Wednesday, April 3, 2013

दुष्काळावर मात

दुष्काळावर मात

असेच एक गाव होते. त्या गावाजवळून जाणारा एक नदी होती. नदीकाठी मोठ्ठी आंबराई होती. आंब्यांच्या मोसमात त्या आंब्यांच्या झाडांना रसदार आंबे येत. त्या आंबेराईमुळेच त्या गावाचे नाव आंबेवन पडले होते. ती आंब्याची बाग कुणा एकाची नव्हती. ती त्या गावच्या मालकीची होती. संपुर्ण गाव त्या आंबेराईचे मालक होते. गावची पंचायत त्या झाडांची निगा राखे. पंचायतीने गावातल्या प्रत्येक घरातल्या स्त्री किंवा पुरूषाला कामे नेमून दिली होती. कुणी लहान लहान रोपट्यांची निगा राखे, कुणी झाडांना पाणी देण्याचे काम बघे, कुणी झाडांवरच्या मोहोराची, त्यावर पडणार्‍या रोगाची काळजी घेई तर कुणी येणारा फळाचा बहर काळजीपुर्वक हाताळी, त्यांची तोड करणे, बाजारात विक्री करणे आदी कामे कुणी करी. तालूक्याच्या गावी बाजारात त्या फळबहाराची विक्री करून दरवर्षी त्या गावाला भरपूर उत्पन्न मिळे. येणार्‍या रोख रकमेचा विनीयोग गावकरी आपसात समजूतीने करून घेत. हे सारे त्या गावच्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले होते. गावकरीदेखील आपल्या पुर्वजांचा आदर राखून या आंबराईची श्रद्धापुर्वक देखभाल करत. गावातील प्रत्येक घर या आंबराईशी भावनेने बांधले गेले असल्याने गावकर्‍यांना ती आमराई स्वःताचीच वाटे. सारे गावकरी भांडणतंटा न करता समजूतीने आपाअपल्या वाट्याची कामे करीत. किरकोळ कुरबूर असेलच तर ती चारचौघे लक्ष देवून मिटवून टाकत.

अशा या आमराईची, तेथल्या कामाची महती सर्वदूर पसरली होती. पंचक्रोशीतील लोक या कामाची माहीती घेण्यासाठी, कैर्‍या, आंबे खरेदी करण्यासाठी नेहमी येत. गावकर्‍यांनी अशा भेटीसाठी येणार्‍या लोकांसाठी एक छानशी बाग त्या आमराईच्या सुरूवातीला केली होती. भेटीसाठी आलेले लोक त्या बागेत विश्रांती घेत, न्याहारी, वनभोजन करत. लहान मुले तेथे खेळ खेळत.

आंबेवन गावाच्या पुर्वेला असलेल्या वीस पंचवीस कोस दूर असणार्‍या तवली नावाच्या डोंगर रांगांमधून रांगणी नावाची नदी उगम पावत असे. आमराईपर्यंत येण्यापूर्वी त्या नदीला आणखी चारदोन ओहोळ मिळत. नदीच्या पाण्याचा फूगवटा अगदी उन्हाळा मध्यावर आला तरी आटत नसे. रांगणी नदीच्या पुण्याईने आंबेवन अन त्याच्या आसपासची जमीन ओलीताची होती. ज्या कुणाची शेती होती तो तो शेतकरी चांगली नगदी पीके घेवून सुखाने खातपीत होते. जे शेतमजूर होते ते इतरांच्या शेतावर राबत होते. गावातले सारे जण सुखात होते.

अशा सुखाने नांदणार्‍या आंबेवनाला दृष्ट लागली. दोन वर्ष सतत तवली डोंगररांगांमध्ये पाऊस पडला नाही. दुष्काळाने परिसर होरपळून निघाला. विहीरींनी आपला पान्हा आटवला. जनावरे चार्‍यापाण्याविना विकायची वेळ आली. गडीमाणसे, बायाबापड्या पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करू लागले. आंबराईची तर होरपळ झाली. उत्पन्नावर परिणाम झाला. शेतकर्‍यांच्या खिशातील पैसा पाण्यापाई संपला. आंबेराईतील चार शहाणेसुरते लोक एकत्र आले. पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी विचार केला. जर रांगणी नदीच्या वरच्या टोकाला बांध घातला तर तीचे पाणी अडवून ते पुरवून वापरता येईल या निष्कर्षापर्यंत गावकरी आले. पण रांगणी नदीचा उगम हा तवली डोंगररांगातून होत होता तो परिसर वडगावाच्या हद्दीत येत होता. आंबेवनाच्या गावकर्‍यांनी वडगावाच्या लोकांना नदीवरील बांधाबाबत सांगितले. त्या गावाच्याही लोकांनी दुष्काळी परिस्थिती पाहून बांध घालण्याबद्दल दुजोरा दिला. दोन्ही गावाच्या गावकर्‍यांनी सरकारदरबारी आपले म्हणणे मांडले. बांध घालण्यासाठी दोन्ही गावे श्रमदान करायला तयार होती पण सरकारी पैशाविना बांधाचे मोठे काम पुढे जाणे अवघड होते. या सगळ्या प्रयत्नात दुष्काळाचे आणखी एक वर्ष उजाडले. जो काही थोडाफार पाऊस पडला त्याच्या पाण्याने थोडेदिवस तहान भागली पण पाण्याशिवाय परिसर उजाड वाळवंट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

कमी पावसामूळे दुष्काळी परिस्थिती आताशा राज्यामध्ये ठिकठिकाणी निर्माण झाली होती. या दरम्यान आंबेवन आणि वडगावच्या लोकांनी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता बांध घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. दोन्ही गावातील घरटी एक माणूस श्रमदानासाठी खपू लागला. कुणी कुदळ घेवून, कुणी फावडे घेवून, कुणी पाटी घेवून तर कुणी कुदळ आदी हत्यारे घेवून कामावर जावू लागला. बाजूच्या डोंगररातून मुरूम, दगड-माती बंधार्‍याच्या भरावासाठी वापरात येवू लागली. बंधार्‍याचा पहिला थर तयार झाला. तोपर्यंत पावसाळा येवून ठेपला. आलेल्या पावसाने डोंगररांगांतून पाणी वाहू लागले. रांगणी नदीच्या उगमापाशी तयार झालेल्या बांधामध्ये पाणी अडू लागले. त्यामूळे परिसरातील विहीरींमध्ये पाणी भरू लागले. पावसाळ्यातील पाण्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न तात्पूरता मिटला होता. बांधातले पाणी पुढला हिवाळा संपेपर्यंत पुरले त्यामुळे गावकर्‍यांचा हुरूप वाढला. ही बातमी राज्याच्या राजापर्यंत पोहोचली. संपूर्ण राज्यभर दुष्काळाचे सावट असतांना ह्या आनंदाच्या बातमीने महाराजांनी बांधाला स्वत: भेट दिली. दोन्ही गावच्या गावकर्‍यांचे अभिनंदन करून सरकारी मदत जागेवरच जाहीर केली.

महारा़जांनी केलेल्या मदतीमुळे सरकारी यंत्रणा कामाला लागली. बंधार्‍याची उंची वाढवली गेली. बांधाचे पाणी सोडण्यासाठी दरवाजे बसवले गेले. दोन्ही बाजूंनी दोन कालवे खोदण्यात आले. पाणीवाटपाचे वेळापत्रक तयार होवून त्याबरहूकूम पाणी कालव्यांमधून वेळोवेळी सोडवण्यात येवू लागले. जातीने महाराज या प्रयोगाकडे लक्ष देवून होते. या सार्‍या प्रयत्नांमुळे आंबेवन व वडगाव परिसरातील पाण्याची पातळी वाढली. शेतीसाठी पाटामधून पाणी मिळू लागले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आंबेवनाची आमराई पुन्हा बहरू लागली.

त्यानंतर आलेल्या आंब्यांच्या हंगामात आंबेवनातील गावकरी तयार आंब्यांच्या पाट्या महाराजांना भेटीसाठी घेवून गेले. महाराजांनी त्या भेटीचा आनंदाने स्विकार करत आंबेवन-वडगाव बंधार्‍याचा प्रयोग संपुर्ण राज्यभर राबवण्याचा आदेश सरकारी अधिकार्‍यांना दिला.

अ) दीर्घोत्तरी प्रश्न:
१) आंबेवनातील दुष्काळापुर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.
२) दोन्ही गावांनी दुष्काळी परिस्थितीवर कशी मात केली?
३) राज्यात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांनी काय प्रयत्न केले?

ब)लघूत्तरी प्रश्न :
१) तवली डोंगरावरून कोणती नदी उगम पावत असे?
२) बांध बांधल्यानंतर गावकर्‍यांनी महाराजांना काय भेट दिली?
३) श्रमदान करण्यासाठी गावकरी काय काय घेवून कामे करू लागली?

क) उपक्रमः
१) तुमच्या परिसरात उपलब्ध असणारे पाणी कसे वाचवता येवू शकते याबाबत प्रकल्प अहवाल तयार करा.
२) जे नागरीक पाणी वाया घालवता त्याबद्दल त्यांचे पाण्याबाबत उद्बोधन करा.

सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले. दारू कशी बनते, तीचे प्रकार कसे पडतात, दारू बनवण्याची शास्रीय विधी, ती पिण्यासाठी करावे लागणारे सामाजीक विधी, निरनिराळ्या देशांतल्या दारूबद्दलच्या संकल्पना आदी सारे त्या लेखांत होते.

गावठी दारू तशी काय आपल्याला नवीन नाही, तरीपण शासनाचे नियम वाचून थोडीफार करमणूक झाली. प्रतिक्रिया देणारेही दारूबाबतीत फार जाणकार दिसले. समाजात आपल्याइतकेच दारूत पट्टीचे बुडणारे आहेत हे पाहून आनंद झाला. बर्‍याचशा लोकांच्या खुपशा प्रतिक्रिया आभ्यासू होत्या. लेखक हलकट यांनी तर गावठी दारू बनवण्याची रेसेपी दिल्याने गावठी दारू घरच्या घरी बनवण्याची इच्छा होत होती. पण ती रसायने अन ते डबे, बॅरल, चुल, चाटू आदींचा सेट घरात लावायचा म्हणजे नसता डोक्याला ताप होता. अन मुख्य म्हणजे गावठी दारू तयार करणारा इसम गावठी दारू पाडतांना दारूच्या अंमलाखाली नसावा इतके या लेखातून कळले. दारू पिण्यापेक्षा दारू बनवणे अगदीच किचकट, चिकाटीचा अन बुद्धी शाबूत ठेवून करायचा प्रकार आहे हे माझे मत पक्के झाले. दारू तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर वाढला. त्यातल्या त्यात गावठी दारू बनवणे हा प्रकार तर भन्नाट होता. कमीतकमी सामूग्री वापरून जास्तीत जास्त नशा देणारी दारू बनवणे हा खरोखरच भन्नाट प्रकार आहे यात शंका नाही. त्यातही जर असल्या दारूच्या भट्टीवर जर पोलीसांच्या धाडी पडल्या तर सगळी मेहनत यांच्या ओठी जाणार! कितीतरी रिस्क या धंद्यात आहे. पोलीसांचे हप्ते सांभाळून, समाजाप्रती आदर राखून, प्रॉफीट मार्जीन कमी ठेवून दारू गाळणे म्हणजे खरोखर लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच आहे. हा धंदा करणार्‍यांना शासनाने काही सवलती जाहीर कराव्यात. अर्थातच त्या सवलती इतक्याही असू नयेत की त्यामूळे असली गावठी दारू म्हणजे सरकारमान्य देशी दारू ओळखली जावू लागेल.

हे असले काही वाचले म्हणजे दारू पिण्याचे ते दिवस आठवतात. सरकारच्या कृपेने आम्ही एका बँकेत कामाला होतो. आमचा संपर्क शेतकरी वर्गाशी होता. आता आमच्या या बँकेत काम करणारी जमात म्हणजे अतिशय दुर्लक्षलेली. त्यांनी काम केले काय अन न केले काय सारखेच. शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी त्यांची कागदपत्रे स्वःतच करवून आणत. काय शेतमाल गहाण वैगेरे ठेवायचा तो परस्पर गोदामात जमा करत. साहेबांच्या कृपेने आमचे काम केवळ सह्याजीरावाचेच होते. अशी सगळी अनुकूल परिस्थिती असल्याने त्यातही एकदोन सहकारी कर्मचारी आनंदमार्गाला लागलेले असल्याने त्यांच्याबरोबर आम्हालाही आनंदाची सवय जडली. आमची बदली ज्या गावी होती तेथे कुटूंब नेणे सोईस्कर नव्हते. इतर सहकार्‍यांचीही तीच स्थिती होती. त्यामूळे आम्ही सगळे सक्तीचे बॅचलर एकाच खोलीत राहत होतो. मग सकाळपासून आनंद मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. घरापासून दुर असलो तरी आमच्या खोलीपासून आनंद मिळवण्याचे दुकान जवळ होते. अगदी बाजूची पाच-सहा घरे सोडली की आनंदप्राप्ती होत असे. नंतर नंतर दुकानदार ओळखीचा झाल्याने उधारउसनवार आनंद मिळे. पुढेपुढे तर आनंदाची इतकी सवय लागली की कर्ज मंजूर करवून घेणार्‍यांसमावेत कर्ज मंजूर झाल्याबद्दल कधी कधी स्वखर्चाने या आनंदाचे वितरण व्ह्यायला लागले. यथावकाश व्हिआरएस स्किम लागू झाल्यानंतर नोकरी सुटली. घरी आल्यानंतर आनंदाचे सेवनाचे प्रमाण कमी कमी होवून आताशा ते बंदही झाले. आनंदाचे व्यसनात रूपांतर झाले नाही ही आनंदाची बाब आहे.
दारू पिणार्‍यांचेही प्रकार पडतात. हौसेने दारू पिणारे, कधीतरी पिणारे, अट्टल बेवडे, केवळ पिण्याचे नाटक करणारे, एकटेच पिणारे व्यसनी, दारू पिणे सहन होत नाही तरी पिणारे आदी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला आपण किती प्यावी हे समजले पाहीजे. हे काही एकदम फुशारकीचे काम नाही की ते केले म्हणजे तूम्ही मोठे शहाणे, सभ्य वैगेरे. होणार्‍या शारिरिक, सामाजिक परिणामांचे भान राखूनच दारू सेवन केले पाहीजे किंवा न केले पाहीजे.

माझ्या दुरच्या नातेवाईकाचे गावाकडे काळा गुळ, इतर रसायने, मोहफुले खरेदीविक्रीचे दुकान आहे. मोहाची दारू घेण्याचा मोह आताशा होत नाही पण अजूनही त्यांच्याकडे गेल्यावर दुकानात जेव्हा जेव्हा जाणे होते तेव्हा तेव्हा जूने दिवस आठवतात.

एकुणच दारूच्या नशेत जाण्यापेक्षा दारूला आपल्या नशेत आणणे महत्वाचे.
(काल्पनिक)
- पाषाणभेद

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.

निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.

शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!

निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?

शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते. शिळपादन या दुर्लक्षीत गणल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल श्रोत्यांची जाणीव वाढून त्याचे रसीक वाढत आहेत हे पाहून अभिमानही वाटतो आहे.

निवेदकः मला सांगा, ही शिळपादनाची सवय आपणास कशी लागली?

शिळबाबा: लहाणपणापासून मी स्थूल प्रकृतीचा आहे. मी जन्माला आलो तेव्हाही माझे वजन जास्त होते. घरचे सांगतात की त्या हॉस्पीटलात जन्माला येणारा मी पहीलाच इतक्या जास्त वजनाचा होतो. मोठा होत असतांना माझ्या अंगात आळसाचा शिरकाव झाला. प्रत्येक गोष्टीत मला आळस करण्याची सवय लागली. दुपारचे जेवण झाल्यानंतर मी आहे तेथेच झोपून जात असे. नंतर आई मला पाठीत रट्टा देवून रात्रीच्या जेवणालाच उठवत असे. अशा रीतीने दिवस जात होते. दरम्यान मी शाळेत जाण्याचाही कंटाळा सुरू केला. सुदैवाने घरची परिस्थिती चांगली असल्याने शाळेत जाण्याबद्दल मला कुणी आग्रह करत नसत. वडिलांचा सोनारकीचा धंदा होता. पुढे थोडा मोठा झाल्यानंतर मी पण त्यांच्या सोन्याच्या दुकानात जावून बसत असे. या सर्व परिस्थितीमुळे शिळपादनासाठी माझी शारिरीक स्थिती अनुकूल झाली आणि ती सवय पुढे वाढीस लागली.

निवेदकः अच्छा. पण मग या शिळपादनाच्या सवयीचे छंदात कसे रूपांतर झाले? ती सवय वाढीस कशी लागली?

शिळबाबा: आमचे दुकान पंचक्रोशीत मोठे व प्रसिद्ध होते. दुकानात बसत असतांना मी शिळपादन करत असे. माझी सवय पाहून आमच्या दुकानाच्या मॅनेजरने माझ्यासाठी एक मोठी कॅबीन दुकानात तयार केली. घरून निघून मी दुकानात कॅबीनमध्ये बसत असे. तेथेच जेवण चहा पाणी व्हायचे. सुरूवातीला मी कमी वेळेच्या शिळा वाजवत असे. नंतर नंतर मला जास्त वेळेच्या शिळांची सवय लागली. पुढे मग मला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा झाली. मी एकदा एका गाण्याच्या मुखड्यावर शिळपादन करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. पुढे मी निरनिराळ्या गाण्यांच्या मुखड्यांवर सराव केला व तो जमू लागला.

निवेदकः अं फारच छान. बाहेर फाल्गून महिन्याचे फारच छान वातावरण आहे. तूम्ही बसा. आपण आपल्या श्रोत्यांना बाहेरची हवा चाखायला सांगू. मी पण त्यांच्याबरोबर एक ब्रेक घेतो. श्रोतेहो तूम्ही कोठेही जावू नका. आम्ही आलोच एक छोटा ब्रेक घेवून.

निवेदकः (परत ताजेतवाने होवून येतो): श्रोतेहो, आपण प्रसिद्ध शिळ्पादक श्री. शिळबाबा यांच्याशी बोलत आहोत. शिळबाबा, मला सांगा, शिळपादनाची वेळ वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले?

शिळबाबा: तो एक नियमीत सरावाचा भाग आहे. सुरूवातीला फारच कमी वेळ शिळपादन व्ह्यायचे. नंतर नंतर मी खुप सरावाने पोटातील हवानियमन करायला लागलो. यात योग क्रियेचा फार मोठा वाटा आहे. बाबा कामदेव यांच्या आश्रमात मला माझ्या बाबांनी उपचारासाठी सहा महीने पाठवले होते. तेथे शवासन या योगक्रियेचा मी झाडून अभ्यास केला. बाबा कामदेव यांनी मला माझ्यावर मेहेनत घेवून दोन महीन्यातच सर्व अभ्यासक्रम शिकवला आणि सन्मानपुर्वक मी आश्रम सोडला. त्यांनंतर दुकानातील एकांत कॅबीनमध्ये मी शिळपादनाचा रियाज करायला लागलो.

यात आहाराचाही भाग महत्वाचा आहे. मला काही पदार्थांचे नियमीत सेवन करावे लागते. चणे, फुटाणे माझ्या खिशात तर नेहमीच बाळगावे लागतात. हवाबाण हरडे, तत्सम आयुर्वेदीक औषधे यांचे मी नियमीत सेवन करतो.

निवेदकः अच्छा म्हणजे तूम्ही फारच मेहेनत घेतात तर. हे जे तूम्ही शिळपादन करतात ते अचूक कसे करतात? म्हणजे सुर कसा लावतात? त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना जरा सांगाना.

शिळबाबा: मी दुकानात टेपवर गाणी ऐकायचो. त्यात काही अभिजात भारतीय वाद्यांच्या रागावर आधारित कॅसेटस आमच्या मॅनेजरने मला दिल्या. त्या ऐकून मला एखाद्या रागावर आधारित शिळपादन करण्याची कल्पना सुचली व मी ती अंमलात आणली. आधी सांगितल्याप्रमाणे योगक्रियेचादेखील मला उपयोग होतो.

निवेदकः तुमचे कार्यक्रम वैगेरे होतात. त्याबद्दल जरा...

शिळबाबा: कार्यक्रम म्हणजे असे काही नाही, पण एखाद्या बैठकीत जाणे होते. मग माझे शिळपादनाचे कार्यक्रम होतात. मला बंदिस्त ठिकाणी कार्यक्रम करायला आवडत नाहीत. खुले मैदान वैगेरे असेल तर बरे पडते. आणखी एक सांगतो. माझ्या कार्यक्रमाची मी बिदागी काही घेत नाही. जाण्यायेण्याचा खर्च देखील मी आयोजकांकडून मागत नाही. सर्व काही मी मोफत करतो.

निवेदकः तुमच्या काही आगामी योजना आहेत काय? तुमचे काय मत?

आगामी योजना म्हणजे हा जो काही शिळपादनाचा प्रकार आहे त्याला अंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून देणे जेणे करून सर्वसामान्य जनतेपर्यंत याची माहिती मिळावी व शिळपादन सारख्या दुर्लक्षीत, हलक्या समजल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. बघूया. तुमच्यासारख्यांचे प्रोत्साहन असेल तर ते कार्यही सिद्धीस जाईल.

निवेदकः नक्कीच नक्कीच. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठिशी आहेतच. शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छीता?

शिळबाबा: काही संदेश देणे वैगेरे करण्याइतका मी काही मोठा नाही, पण मेहेनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जगातला प्रत्येक व्यक्ती शिळपादनात यशस्वी होवू शकतो हेच माझे सांगणे आहे.

निवेदकः शिळबाबा, तुम्ही आज आमच्या स्टूडीओत आलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपल्या शिळपादनाची एक झलक म्हणून तूम्ही काहीतरी ऐकवा.

शिळबाबा: मी सुद्धा तूमचा आभारी आहे. माझ्यासारख्या कलाकाराला बोलायला मिळते हे माझ्य भाग्य आहे. आता मी तुमच्या आग्रहाखातर राग 'बहारी ठसधमाल' मध्ये 'आओ सैया खेले होली, जरा नजदीकसे मारो पिचकारी' ही चीज दृतलयीत ऐकवतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार.

(ही मुलाखत एकाचवेळी आंतरजालावर निरनिराळ्या संकेतस्थळांवर प्रकाशित केली गेली.)