Wednesday, October 28, 2009

बोलत होता मोबाईलवर

बोलत होता मोबाईलवर


आरे त्या देवळात करुंन र्‍ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच.
- सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्‍याला सांगत होता मोबाईलवर.

"हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर.

आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?
- सुदाम मुकादम बोलत होता त्याच्या मोबाईलवर.

अरे, कॉलेजमध्ये नको, त्याच्या समोरच्या आइस्क्रीमच्या शॉप मध्येच येना. तेथे वरती गर्दी पण नसते काही. चल हट, मागच्या वेळेसारखं काही करायच नाही हं, चल ठेवते, बाय!
-शिल्पा आपल्या मित्राला सांगत होती मोबाईलवर.

अरे, काय क्लिनीकमध्येच आहेस ना? मी बाफणा नावाच्या पेशंटला पाठवतो आहे तुझ्याकडे. हं, टाईप २ डायबेटीक विथ लेफ्ट व्हेंन्ट्रीक्यूलर हायपर्ट्रूफी. जरा बघून घे. हो.. हो... बिजनेसमन आहेत. अन तुझी नवीन जागा कशी आहे? माझे काय रे, सध्या सिझन चालू आहे. रविवारी बसू सगळे. चल बाय.
- डॉ. गोगटे डॉ. शहांशी बोलत होते मोबाईलवर.

भाऊराव, ३ वाजत आले, आता तरी माघार घ्या. नाय बंडखोरी आम्हीपन केली आसती हो, पन आम्ही तुमचं सगळं सांभाळून घेवू. महामंडळाच अध्यक्षपद देवू. चला आता कलेक्टर हापिसात या आन माघारी अर्जावर सह्या करा.
- पक्षाचे अधिकृत उमेदवार बंडखोर भाऊरावांना सांगत होते मोबाईलवर.

आरे गेनू, लवकर ये बाबा. २ पोती जास्त आन शिंच्या. आज लोकांनी जास्त नारळ अन फुलांच्या माळा वाहील्यात देवीला. येतांना मागच्या दाराने ये अन हो पैसे पण घेवून ये हो.
देवीचे पुजारी मंदीराबाहेरच्या गेनू दुकानदाराला सांगत होते मोबाईलवर.

ए आई, आता तू जास्त काम करत जावू नको. बाबांना घरीच रहायला सांगत जा. प्रकृतीची काळजी घेत जा. मी पैसे पाठवतोच आहे. तुझी सुनबाई मजेत आहे येथे. धर आता तुझ्या नातवाशी फोनवर बोल.
- एनआरआय आयटीतला मुलगा आपल्या भारतातल्या आईशी बोलत होता मोबाईलवर.

No comments: