Wednesday, April 3, 2013

सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले. दारू कशी बनते, तीचे प्रकार कसे पडतात, दारू बनवण्याची शास्रीय विधी, ती पिण्यासाठी करावे लागणारे सामाजीक विधी, निरनिराळ्या देशांतल्या दारूबद्दलच्या संकल्पना आदी सारे त्या लेखांत होते.

गावठी दारू तशी काय आपल्याला नवीन नाही, तरीपण शासनाचे नियम वाचून थोडीफार करमणूक झाली. प्रतिक्रिया देणारेही दारूबाबतीत फार जाणकार दिसले. समाजात आपल्याइतकेच दारूत पट्टीचे बुडणारे आहेत हे पाहून आनंद झाला. बर्‍याचशा लोकांच्या खुपशा प्रतिक्रिया आभ्यासू होत्या. लेखक हलकट यांनी तर गावठी दारू बनवण्याची रेसेपी दिल्याने गावठी दारू घरच्या घरी बनवण्याची इच्छा होत होती. पण ती रसायने अन ते डबे, बॅरल, चुल, चाटू आदींचा सेट घरात लावायचा म्हणजे नसता डोक्याला ताप होता. अन मुख्य म्हणजे गावठी दारू तयार करणारा इसम गावठी दारू पाडतांना दारूच्या अंमलाखाली नसावा इतके या लेखातून कळले. दारू पिण्यापेक्षा दारू बनवणे अगदीच किचकट, चिकाटीचा अन बुद्धी शाबूत ठेवून करायचा प्रकार आहे हे माझे मत पक्के झाले. दारू तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर वाढला. त्यातल्या त्यात गावठी दारू बनवणे हा प्रकार तर भन्नाट होता. कमीतकमी सामूग्री वापरून जास्तीत जास्त नशा देणारी दारू बनवणे हा खरोखरच भन्नाट प्रकार आहे यात शंका नाही. त्यातही जर असल्या दारूच्या भट्टीवर जर पोलीसांच्या धाडी पडल्या तर सगळी मेहनत यांच्या ओठी जाणार! कितीतरी रिस्क या धंद्यात आहे. पोलीसांचे हप्ते सांभाळून, समाजाप्रती आदर राखून, प्रॉफीट मार्जीन कमी ठेवून दारू गाळणे म्हणजे खरोखर लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच आहे. हा धंदा करणार्‍यांना शासनाने काही सवलती जाहीर कराव्यात. अर्थातच त्या सवलती इतक्याही असू नयेत की त्यामूळे असली गावठी दारू म्हणजे सरकारमान्य देशी दारू ओळखली जावू लागेल.

हे असले काही वाचले म्हणजे दारू पिण्याचे ते दिवस आठवतात. सरकारच्या कृपेने आम्ही एका बँकेत कामाला होतो. आमचा संपर्क शेतकरी वर्गाशी होता. आता आमच्या या बँकेत काम करणारी जमात म्हणजे अतिशय दुर्लक्षलेली. त्यांनी काम केले काय अन न केले काय सारखेच. शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी त्यांची कागदपत्रे स्वःतच करवून आणत. काय शेतमाल गहाण वैगेरे ठेवायचा तो परस्पर गोदामात जमा करत. साहेबांच्या कृपेने आमचे काम केवळ सह्याजीरावाचेच होते. अशी सगळी अनुकूल परिस्थिती असल्याने त्यातही एकदोन सहकारी कर्मचारी आनंदमार्गाला लागलेले असल्याने त्यांच्याबरोबर आम्हालाही आनंदाची सवय जडली. आमची बदली ज्या गावी होती तेथे कुटूंब नेणे सोईस्कर नव्हते. इतर सहकार्‍यांचीही तीच स्थिती होती. त्यामूळे आम्ही सगळे सक्तीचे बॅचलर एकाच खोलीत राहत होतो. मग सकाळपासून आनंद मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. घरापासून दुर असलो तरी आमच्या खोलीपासून आनंद मिळवण्याचे दुकान जवळ होते. अगदी बाजूची पाच-सहा घरे सोडली की आनंदप्राप्ती होत असे. नंतर नंतर दुकानदार ओळखीचा झाल्याने उधारउसनवार आनंद मिळे. पुढेपुढे तर आनंदाची इतकी सवय लागली की कर्ज मंजूर करवून घेणार्‍यांसमावेत कर्ज मंजूर झाल्याबद्दल कधी कधी स्वखर्चाने या आनंदाचे वितरण व्ह्यायला लागले. यथावकाश व्हिआरएस स्किम लागू झाल्यानंतर नोकरी सुटली. घरी आल्यानंतर आनंदाचे सेवनाचे प्रमाण कमी कमी होवून आताशा ते बंदही झाले. आनंदाचे व्यसनात रूपांतर झाले नाही ही आनंदाची बाब आहे.
दारू पिणार्‍यांचेही प्रकार पडतात. हौसेने दारू पिणारे, कधीतरी पिणारे, अट्टल बेवडे, केवळ पिण्याचे नाटक करणारे, एकटेच पिणारे व्यसनी, दारू पिणे सहन होत नाही तरी पिणारे आदी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला आपण किती प्यावी हे समजले पाहीजे. हे काही एकदम फुशारकीचे काम नाही की ते केले म्हणजे तूम्ही मोठे शहाणे, सभ्य वैगेरे. होणार्‍या शारिरिक, सामाजिक परिणामांचे भान राखूनच दारू सेवन केले पाहीजे किंवा न केले पाहीजे.

माझ्या दुरच्या नातेवाईकाचे गावाकडे काळा गुळ, इतर रसायने, मोहफुले खरेदीविक्रीचे दुकान आहे. मोहाची दारू घेण्याचा मोह आताशा होत नाही पण अजूनही त्यांच्याकडे गेल्यावर दुकानात जेव्हा जेव्हा जाणे होते तेव्हा तेव्हा जूने दिवस आठवतात.

एकुणच दारूच्या नशेत जाण्यापेक्षा दारूला आपल्या नशेत आणणे महत्वाचे.
(काल्पनिक)
- पाषाणभेद

No comments: