रामराम मंडळी. लई दिवसापास्न मी तुम्हास्नी माझ्या शेतावर घेवुन जायच म्हनत होतो. तो योग आज आला बघा.
चला तर मग माझ्या शेतावर.
माझ्या जमीनीच गाणं
हि जमीन माझी काळी काळीभोर
हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु ||
हिच्यामंदी करीतो मी जोंधळा
लावीतो कधिमधी हरभरा
पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर || १ ||
हि जमीन माझी ...
कोंबडी शेळी बकरं मेंढरं
तसच पाळीतो मी रानपाखरं
गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं || २ ||
हि जमीन माझी ...
हि विहीर माझी लईलई भारी
सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी
अहो मोटर चाले तास चार || ३ ||
हि जमीन माझी ...
एका तुकड्यात लावले तांबटे वांगे हो
एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास
आलाय कलमी आंब्याला सोन्यावानी मोहोर || ४ ||
हि जमीन माझी ...
औंदा लावलाय मी उन्हाळी कांदा
देईल हातामधी रुपया बंदा
न्याहारी आसं माझी झुनका भाकरं || ५ ||
हि जमीन माझी ...
उस हा हो हिरवा जर्द
त्याला घालतो मी हो बारं
झालीत मनगटाएवढी त्याची पेरं || ६ ||
हि जमीन माझी ...
मी हो शेतकरी भिमथडीचा
गुळासाठी लावतो गुर्हाळ
तिकड सहकारी करी साखर || ७ ||
हि जमीन माझी ...
कारभारनीनं लावली हौसेने कपास मऊ
हयो काय, इथं टरारला गहू
त्येला खायाला भिरभीरती पाखरं || ८ ||
हि जमीन माझी ...
कुदळ फावडं विळा नांगर
तण काढती हो ही औजारं
यंदा घ्यायाचा आहे हो ट्याक्टर || ९ ||
हि जमीन माझी काळी काळीभोर
हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु ||
२८/०१/१९९८
- वणी ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील काव्यसंमेलनात २००० साली वाचन केलेली कविता.
No comments:
Post a Comment