शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ
अग कारभारणी आता घाई कर चल
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||धृ||
पावसानं केली घाई शिवारात आला मोठा
काळ्या रानी आला तो घेवूनी हिरव्या वाटा
रान आता हिरवील, रान आता फुलवील
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||१||
भुईमुग, तूर, मठ, उडीद अन मुग
पिकं लावणी करू आता बाजरी पेरू या मग
पांभर धरतो मी अन तू मागं ये धरून ओळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||२||
नागली, नाचणी, खुराचणीचं आंतरपीक घेवू
ज्वारी, सुर्यफूल, गहू, हरबरा; रब्बी हंगामात ठेवू
तू म्हणतेस तर करू एकदोन पोते तांदूळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||३||
विहीरीला पानी उतरलं चार परस खोल
द्राक्ष डाळींबाच्या नादी नको, जमीन आहे पाणथळ
निंदणी खुरपणी करून घेवू काढण्या हरळी अन लव्हाळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||४||
कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी करू आपण भाजीसाठी
गिलके, काकडी, वाल पापडी लावूया तूझ्या हौसेसाठी
न्याहारी कर लवकर बघ पहाटेची झाली सकाळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||५||
खरीपाची जोडणी केली, पैका येईल बक्कळ
देवाजीला विनंती केली, जावूदे सारा दुष्काळ
सारं काही त्याच्या हाती आपण निमित्त केवळ
शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||६||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०६/२०१०
No comments:
Post a Comment