गेल्या मासाच्या अंतीम आठवड्यात कचेरीतील मार्च शेवटाच्या कामामुळे काही वेगळे करण्याचा विचारसुद्धा करवत नव्हता. त्या वेळी अचानक भाचीच्या बालभारती (शासकीय) पुस्तकातील सरस्वती देवी च्या चित्रावर आस्मादिकांची द्रुष्टी गेली. देवीच्या करातील पुस्तक एखाद्या ग्रंथासम आणि हातातील मोत्यांची माळ जणू काव्यमोती सम मज भासू लागले. ही काहीतरी नव उर्मी आहे की काय अशी अंतस्थ शंका मनी दाटुन आली. तसे मी काही लेखक किंवा कवी नव्हे. आपले कचेरीत मान मोडून लिहीत बसावे हाच काय तो लेखणीशी संबंध. तरीही काहीतरी लिखाण प्रसवले पाहीजे असे राहुराहून वाटू लागले. परंतू नक्की काय करावे असा पेच पडला.
मासाच्या शेवटल्या दिशी तर कचेरीत माझ्या हातून बर्याच चुका घडल्या. त्या चुका स्वतः मामलतदार साहेबांनी दाखवल्यानंतर आम्ही ताळ्यावर आलो. त्यांची दुरस्ती करण्यासाठी आम्हास जादा तासाचे काम करणे भाग पडले. आता त्या जादा वेळेचे पैसे मिळतील हा भाग निराळा. पण माझ्यासारखा जबाबदारीने काम करणारा सुद्धा अशी चुक करतो हे बघून आमचे मुख्य कारकून सो. श्री. रानवेडे यांनीपण सखेद मह्दआश्च्रर्य व्यक्त केले. त्यादिवशी ते पण माझ्यासाठी जादा वेळ थांबले होते. केवढी हि आपल्या कर्मचार्याची काळजी. ते बघून माझे मन भरून आले. जास्तच वेळ होते आहे ते पाहून साहेबांनी शिपायास सांगुन स्वत: जेवण मागावले. जेवण घेउन आलेल्या पोर्यास जेवणाचे पैसे कचेरीच्या खात्यावर टाकण्यास पर्मावीले.
दुसर्या दिशी नवीन मास चालु झाला. पहिल्या आठवड्यात गुरूवारी आंतरजाळावर भटकत असता मिसळपाव या संकेतस्थळावर आमची स्वारी येवुन थडकली आणि आज आपण जेवणाचा डबा सखाराम शिपायास द्यावा आणि स्वत: भगवती हाटेलाची मिसळ चापण्यास जावे असा साक्षातकार मला व माझ्या टेबलाच्या पुढयात बसलेल्या व नदितील वाळू काढण्याचे टेंडर नेण्यासाठी आलेल्या श्री. गोमाडे- वाळू पुरवठा करणार्यांकडुन आलेल्या माणसास एकदम व्हावा यात आर्श्चय वैगेरे काही नव्हते हे आपणास एव्हाना ध्यानात आलेच असेल. अहो, मिसळपाव संकेतस्थळावर वापरायचे आणि मिसळपाव चापायची नाही म्हणजे घोर अपराधच. आणि आम्ही तो सहसा समोर कुणी कामासाठी आलेला माणुस असतांना करीत नाही. समोरचा आग्रहाने सांगत असतांना तो आग्रह मोडवत नाही हो.
त्यानंतर दुपारी निवांतपणे मिसळपाव धुंडाळतांना अचानक श्रीयूत. भडकमकर मास्तरांचा महान साहित्यिक जालिंदरजींविषयीचा लेख वाचण्यात आला. आजकाल साहित्यसंमेलनात जे काही घडते ते प्रत्यक्शात करणारे साहित्यिक श्री. जालिंदरजी आहेत हे पाहून मनास उभारी आली. त्यांची ग्रंथसंपदा पाहून अभीमान वाटला. मराठीविषयीचा आत्मविश्वास दुणावला. आपणही फुल ना फुलाची पाकळी लिहिले पाहिजे असे वाटू लागले.
सदरहू लेखात उल्लेख असणारे "लिहिते व्हा.." हे संदेशात्मक लिखाणाचे पुस्तकही नुकतेच बाजारात आले आहे हे ही समजले. आपण काही लेखक नाही पण हे पुस्तक आपणापाशी असले म्हणजे ते वाचून व त्या पासून काही स्फूर्ती घेउन आपणही काहीतरी लिहू शकू असे अंत:प्रेरणा सांगु लागली. यास्तव आम्ही कचेरीतुनच बर्याच पुस्तकालयांना दुरध्वनी केले. पण कोठेही काही माहीती मिळू शकली नाही.
हे पुस्तक नविन असल्याकारणाने असे व्हावे असे वाटते. नाहीतरी आपणाकडे वस्तू जुनी झाली की मोल कळते. पुस्तकाविषयीची नकारघंटा एकुन आपण लिहू शकत नाही ही कल्पना करवत नव्हती. मनाचा निर्णय घेतला आणि ठरवीले की या विषयी आपणालाच विचारावे. आपणापैकी कुणाला या पुस्तकाविषयी / त्याच्या उपलब्भतेविषयी जास्त माहीती असेल तर मला कळवावे. मी ते पुस्तक वाचू ईच्छीतो. पुस्तक मिळाल्यास मी ते वाचून परत करीन असे सांगू ईच्छीतो. पुस्तक वाचण्यास देण्याची इच्छा नसल्यास ते कोठे उपलब्भ होईल ते क्रुपया सांगावे. मराठी चा झेंडा आशियापार नेणार्या श्री. जालिंदर यांना सादर प्रणाम.
No comments:
Post a Comment