Saturday, December 11, 2010

माहेराची आटवण येई

माहेराची आटवण येई

आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||

बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका
पुढं जाई मागं येई, चुके काळजाचा ठोका
पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||१||

भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला
सुर जाई लांब मोठा, जवा राही मैत्रीण जोडीला
इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||२||

बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी
जिंकायाची परत्येक डाव, राही मोटी बहिन पाठी
भादव्यात नेमानं भजायाची गुलाबाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||३||

सहावा सरून काल सातवा लागला
बाळराजाच्या चाहूलीचा गोळा पोटात आला
माझ्या घरीही येईल झोका, दोन महिनं वाट पाही
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||४||

आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०७/२०१०

No comments: