link
नैनो (तेच ते हो हिंदी भाषिक... निट उच्चारही करता येत नाही त्यांना... सुरेश ला सुरेस म्हणतात....शंकरला संकर म्हणतात....काय संकर करतात शंकरच जाणे...) तर नैनो .... आपली नॅनो म्हणायचं हो मला... आपलीच म्हणायची... कारण तिचा जन्म आपल्या पुण्यातच झाला ना? आता सासरी म्हणजे गुजरात मध्ये गेली म्हणून काय झाले? तर नॅनो ही कार आपल्याला काही परवडणार नाही. आपण तर बुवा मस्त रिक्षा घेणार. अहो नैनोमध्ये (ऐ गपे... मराठी शिकवू का?) सॉरी अहो नॅनोमध्ये किती माणसं बसतात? सांगा सांगा.. ४ च ना? म्हणजे १+३ ना? १ म्हणजे डायवर अन बाकी ३. बळजबरी केली तर १+४ चं पासिंग मिळेल तिला.
आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. या रिक्शावाल्याचा स्वभाव अन शंकरभगवान यांचा स्वभाव एकदम खटकू. नगास नग. कधी काय होईल सांगता येत नाही. कधी हात दाखवून वळेल तर कधी तिसरा डोळा मारेल.. आपलं उघडेल.. भस्म हो साक्षात भस्म. जळून राखुंडी. कधी गांजा/ भांग पिलेले डोळे तर कधी सोमरस प्राशन. असो.
तर रिक्षात पुढे ३ जण.. ग्रामिण भागात ५ जण. आता पुढे मोजा. मागे ४ जण बसतीलच. व्हा पुढेमागे. बसा खेटून. किती झाले? ७ की ९? अहो शहरी भागात ७. ग्रामिण भागात ९. पुढे मोजा. बच्चेकंपनी असेल तर मागे बाल्कनीत २ जण. सामानसुमान पायाशी. एखादी बॅग पुढे किक च्या हँडल जवळ. (काय कॉम्बीनेशन आहे. किक पायाची अन हँडल हाताचे.)
नै.नॅनो अन रिक्षाचा अॅव्हरेज सारखाच. स्पिडही सारखाच. रिक्षात वेळीअवेळी पेट्रोलचा डोस देवून रॉकेलही चालू शकते. रिक्षा हवेशीर आहे. दार खिडकी नाही. खा अन पचाक. खा अन पचाक. खा अन पचाक. अरे बस कर बाबा.
पार्किंग ला जागा कमी लागते. टर्नींग रेडीयस कमी. गल्लीबोळात जाता येते. रिक्षात लाखभर पैसे मळक्या पिशवीत ठेवले तर कुत्रेही हुंगत नाही. अन मुख्य म्हणजे ती पण आपल्या पुणे-३५ मध्येच तयार होते. बॉडी दणकट आहे. सरळ अंगावर घालता येते. गॅरेजचा खर्च कमी येतो. अॅक्शीलेटर वायर २५ रुपयात भेटते. आहे का तुमच्या नै..नॅनोचा पार्ट स्वस्त? टेप मस्त धकधक लावता येतो. झंकार नाय तर टकारा सर्कीट टाकल तर शकिराही नाचेल. वका वका. काही शक? मातीच्या मडक्यात नुसते स्पिकर ठेवा महाराज. घुंगरूही ऐकू येतील.
रिक्षा चालवत असल्याने बाकीचे वाहनधारक सहसा नादी लागत नाही. लागलाच तर आवाज चढवता येतो. परमिट घेतले तर डबल बिजनेसही करता येतो. रिक्षाच्या हुडवर जाहिरात करता येते.
आता तुम्ही सांगा त्या नै...नॅनोमध्ये आहेत काय एवढ्या सुविधा?
अहो पोरीदेखील म्हणतात, "मला रिक्षावाला नवरा पायजे...मला रिक्षावाला नवरा पायजे..."
म्हणून म्हणतो आम्ही तर एक्स्पोर्ट होणारी रिक्षाच घेणार.
- पाभे (रिक्षावाला)
3 comments:
तीन चाकी असल्याने रिक्षाला टोल पण नाही ;-)
मस्त खुसखीत लेखन ! झकास !!
मस्त खुसखीत लेखन ! झकास !!
Post a Comment