Friday, December 30, 2011

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||१||

नांदूरमधमेश्वर धरण जवळ दोन मैलावर
उस द्राक्ष पिकवी शेतकरी कष्टाने फार
नाशिकजिल्ह्यातले हे पक्षी अभयारण्य
गोदावरी पुढं वाहते पिकवीत रानं
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||२||

गणपती सरस्वती देवीच्या आजूबाजूला
होमकुंड मंदिरात दाखवीते ज्वाला
वाहन देवीचे वाघ समोर दर्शनाला
मन प्रसन्न होई आईला भेटून
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||३||

निळकंठेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी
हरहर शंभो शंकराची समोर वसती
एका गावात दोन देव नांदती
अख्यायीका प्रसिध्द पुरानकालापासून
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||४||

म्हाळसादेवी कुळदेवी भक्त कुळांची
भक्त तिचे सारे देशातून येती
आशिर्वाद दर्शन घेवून जाती
पाषाणभेद बुध्दीहीन करी आईचे कवन
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||५||

- पाषाणभेद

युगलगीत: बासूंदी गोड गोड

युगलगीत: बासूंदी गोड गोड

तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||

ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||

तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१||

ती:
माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई
मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई
बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||२||

तो:
सडपातळ तू काजूकतली आहे पाकातली जिलेबी
चाटून पुसूनी फस्त करील वर खाईल कुल्फी
तोंडी माझ्या लागू दे ग तुझ्या वाटीतला कलाकंद
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||३||

ती:
चाखव मला तुझा रे लाल गाजर हलवा एकदा
गाल तुझे रगगुल्ले चाखले खाल्ले मोदक अनेकदा
तिखट चिवडा भजी पकोडे खिलवूनी केलीस झोपमोड
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||४||

तो:
प्रेमाची गोडी वाढली खावून गोड मिठाई
पेढा तुझा ग मी आहे तू माझी रसमलाई
पुरे मला आता नको आणखी भरले माझे पोट
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||५||

- हलवाई पाषाणभेद

Thursday, December 29, 2011

(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली

तुझी माझी प्रित जमली

(टु ऋ : चाल एखाद्या भांगड्यासारखी आहे ब्वॉ.)

तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
लपून छपून प्रेम ते केले
कधी कुणा नाही कळले
आता वाट नको पाहू
वेळ लग्नाची झाली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
कानी तुझ्या ग डूल डुले
पायी पैंजण रुणझूण बोले
गाली लाली येण्याची
वेळ जुळूनी आली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
तू या शेताचा रे राजा
येथेच आण तू बँडबाजा
तुझ्या राणीची वरात
मला स्वप्नात दिसली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
घराची होशील तू ग राणी
कसा राहू तुजवाचूणी
नको जावू आता दुर
तारीख लग्नाची ठरली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

- पाभे

Wednesday, December 28, 2011

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

गुरूदत्तावरी माझा राही विश्वास
दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास
विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती
वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो ||

चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात
प्रयत्न करणे केवळ असे हातात
मागणे माझे काही नसता
दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो ||

- पाभे

कळीकाळानं असला कसला मौका साधला

कळीकाळानं असला कसला मौका साधला

कळीकाळानं असला कसला मौका साधला
व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ||


बाप तू रं आमचा तूच आमची माय
दूध बी तूच आन तूच दूधावरली साय
कोना म्हनू आता आमी माय अन बाप
तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१||


न्हावूमाखू केलं तू रं
तूच घातलं खावू
तू न्हाई समोर आता
आमी कुठं पाहू
इस्तवात पडलो जवा
तवा तूच विझवाया आला ||२||
पुर्वप्रकाशित:शब्दगाऽऽरवा २०११

- पाभे

चालू नको अशी तू

चालू नको अशी तू

चालू नको अशी तू तोर्‍यात ग तोर्‍यात
केस उडतात भुरूभुरू वार्‍यात

केस तुझे मखमली आले गाली
ओठांवर तिळ शोभे गाली खळी
नको तिरक्या नजरेनं पाहू
मीच दिसे तुझ्या डोळ्यात

खट्याळ वारा तुझा उडवी पदर
उगाच माझी त्यावर गेली नजर
पाहून तुझं रूप झाली हुरहुर
सावरून घे पदराला हातात

सांग तू असा का करते नखरा
बघून तुला मी मारतो चकरा
जीवाला लावून नको जावू घोर
कसं सांगू मी तूला प्रेमात

- पाभे

मी या शाळेत जाणार नाही

मी या शाळेत जाणार नाही

दुर आहे शाळा घरी लवकर येता येत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

भिती मला वाटे शाळा नवी मोठी
आठवते मला शाळा जुनी छोटी
नविन शाळा मला मुळीच आवडत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

जुने मित्र माझे फार होते ग चांगले
बट्टी होई आमची जरी भांडण झाले
ह्या शाळेत मला मुळी कुणी मित्रच नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

मोठे मोठे वर्ग येथे मोठा आहे फळा
नव्या मुलांना जुनी मुले करती कोंडाळा
भंडावून सोडी सारे दोन्ही डोळा पाणी येई
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

लहानच आहे मी काही मोठा नाही झालो
उगीचच मागच्या वर्गात पहिला मी आलो
या शाळेत अ‍ॅडमीशन का घेतले समजत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

आई तू एकदातरी सांग ना ग बाबांना
जुनी शाळाच चांगली बोल ग त्यांना
अभ्यास तेथेही करीन निट मी राहीन
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

- पाषाणभेद

शाळेची वेळ

महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते.
विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात.
सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात.

सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना शाळा संपवून दिवसभर मोकळा वेळ मिळतो. ते विद्यार्थी या वेळेत घरी जावून, ताजेतवाने होवून दुपारच्या दरम्यान एखाद्या शैक्षणीक वर्गाला जावू शकतात. फावल्या वेळेचे छंद, वाचन, घरकाम करू शकतात. एखादा गरजू विद्यार्थी एखादे काम करून हातखर्चाला पैसे मिळवू शकतो. (बालमजूरी योग्य नाहीच पण ती त्या विद्यार्थ्यांची गरज असू शकते.)

जेव्हापासून इयत्ता १२ वी ला स्पर्धा परिक्षेला महत्व आले तेव्हापासून इयत्ता दहावीच्या गुणांचे महत्व कमी झाले. तरीही दहावीचे गुण पुढील प्रवेशासाठी महत्वाचे असतातच असतात. अगदी ०.१ टक्यांवरूनही एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आजकाल स्पर्धा परिक्षांची तयारी अगदी नववी पासून होते आहे. अशा नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना हा मोकळा वेळ सोन्यासारखा मौल्यवान ठरू शकतो.

बहूतेक शाळांचे मोठे माध्यमिक वर्ग (आठवी ते दहावी) हे दुपारच्या सत्रात आयोजित केलेले दिसतात. या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळा, पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. सकाळच्या वेळात या वर्गांचे नियोजन शाळांनी केल्यास तसा वेळ त्या विद्यार्थ्यांना निश्चीत मिळू शकतो.

याच्या नेमके उलट घडते. लहान वर्गाचे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत जातात. पाचवी पासून पुढे ठिक आहे पण पहिली ते चौथीचे विद्यार्थी हे खरोखर लहान वयाचे असतात. सकाळच्या वेळी त्यांचे उठणे, तयारी करवून घेणे पालकांना जिकीरीचे असते. त्यातही दुपारचा वेळ हा त्यांच्यासाठी इतका काही महत्वाचा नसतो. त्यावेळेत ते शाळेत जावू शकतात.

शालेय व्यवस्थापनाला या गोष्टी माहीत असतीलच पण याबाबत त्यांनी काही विचार करून वेळेचे योग्य नियोजन केले पाहीजे.

आपल्यालाही शाळेच्या वेळेबाबत असला अनुभव आहे काय?

Sunday, December 25, 2011

झाड

झाड

आजकाल कुणी सावलीत येत नाही
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ||

गेले कित्येक उन्हाळे
सावली देत आहे उभा;
कोरडे ठेवीले वाटसरूंस
पावसाळ्यात सुध्दा;
हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१||

खोड जुन वाढले
फांद्या जुन्या झाल्या;
त्या मुळी न मातीत
नव्याने रूजल्या;
नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२||

कधी गळते दुजे
पान पहिल्यासारखे;
मातीत मिळूनी
होते ते मातीसारखे;
त्या पानांसारखे माझेही पान होई
सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३||

- पाषाणभेद

भाव(खावू)गीत:फेसबुकमुळे

भाव(खावू)गीत:फेसबुकमुळे


तो:
जग हे आभासी कोणा न कळे
ती:
(हो रे, ते खरे, पण)
तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ||

तो:
तुझा आयडी होता आयडी हा खरा
ती:
तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा
तो:
होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१||

तो:
आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक
ती:
त्यानंतर आपण कितीक फिरवीली बाईक
तो:
फोटो तुझा आता डिलीट करून टाक गडे ||२||

ती:
नकोच फेक आयडी आता नवे नवे ते करणे
तो:
नकोच तसलेच फोटो पाहून उगाचच झुरणे
ती:
दोन आयडी नको आता एकच आयडी पुरे ||३||

ती:
होईल रे आता स्टेटस अपडेट एकदा
तो:
नकोच खोटी स्तूती करा सदा सर्वदा
ती:
कमेंट देण्यासही वेळ आता न मिळे ||४||

- पाषाणभेद