Monday, January 27, 2020

एकदा तरी माती व्हावे

एकदा तरी माती व्हावे

कधीतरी इतरांच्या पायी जावे
एकदा तरी माती व्हावे

नको राग लोभ कशाचा
मी माझाच नाही आहे सर्वांचा
नको व्यर्थ माझे माझे करावे
एकदा तरी माती व्हावे

दैन्य इतरांचे पाहून
मग कळते मी किती सुखी ते
आपलेच सुख आपल्याला टोचावे
एकदा तरी माती व्हावे

चारी ठाव घरी खातसे
ताटात गरम पक्वाने
कागदावर अन्न केव्हातरी चाखावे
एकदा तरी माती व्हावे

वापरसी अंघोळीस पाणी मुबलक
फासशी साबण अंगास सुवासीक
शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे
एकदा तरी माती व्हावे

सेवा करवून घेई स्वत:ची
हातात सार्‍या वस्तू येती
कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे
एकदा तरी माती व्हावे

आत्मकेंद्री स्वभाव होई
मलाच हवे सारे काही
वागणे असे टाकून द्यावे
एकदा तरी माती व्हावे

स्वार्थी जग असले तरी
कुणी एखादा भेटतो वेगळा
त्याच्या अंगचे निस्वार्थीपण घ्यावे
एकदा तरी माती व्हावे

- पाषाणभेद
२७/०१८/२०२०

Saturday, January 18, 2020

हॉटेल शिवीभोजन थाळी

हॉटेल शिवीभोजन थाळी

मालक: हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं.
हॅ हॅ हॅ या या या.
बसा बसा बसा.

मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय?

मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज. हॅ हॅ हॅ.

मालक: अरे तो ढिल्ला पोळीवाला आला नाही अजून सोन्या? कुठे उलथला काय माहित.
त्या आठवी नापास मंदने अजून पोळ्या दिल्या नाहीत. मग भो**च्या थाळीत काय फक्त भात देवू काय रे सोन्या गाढवीच्या?
गिर्‍हाईक देव आहे आपला. त्याला ताटकळत ठेवून ताटात काय ठेवू? आमचा हा? म्हणजे मेंदू?

मालक: अरे दळभद्री, अरे तो गॅस संपलाय किचनमध्ये बघ जरा. नाहितर तुला बसवेल गॅसच्या जागी. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: ओ मालक, किती वेळ लागेल अजून थाळी सजवायला?

मालक: तुम्ही थोडे थांबा हं गिर्‍हाईकदादा. ह्या भा**ऊ पाजी गॅसला आताच संपायला पाहिजे होते. माठ्या, सोन्या भामट्या बघ जरा. येथे येणारे मोठे भुक्कड असतात त्यांची सोय पहायला नको का घनचक्कर? ती कोण पाहणार? तुझा ठोल्या बाप की माझा उलथलेला चुलता?

गिर्‍हाईक २: ओ मालक येथे बघा. चमचा बघा किती घाण आहे? न धुतलेलाच दिलेला दिसतोय.

मालक: अरे तिच्यायला! अरे पोंग्या, बघ जरा तो चमचा, बदलून दे तिन नंबरला. हॅ हॅ हॅ, आजकाल चमचे जरा जास्तच झालेत हो. मधे मधे कडमडतात. त्यामुळे होते चुकून. बाजूला राहून जातो एखादा डुकरासारखा चमचा. आमच्या मोरीतले माणसे म्हणजे एकदम छपरी आहेत बघा. आताच त्या बोंगाड्यांना तासतो.

मालक: अरे ए सुक्काळीचे, जास्त बेवडा मारून आलेत काय आज सकाळी? दळभद्री साले, रोज कुत्र्यासारखे खातात फक्त. अन भांडी निट घासायला नको का तुम्हा नालायकांना? अरे गिर्‍हाईक आमच्या नावाने ओरडते ना बैलांनो.

नोकर: मालक नळाला पाणी आलेले नाही कालपासून. जे आहे त्यातच घकवतोय.

मालक: अरे ए बिनडोक टमरेल, भो**च्य, तु मला आज सांगतो? कालच सांगितले असते तर मागवला असता एखादा पाण्याचा टँकर.

वेटर: एक वडापाव, पंधरा रुपये घ्या मालक.

मालक: अहो, सुटे द्या साहेब पंधरा रुपये. *टभर बिलासाठी कुठे उगीचच पाचशेची नोट काढता.

वेटर: मालक पुढचे गिर्‍हाईक. पाच नंबर. शिवीभोजन थाळी. दहा रुपये घ्या.

गिर्‍हाईक १: हे घ्या दहा रुपये.

मालक: नाव सांगा.

गिर्‍हाईक १: नाव कशाला?

मालक: अहो थाळी घेतली तर नाव सांगावे लागेल. च्यामारी, *टभर पैसे मिळवायचे अन सगळ्या नोंदी ठेवायच्या असे फुकटे काम दिले आहे बघा सरकारने.
गिर्‍हाईक काय एकदम उपाशी असते. येते आपले हादडायला, हॅ हॅ हॅ, म्हणजे तुम्ही नाही हो. उगाच आपले हे.

गिर्‍हाईक १: बरं बरं राहूद्या ते.

मालक: काम काय करतात ते सांगा.

गिर्‍हाईक १: अहो ते कशाला आणखी.

मालक: असे कसे? अहो सगळी कुंडली द्यावी लागेल बघा एकदा का शिवीभोजन थाळी खाल्ली तर. अनुदानीत आहे ना. *टभर पैशात पोटभर खा. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: अच्छा.

मालक: आधार क्रमांक काय?

गिर्‍हाईक १: आता तो पण द्यायचा का?

मालक: मग! अहो आता तर तो येथे द्यावा लागतोय. काय सांगावे पुढे मागे तर सुलभातही द्यावा लागेल. आहात कोठे. आता उद्याच या. रात्री शिवीथाळीची अपेक्षा करू नका. उपाशी झोपा. या पुन्हा शिवीभोजनाचा लाभ घ्यायला.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या खुळ्या बधीर लेका, शिव्याथाळीचा आजचा कोटा संपला बघ. त्यातल्या त्यात या फुकट्या कामात बरे आहे की फक्त दिवसाच हि शिवीथाळी द्यावी लागते आहे. सोन्या फुकट्या दलिंदरा, अरे, बाहेर बोर्ड लाव शिवीथाळी संपली म्हणून.
हॅ हॅ हॅ.

Saturday, January 11, 2020

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक हीटर, गॅस हीटर, गॅसवर भांडे ठेवून गरम पाणी करणे किंवा गरम पाण्याचा बंब असो. कोणत्याही साधनांनी गरम पाणी आले म्हणजे झाले. ते नसलेच तर सरळ थंड पाण्याच्या नळाखाली बसायचे अन आंघोळ उरकायची. गरम पाण्यातल्या आंघोळीला मनाची तयारी करायची गरज नसते. मस्तपैकी नळाने किंवा वर उल्लेखलेल्या साधनांनी येणारे गरम पाणी बादलीत घ्यायचे अन सरळ आंघोळीला सुरूवात करायची. थंड पाण्याच्या आंघोळीला मात्र मनाची अन शरीराची तयारी असावी लागते. उन्हाळ्यात थंड पाणी चांगले वाटत जरी असले तरी सकाळी ते थंड पाणी अधीक थंडच असते. त्यामुळे अशा आंघोळीसाठी आधी पायापासून सुरूवात करावी लागते. थंड पाण्याने आंघोळ करायची असे मनाने ठरवले की आधी पायावर पाणी टाकून शरीर आंघोळीसाठी तयार होते. मग कमरेवर आणि मग छाती, खांदे, डोके असे वरचढ प्रमाणात मगाने पाणी अंगावर घ्यावे लागते. एकदा का एखाद दोन मग थंड पाणी अंगावर पडले की मग मात्र गरम पाण्याच्या तुलनेने हि आंघोळ अधीक वेगात होते. चटचट डोके, अंग धुतले जाते, शॅम्पू, साबण चोपडला अन धुतला जातो. टॉवेलने खसखसा अंग पुसलेदेखील जाते. अशा आंघोळीनंतर मात्र एकदम प्रसन्न अन उत्साही वाटते. हातात अगदी डोंगर फोडायचे काम दिले तरी ते होवून जाईल असा उत्साह अंगी संचारतो. थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्याची आंघोळ एक बुळा प्रकार आहे असे माझे प्रामाणीक मत आहे.

एक आठवण सांगतो. कॉलेजला असतांना आमचे होस्टेल हे थोडे गावाबाहेर होते. गरम पाण्याची काही सोय नव्हती तेथे. मग बाकीचे विद्यार्थी गरम पाण्यासाठी हीटरचा रॉड वगैरे घेवून सोय करायचे. मी मात्र उन्हाळा असो की हिवाळा, सकाळी साडेपाचच्या दरम्यान दोन तिन किलोमिटर पळायला जायचो. जॉगींग वगैरे प्रकार नव्हता तेव्हा. मी एकटाच पळून यायचो आणि अंग घामाने थबथबून जायचे. मग मी सरळ गार पाण्याच्या नळाखाली बसायचो. ज्यांना मी पळून येवून आंघोळ करतो आहे हे माहीत नव्हते ते आश्चर्यचकीत व्हायचे. इतर मुलांनी ब्रश देखील केलेला नसतांना मी मात्र सगळ्यात पहिला आंघोळ करून कपडे धुवून तयार झालेलो असायचो. आता मात्र अंग गरम पाण्याला सोकावलेले आहे. पण गार पाण्याची सवय शरीराला अजूनदेखील आहे हे गेल्याच आठवड्यात मी मध्य प्रदेशात गेलो असतांना जाणवले. तेथे हॉटेलवर सकाळी गरम पाणी मिळेल हे सांगितलेले होते. पण सकाळी नळाला गरम पाणी येत नव्हते. मग शेजारच्या रूममधल्या कुटूंबाला गरम पाण्याबाबत विचारले तर तेथेही गरम पाणी येत नसल्याचे समजले. मग मी सरळ रूममध्ये येवून नळाखाली बादलीत पाणी घेतले अन माझी गार पाण्याची लिटमस टेस्ट घेतली अन मी त्यात तेवढ्या थंड वातावरणात उत्तीर्ण झालो.

असलीच थंड पाण्याची आंघोळ हि कधीकधी बळजबरी करावी लागते. त्यातील एक हमखास वेळ म्हणजे लग्नाच्या वर्‍हाडाबरोबर किंवा एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमीत्त सामूदायीकरित्या मुक्कामी जाणे. तेथल्या मुक्कामी सकाळी गरम पाणी अभावानेच मिळते. "असेल नशीबात तर आंघोळ होईल गरम पाण्यात" अशी परिस्थीती असते. सगळ्याच ठिकाणी मुक्कामासाठी हॉटेल नसते. यजमान ठेप ठेवणारा जरी असेल तरी कार्यस्थळी पाहूण्यांची गर्दी असल्यामुळे गरम पाणी तरी किती जणांना पुरेल असाही सामाजीक विचार मनात येतो. काही होतकरू अन अनूभवी मंडळी सगळ्यात आधी उठून आंघोळीला रांगा लावतात अन बाथरूम अडवून बसतात. आपल्याच कुटूंबाची आंघोळ आधी व्हावी हा स्वार्थी विचार प्रत्येक कुटूंबधारक करत असतो. मग त्यात सख्खे नातेवाईकही बाद होतात. लग्नात तर हमखास बाथरूम अडवणूक होते. मी अन माझी बायको-नवरा-मुले यांची आंघोळ आधी कशी होईल यातच प्रत्येक वर्‍हाडी गुंततो. लग्नातल्या महिलांना एकमेकींचा रुसवा करण्यास आंघोळ हे एक कारण भेटते. 'माझ्या नणंदेने बघा मला आंघोळ देखील आधी करू दिली नाही, साबण तर दिलाच नाही' असले रुसवे कुटूंबात रंगतात. वरमायची आंघोळ हा देखील एक प्रकार असतो. त्यातही रुसवे फुगवे घडतात. एकदा का सगळ्यांच्या आंघोळी झाल्या तर मग या रुसव्याची भरपाई नाष्ट्याच्या आग्रहाने होते. काही अनूभवी मंडळी गावातल्या इतर नातेवाईकांकडेच मुक्काम ठोकतात किंवा किमानपक्षी आंघोळीलातरी तेथे जातात.

एखाद्या निरर्गरम्य ठिकाणी सहल म्हणा किंवा आजच्या जमान्यातले विकएंड पर्यटन म्हणा किंवा देवदर्शन कम भटकंतीच्या निमीत्ताने आजकाल गाड्या भरभरून लोक पर्यटन करत आहेत. प्रवासाच्या सोई वेगवान अन पाहीजे तेथे उपलब्ध झाल्याने आजकाल जो तो उठतो अन शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार पहाटपर्यंतच्या विकांतात  पर्यटनाचाचा विचार करतो आहे. अशा पर्यटन स्थळी किंवा धार्मीक स्थळी आंघोळ हे एक कार्य असते. काही ठिकाणी धार्मीक पर्यटन हे केवळ आंघोळ करवून घेण्यासाठीही आपल्याकडे प्रचलीत आहे. नर्मदेतले स्नान, गोदावरी- नाशकातले रामकूंडातले किंवा कुंभमेळ्यातले स्नान, अलाहाबाद - प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील किंवा त्रिवेणी संगम आदी ठिकाणावरील स्नान हे धार्मीक स्नानात मोडते. भारतात कोणत्याही नदीत स्नान केले तर गंगेत स्नान केले असे म्हटले जाते एवढे स्नानाचे महत्व आहे. एखाद्या धबधब्याखाली जावून अंग भिजवणे, रेन डान्स असलेले किंवा वॉटर पार्क मधले भिजणे हे हौशी पर्यटनाखाली मोडते. अगदीच झाले तर कोणत्याही स्विमींग पूल मध्ये पोहोण्याआधी अंग धुवावे लागते. झालेच तर काही हौशी व्यक्ती समुद्रस्नान किंवा मड बाथ किंवा सूर्यस्नान, किंवा पावसातले स्नान देखील करतात. काही ठिकाणी चॉकलेटचे स्नान किंवा देवादिकांची मध, दूधाने घातलेली आंघोळ आदी देखील प्रकार प्रचलीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी किंवा रायगड येथील सुधागड येथील उन्हेरे येथे गरम पाण्याचे कुंड आहे. तेथे गंधक मिश्रीत पाण्याचे झरे वाहतात. तेथे केलेले स्नान हे वैद्यकीय दृष्ट्या त्वचारोगावर उपाय मानला जातो.
हॉस्पीटलातले रुग्णाला केलेले स्पंजींग देखील एक आंघोळीचाच प्रकार आहे.

दिवाळीतले अभ्यंगस्नान हा देखील एक वैविध्यपूर्ण प्रकार आपल्यात आहे. कार्तीक महिन्यातली थंडी अन त्या थंडीत सकाळी उठणे आणि उटणे, तेल लावून, मोती साबण लावून केलेले स्नान किती प्रसन्न असते. त्या आंघोळीला धार्मीकतेचा वारसा आहेच पण वैद्यकीयदृष्ट्याही अधिष्ठान आहे. बोचर्‍या थंडीत शरीराला तेलाने मर्दन केल्याने शरीरातील तेलाची कमतरता भरून निघते हा हेतू आपल्या पुर्वजांनी जाणला असावा आणि मग तशी आंघोळ करण्याची प्रथा पडली असावी. असले उटणे वगैरे लावून केलेली आंघोळ हि केवळ दिवाळीच्या एका दिवसापर्यंत मर्यादीत न राहता वर्षभर असावी असे मला वाटते. महिलावर्ग या उटण्याच्या आंघोळीला मुकतो हे मात्र खरे. महिलांवर कायमच अन्याय होत असल्याचे हे पाणीदार उदाहरण आहे. समस्त महिलावर्गाने आणि स्त्री मुक्तीवाल्यांनी केवळ महिलांसाठी असलेली एखादी आंघोळ शोधायला हरकत नाही. अर्थात भोगी, रथसप्तमी इत्यादी सणांना महिला नदीवर स्नान करण्यासाठी जातात. ती देखील एक मुहूर्ताची आंघोळच असते.

पुरानकाळापासून माणूस हा प्राणी आंघोळ करत असल्याचे पुरावे मिळतात. रोमन साम्राज्यातील किंवा हडप्पा, मोहोंजोदरो येथील स्नानगृहे, न्हाणीघर, तेथील पाणी वाहून नेण्याच्या जागा आदी पुरावे उत्खननात मिळालेले आहेत. प्रत्येक धर्मात स्नानाचे महत्व आहे. क्रिश्चन लोकांत बाप्तीस्मा घेण्याचे स्नान असो, मुस्लीमांतले शुक्रवारचे स्नान, आपल्या हिंदूमधले नद्यांमधले पवित्र स्नान, लग्नातले वधू वरांनी एकत्र केलेली सार्वजनीक आंघोळ, त्याच वधू वरांनी लग्नानंतर एकत्र केलेली खाजगीतली आंघोळ, लहान मुलांची आंघोळ, शेवटची आंघोळ, बादलीत पाणी घेवून केलेली आंघोळ, शॉवर खाली केलेली आंघोळ आदी अनेक प्रकार आंघोळीचे असतात. युरोप अमेरीकेत पूर्वी आंघोळीसाठी सार्वजनीक जागाही होत्या. तेथे सामुदायीकरित्या आंघोळ करत असत. हमाम में सब नंगे हि म्हण त्यातूनच उदयाला आली असावी. 

चित्रकारांनाही आंघोळ हा विषय चित्र काढण्यासाठी महत्वाचा वाटलेला आहे. अनेक चित्रकारांनी या आंघोळीच्या चित्रांमधे हात धुवून घेतलेला आहे. गोपीका नदीत स्नान करत आहेत अन श्रीकृष्ण त्यांचे कपडे चोरतो या विषयावर अनेक चित्र आहेत. जशी परिस्थीती आंघोळीच्या चित्रांमध्ये आहे तशीच परिस्थीती चित्रपटांमध्येही आहे. अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटातल्या नायिकांना चित्रपटात आंघोळीला बसवलेले आहे. ब्रम्हचारी चित्रपटातील यमुनाजळी खेळ खेळू यातील मिनाक्षी, राम तेली गंगा मैली मधली मंदाकीनी, किशन कन्हैया मधली राधा बीना है किशन अकेला म्हणणारी शिल्पा शिरोडकर कोण विसरेल? काही प्रसंगात तर नायीका भिजवण्यासाठी खास प्रसंग निर्माण केलेले आढळतील. पावसाचे कोणतेही वातावरण नसतांना चित्रपटात नायक नायीका पावसात भिजतात. ओढून ताणून ओलेत्या केलेल्या प्रसंगांना नायक नायीकांनी आक्षेप घेतलेला आढळत नाही. केवढे  हे आंघोळीविषयी प्रेम!

एकूणच परिपुर्ण आरोग्य आणि निकोप मनासाठी आंघोळ हे एक आद्य कर्त्यव्य आहे. ज्या दिवशी आंघोळ झाली नाही तो दिवस खराब जातो हे निश्चीत. मुंबईत  लोकलमधून प्रवास करून, घामाने न्हावून ( बघा, घामाने न्हाणे हे देखील आंघोळीतच गणले जाते!) घरी आल्यानंतर प्रथम आंघोळ होते. त्यानंतरच मंडळी कुटूंबाच्या प्रेमात न्हातात.   

दिवसाची सुरूवात आंघोळ करून प्रसन्न होते याचा अनूभव तुम्ही, आम्ही सर्वांनीच घेतलेला असेल. आंघोळीने शरीर धुतले जाते. त्वचेचे आजार आंघोळीने नष्ट होतात. आंघोळ केल्यानंतर प्रसन्न वाटते. उत्साह निर्माण होतो. पर्यायाने मनाचे आरोग्य राखले जाते.

ब्रह्ममुहूर्तावर हा लेख प्रकाशीत करून मी आजचे चंद्रग्रहण संपल्याच्या कारणास्तव एवढ्या थंडीत मस्त गरम पाण्याने आंघोळ करायला पळतो.

- पाषाणभेद
११/०१/२०२०