Wednesday, August 25, 2010

गीत: वाटे मज अपार सुख

वाटे मज अपार सुख

वाटे मज अपार सुख, धरूनी हाती हात
कोणी नसे जवळी तरी तुच द्यावी साथ ||धृ||

कुंजविहारी यमुनाजळी
ऐकून कान्हाची मुरली, राधीका आली प्रेमभरात ||१||

शांत शांत या उपवनी
पाखरे मधूर कुजन करोनी, चोच देती चोचीत ||२||

नकोच काही दुसरे मजला
तुच सखया जवळी असता, साथ देईल चांदरात ||३||

दोन नयनांचे झाले मिलन
ओळख विसरून तन, द्यावया निघाली साथ ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०६/२०१०

शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ

शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ

अग कारभारणी आता घाई कर चल
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||धृ||
पावसानं केली घाई शिवारात आला मोठा
काळ्या रानी आला तो घेवूनी हिरव्या वाटा
रान आता हिरवील, रान आता फुलवील
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||१||

भुईमुग, तूर, मठ, उडीद अन मुग
पिकं लावणी करू आता बाजरी पेरू या मग
पांभर धरतो मी अन तू मागं ये धरून ओळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||२||

नागली, नाचणी, खुराचणीचं आंतरपीक घेवू
ज्वारी, सुर्यफूल, गहू, हरबरा; रब्बी हंगामात ठेवू
तू म्हणतेस तर करू एकदोन पोते तांदूळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||३||

विहीरीला पानी उतरलं चार परस खोल
द्राक्ष डाळींबाच्या नादी नको, जमीन आहे पाणथळ
निंदणी खुरपणी करून घेवू काढण्या हरळी अन लव्हाळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||४||

कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी करू आपण भाजीसाठी
गिलके, काकडी, वाल पापडी लावूया तूझ्या हौसेसाठी
न्याहारी कर लवकर बघ पहाटेची झाली सकाळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||५||

खरीपाची जोडणी केली, पैका येईल बक्कळ
देवाजीला विनंती केली, जावूदे सारा दुष्काळ
सारं काही त्याच्या हाती आपण निमित्त केवळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०६/२०१०

Thursday, August 12, 2010

युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे

युगलगीत : अलवार गुपित उमगले प्रितीचे
ती :
अलवार गुपित उमगले प्रितीचे
माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ||

ती :
हळूच आज सांज फुलली
नभानेही लाली ल्याली
लकेर घेवूनी सुरांची सुस्वर
ताला सुरांचे गीत मी गातसे ||१||

दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे....

तो :
दुरवर बघ त्या डोंगर रांगी
खुणावीतसे तो रंगीत पक्षी
बोलावी का तुला मला तो
समजेल का कधी बोल त्याचे ||२||

दोघे : अलवार गुपित उमगले प्रितीचे....

ती :
लहरून वारा मंद धुंदला
अस्सा झोंबला अस्सा कुंदला
लगडून जायी सार्‍या शरीरा
सावरून घेई मला तुच आता जवळ ये ||३||

दोघे :
अलवार गुपित उमगले प्रितीचे
माझ्या मनी आज मोर नाचे ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)

२३/०६/२०१०

Tuesday, August 10, 2010

गीत: कधी कधी खोटं बोलाया लागते

कधी कधी खोटं बोलाया लागते


कधी काम करतांना, कधी काम सांगतांना
तुमची आमची कसोटी खरोखर लागते
लोकहो तुम्हां खरखरं सांगतो, तेव्हां कधी कधी खोटं बोलाया लागते ||धृ||
लहाणपणीचे साधे उदाहरण तुम्ही घ्याना
शिक्षक सांगती अमूक तमूक गृहपाठ करूनी आणा
न केला अभ्यास तर तुम्ही काय देता उत्तर?
ठावूक असे गुरूजनांना त्याचे कारण
तरीही शिक्षा मिळे तुम्हांला ओल्या छडीची
खोटे बोलणे तेव्हा आपसूक येई तुमच्या ओठी
असलेच खोटे खोटे बोलणे तेव्हापासून सुरू होते
म्हणून तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||१||

मोठे मोठे होता होता खोटे बोलणे हे
वाढतच जाते कमी न होता कधी ते
घरादारात, शाळा, कॉलेजात
असलेच बोल बोलणे ठरते क्रमप्राप्त
सगळेच खोटे बोल दुसर्‍यांशी बोलतात
खर्‍याचा आव आणूनी एकमेकां गंडवतात
कारणाकारणाने असे खोटे बोलणे तुम्हाआम्हास माहित असते
म्हणून तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||२||

ऑफीसात तर खोट्याशिवाय काम कधी होईना
सहकारी, अधिकारी यांचे त्याविणा काम कधी ढळेना
मारावी लागते कधी लग्नासाठी सुट्टी
कधी मारावी लागते मुलांच्या शाळेसाठी बुट्टी
कधी घरचा गॅस अचानक संपतो
कधी नातेवाईकच हॉस्पीटलात गॅसवर राहतो
असे सर्व असतां काय करावे ते करावेच लागते
तेव्हा तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||३||

असे हे खोटे बोलणे आपल्याच तोंडाचे
कधी शाप असे तर कधी उशा:पाचे
जरूर स्मरण करा गांधीजींच्या एका माकडाचे
पण योग्य वेळी भान ठेवा बोल खोटे बोलायाचे
नाहीतर उगाचच फसणे येई तुमच्या पदरात
ज्यांना खोटे बोलणे न येई ते मानहानी पत्करतात
"म्हणूनच बोलणे खोटे योग्य", असेच पाषाणाचे बोल खरे ठरते
तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||४||

बोलणे खोटे योग्य असे, काम करण्यासाठी फायदेशीर ठरते
एकविसाव्या शतकाचा हाच मुलमंत्र जपणे हेच सत्य असे
आई बाप पोरगा प्रेयसी रक्ताचे नातेवाईकही त्यातून ना सुटे
असल्याच गोष्टी जगात असती सगळीकडे
व्यर्थ आहे त्यांच्याविणा सरळ चालणे
त्याच त्याच गोष्टी आता किती वेळ सांगू , माझे बोलणे तुम्हा खोटे का वाटते?
ऐका माझे, तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०६/२०१०

Saturday, August 7, 2010

गीत: अरे अरे रिक्षावाल्या

अरे अरे रिक्षावाल्या
अरे अरे रिक्षावाल्या तू चाललास कुणीकडे
जायचे आहे मला तिकडे, तू नेतोस भलतीकडे ||धृ||

संध्याकाळची वेळ झाली, नाही मिळेना वाहन
थांबून थांबून कंटाळले, उरले नाही त्राण
शेवटचा उपाय म्हणूनी बोलावली तुझी रिक्षा
का उगाच लांबून नेतो, मला माहीत आहे रस्ता
असं कसं करतोस, भलत्याच भागात आणले मला इकडे
जायचे आहे मला तिकडे तू नेतोस भलतीकडे ||१||

लांब माझे घर आहे, रिक्षा ने की घराजवळ
मिटरने जे काही होईल तेच पैसे मी देईल
नकोस मागू जादा भाडं, नेहमीच करते मी रिक्षा
काहीबाही बोललास तर करीन तुला शिक्षा
आरेरावी केलीस तर जाईन मी हवालदाराकडे
जायचे आहे मला तिकडे, तू नेतोस भलतीकडे ||२||

अरे अरे रिक्षावाल्या तू चाललास कुणीकडे
जायचे आहे मला तिकडे तू नेतोस भलतीकडे

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०६/२०१०