Tuesday, June 29, 2010

वंशावळी : एक ओळख

वंशावळी : एक ओळख

मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार

आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट - श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata
श्री. कैलास ब्रम्हभट (वंशावळ वाचणारे)

ते त्यांच्या वडिलांपासून असणारे हे काम सांभाळतात. आल्यानंतर चहापाणी झाला. अन त्यांनी आमची वंशावळी वाचायला सुरूवात केली. वंशावळ वाचण्याच्या आधी त्यांनी गणेश व इतर देवतांना वंदन केले अन मग एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचू लागले. कोण व्यक्ति कुठे होता, त्याला मुलगे किती, मुली किती, सुनबाई कोणत्या कुळातली, तिचे माहेरचे गाव कोणते आदी उल्लेख त्यात येत गेले. अगदी शंभर वर्षे च्या वरचा उल्लेख त्यात आला होता. नंतर नंतर जेव्हा पणजोबा, आजोबांचा उल्लेख त्यात आला तेव्हा ओळख पटायला लागली. एक प्रकारचा आपल्या कुळाचा इतीहासच होता तो. त्यानंतर त्यात आताच्या नविन पिढीची/ मुलांची नावे लिहील्या गेली. नंतर त्या पोथीची पुजा करून व दक्षिणा अन शिधा देवून समाप्ती झाली.
Vanshaval
वंशावळीतील एक पान

Vanshaval-2
वंशावळीतील एक पान

कैलास ब्रम्हभट यांच्याशी केलेल्या गप्पामधून बरीच माहिती मिळाली. कैलास यांचे पणजोबा/ आजोबा हेच काम करत असत. वंशावळीसच नामावळी किंवा वडलोपाजी असे म्हणतात. आता ते मध्यप्रदेश, गुजरात अन महाराष्ट्राचा प्रदेश या वंशावळ वाचण्यासाठी सांभाळतात. जोडीने ते एका मोटरसायकल ने घरून दिवाळीनंतर निघतात अन जुन पर्यंत ते फिरत राहतात. एखाद्या गावात ते एखाद्या घरी राहतात अन मग त्या गावातल्या समाजबांधवांच्या घरी वंशावळी वाचत फिरतात. त्यानंतर जवळच्या गावात चक्क्कर असतो. असे जुन पर्यंत चालू असते. आमच्या घरचे वाचन संपल्यानंतर ते गल्लीतील दुसर्‍या समाजबांधवांकडे जाणार होते. त्यांचे नाव सांगितल्याबरोबर त्यानी ते कोठले, त्यांचे भाऊबंद कोण याचा उल्लेख बरोबर केला. प्रत्येक कुळाच्या वह्या स्वत्रंत्र असल्याने व शेजारच्यांच्या वह्या आणल्या नसल्याने त्यांच्याकडे वाचन होवू शकले नाही. पुर्वी मोटरगाडीने प्रवास व्हायचा पण आता मोटरसायकल घेवूनच प्रवास केला तर परवडतो. जुन नंतर ते परत राजस्थान (मदनगंज ता किशनगंज, जि अजमेर) ला जावून त्यांच्या स्व:ताचा इलेक्ट्रीकलचा व्यवसाय बघतात.

2 comments:

Vishnu Gopal Vader said...

मी कर्नटकातला आहॆ. आमच्याकडॆ अशा लॊकांना `हॆळवी' म्हणतात. आपली माहिती अत्यम्थ उपयुक्त असून त्या लॊकाम्च्या सम्ग्रहातलॆ एक पान दाखविल्याबद्दल धन्यवाद!!

Dr. Vishnu Wahatule said...

Mr . Vishnu Balkrushna Wahatule
मी महाराष्ट्रातील आहे.
"मी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देविसिंग पाटील यांच्या कार्याचे ऐतिहासिक अध्ययन सन १९३४ - २०१२"
या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पी.एच.डी. चे संशोधन करत आहे.
तर मला त्यांची वंशावळ पाहिजे. ती वंशावळ मला कोणाकडे मिळेल .
करया मला ते सांगा. माझा ई मेल देतो.
vishnuw199@gmail.com
धन्यवाद !