Monday, August 6, 2018

लहानपणाची आठवण

पावसाळी ढग आकाशात होते. समोर जॉगींग ट्रॅक आणि मधले खेळाचे मैदान होते. आज कुणीच खेळत नसल्याने मोकळे होते ते. त्या शांत वातावरणात मी भरभरून मोकळा श्वास घेतला. शहरातल्या त्या जॉगींग ट्रॅकवर पावसाळ्यामुळे गर्दी बरीच कमी होती. एका कोप-यात बसलो. लहान मुलं खेळत होती. काही व्यक्ती चालत होत्या. काहीपावसाळ्यामुळे, ग्रीन जीम करत होत्या. मी पावसाळ्यात तयार झालेल्या हिरव्यागार गवताच्या काठावर बसलो होतो.  

समोर असणारे  रानटी गवत पाहून मला माझ्या लहाणपणाचे दिवस आठवले. सहावी सातवीत असेन तेव्हा. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत तालूक्याचे न्यायालय होते. तेथे मोठे मोकळे आवार होते. त्यात मुख्य न्यायालाची बैठी कौलारू इमारत होती. जुन्या काळातली, दगडी लाकडी बांधकाम होते ते. तसे त्या आवारातल्या सार्‍या कचेर्‍या ह्या दगडीच होत्या. बहूदा पन्नासातल्या दशकातल्या असाव्यात. बाजूलाच वकीलांची बार रुम. दुरवर कस्टडी मिळालेल्या किंवा कोर्टाची तारीख असणार्‍या आरोपींना ठेवायची रुम होती. बाकीच्या इमारती कौलारू होत्या पण आरोपी ठेवण्याची कोठडी पत्र्याच्या छताची होती. त्या खोलीच्या बाजूलाच त्या आवाराची राखण करायच्या रखवालदाराची राहण्याची खोली होती. त्याने मोठ्या हौशीने फुलझाडे, आणि अळूची रोपे अंगणात लावली होती. त्या अंगणातच एक पाण्याचा नळ होता. 

संपुर्ण कोर्टाच्या आवाराला दगडी भिंतीचे उंच कंपाऊंड होते. आम्ही गल्लीतील मुले त्या भिंतीवर चढून पुर्ण चक्कर मारत असू. त्यावरून आपण पडू वैगेरे भिती कधी जाणवली नाही त्या वेळी. सुटीत किंवा न्यायालयाचे कामकाज बंद असतांना आम्ही तेथे खेळायला जात असल्याने मोठे प्रवेशद्वार बंद असे. पण त्याच्या बाजूलाच एक गोल फिरणारे लोखंडी दार होते. त्यावर उभे राहून गोल फिरण्याचा आनंद मिळत असे.

आवारातच एक मारूतीचे मंदीर होते. छोटेसे, दगडी. बहूतेक ( की सगळ्याच?) न्यायालयाच्या आवारात मारूतीचे मंदीर (का)असते.(?) तसेच हे देखील. दर शनीवारी माझ्या घरासमोरील माझ्याच वयाचा मित्र त्या मारूतीला तेल आणि उडदाची दाळ वहायला जात असे. त्याचे पाहून माझी आईदेखील मला त्याच्याबरोबर तेल, दाळ वहायला पाठवत असे. संध्याकाळच्या वेळी न्यायालयाचे कामकाज आटोपल्यामुळे सारे आवार रिकामे असे. संपुर्ण शांतता असे. त्या विस्तीर्ण आवारात झाडे असल्याने आजूबाजूच्या घरे, इमारती दिसत नसत. पुर्ण एकांत, शांतता त्या परिसरात असे.

सुटीच्या दिवशी आमच्या शाळेला आणि न्यायालयादेखील सुटी असे. उन्हाळ्यातदेखील शाळेसारखी न्यायालयाचे मोठी सुटी असते हे आत्ता मोठे झाल्यावर माहीत झाले. कारण शनिवार रविवारची सुटी असो की मे महिन्यातली मोठी सुटी असो आम्ही गल्लीतली मुले न्यायालयाच्या आवारातच खेळायला जात असू. आमचे तेथील खेळ म्हणजे झाडावर चढणे, आवारातल्या भिंतींवर चढणे, जांभळे तोडणे, गवतात पळणे, गवतफुलांवर उडणारी पिवळी फुलपाखरे पकडणे, रंगीत भुंगे पकडून त्यांच्या पायांना दोरा बांधून उडवणे किंवा काडेपेटीत जमा करणे, मारामार्या करणे, विटीदांडी, पावसाळ्यात चिखल मातीमध्ये लोखंडी कांबी- गज खुपसणे आदी कमी खर्चाचे होते. न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या मागे बरीच मोठी पडीक जागा होती. तिचा वापर नसल्याने गवत तेथे कायम माजलेले असे. त्या गवताची जात काहीशी वेगळी असल्याने ते उंच होते. साधारणतः लहान मुलाच्या गुढग्या-मांड्यांच्या वर ते असे. त्यात फुलपाखरांना पकडण्यासाठी पळावे लागे. आता विचार केला असता ते किती धोक्याचे होते ते लक्षात येते. कारण त्या उंच गवतात साप, विंचू इतर जनावरे असण्याची शक्यता होती. पण आम्हाला अटकाव करणारे त्या आवारात कुणीच नसल्याने आम्ही लहान मुले बिनधास्त त्या गवतात खेळत असू. कधी कधी न्यायालयाचे कामकाज सुरू असण्याच्या दिवशीही तेथे खेळणे झाल्यास बाररूममधील वकीलांनीही आम्हा मुलांवर कधी ओरडल्याचे आठवत नाही.

बाररूमच्या बाजूलाच, मंदीराच्या समोर एक उंच जांभळीचे झाड होते. त्यावर थोड्या अंतरावर चढता येत असे पण तेथे जांभळे नसत. मग आम्ही खाली पडलेल्या जांभळाच्या सड्यांमधून जांभळांचा आस्वाद घेत असू. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एक मोठे विलायती चिंचेचे झाड, कौठाचे होते. तिकडे फारसे खेळणे होत नसल्याने विलायती चिंचा कधी पाडल्याचे आठवत नाही पण एक दोन आषाढी कार्तीकी किंवा महाशिवरात्रीच्या उपासांच्या आधीमधे कौठाची फळे पाडल्याचे आठवते. त्या झाडांच्या पलीकडेच तालूक्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डाव्या बाजूला सरकारी शाळांच्या बैठ्या कौलारू इमारती होत्या. कंपाउंडच्या भिंतीवर चक्कर मारतांना तो परिसर, तेथील रुग्ण आदींचे दर्शन होई. शाळेचे आवार मोठे होते. जवळपास चार बैठ्या इमारतींच्या मध्ये दोन मोठी खेळण्यासाठी मैदाने होती. तेथे आम्ही क्रिकेट खेळत असू. खेळायला दगडी चेंडू असल्याने कुणी यष्टीरक्षणाला तयार होत नसे. मग मीच यष्टीरक्षक होत असे. न्यायालयाच्या उजव्या बाजूला, आरोपींच्या खोलीच्या मागे रांगेने गुलमोहोराची झाडे होती. त्यांच्या शेंगा वाळल्यावर तलवारीसारख्या खेळण्याच्या कामात येत. कधी कधी गुलमोहोराच्या फुलांचा तुरा खाणे होई.

काही कालावधीनंतर मंदीरामागच्या मोकळ्या जागेत एका कोपर्‍यात तालूकान्यायमुर्तींसाठी सिमेंटचे घर बांधले गेले. अर्थात ते घर एका कोपर्‍यात असल्याने आणि त्यात राहणार्‍यांनीही आमच्या खेळण्यावर कधी आक्षेप घेतला नाही. कधीतरी पुढल्या वर्षात तेथे राहणार्‍या न्यायमुर्तीच्या मुलाने शाळेत माझ्या वर्गात प्रवेश घेतला. त्याची भाषा काहीशी वेगळी होती आणि तो अबोल असल्याने त्याच्याशी मैत्री होवू शकली नाही. 

असेच एकदा आमच्या शाळेतच मोठ्या वर्गात असणार्‍या एका विद्यार्थ्याशी काही कारणामुळे शाळेत भांडण झाले. तो आमच्या गल्लीच्या पुढल्या गल्लीतच रहायला होता. त्याने शाळेतील भांडणाचा बदला घेण्याच्या हेतूने मला न्यायालयाच्या आवारात गाठले. मग त्याची अन माझी मारामारी सुरू झाली. तो काहीसा बुटका पण मजबूत असल्याने अधीक कालावधीसाठी मारामारी चालू राहीली. ठोसे, बुक्या आदींचा दोन्हीकडून मारा झाला. नंतर कुणीतरी मोठ्या व्यक्तीने मारामारी सोडवली. नंतर तो मुलगा वरचेवर दिसत असे पण मग त्याने अन मीही  जुना वाद उकरून काढला नाही. नंतर शहरात तो एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला लागला तेव्हा त्याच्याशी भेटणे, बोलणे झाले. 

वय वाढले तसे पुढे मोठ्या वर्गात गेल्यानंतर त्या न्यायालयाच्या आवारात खेळण्यासाठी जाणे कमी होत गेले. कधीतरी मधूनच लहर आली तर मारूतीच्या मंदीरात दर्शनासाठी जात असे. त्यावेळीही तेथे आधीसारखीच शांतता असे. आता मी ते गाव सोडले आहे. त्या गावाला अन पर्यायाने न्यायालयाच्या त्या आवाराला भेट देणे झाले नाही. इतक्या वर्षांनंतर तेथे खुप बदल झाला असणारच. न्यायालयाची इमारत जुनी झाली किंवा जागा कमी पडते या कारणामुळे पाडून नवी काँक्रीटची इमारतदेखील बांधली गेली असेल. तेथील झाडे, गवत आदी देखील नसणार. मारूतीचे मंदीर मात्र असेल पण त्यातही बदल झाला असेल. कधीकाळी तेथे जाणे झालेच तर तो परिसर कसा असेल याची उत्सूकता आहे. काळानुरूप बदल होत जाणारच. गतकाळातील तेथील आठवणी मात्र माझ्यासोबत नेहमी असतील.

Friday, March 2, 2018

सप्तश्रृंगी देवी

सप्तश्रृंगी देवी


काल रातीला देवी माझ्या सपनात आली
गड देवीचा चढायाला सुरूवात मी गा केली || धृ ||

रडतोंडीचा घाट होता लई अवघड
पाहून छातीमधी बाई व्हयी धडधड
रस्त्यामुळं नांदूरीगड चढण आता सोपी झाली ||१||

अठरा शस्त्रे घेतले तू ग अठरा हातामधी
सौभाग्याचे अलंकार तुझ्या अंगावरती
महिषासुर मारी तू आदिमाया शक्तिशाली ||२||

विडा तांबूलाचा खावूनी मुखी रंगला
सप्तश्रृंगीच्या पायी जीव माझा दंगला
देवी माझी सोळा शिणगार ग ल्याली ||३||

कुंकवाचा मळवट भरला देवीच्या कपाळी
अकरा वार साडी नेसूनी अंगावर चोळी
घाई करा दुपारच्या आरतीची वेळ आता झाली ||४||

- पाषाणभेद

Friday, October 13, 2017

जय महाराष्ट्र बोला

जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला
आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका नाहीतर
एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो
कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो
सोईचे नियम केले हो केले
दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले
खेळी केली अन गावं खिशात घातले
एक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा
आतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला
बेळगाव कारवार भालकी बीदर
आळंगा हल्याळ निपाणी घातले घशात
आतल्या गाठीचे तुम्ही
खोटे आयोग लावले कितीक वेळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला
मागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून
बळजबरी केली कानडीची मार मारून
सांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला
नका आता भाषेचे राजकारण करू
नका आणखी सीमाभागाचे लचके तोडू
मराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
- पाषाणभेद

मेरे मरदको काम पे है जाना

मेरे मरदको काम पे है जाना
मेरे मरदको काम पे है जाना
तुम आठ अंडे मेरेकू देना
रे बाबा आठ अंडे मेरेकू देना ||
सुब सुब मिल मे वो जाता
सायकल को डब्बा टांगता
वो डब्बेको बुर्जीच मांगता
नही दुसरी भाजी वो खाता
इसलिए आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||१||
मिल मे वो कपडा लुंगी बनाता
घर मे भी वो चौकडी लुंगी पहेनता
पलंग पे चद्दरजैसी लुंगी डालता
अभी लुंगीकेही पिशवी मे अंडे देना
टोटल आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||२ ||
मेरे मरद की मै औरत अकेली
नही दुसरी बिवी कोई उसकी
दो बेटी छोटे तिन बेटे है मेरे
खाने को एकसाथ गिल्ला करे
उनको आम्लेट है मुझे खिलाना
आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||३||
बच्चे जब स्कूलकू जाते
तभी तो वो घरकू आते
थकेले दमेले वो होते
सेवा स्पेशल मै करती
हातपैर मै उनके दबाती
वो काम करनेकी ताकद मेरेमे होना
आठ अंडे मेरेकू देना
मेरे मरदको काम पे है जाना ||४||
- ( लुंगीवाला) पाभे

काडीचा सरडा

काडीचा सरडा
ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते.
होती शुष्क एक काडी झाडावरती
तुटूनी पडली खाली धरणीवरती

जणू ओढावले तिचे मरणचकी
वय होवोनी मातीत मिळाली

वेगळी झाली मग तिचे व्हावे काय?
धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय

प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे
पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे

डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी
पुढील पाय लांब केले खाली रेटूनी

लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती
उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी

निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात
काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात


Monday, September 18, 2017

वगनाट्य "वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" या नाट्याचे नाट्यवाचन संपन्न

वगनाट्य "वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" या नाट्याचे नाट्यवाचन संपन्न

नाशिक (दि. १७): वगनाट्य "वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" या नाट्याचे नाट्यवाचन दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतील सभागृहात झाले. यावेळी अध्यक्ष माननिय प्रा. श्री. रविंद्र कदम, कार्यवाह श्री. सुनील ढगे, खजिनदार मुकूंद गायधनी, जेष्ठ नाट्यलेखक श्री. प्रदीप पाटील, शरद निकूंभ, संगिता निकूंभ तसेच इतर नाट्यरसीक उपस्थित होते.

प्रस्तूत नाट्याचे वाचन नाट्यलेखक सचिन बोरसे तसेच नाट्यरसीक मयुर पुराणीक यांनी केले.
कार्यवाह श्री. सुनील ढगे प्रास्ताविक करतांना

आस्मादिकांना स्मृतीचिन्ह देतांना अध्यक्ष माननिय प्रा. श्री. रविंद्र कदम

सहकारी मयुर पुराणीक यांचा सत्कार

नाट्यवाचन करतांना

नाट्यवाचन करतांना

नाट्यवाचन करतांना

'वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही' या नाटकाचे वाचन

दै. सकाळ
नाट्य परिषदेतर्फे रविवारी नाट्यवाचन
नाशिक, ता १४: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. १७) सायंकाळी सहाला 'वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही' या नाटकाचे वाचन होणार आहे. जेष्ठ नाट्यलेखक व त्यांचे सहकारी नाटकाचे वाचन करणार आहेत. कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या सभागृहात होणारा कार्यक्रम मोफत असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांनी केले आहे.



Thursday, July 27, 2017

आला पावसाळा आला पावसाळा

(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून)
|| आला पावसाळा आला पावसाळा ||
आला पावसाळा आला पावसाळा
प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा

मनपाचे रस्ते खड्डेरी
दुचाकी तयामध्ये घातली
चुकवित चालली पाणी गाळा

समोरून पहा कोण येतसे
त्याचीही अवस्था तशीच असे
उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा

चारचाकीवालाही सुरक्षित नसे
खड्डयात आदळता शिव्या देत असे
न जाणो मोठी खोक ये कपाळा

जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी
पुढिल ऋतूची वाट पाहूनी
आरोग्यासी वित्त आपले जाळा

- पाषाणभेद

Thursday, July 13, 2017

वगनाट्यः वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही :: Comedy Folk Drama




वगनाट्यः वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
Vagnatya: Vairi Bhedala Arthat Premala Seema Nahi
(Comedy Folk Drama in Marathi Language)

ISBN: 978-93-5267-770-2
Published By: Amigo POD Book Publisher India, Nashik, Maharashtra
amigopublisher@gmail.com
Mobile: 94OThreeO4378Two


















जय महाराष्ट्र बोला

जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला ||

आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका
नाहीतर एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||1||

बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||2||

मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो
कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो
सोईचे नियम केले हो केले
दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले
खेळी केली अन गावं खिशात घातले
एक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा
आतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||3||

बेळगाव कारवार भालकी बीदर
आळंगा हल्याळ निपाणी घातले घशात
आतल्या गाठीचे तुम्ही
खोटे आयोग लावले कितीक वेळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||4||

मागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून
बळजबरी केली कानडीची मार मारून
सांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||5||

नका आता भाषेचे राजकारण करू
नका आणखी सीमाभागाचे लचके तोडू
मराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||6||

- पाषाणभेद

Sunday, March 19, 2017

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या  MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.

ऑनलाईन कम्युनिटी वेबसईट्स वरील (म्हणजेच येथील) मित्र - सुहास साळवे, जयपाल पाटील, प्रसन्न केसकर, विशाल विजय कुलकर्णी, चित्रकार शरद सोवनी (चित्रगुप्त), प्रमोद देव, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या), कैवल्य देशमुख, मदणबाण, प्रसाद ताम्हणकर (परा), सागर भंडारे, राजेश घासकडवी, पराग दिवेकर (आत्मा), राज जैन व इतरांनीही लेखनकामी प्रोत्साहन दिले.
प्रस्तूत पुस्तकलेखनकामी येथील सदस्य किरण भावे यांचा 'किरण फॉन्ट' वापरला आहे.
नव्या स्वरूपातील हे वगनाट्य आपणांस आवडेल याची खात्री आहे.

धन्यवाद.

आपला,
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या उर्फ सचिन बोरसे!

Cover Page

Last Page

Title Page

Verto Page

ArpanPatrika

Manogat 1

Manogat 2

Loknatyachya nimittane 1

Lokanatyachya nimittane 2

Lokanatyachya nimittane 3

Suchana

Ghoshana

Bhumika

Page1

Page 2

Page 3

Page 21

Page 31

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

Thursday, November 17, 2016

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली


सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी 
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने 
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली             ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली              ||१|| 

भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात 
मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात
दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली   ||२||

बँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन
लाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन
एटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली   ||३||

हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला
भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला
ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली            ||४||

- पाषाणभेद

Monday, May 9, 2016

आखाजीचा सण

गवराईचा सन आला गवराईचा सन आला
या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला

सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या
झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या

आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो
आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो

माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला
पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या

कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे
हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे
मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे

नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई
कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही

- पाभे

आखाजीना सन

खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा -

नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू
चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू

माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात)
झोका टांगेल शे दारात

आंबानं पान हिरवंगार
झोका जावूदे जोरदार

गवराई चला वं मांडूया
पुजा तिन्ही करूया

आखाजीना सन शे
माहेराला बरकत दे

माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले
सासर मधार सुख दे

Thursday, January 1, 2015

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा
पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू||

हाती घेवूनीया विणा आणि टाळ
भजनात विसरती काळवेळ
हरपली तहानभुक हरपले देहभान
जमला मेळा...||1||

नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री
आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी
माऊलीच्या घरी आलो माहेराला
जमला मेळा... ||2||

विठूरायाचे सावळे मुख
पाहूनिया झाले सर्वसुख
ओलांडला पर्वत यातनांचा
जमला मेळा...||3||

- पाषाणभेद

हेल्मेट वापरासंदर्भातील सल्ले


सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण हेल्मेट वापरण्याचा निर्णय घेतला. हेल्मेट वापरणे आपल्याच हिताचे असते.
हेल्मेट निवडतांना काही काळजी घेणे आवश्यक आहे. दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेटसंदर्भात खाली दिलेले मुद्दे कृपया निट वाचा.

१) तूमच्या डोक्याला बसणारे हेल्मेट निवडा. हेल्मेट निवड करतांना डोक्याला एकदम फिट्ट बसणारे नको अन त्यातून तूमचे डोके त्याच्या आत फिरेल इतकेही ढिले नको.

२) हेल्मेटच्या बाह्यस्वरूपावर जरा लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच मित्राकडे आहे म्हणून तसेच, भाव-शायनिंग मारण्यासाठी घेतलेले, स्वस्त, रस्त्यावरचे नको.

३) हेल्मेटवर रंगीत रेडीयम असते. बर्‍याचदा रेडीयम विनाईल प्रकारातले असते. ते तसे नसावे. विनाईल कालांतराने फिके पडते. रेडीयम असेल तर रात्रीच्या वेळी प्रकाशमान होवून इतर वाहनांना ते दिसू शकते हा फायदा रेडीयममुळे मिळतो. बर्‍याच हेल्मेटवर केवळ रंग लावलेले आकार असतात त्यांचा उपयोग तसा नसतो. केवळ हेल्मेट आकर्षक दिसते व किंमत वाढते. (याच कारणामुळे माझ्या पहिल्या हेल्मेटवर मी Intel inside चा मोठा लोगो रेडीयम मध्ये करून चिकटवला होता.)

४) हेल्मेट कोणत्या प्रकारात घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो. शारिरीक गरज, खिशाचा सल्ला, चेहेर्‍याचा, डोक्याचा आकार आदी बरेच मुद्दे त्यात येवू शकतात. हेल्मेट घेणे म्हणजे साडी घेण्यासारखे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Motorcycle_helmet या लिंकवर याची जास्त माहीती करवून घ्या.

५) आपण ढोबळमानाने 'खुले' व 'बंद' प्रकाराचे हेल्मेट (Open and Closed Type of Helmets) असतात असे मानू. 'खुले' म्हणजे केवळ कवटीचे संरक्षण करणारे व 'बंद' म्हणजे कवटी अधिक जबड्याचे (चेहर्‍याचे) संरक्षण करणारे हेल्मेट होय.
'खुल्या' हेल्मेटच्या प्रकारात तुम्ही खर्च केलेल्या पैशांमधून केवळ कवटीचे संरक्षण होते. त्या पैशात थोडी जास्त भर टाकून 'बंद' प्रकारचे हेल्मेट खरेदी करता येवू शकते. पण काही जणांना 'बंद' प्रकारच्या हेल्मेट मध्ये कोंडल्यासारखे भासू शकते. कानांवर इतर वाहनांचे आवाज कमी येवू शकतात असे भासते. (हे केवळ भासच असतात!)
कोंडल्यासारखे भासणे, कमी आवाज येणे आदी भास हेल्मेटच्या वापराच्या सवयीने परिचयाचे होत जातात. कदाचित यामुळे आपल्या वाहनाचा वेग आपसूक मर्यादेत राहतो हा पण एक फायदाच जाणावा.

आता हेल्मेटच्या बाबतीत काही आधिकारीक सुचना:

माझ्या मते भारतातील प्रत्येक दुचाकी चालकाने 'बंद' प्रकारातलेच हेल्मेट घ्यावे. सुरूवातीला नव्या हेल्मेट तुम्हाला त्रासाचे वाटेल पण एकदाका हेल्मेटची सवय झाली की मग चिंता नाही. आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी या 'बहाणे' या प्रकारात मोडतात. माझा तुम्हाला 'बंद' प्रकारातील हेल्मेट घेणे हाच आग्रह असणार आहे.

६) रस्त्यावरचे हेल्मेट कधीही घेवू नये. रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. त्याचे प्लास्टीक, फायबर कमी दर्जाचे असू शकते. त्याचे पट्टे रिबीटने निट न-बसवलेले असू शकतात. त्याच्या आतील कापडाचा दर्जा कमी असू शकतो. त्यातील फोम, थर्मोकोल कमी दर्जाचे असू शकते. त्याची काच कमी ग्रेडची, अपारदर्शक असू शकते. तो विक्रेता पळून जावू शकतो. तो विक्रेता बिल देवू शकत नाही. आदी.

७) मिलीटरी कँन्टीनमध्ये स्वस्त मिळते म्हणून तेथले हेल्मेट कधीही घेवू नये. मिलीटरी कँन्टीनमध्ये कमी किंवा ठरावीक कंपन्यांचे, ठरावीक आकाराचेच हेल्मेट मिळू शकतात. त्यात तुमचे डोके 'निराळे' असल्यास हेल्मेट तुमच्या डोक्याला निट न-बसणारे असू शकते.

८) हेल्मेटची निवड करतांना एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला. ही एक जास्तीच्या संरक्षणासाठीची तरतूद आहे.
सततच्या वापराने पुढेपुढे हेल्मेटच्या आतील थर्मोकोलचा आकार तुमच्या डोक्यानुसार घडेल.

९) हेल्मेट घातल्यानंतर त्याचे पट्टे काळजीपुर्वक बांधा/ लावा. त्याच्या लॉकचा "टक्क" असा आवाज आल्याची खात्री करा. पट्टे न बांधता घातलेले हेल्मेट हे हेल्मेट डोक्यात घालून न घातल्यासारखे आहे.

१०) कालांतराने हे पट्टे ढिले होतात. ते वेळोवेळी हनूवटीला/ मान-चेहेर्‍याला घट्ट होतील असे करत चला.

११) हेल्मेटची काच जास्त वापरामुळे चरे पडलेली असेल, त्यातील गिअरमधून पडत असेल किंवा ढिली झाली असेल तर बदलवून घ्या.

१२) काळ्या रंगाची काच कधीही लावू नका. डोळ्यांना फारच उन दिसत असेल तर हेल्मेटमध्ये गॉगल वापरा.

१३) एकच हेल्मेट हे आयुष्यभरासाठीचे नाही. दोन-पाच वर्षात, आतील थर्मोकोलचा आकार बदलल्यास ऐपतीप्रमाणे बदलणे गरजेचे आहे.

१४) हेल्मेट न वापरणार्‍यांसाठी: एकदा तुम्ही हेम्लेट मोटरसायकल चालवतांना सतत आठ दिवस वापरा. नवव्या दिवशी हेल्मेट न घालता गाडी चालवणे तुम्हाला आवडणार नाही हे नक्की.

वाचकाचा प्रश्नः >>> समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात?>>>>>>

कृपया सल्ला क्र. ८ वाचा.
८) हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला.

या प्रकारात हेल्मेटच्या कडा सरळ कपाळावर येतात. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. समोरचे उन जरी येत असेल तर काच वर केल्याने फरक पडतो. तसेही डोळ्यावर येणारे उन हे सकाळचे किंवा संध्याकाळचे कोवळे असते. ते डोळ्यांना खुपत नाही. मला सांगा भारतातील शहरांमधील असे कोणते रस्ते एकदम सरळ पुर्व-पश्चिम असतात? अन कोणता प्रवास इतका पुर्व पश्चिम खुप दुरचा असतो?

सर्वात महत्वाचे हेल्मेट वापरणे सुरूवात करणे. यामुळे आपल्या शरिराला, डोळ्याला हेल्मेट ची सवय होते. आधीच पाण्यात पडून बुडेन की काय ह्याची भीती बाळगली तर पोहोता येणार नाही.

वाचकाची शंका: >>> शिवाय हेल्मेट थेट डोक्यावर घातल्याने टाळूला घासून केस गळतात अशी तक्रार मी ऐकली आहे त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या मध्ये आवरण असू दे..

हेल्मेटमुळे आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी आणि हेल्मेट टाळूला घासून केस गळतात या तक्रारी 'बहाणे' या प्रकारात मोडतात.

हेल्मेटमुळे केस गळतात असा कोणताही निश्कर्ष वैद्यकीय संशोधनात निघालेला नाही. १७ वर्ष हेल्मेटच्या वापराने माझ्या टाळूच काय पण डोक्याच्या कोणत्याही भागाला टक्कल पडलेले नाही. डोक्याचे केस गळणे, टक्कल पडणे, (केस अकाली पांढरे होणे) आदी अनुवंशीक-वैद्यकिय आहे. हेल्मेटच्या वापरामुळे झाला तर फायदाच होतो, तोटा नाही.

१५) हेल्मेट घेतेवेळी सोबत दुचाकीला त्याचे लॉक येते ते बसवून घ्या. यामुळे मोटरसायकल चालवल्यानंतर हेल्मेट कोठे ठेवावे हा प्रश्न उद्भवत नाही व त्यामुळे हेल्मेट बरोबर न नेणे हा 'बहाणा' टाळता येतो. लॉकमुळे हेल्मेटचोरीला थोडाफार आळाही घातला जातो.

१६) हेल्मेट सोबत रीप्लेसेबल कुशनिंगची तसेच फोल्डेबल- हिंजेस असलेल्या हेल्मेटची सुद्धा आवश्यकता नाही. यामुळे हेल्मेटची किंमत वाढते. कोणत्याही मशिनरीमध्ये जेवढ्या जास्त असेंब्ली तेवढ्या जास्त तक्रारी. (सोय व संरक्षण हे वेगवेगळे मुद्दे आहेत.)

१७) मुख्य म्हणजे रस्त्यावरचे नियम पाळा. (रस्त्यावरचे नियम पाळण्यामध्ये हेल्मेट घालून वाहन चालवा हा सल्ला असतोच!!)

हॅप्पी ड्रायव्हींग.


Thursday, October 16, 2014

कोवळीक


कोवळीक

आताशा आयुष्यात माझ्या येवून जा
आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा

रुक्ष शुष्क आयुष्याच्या वाळवंटात
आर्त पाण्यासाठी तगमगलेली

कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची
कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची

फुले तर तर भरपुर निघाली
पण अजूनही आस आहे फुलायची

- पाभे

Wednesday, October 15, 2014

अहिराणी गीत: मन्हा सासरनी वाट


अहिराणी गीत: मन्हा सासरनी वाट

मन्हा सासरनी, सासरनी वाट भलती भारी व
मन्हा दादलानी दादलानी मी शे लाडी व||धॄ||

कालदिन तेस्नी लई माले सोनानी पोत
ती पोत घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लई माले सोनानी मुंदी
ती मुंदी घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लाया माले कबंरपट्टा
कंबरपट्टा घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लाया माले कबंरपट्टा
कंबरपट्टा घालीनसन मी दिसू रानी व

कालदिन तेस्नी लाया माले पैठणी शालू
तो शालू घालीनसन मी दिसू रानी व

मन्हा सासरनी, सासरनी वाट लई भारी व
मन्हा दादलानी दादलानी मी शे लाडी व ||धॄ||

(मिसळपाव.कॉम वरील सदस्य इरसाल आणि आर्या१२३ यांच्या सुचनांचे आभार)

- पाषाणभेद

Saturday, February 8, 2014

अकबराचा मोबाईल हरवतो

अकबराचा मोबाईल हरवतो

नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती.

बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते. दरबार सुरू होता तेव्हा बादशाह प्रसन्न दिसत होता. अगदी न्यायालयीन कलमांच्या कंटाळवाण्या अन न-समजणार्‍या चर्चेतदेखील त्याने रस दाखवला होता. पण त्या चर्चेनंतरच अकबराचा चुळबूळपणा वाढला होता. एकदोन वेळा त्याने अंगरख्याच्या खिशातही हात घातला होता.

दरबारी नाष्टा अन चहा झाल्यानंतर बिरबलाने कधी नव्हे ते स्व:तहून दासीला बोलावून अकबराला जर्दापान दिले. तरीपण अकबराचा मुड काही खुलला नव्हता. त्याच्याकडून नेहमीप्रमाणे होणारे विनोद, दरबार्‍यांची खेचाखेची होत नव्हती.

तेव्हढ्यात अकबर बादशाहाने वैतागून मोठ्याने हुजूर्‍याला आज्ञा केली की, "अरे माझा मोबाईल शोध बाबा". नंतर अकबराने सार्‍या दरबाराला ऐकू जाईल अशा आवाजात सांगितले त्याचा मतितार्थ असा की आज दरबारात येण्यापुर्वी राणीच्या महालात असेपर्यंत बादशाहाचा मोबाईल त्याच्या अंगरख्याच्या खिशात नेहमीप्रमाणे होता. दरबाराची वेळ झाली अन नाईलाजाने तो राणीमहालातून दरबारात हजर झाला होता. नंतर चर्चेदरम्यान एकदोन वेळा त्याने मोबाईल मध्ये काही मेसेज वैगेरे बघण्यासाठी खिशात हात घातला तर मोबाईल तेथे नव्हता. म्हणजेच अकबराचा मोबाईल गायब झाला होता.

प्रत्यक्ष अकबर बादशाहाचा मोबाईल गायब झाला हे पाहून सार्‍या दरबार्‍यांची मोबाईल शोधासाठी धावपळ सुरू झाली. राणीसाहेबांच्या हाती मोबाईल चुकून हाती लागला तर त्या मोबाईलमधील नको त्या गोष्टी पाहतील अन मग रात्री खरडपट्टी घेतली जाईल हे मनात येवून अकबरालाही त्याच्या मोबाईलची काळजी वाटू लागली.

बादशाहाचे सिंहासन, बाजूचे पानाचे व पाण्याचे टेबल, दरबारात येण्याचा मार्ग, इतर दरबार्‍यांच्या जागा आदी सार्‍या ठिकाणी सेवकांनी लगबग करत मोबाईलचा शोध घेतला. मुख्य सुरक्षा सचिवाने राजवाड्याचे मुख्य द्वार बंद करण्याचे आदेश दिले. बादशाहाचा मोबाईल सापडेपर्यंत कुणीही राजवाड्याच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. सार्‍या दरबार्‍यांनी संध्याकाळी उशीरा घरी येवू असल्या अर्थाचे एसएमएस घरी पाठवले. काहींच्या मनात मोबाईल चोरी तर झाला नसेल ना असली शंकाही आली. अकबराच्या शालकाने चतूराई नजरेत यावी म्हणून अकबराच्या मोबाईलवर रींग दिली तर मोबाईलवर रींग जात होती. म्हणजेच मोबाईल कमीतकमी बंद झालेला नव्हता.

अकबराने त्याचा मोबाईल सगळ्यात शेवटी राणीदरबारात वापरला होता व त्यानंतरच तो नाहीसा झाला या निष्कर्षापर्यंत सारे दरबारी आले. आता राणीच्या दरबारात खास विश्वासू सेवक व दरबार्‍यांपैकी बिरबलालाच प्रवेश होता हे सार्‍यांना माहीत होते. संशयाची सुई आपल्याकडे वळत आहे हे पाहून मोबाईल शोधाची सगळी सुत्रे बिरबलाने आपल्या हातात घेतली.

बादशाहाला त्याने विचारले, "महाराज, आपण मोबाईल शेवटचा कधी हाताळला?"

"हाताळला म्हणजे तसा तो नेहमी हातातच असतो", तसल्या गंभीर प्रसंगातही आपली विनोदीबुद्धीची चुणूक दाखवत अकबर पुढे म्हणाला, "पण दरबारात येण्यापुर्वी मी राणीसाहेबांच्या महाली गेलो होतो. थोड्या गप्पा झाल्या, राणीसाहेबांच्या हातून पान खाल्ले अन तेवढ्यात दरबारात येण्यासाठी लावलेल्या वेळेच्या अलर्टने रसभंग केला. अलर्ट बंद करून मोबाईल मी नेहमीप्रमाणे सायलेंट मोडवर टाकला अन तडक दरबारात हजर झालो. रस्त्यात कुठेही थांबलो नाही की काही नाही. असा चालताचालता मोबाईल हरवतो म्हणजे काय?", अकबराने थोड्या रागातच सांगितले.

"महाराज, आपण मोबाईल शेवटचा कधी चार्ज केला होता? अन बॅटरीचा काही प्रॉब्लेम तर नाही ना? म्हणजे बॅटरी लवकर संपणे वैगेरे?" बिरबलाने पुढला प्रश्न विचारला.

"असे बिरबल, हा माझा मोबाईल अगदी लेटेस्ट आहे म्हणजे होता बघ. काही बॅटरीबिटरीचा प्रॉब्लेम नाही. फक्त तो हरवायला नको अन कुणाच्या हातातही पडायला नको. मोबाईल कंपनीला सांगून सिमकार्ड ब्लॉक करता येईल मोबाईल लॉक करता येईल पण त्यात असणार्‍या डेटाचे काय? अन मी तर त्याला पासवर्डही ठेवला नव्हता. काही जोक असलेले मेसेजेस मी राणीसरकारांनाही वाचायला मोबाईल त्यांच्या हातात तेवढ्यापुरता द्यायचो." बादशाहाने काळजीपोटी खाजगी आवाजात बिरबलाला सांगितले.

बिरबल थोडा विचारात पडलेला दिसल्याने अकबराने त्याची रडकहाणी बंद केली. बिरबल बराच वेळ काही बोलत नाही हे पाहून बादशाहा उसासून म्हणाला, "बिरबल, काहीही करून तो मोबाईल मिळव बाबा. मोबाईल न मिळाल्यास मी तूला तुरूंगात टाकीन."

अर्थात 'तुरूंगात टाकीन' वैगेरे ह्या पोकळ धमक्या असतात हे सवयीने बिरबलाला माहीत होते, आता दुपारचे तीन वाजून गेले असूनही मोबाईलचा शोध न लागल्याने अन भुकेने पोटात कावळे ओरडत असल्याने बिरबल थोडा काळजीत होता.

बिरबल काय बोलतो हे ऐकण्यासाठी सार्‍या दरबाराचे कान बिरबलाकडे लागले. बादशाहाच्या शालकाच्या मनात बिरबलाविषयी असलेल्या असूयेने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.

शेवटी बिरबल निर्धाराने बोलला, "महाराज, सार्‍या दरबारातल्या अधिकार्‍यांना व सेवक, दासदासींना घरी जाण्याची परवानगी द्यावी. तुम्हीही जेवून घ्या मी पण जेवण करून आलो की मी तुम्हाला तुमचा मोबाईल मिळवून देईन."

बादशाहासकट दरबारातील उपस्थितांना हायसे वाटले. मोबाईल संकट तात्पुरते तरी टळले होते. उद्याचे उद्या बघता येईल असा विचार करून दरबार बरखास्त करण्यात आला. अकबर बादशाहा मुदपाकखान्यात अन बिरबल जेवायला त्याच्या घरी गेला.

पाच वाजेच्या सुमारास बिरबल पुन्हा दरबारात हजर झाला. मोबाईलचा शोध नक्की कसा घेतला जातो याची उत्सूकता लागून इतर दरबारी लांब अंतरावर थांबले. येतांना बिरबलाने मुख्य इलेट्रीशियनला बरोबर आणले होते. येथे मोबाईल शोधाची मारामार असतांना इलेट्रीशियनचे काय काम? का तो हवेत मोबाईल चार्ज करेल? असे विचार बादशाहाच्या मनात आले पण काय घडते हे पाहाण्याचे त्याने ठरवले.

उन कलल्यानंतर सूर्य बुडण्याच्या सुमारास बिरबलाने राणीमहालाच्या काही विश्वासू दासींना व इलेट्रीशियनला घेवून राणीमहालाकडे कुच केले. बरोबर बादशाहाही होताच. राणीमहालात आल्या आल्या बिरबलाने दासींना दरबाराचे दरवाजे, खिडक्या, त्यावरील पडदे बंद करण्यास फर्मावले. सारे जण श्वास रोखून बिरबल नक्की काय करतोय ते पाहत होते.

आता बिरबलाने मुख्य इलेट्रीशियनला राणीमहालाचा मेन स्विच बंद करण्यास सांगितले. मेन स्विच बंद केल्यानंतर राणीमहालात अंधार पसरला. अकबराने ताबडतोप राणीचा हात घट्ट धरला. बिरबल बाजूलाच उभा होता. झालेल्या अंधारात काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात बिरबलाने त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल काढला अन अकबराच्या हरवलेल्या मोबाईलचा नंबर डायल केला. जशी पहिली रींग गेली तसा राणीच्या मंचकाकडून उजेड येवू लागला. राणीच्या मंचकाच्या उशीकडची बाजू प्रकाशाने भरून गेली. मोबाईलमधून पुर्ण रींग संपण्याच्याआत बिरबलाने मंचकाच्या दिशेने झपझप पाऊल टाकून उशीजवळचा अकबर बादशाहाचा मोबाईल हस्तगत केला.

आता बिरबलाने मोठ्याने आवाज देवून मुख्य इलेट्रीशियनला मेन स्विच चालू करण्यास सांगितले. मेन स्विच चालू करताच राणीमहाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. बादशाहाला खेटून उभी असलेली राणी संकोचाने बाजूला झाली. बिरबलाने हसत हसत अकबराचा सापडलेला मोबाईल अकबराच्या हवाली केला.

अकबराने मोबाईल घाईघाईने बिरबलाकडून घेतला व पहिल्यांदा सायलेंट मोड ऑफ केला. मोबाईल राणीच्या किंवा इतर कुणाच्याही हातात न गेल्याचे पाहून त्याचा जीव भांड्यात पडला होता.

आपला हरवलेला मोबाईल अशा प्रकारे चतूराईने शोधून दिल्याबद्दल खुश होवून अकबराने पुर्ण वर्षाचा टॉक टाईम बिरबलाच्या मोबाईलसाठी जाहीर केला.

Friday, December 27, 2013

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||

गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||

गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||

चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||

शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||

पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||

Sunday, November 10, 2013

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

अवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे. आता मी एमएस्सी (मॅथ्स) करते आहे. लग्नाला अजुन वेळ असल्याने पुढेमागे पीएचडी केली तर याच आकडेवारीचा स्टॅटेस्टीकल डेटा वापरणार आहे.

समीर तांबोळी, असोली ता.वेंगुर्ला,सिंधुदूर्ग: सचिन तेंडूलकर को मै बचपनसे खेलते देख रहा हूं. मच्छीमार्केटपे मैने उनके रिटायरमेंटका बॅनर लगाया है. त्येंला रिटायरमेंटच्या बधायी देतो.

राम गायकवाड, कुरणखेडः मी तर फार उदास झालो बातमी ऐकून. आता भारतीय क्रिकेटसंघाचे कसे होणार? सरकारने ग्रामीण भागातही क्रिकेटचे टॅलेंट शोधले पाहीजे. शाळेत अनुदान दिले पाहीजे.

कामेश शहा, बोरीवली: सचिन तेंडूलकरजी को अभीभी मेच खेलना चाहीये था. उनमे बहोत टॅलेंट है. उनकेउपर मैने चार बार पैसा कमाया, और सात बार गवाया है. उनको रिकवरी करनेके लिए अभी खेलना चाहीये.

समाधान डेंगळे, शिरसोली, धुळे: आम्ही सचिन तेंडूलकरची एकपण मॅच बघणे सोडायचो नाही. आमच्याकडे लाईट जरी गेली तरी शेतातले डिझेल जनरेटर गावात आणून मॅच बघीतली जाते.

प्रिया जोशी, पाषाण, पुणे: मी अन आमचा सिंबॉयसीसचा गृप सगळी जणं क्रिकेटमॅच असली की वैशाली, रुपाली, मॉडर्न किंवा इतर ठिकाणी पडीक असतो. उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.

દર્પના પટેલ, અમદાવાદ: સચિન સર ખૂબ જ શ્રેષ્ઠ બેટ્સમેન છે. હું તેને આગળ સફળ કારકિર્દી માંગો.

पारूल मेहेता, वारछा, सुरतः सचिनजीके रिटायरमेंट के फंक्शनको सेलीब्रेट करनेके वास्ते हमारे क्लबने एक पार्टी रखी है. उसमे शामील होनेके लिए मैने एक डिझायनर साडी ऑर्डर की है.

हार्दीक तोमर, पलासीया, इंदोरः मै इंदौर क्रिकेट क्लब का सदस्य हूं. हमे सचिनजीके फायनल मैचकी १० तिकटें क्लबकी तरफसे मिली है. हम १७ तारीख को मुंबई मैच देखने यहांसे निकलेंगे. ताज हॉटेल मे रहेनेका बंदोबस्त किया है. देखते है क्या होता है.

सतविंदर भाटीया, (अक्री)राजपुरा, जिला पटीयाला: ओय सचिनसर तो ग्रेट है जी. उनको हार्दीक बधायीयां जी. वो तो बडे शेरकी तरह बैटींग करते थे जी. पाकिस्तानवालोंकी खटीया खडी करते थे जी.

माधव गावडे, वाशी नाका, चेंबूरः सचिनच्या या शेवटच्या मॅचनंतर क्रिकेट बघणे सोडून देईन अशी शपथ आम्ही कॉलनीतल्या अंडरार्म क्रिकेट क्लबच्या मेंबर्सनी घेतली आहे. फार वाईट वाटते आहे.

राज आगलावे, न. ता. वाडी, पुणे: आमच्या राष्टवादी कार्यकर्त्यांनी संगमवाडी पुलावर मोट्टा बॅनर लावलेला आहे शुभेच्छांसाठी. तुम्ही जरूर बघा. शेवटची मॅचचे थेट प्रक्षेपणपण आम्ही आमच्या कॉलनीत पडद्यावर दाखवणार आहोत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे.

विनोद गालफुगे, फुगेवाडी, दापोडी, पुणे: सचिन म्हणजे क्रिकेटचा बादशा. देवच म्हणाना. आता देवच जर मंदीरात नसेल आपलं क्रिकेटमध्ये नसेल तर मंदिरात काय बघणार, नुसती घंटा?

प्रतिक बंदसोडे, चदशां, पाचपाखाडी, ठाणे: क्रिकेट हे एक शरीर आहे. सचिन म्हणजे त्यातले हॄदय आहे. हॄदय आता बंद पडणार. भारतातले क्रिकेट मरणार.

असल्या बर्‍याच प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीकडे आलेल्या आहेत. यथावकाश आम्ही त्या प्रकाशित करूच. आपल्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण येथे जरूर जरूर लिहा.






.
(सदर लेखन केवळ विनोदी अर्थाने घ्यावे. सचिनच्या खेळाचे कौतूक आहेच.).

Sunday, September 22, 2013

असले कसले जेवण केले

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

- डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)
३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
---------------------------
जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी
---------------------------
सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है|

शोध माझ्यातला

शोध माझ्यातला


मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी?
धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी?
पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी?

एकांती बसता कोणताच विचार नाही मनी
लागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी?
रूप रंग गंध हुंगले कधी श्वासात
असे झाले कधी हरवून गेलो त्यात?

दिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला?
मार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला?
चिड आली का सार्‍या दुनियेची, इतरांच्या वागण्याची?
खरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची?

ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे
उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे
का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले?
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

- पाभे

Saturday, August 17, 2013

आहे!?

आहे!?

आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे?
आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे!

आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे?
आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे!

आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे?
आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे!

आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे?
आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे!

(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?)
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!)

किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे?
साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे

तेल ३ किलो आहे, तुप पाऊण किलो आहे, मिरची अर्धा किलो आहे
नारळ, साबूदाण, शेंगदाणे, मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे

सामान मोजले, चला लवकर ८४३ रुपये काढा, गिर्‍हाईकांची घाई आहे
काय शेठ! इतके पैसे कसे झाले? हा महागाईचा आलेख चढता आहे!

मी काय म्हणतो लिहून ठेवा! आत्ता पैसे नाहीत उधारी आहे!
रामू सगळा माल आत ठेव! माफ करा, उधारी बंद आहे!

- पाभे 

Tuesday, August 13, 2013

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत


नमस्कार श्रोतेहो.

आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

मी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.

भरत कुलकर्णी : नमस्कार.

मी: यंदाच्या हंगामाचा "मराठी साहित्य अधिवेशन सेवा संघ परिषदेतर्फे" जाहीर झालेला 'उत्कृष्ट शेतकवी' हा पुरस्कार आपणाला मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. मला सांगा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपणाला काय वाटले?

भरत कुलकर्णी : हा पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी "मसाअसेसपचा" आभारी आहे. मला हे अपेक्षीत नव्हते. ग्रामीण भागातील  शेतकवीला इतका मानाचा पुरस्कार पहिल्यांदाच मिळतो आहे. मला खुप आनंद झाला. या पुरस्काराच्या निमीत्ताने ग्रामीण भागातील शेतकवींमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. शेतकाव्याचे भरघोस उत्पादन यापुढील काळात अपेक्षीत असल्याने शहरकवींनी साहित्याची काळजी करणे सोडून द्यावे असे मला या निमीत्ताने वाटते.

मी: आपण गेल्या वर्षी पाच कवीतासंग्रह प्रकाशीत केले. तीन कथासंग्रह लिहीले. दोन ललीतगद्य निबंध आपले बाजारात आले. ह्या सार्‍या उत्पादनाबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना सांगाना.

भकु: अवश्य. सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्याचा फार उपयोग झाला. प्राध्यापकीच्या काळात भरपुर वेळ मिळायचा. महाविद्यालयाच्या पुस्तकसंग्रहाचा मला अभिमान आहे. मला हवी ती पुस्तके मिळाली. यामुळे मी साहित्याचा भरपुर अभ्यास केला. जाणीवा प्रगल्भ केल्या. याच काळात पीएचडीचा अभ्यासही मी करत होतो. "आदिवासींचे  मुक्तलोकसाहित्य व त्यातील ग्रामीणता आधुनिकतेकडे कशी झुकते आहे व त्याचे पुढील शतकात होणारे परिणाम" हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. त्याच वेळी विद्यापिठाच्या वतीने 'महाराष्ट्रातील आदिवासी, गिरीजन यांची साहित्याबद्दल आस्था' यांचा अभ्यास करण्यासाठीच्या समितीत माझा समावेश केला गेला. त्या निमीत्ताने त्या समितीने संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चंद्रपुर, भंडारदरा, तापीचे खोरे, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातपुडा पर्वत, अहवा-डांग (गुजरात) झालच तर नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा, हरसूल, कळवण, बागलाण, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडचा पट्टा, दक्षीण कोकणातील संगमेश्वर, कणकवली, ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आदी संपुर्ण ठिकाणच्या आदिवासी समाजाचा आम्ही अभ्यास केला. तेथील प्रश्न समजावून घेतले. त्यांच्या जनरीती, उदरनिर्वाह यांचा अभ्यास झाला. तो अनुभव खुपच समृद्ध करून गेला. त्या निमीत्ताने जे जे बघण्यात आले ते ते माझ्या साहित्यपिकात उतरले.

मी: फारच छान. एकुणच तुम्ही केलेल्या कामाची पावती या पुरस्काराने आपणाला मिळाली हे उत्तमच झाले. आता मागच्या वर्षीचा आधीच्या साहित्यउत्पादनाबद्दल अधिक सांगा.

भकु: मागल्या वर्षी जे काही उत्पादन मी घेतले त्याच्या आधीही माझे शेतकवी या प्रकारात उत्पादन मी घेतच होतो. दर पंधरवडी मी दै. लोकजागृतीमंचात ते उत्पादन पाठवायचो. ललीत निबंध हा नगदी माल असतो. तुम्हाला सांगतो, भारतात घडणार्‍या घटना त्यास पुरक ठरतात. त्याच वेळी मी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला व पुर्ण वेळ शेतहित्यीक झालो. त्यावेळी मजेचे प्रकाशन या संस्थेने मला शेतसाहित्य या प्रकाराविषयी त्यांच्या दिवाळी अंकात काहीतरी लिहीण्याचा आग्रह केला. माझा लेखसंग्रह तयार होताच. त्यात थोडेफार बदल करून त्यांना तो पाठवला. त्या लेखामुळे माझा उत्साह दुणावला व अधिकाधीक पिक घेण्यास सुरूवात केली.

मी: तुम्ही कोणकोणती साहित्यपिके घेतात?

भकु: शेतकाव्याचा मी पुरस्कर्ता आहे. काव्याची निरनिराळी उत्पादने जसे: समुहगीत, देशभक्तीपरगीत, चित्रपटगीते, विरहकाव्ये, गझला, सुनीते यांचेही मी आंतरपीक घेत असतो. मुक्तछंदकाव्य नेहमीच तयार असते. अर्थात बाकीचेही शेतसाहित्यीक त्याचे उत्पादन घेत असल्याने बाजारात त्याला मागणी कमी असते. भजन, अभंगही हंगामानुसार होते. मागच्या आषाढी एकादशीच्या काळात 'भजनएकसष्ठी ' हा भजनकाव्यसंग्रह देखील बाजारात आला. मजेचे प्रकाशनाचे भटकळांनी त्यासाठी मला अटकळ टाकली होती. कथा, कादंबरी ही पिके तयार होण्यास वेळ लागतो. त्याकडेही लक्ष द्यावे लागते.

'हे कसे करावे?, ते कसे करावे' असे मार्गदर्शन करणारे लेख, लावण्या, चित्रपटगीते ही तशी नगदी पिके आहेत. पण दरदिवशी दोन या प्रमाणात शेतकाव्य किंवा शेतसाहित्य निर्माण करतांना नगदी पिकांकडे थोडे दुर्लक्ष होते हे मान्य करावे लागेल.

मी: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य ही पिके घेतांनाची प्रक्रिया काय असते?

भकु: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य तयार करतांना मनाची मशागत चांगली करावी. उन्हाळ्यात प्रखर उन असतांना जातीपातीची ढेकळे संघर्षाचा कुळव वापरून फोडून घ्यावीत. दलितपद्धतीने ढेकळे जास्त चांगली फोडली जातात.
पहिल्या पावसाने शेतपिकासाठी नागरी मनाची जमीन तयार झालेली असतांना सुरूवातीचे दोन आठवड्यात तयार होणारे पावसाळी काव्य हे उत्पादन घ्यावे. आजकाल शहरात या पिकाला फार मागणी आहे. शहरातले काही हौशी लोक आपल्या मित्रमैत्रीणी किंवा कुटूंबासहीत या पिकाचा आस्वाद घेतात. काही जण तर सरळ शेतावरच्या घरात मुक्काम करून त्याचा रस चाखतात. पुणे, मुंबई त्याजवळील मावळ, लोणावळा येथे हे उत्पन्न फार खपते. याप्रकारचे उत्पादन इंटरनेटवरही बरेच केले जाते. इंटरनेटवरील पिकाला स्थळाचे बंधन नसल्याने संकेतस्थळावळ चांगल्या पॅकींगमध्ये ते ठेवले जाते. तेथील ग्राहकही त्याचा आस्वाद घेतात.

हिवाळ्यात पुन्हा मनाची जमीन आनंदाच्या दोन पाळ्या देवून तयार ठेवावी. गादीवाफे करून एखाद्या कादंबरीचे बीज पेरावे. सामाजिक, रहस्यमय किंवा शृंगारीक कंपनीचे बियाणे आजकाल सरकारपुरस्कृत बाजारात मुबलक मिळते. अर्थात त्यात भेसळीचे प्रमाण कितपत आहे ते पाहूनच त्या त्या जातीचे बियाणे घ्यावे. बाजारपेठेत या प्रकारच्या मालाला फार मागणी आहे पण पुरवठा त्यामानाने कमी असल्याने उत्पादनास भाव चांगला मिळतो.

विदेशी त्यातल्या त्यात इंग्रजी (अमेरीका, ब्रिटन) कंपनीच्या सुधारीत वाणांचे संकरीत बियाणे किंवा वाण वापरल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या पिकाला मागणी असते. देशभक्ती या मालाला सध्या मागणी नाही. ते करू नये.
थोडे थोडे पिके घेण्याचे ठिबकसिंचनसाहित्य करण्याचा प्रयत्न करावा. शेतावर मत्सरकिडीचा प्रदुर्भाव झाला असल्यास जाहिरातीच्या पाण्याचा मारा करावा. द्वेषकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी उलटद्वेष या बुरशीनाशकात साहित्याची बियाणे प्रतिरचना दुप्पट या प्रमाणात बुडवावे मगच पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे साहित्यपिक उत्पादन घ्यावे.

आमच्या कडील काही शेतकाव्यकरी सामुहीक अनुदानीत शेतसाहित्य करून कंटेनर भरून आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत.

मी: बरं हे झाले साहित्यनिर्मीतीबाबतीत. आता तयार मलाला बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी काय काळजी घ्यावी.

भकु: शेतसाहित्यकर्‍यांनी बाजाराचा नियम पाळला तर त्यांच्या मालाला बाजारात उठाव असेल. अन्यथा व्यापार्‍यांच्या तोंडचा भाव त्यांना घ्यावा लागेल. मागणी कमी असतांनाच साहित्यमाल बाजारात पाठवावा. पुणे-मुंबई येथील काही व्यापारी चांगला भाव देत आहेत. सरकारी हमीभाव शेतसाहित्यासाठी नेहमीच मारक असतो. एखाद दुसर्‍या किंवा प्रतिथयश शेतसाहित्यकर्‍याचाच माल विद्यापिठीय अभ्यासक्रमात जातो. त्यासाठी काय काय करावे लागते तो मुद्दा येथे उपस्थित करत नाही. सरकार तरी कोठे कोठे पाहणार?

शहरातली मध्यमवर्गीयच शेतसाहित्याचे मोठे मागणीदार आहेत. ग्रंथपिक-प्रदर्शनचळवळ हा नविन पायंडा उभा राहत असल्याने तेथे माल विक्रीस ठेवावा. शेतसाहित्यमाल हा आकर्षक पॅकींगमध्ये विकल्यास चांगला भाव मिळतो.

मी: शेतसाहित्य व्यापारात काय काय दुर्गूण आहेत?

भकु: काही शेतसाहित्यकर्ते कमी दर्जाचा माल चांगल्या कंपन्यांना विकतात. कंपन्या जाहिरातबाजी करून तो कनिष्ठ दर्जाचा माल बाजारपेठेत खपवतात. हे शेतसाहित्य खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या हक्काविरूद्ध आहे. ग्राहकांनीच काळजी करून माल विकत घेतला पाहिजे. अलिकडे 'परकिय शेतसाहित्याचे अनुवाद' ह्या मालाचेही उत्पादन खुप होते आहे. अर्थात जग छोटे होते आहे. हे चांगले की वाईट हे काळच ठरवेल.

मी: "मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते" असा एक प्रवाद आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?

भकु: "मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते"हा निव्वळ गैरसमज आहे. मला सांगा मुंबई-पुण्यातले शेकडा किती टक्के शेतसाहित्यीक पणजोबांच्या काळापासून मुळचे तेथले आहेत? मला वाटते तो आकडा एक टक्याच्याही खाली असेल. जे जे मोठे शेतसाहित्यीक आज मुंबईपुण्याचे आहेत असे भासवतात ते मुळचे ग्रामीण भागातलेच होते. केवळ शेतसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतरत्र अर्थार्जन करण्यासाठी ते तेथे गेले व तेथून ते पिके घेतात. मुळचे पाणी उरलेल्या महाराष्ट्राचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा-कोकण, सीमावर्ती महाराष्ट्र येथील शेकडो शेतसाहित्य उत्पादक देखील चांगला माल तयार करत आहेत. त्याच मालावर नागरी वस्त्या पोसल्या जात आहेत. एकुणच ग्रामीण भागातच समाधानकारक स्थिती आहे.

मी: भरत कुलकर्णी साहेब, आपल्याबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो पण आता वेळेची कमतरता असल्याने आपले विचार अजून ऐकता येणे शक्य नसल्याने या वेळेपुरते आम्ही समाधान मानतो. आपला मौलीक वेळ खर्च करून आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले आकाशवाणी तसेच आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.

भरत कुलकर्णी: धन्यवाद.
(इतर मराठी संकेतस्थळांवर सदरचे लेखन दुसर्‍या एका नावाने प्रसिद्ध केले आहे.)

Sunday, July 14, 2013

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.)

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई
तू मन्हाकडे का पाहत नाही?
ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तुन्हा गळा मा सोनानी माळ
तू पायमा बांधस चाळ
तू लाजत लाजत जाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुन्हा घरावर मी मारस चकरा
तुन्हा बाप व्हई का मना सासरा?
मन्ह प्रितेम का तुले दिसत न्हाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुले पाहीनसन व्हयनू मी येडा
तुन्हासाठी मी बाजार धंदा सोडा
जीव जळस मन्हा थोडा थोडा
एखादडाव मनाकडे जरा लय पाही
तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास
मी तठे तुन्हा मांगे मांगे येस
तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
तो पैलवान गडी शे मी घाबरस
आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

आते पाऊसपानी बरा व्हयेल शे
डांळींबनी बाग मी आता लावेल शे
कांदास्ना पैसाबी मना खिसामा शे
यंदा मोसममधार लगीनले मन्ही काही हरकत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

- पाभे