे पिछे ना आना, कभी सिटी ना बजाना
ना कभी मुझको चिढाना, ना कभी आँख दिखाना
मैं हूं तुम्हारी होनेवाली भाभी ऐसेही समझना
मै तो हूं चिंगारी, सुलगी तो आग लगावूंगी
मै तो हुं शम्मो शहाबादी, हात लगी तो होगी बरबादी ||१||

पिछले गली के राजूने कल मुझे सपने मे देखा
सपनेमेंही उसने साधा बात करने का मौका
मैनें सपनेमेंही उसको ऐसा जबरन ठोका
के हप्तेभर उसे बिस्तर से ना मिलेगी आजादी
मै तो हुं शम्मो शहाबादी, हात लगी तो होगी बरबादी ||२||

जबभी मै रस्तेसे चलू, हट जावो सारे तुम पपलू
कोई खुदको हिरो समझे, मैं तो उसे वही रोकलू
मेरे आगे कोई न जाए, मैंही सबके आगे चलू
फिर पिछे चाहे पडे सारे सारे देश की आबादी
मै तो हुं शम्मो शहाबादी, हात लगी तो होगी बरबादी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११

Thursday, February 17, 2011

आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली


आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली

जास्वंदीचा रंग करा ग
सख्यांनो रंग खेळू चला ग
लाल रंग लावा गाली
त्या रंगाची चढली लाली
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली                                                         ||धृ||

काढा ग काढा तिला घराबाहेरी
ओढा ग ओढा तिला करा बळजोरी
घ्या हाती रंग ओला
नेम धरूनी मारा पिचकारी
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली                                                         ||१||

फेर धरूनी नाचू आता
हात हाती धरू चला
रंगाने माखू सार्‍या
आज अंगरंगांची ओळख झाली
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली                                                         ||२||

राहू नका कोणी रंगांवीणा
भिजवा रंगात सार्‍यांना
आनंदाच्या सणात सारी
धरती भिजून गेली
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली                                                         ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०८/२०१०

नकोना नकोना आता नकोना


नकोना नकोना आता नकोना


तो: ऐ, ये ना
ती: अंहं नकोना, नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना                                      ||धृ||

ती: अवेळी या वेळी तू सतावी मला
इथे नाही कुणी आवर स्व:ताला


तो: नको करू बहाणे का छळशी मला
छळण्याचा खेळ बरा जमतो तूला
तू जवळ ये अथवा मला जवळ घे ना
                                      ||१||

ती: अंहं नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना

ती: इतर वेळी तू रे भोळा सांब माझा
अशा वेळी काय होई न राहतो तूझा


तो: उगा का प्रश्नोत्तरे तूच विचार मनाशी
अशा वेळी काय मागणे हे तू जाणशी
अंतर मिटवाया दुर राहू नको ना
                                      ||२||

ती: अंहं नकोना
तो: नकोना नकोना आता नकोना

ती: चल जा हट सोड तू वाट माझी
ओरडून सांगेन मी तक्रार तुझी


तो: माहीत नाही का काय लागे मला
काय जे हवे तूला तेच हवे मला
मग का ओरडूनी तू सांगे सकळांना
                                      ||३||

ती: तू माझा असूनी दया येते मला
कशाला मग मी त्रास देईन तूला


बहाणे नव्हे हा तर रूकार माझा
वेड्या, चल जवळ येना तू जवळ येना          
                           ||४||

दोघे: हं हं हं हं हं ला ला ला ला ला

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०८/२०१०

Monday, February 7, 2011

जेजूरी गडावर नांदे मल्हारी


देवा तुझी सोन्याची जेजूरी

जेजूरी गडावर नांदे मल्हारी
देवा तुझी सोन्याची जेजूरी                            ||धृ||

देव बसलाय उंच गडावर
चला जावू चढू पायर्‍या हजार
गडकोट बांधला करण्या संरक्षण
वेशीतून जावू घेवू देवाचं दर्शन
बेल भंडारा उधळूनी बोला
यळकोट यळकोट जय मल्हारी
देवा तुझी सोन्याची जेजूरी                            ||१||

देव हा खर्‍या शुरांचा
राजा शिवाजी, मल्हाररावांचा
पराक्रमी उमाजी नाईकांचा
गोरगरीब रयतेचा
मेंढरासंग धनगरांचा
अशा देवाची करू वारी
देवा तुझी सोन्याची जेजूरी                            ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०

Saturday, February 5, 2011

रानवाटा शोधतांना


रानवाटा शोधतांना

रानवाटा शोधतांना हरवले माझे मन                      ||धृ||
हरवले मीच मला, गेलो तुला सापडून

सोनसकाळी एकेदिनी | एकांती रानीवनी
नजरेच्या टापूमधे | अथांग निळे पाणी
डोळा हलकेच दिसे | मुर्ती साजरी छान                    ||१||

गंध शोधीत जाता | रुप समोर येई
वाटेतून चालतांना | शब्द सलज्ज होई
अलगद थरथर | ओठी आली दिसून                      ||२||

चालतांना दशदिशा | मला न उरले भान
आभाळाने धरतीस | दिले भरून दान
सावलीत उन्हाच्या | तळपती जिव दोन                   ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०

गण: वंदन करीतो गजाननास


गण: वंदन करीतो गजाननास

यावे गणास गणपती आज
नमन करीतो आम्ही तुम्हास
रसीक जमले तुमचा भास
होवूद्या गौळणवग खास
वंदन करीतो गजाननास                           ||धृ||

कार्यारंभी वंदन करूनी
गणास आळवी शुभशकूनी
हाती घेतली डफतुणतूणी
द्यावा आशिर्वाद आम्हास
वंदन करीतो गजाननास                           ||१||

सरस्वतीचे लेणं लिहूनी
गान मंदिरी गाणं गावूनी
नम्र होवूनी तिजला वंदूनी
विनवितो आम्ही बुद्धी देवीस
वंदन करीतो गजाननास                           ||२||

कला आमची रसीका दाखवाया
भाग्यवंत पुण्यवंत आम्ही ठराया
लवकर येवूनी आम्हास पावा
गणात नित भजतो तुम्हास
वंदन करीतो गजाननास                           ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०

Wednesday, January 19, 2011

स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला नैसर्गीक फिल्टर

स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा.

पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडचणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.
हां, आता लहान मुले, महीलावर्गाची यात कुचंबणा होणार, पण निसर्गापूढे कोणाला जाता येते का?

दुर्देवाने या साथीत ज्यांचे म्रुत्यू झाले आहेत त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांबद्दल सहानुभूती बाळगून मी म्हणतो की त्यांच्या (माणसांच्या) शारीरीक (मिशी) ठेवण्याबाबत जर काही संख्याशास्त्रीय डाटा उपलब्ध केला गेला तर मला वाटते की या माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आढळेल.

आपल्याला काय वाटते?
(पुर्वप्रकाशीत)

- पाषाणभेद

एसटी पुराण

एसटी पुराण

एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली. आपल्यातल्या जुन्या लोकांपैकी बर्‍याच जणांनी असल्या जुन्या बस बघीतल्या असतील. त्यानंतर बर्‍याच बसेस आल्या अन गेल्या. त्यांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलले. सार्वजनिक प्रवासासाठी महामंडळ अस्तित्वात आले. प्रवासास अनेक सुखसोई असणार्‍या बसेस आल्यात.

६० ते ८० च्या दशकाच्या शतकात एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे हाच एक पर्याय होता. त्यानंतरच्या काळात खाजगी लक्झरी बस प्रवासासाठी उपलब्धझाल्यामुळे प्रवास बराचसा सुखकर झाला अशी प्रवाशांची समजूत झाली.

एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे फॅशन झाल्यासारखे वाटते. काही प्रमाणात शहरी भागात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामिण भागात प्रवासासाठी एसटी बस शिवाय पर्याय नाही. 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी' हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. ती सवलत नाकारली तर महामंडळाचा नफा बर्‍याच प्रमाणात वाढू शकतो. तरीही केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. सरकारने महामंडळाप्रती आपली दृष्टी बदलली पाहीजे. बर्‍याचदा खाजगी वाहतूकदार करणारे हे राजकारणी अन मोठे लोक असतात. ते सुद्धा महामंडळाची अडवणूक करतात. त्या त्या रुट वर कमी प्रमाणात गाड्या चालविल्या जातात. हे सार्वजनिक प्रवासास अहितकारक आहे.

भारतातल्या प्रत्येक राज्यात अशी एसटी धावते. तुम्ही त्या त्या राज्यात जर अशा एसटी बसने प्रवास केला तर तुम्हास आपल्या राज्यातील बससेवाच कशी चांगली आहे हे पटेल. काही प्रमाणात गैरसोई असतील तरीही सामायीक विचार केला असल्यास वरचे विधान आपणास पटेल.

आता बसबद्दल. माझ्या लहाणपणापासून मी लालपिवळी बस बघत आलेलो आहे. st busa ordinary
त्यातून प्रवासही केला आहे. नंतरच्या आशियन गेम च्या काळात आशियाड बस सुरू झाल्या.
asiad bus
त्यांचा रंग हिरवा पांढरा होता.
आता जनता बस चा रंग लाल असतो.

shivaneri AC bus
शिवनेरी एसी बसचा रंग निळा आहे.

बसेसचे सिटस, अंतर्गत व्यवस्था आरामदायी झालेली आहे. तरीही त्यातल्या त्यात मला आपली लालपिवळी जुन्या बॉडीची बसच आवडते. जुन्या बसचे सीट सलग आहे. त्यात आशियाड बस सारखी तुटक सीटस असलेली आसनव्यवस्था नाही. ३+२ अशी आसन व्यवस्था जुन्या लाल पिवळ्या बसेस मध्ये असते. सीटस च्या पुढे (अन पुढल्या सीट च्या मागे) एक मोठी आडवी दांडी सलग असते. तिच्यावर डोके टेकून मस्त झोप लागते.
आशियाड अन आताच्या नविन जनता बस मध्ये अशी सोय नाही.
asiad bus without handle
आशियाडमध्ये पुढला आडवा दांडा नसतो. एक छोटे हँडल आहे. सीटही तुटक तुटक असतात. त्यामध्येही हात ठेवण्याचे हँडल बसण्याच्या आड येते. सीटला पायबर मोल्डींग मध्ये बनवत असल्याने घमेल्यासारखा आकार आपल्या सीटच्या सोईसाठी दिलेला असतो. त्यात काही सीट 'मावतात' तर काही बाहेर 'सांडतात'. आशियाड बसमधले प्रवासी शक्यतो शेजार्‍यांशी बोलत नाही. केवळ नाईलाज म्हणून आम्ही आशियाड 'बस' मध्ये बसतो अन्यथा लक्झरी बस आम्हास परवडते/ आवडते अशी त्यांची गोड तक्रार असते. खरे म्हणजे त्या प्रवाशांनी खाजगी लक्झरी बसची 'गोडी' कधीतरी चाखलेली असते. खाजगी बसच्या प्रवास करण्याच्या वेळेचा भोंगळपणा, वेळकाढूपणा, त्यांचे टेक ऑफ पॉईंट्सवर थांबणे, सक्तीचे 'शहर दर्शन' हे त्यांनी घेतलेले असते. एसटी बस ही त्यातल्या 'दगडापेक्षा मऊ' वृत्तीने अन गॅरंटीड वेळेवर सुटणे-पोहचणे, सुरक्षीत असणे या गुणांवर ते आशियाड मध्ये बसलेले असतात.
एकूणच ज्याने प्रवास केलेला आहे त्याला आशियाड बस पेक्षा लालपिवळी बस चांगली वाटू शकते. लाल पिवळ्या बसमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे पण ते ग्रामिण भागातल्या बसमध्येच. शहरी भागात लालपिवळी बस सुद्धा (तुलनेने) स्वच्छ असते.

गावाकडच्या बसने प्रवास करण हा एक अनुभव असतो. कंडक्टर ड्रायव्हरला त्यांचे नेहमीचे प्रवासी ओळखीचे झालेले असतात. गावात शेवटची बस असेल तर ते अशा प्रवाशासाठी थांबतात. तो आल्यानंतरच बस निघते. बाजाराची बस म्हणजे एक जत्राच असते. भाजीपाला, घरगुती सामानसुमान, फावडे, पहारी, विळे, कुदळ, खताची पोती, चादरी विक्री करणार्‍यांच्या थैल्या आदी आसनांवर आसनांखाली विराजमान होतात. वरच्या टपावर भाज्यांची मोठी पोती, सायकली, एखादा पलंग ठेवलेला असतो. कंडक्टर त्या सगळ्यांची लगेजची तिकीटे विचारून काढत असतो. त्याचा या गर्दीत हिशेब जुळतो हे पाहून मला तर तो एखाद्या चार्टड अकाउंटपेक्षा मोठा वाटायला लागतो.

तर असे हे एसटी पुराण. यातल्या छोट्या छोट्या एककांबद्दल (units) नंतर कधीतरी लिहू. तुर्तास विस्तारभयास्तव येथेच थांबणे योग्य.
(लेखातील छायाचित्रे त्या त्या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

- पाषाणभेद
०६/०८/२०१०

Tuesday, January 18, 2011

वाट बघतोय रिक्षावाला

शालिमारे का भौ?

चला सिबीएस, शालिमार...

लगेच निघेल...

"शालिमार?"

चला बसा...

शालिमार... शालिमार...

ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?

ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल?

विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.

आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर. आजून दोन पायजे तुमाला हालायला.

चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?

"हो, शालिमार."

किती दोन का?

"हो. किती पैसे?"

बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सिबीएस?

"अहो आता कुठे बसवता? चार तर बसवले. किती अडचण."

पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा

"ओ आवाज जरा हळू करा ओ. डोकं दुखतंय."

बंदच करतो. ठिक?.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?

"हो. मिळाले"

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

"शालिमार आलं का? "

हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.

चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?

"हो."

बसा.

"पवननगर म्हणजे सिडको ना? "

हो. तुमाला कुठे जायचे आहे?

"पवननगरलाच. त्रिमुर्ती चौकात."

त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.

"कधी निघणार."

हे काय लगेच. शिट तर भरू द्या.

"हा स्टॉप शेअर रिक्षांचा आहे ना?"

हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.

"पट्टा म्हणजे?"

नविन आहे का तुम्ही.

"हो"

पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार ते नविन सिडकोचा आहे.

"दररोज किती पट्टे मारतात?"

सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्‍या दिवशी लेवल करावी लागते.

"किती कमाई होते दिवसभरात?"

कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्‍हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.

पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"चला लवकर. किती वेळ?"

अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?

"नको. गाडी भरेपर्यंत गप्पा मारू. स्पेशल ट्रिप मारता का?"

नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.

चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"पुडी देवू का? हिराये  माज्याकडे"

"नाही मला नाही लागत. तुम्ही किती खाता? "

जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.

"माळी म्हणजे?"

१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.

"अरे बापरे एवढ्या पुड्या!"

अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.

पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....

"गाडीत टेप लागतो का?"

हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.

चला आता गिर्‍हाईक आलं. लगेच निघतो बघा.

पवननगर का?

"हो"

चला बसा.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०८/२०१०

शालिमार चौक, नाशिक

Thursday, January 13, 2011

कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

अरे आमच्या कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

आवडते म्हणूनी लोणी मागतो
माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो
उगाच माझी खोडी काढूनी
तुम्ही लोणी मज देत नाही
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?

दही दुध शिंक्यात टांगले
हाती माझ्या न लागे असे ठेवले
संवंगड्यासवे काढाया जाता
म्हणता दही मी चोरून खाई
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?

पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता
उगाचच तुमची वस्त्रे विसरता
न जाणोनी कोठे शोधीता
आळ मजवर मग का घेई?
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०१०

Tuesday, January 4, 2011

मळ्यातली सहल


मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्‍याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.


आपल्यासाठी काही छायाचित्रे:





मळ्यातले घर




"माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलाय लळा"- यांच्याच ताज्या दुधाचा चहा घेतला



"कोंबडी शेळी बकरं मेंढरं

तसच पाळीतो मी रानपाखरं

गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं" (माझ्या जमीनीचं गाणं)

शेती उपयोगी जनावरे कपिला गाय, राजा व सर्जा बैल





"गाय वासरू - .... नका विसरू!"



"हिच्यामंदी करीतो मी जोंधळा

लावीतो कधिमधी हरभरा

पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर "

८ तुकडे बाजरी लावलेली आहे. मी गेलो तेव्हा निंदणी चालू होती.




बांधावरून फिरतांना राणी कुत्री आमच्या बरोबर आली.




या कुत्रीला माणसांचा फार लळा होता. फोटोसाठी खास पोज दिली तिनं!





हे गावीत काका. हे शेतातच राहतात अन देखभाल करतात. मिरचीला नुकतेच खत टाकलेले होते. त्याची पाहणी चालू आहे.




"एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास" - जनावरांसाठी लावलेला घास




हे मिरचीच्या वावराचे तुकडे. मी गेलो तेव्हा २ हप्ते काढलेले होते.




मिरचीची रोपे




हे आणखी वेगळे रोप मिरचीचे. ही तिखट जातीची अन मोठ्या आकाराची मिरची होती.




गावित काकांनी मग वानोळा घेवून जाण्यासाठी इतक्या मिरच्या तोडल्या की माझ्या मोटरसायकलची डिक्की तर भरूनच गेली. शेवटी मीच काही मिरच्या कमी केल्या.



नंतर गाईचे दुध काढतांना उशीर झाला. अंधारायला आलेले होते. पावसाचे वातावरण असल्याने मी मग घाईघाईने शेतातून निघालो.


माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
पडती मनामधी तुफानी पाउस धारा ||धृ||

लाटांवर लाट येई उंच उसळून
तालात त्यांच्या घेई मला लपेटून
भरती आली माझ्या मनाच्या समिंदराला
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||१||

भरल्या वादळी नाव वल्हवू मी कशी
माझ्या होडीची वल्ह दिली तुझ्या हाती
जोशात हाक नाव पोचव सागर तीराला
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||२||

जाळं टाकलं पाण्यात गावंना मला मासोळी
आले तुझ्याच जाळ्यात मीच झाले मासोळी
घरला ने मला बरोबरीनं काढीन जलम सारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||३||

-पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०७/२०१०

Wednesday, December 29, 2010

आयटम साँग : मै तो नाचू छम छम छम छम

आयटम साँग : मै तो नाचू छम छम छम छम

मै तो नाचू छम छम छम छम, छमा छम छम
तू ईधर कम कम कम ||धृ||

लडकी मै नही हूं भोली, सता मुझे
क्या मै कर जावू नही मालूम तूझे
रात भर मस्ती करना, ऐसे शरमा
मेरे साथ नाचनेका नही है किसमे दम
मै तो नाचू छम छम छम छम ||||


आज जवानी का तूभी जरा चखले नशा
दुनीया जाय तेल लेने, तू क्यूं पाये सजा
आजा मेरी जान, पास आजा जरा
तूही मेरी व्हिस्की तूही मेरी रम
मै तो नाचू छम छम छम छम ||||


सारी दुनीया है मेरे हुस्न की दिवानी
मै मांगू दिल, तो पगले देते जवानी
कोई पसंद आया, तूही भाये मुझे
तूही तो मेरा राजा है, तूही मेरा सनम
मै तो नाचू छम छम छम छम ||||


मै तो नाचू छम छम छम छम, छमा छम छम
तू ईधर कम कम कम ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/१२/२०१०

Tuesday, December 14, 2010

युगलगीतःसजना ओय सजना तुम इतने देर से क्यूं आये?

युगलगीतः सजना ओय सजना तुम इतने देर से क्यूं आये?


लडकी:
सजना ओय सजना तुम इतने देर से क्यूं आये?
आये तो आये तुम खाली हात आये! ||धृ||

लडका:
देर हो गयी माफ कर देना
इतनीसी बात पर गुस्सा ना होना
आये तो हम आपहीके लिये आये

लडकी:
तुम इतने देर से क्यूं आये? ||१||

चलो जाने दो
आज कहाँ जाये खाने खाना?
मै जो बोलूंगी वही तुम्हें है मंगवाना

लडका:
ठिक है बाबा, ये भी मान लिया
क्यूं न आज ढाबे में खाना खाने जाये?

लडकी:
तुम इतने देर से क्यूं आये? ||२||

एक बात बोलो
करते हो ना प्यार सच्ची मुझसे
या दिल दे दिया और किसीसे

लडका:
ये क्या कहेती हो!
ऐसा क्यूं तुम सोचती हो?
अरे हम आपहीसे सदा प्यार करे

लडकी:
तुम इतने देर से क्यूं आये? ||३||

बडे भोले हो, बडे बुद्धू हो
ये तो केवल था एक बहाना
मुझे मालूम है की तुम मेरे लिए आहें भरे
फिरभी तुम इतने देर से क्यूं आये? ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/११/२०१०

Saturday, December 11, 2010

माहेराची आटवण येई

माहेराची आटवण येई

आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||

बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका
पुढं जाई मागं येई, चुके काळजाचा ठोका
पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||१||

भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला
सुर जाई लांब मोठा, जवा राही मैत्रीण जोडीला
इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||२||

बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी
जिंकायाची परत्येक डाव, राही मोटी बहिन पाठी
भादव्यात नेमानं भजायाची गुलाबाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||३||

सहावा सरून काल सातवा लागला
बाळराजाच्या चाहूलीचा गोळा पोटात आला
माझ्या घरीही येईल झोका, दोन महिनं वाट पाही
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||४||

आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०७/२०१०

Thursday, December 9, 2010

आसं कसं वो तुमी मर्द गडी

आसं कसं वो तुमी मर्द गडी


{{{कानडाऊ योगेशु वदला तू
लावणी लिहायची फर्माईश केलीस तू

पाषाणाने लिहीली लावणी आनंदाने
वाचन करा आस्वाद घ्या तुम्ही सारे}}}



जमीन खोदताय निसती तुम्ही
जेसीबी यंत्र येईना धड कामी
खालचा वरचा गियर टाकीता
अ‍ॅक्शीलेटर दाबूनी बंद पाडता गाडी
पाव्हनं आसं कसं वो तुमी मर्द गडी ||धृ||

कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा
दाजी तुमी गाडी निट चालवा


दिवसाराती कामच काम, नाय दुसरं काही ठावं
जळ्ळं मेलं लक्षण तुमचं, धंदा करायचं नुसतं नावं
गाडी भाड्यानं कशाला लावता
धंद्याची गावंना तुम्हा नाडी
अहो आमदार, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||१||


लई दिसांची मैतरी आपली, वाढू लागली प्रित
डोक्यामदी गजरा माळूनी, साजरी करूया रात
टॅक्टर दामटायचा सोडून देवून
उगा म्हनं चालवू का बैलगाडी
अहो मिशीवाले, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||२||


गावरान आबं पिकल्याती, पेरू लागल्याती पाडाला
पाडायाची आठवन पडली, बहार जड झाला झाडाला
उगाच खुळ का काढीता
म्हनं तुझी माझी नाय जमायाची जोडी ||३||
टोपीवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी

येड्यावानी करताय सगळं, सरळ चालंना काही
सांगून सांगून थकले मी ग,काम्हून वाकड्यात शिरता बाई
पायात पाय आडकला तुमचा
कमरंचं धोतार रस्ता झाडी
अहो फ्येटेवालं, आसं कसं वो तुमी मर्द गडी ||४||

कोरस : डिझल भरलंय नव्ह टाकीत तुमी, हात लावून जरा हलवा
दाजी तुमी गाडी निट चालवा


- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०७/२०१०

Wednesday, December 8, 2010

माझे बाबा

माझे बाबा

बंडू म्हणाला माझे बाबा ताकदवान
ऑफीसात सारे झुकवतात मान

राम म्हणाला माझे बाबा आहेत मस्त
४ डिश भेळपुरी करतात फस्त

शाम म्हणाला माझे बाबा करतात मस्ती
मातीमधली जिंकतात कुस्ती

खंडू म्हणाला माझे बाबा शेतकरी
शेतात जावून उसाला पाणी भरी

राणी म्हणाला माझे बाबा गॅरेजमधे जातात
स्कुटर कारचे ऑपरेशन करतात

चित्रा म्हणाली माझे बाबा डॉक्टर
पण नाटकात असतात अ‍ॅक्टर

सुंदर म्हणाला माझे बाबा आहेत बिल्डर
क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट फिल्डर

चिनू म्हणाला माझे बाबा शाळेत शिक्षक
लेख कविता नाटकांचे करतात परिक्षण

गणू रडत म्हणाला माझे बाबा आता नाहीत
ते काय होते मला नाही माहीत

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२५/०७/२०१०