Saturday, December 21, 2019

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी - General Travel Checklist

मागे येथे प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी येथे लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे.

तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो. तसेच तो प्रवास पायी, सायकलपासून ते थेट आगगाडी, बस, खाजगी कार, आगबोट इत्यादी विविध वाहनांमधूनही होत असतो. अशा प्रकारच्या प्रवासासाठी तयारीचा वेळ काही वेळा अगदी काही मिनिटांचाही असू शकतो. अशा कमी वेळात लगेचच तयारी करुन प्रवासाला निघणे होते. मग आहे ते सामान पिशवीत भरले जाते किंवा महत्वाची वस्तू राहून जाते. गेलेल्या ठिकाणी मग आपल्याला लागणारी वस्तू पुन्हा घ्यावी लागते.

प्रवासाच्या तयारीला काय काय गोष्टी लागू शकतात याची संभाव्य यादी कुणी केलीही असेल. मला आठवते की खूप पूर्वी मायक्रोसॉप्टच्या ऑफीससूटमध्ये एका अ‍ॅप्लीकेशनमध्ये अशी विस्कळीत यादीचे टेम्प्लेट होते. इंटरनेटवर शोध घेतांना अशा रितीची चेकलिस्ट भेटूही शकते पण ती इंग्रजीत आहे आणि ती आपल्या राहणीमानाप्रमाणे नसावी. अर्थातच अशी यादी परिपूर्ण असूच शकत नाही. कारण व्यक्तीपरत्वे गरजा भिन्न होत जातात. मला एखादी गोष्ट आवश्यक असेल ती दुसर्‍याला अवांतर वाटेल.

खाली अशा प्रवासाला लागणार्‍या किंवा प्रवासात उपयोगी पडणार्‍या वस्तूंची यादी दिलेली आहे. सदर यादी वस्तूंच्या कोणत्याही क्रमाने नाही. सदर यादीत एका ओळीत एकच वस्तू येईल अशी बनवली आहे जेणे करून याची प्रिंट घेवून प्रवासाला निघण्यापुर्वी टिकमार्क करत वस्तू गोळा करायला सोप्या व्हाव्यात.

आपण हि यादी नजरेखालून घाला. काय वस्तू असाव्यात, काय नसाव्यात ते येथे लिहा म्हणजे चर्चाही होईल अन यादीपण परिपुर्ण होत जाईल.

टूथ ब्रश
पेस्ट
दाढीचे सामान
कंगवा
सेफ्टी पीन्स
सौंदर्यप्रसाधने
अंडरपॅंट, बनीयन
टॉवेल
साबण
प्रवासात उलटी न होवू देणारी गोळी (अ‍ॅव्होमीन किंवा इतर)
रक्तदाब, मधूमेह किंवा नेहमी लागणारी औषधे, क्रिम
डोकेदूखीवरचा बाम, आयोडीन, अमृतांजन, झेंडू तत्सम
इस्त्री केलेले ड्रेस
एक्स्ट्रा पिशवी
प्लॅस्टीक कॅरी बॅग
एखादी स्लिपर, चप्पल
गरम कपडे, मफलर, टोपी
कानात घालायचा कापूस
नाईट पॅंट, रात्रीचे कपडे
चष्मा घर
उन्हाची टोपी, गॉगल
छत्री, रेनकोट (हवामानाप्रमाणे)
मोबाईल
चार्जर, पॉवरबँक
हेडफोन
सेल्फी स्टिक
कॅमेरा
चटई
फळे कापण्याचा चाकू
जूने वर्तमानपत्र
पैसे, सुट्टे पैसे
क्रेडीट, डेबीट, ट्राव्हल कार्ड
फास्टॅग रिचार्ज केले का?
लिहीण्यासाठी पेन
कागद
जेथे जायचे तेथले फोन क्रमांक (कागदावर लिहीलेला असावा. मोबाईल कधीही दगा देवू शकतो.)
महत्वाचे फोन क्रमांक लिहीलेला कागद
जाण्याचा रस्ता असलेला नकाशा, पत्ता इ.
वाहनासंदर्भात कागदपत्र जसे आर सी बूक, ड्रायव्हींग लायसन्स
पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड
आपल्या पत्याचे ओळखपत्र (आपल्याकडच्या बॅगांमध्ये असे ओळखपत्र टाकून ठेवावे. हरवल्यास बॅग परत मिळण्याची शक्यता वाढते. स्वानूभव आहे.)
जेवणाचा शिधा किंवा डबा
इतर वेळेचा खाऊ
बिस्कीट, मॅगी
लहान मूल असल्यास त्यांचा खाऊ, दूधाची सोय.
पाण्याच्या बाटल्या
फर्स्ट एड
स्वतःची गाडी असल्यास गाडीसाठीच्या वस्तू वाढतात त्या लक्षात ठेवणे. (जसे आरसी बूक, स्टेपनी, गाडीतले ऑईल, हवा, पाणी, पेट्रोल, लायसन्स इत्यादी.)
इतर सदस्य बरोबर असतील तर या यादीतील वस्तू त्यांच्या गरजेप्रमाणे परत वरतून चेक करत येणे.
ट्रेकींग, एखादी मोहीमेसाठी प्रवास असेल तर गरजेप्रमाणे पुन्हा या वस्तू वरतून चेक करत येणे.
अधिकच्या वस्तू.....
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------

Monday, December 16, 2019

माहेर, सासर

माहेर, सासर
नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा
अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले
चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर
मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते
मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर
- पाषाणभेद
०८/१२/२०१९

बाटाट्याचे उपयोग

बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||

माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||

"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||

कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||

कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी
कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी
बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा ||

माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी
किंवा करा मिक्स भाजी नाहीतर पाव भाजी
कुकरमध्ये उकडून घ्या किंवा मेथी पालकात टाका ||

खिचडीत टाका बघा चव कशी छान न्यारी
वांगी बटाटा भाजी आवडीने खातात सारी
माझ्यासवे बनवा सार भाजी घेवून टमाटा ||

माझे बनवा वेफर्स, फिंगर चिप्स, काप कापून
छोटे उद्योग झालेत मोठे त्या साऱ्याला विकून
पिकवून शेतकरी व्यापारी हाती मोजती नोटा ||
"

इतक्यात घाईने आई आली स्वयंपाकघरात
प्रश्न विचारी आज काय देवू तुला डब्यात?
बटाटा कर मी म्हटले अन केला त्याला बाय बाय टाटा ||

- पाषाणभेद
०९/१२/२०१९

Thursday, December 12, 2019

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा
मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.
दुसरे असे की जर अशा सोशल फोरवरील काही मुद्दे असोत किंवा धागे असोत ते शासनातले अधिकारी व्यक्ती, मंत्री की ज्यांच्या हातात नियम बनवणे आणि राबवणे शक्य आहे त्यापर्यंत जर गेले आणि त्यांनी गंभीरपणे यातील तथ्थे जाणून घेवून जर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला तर अशा पाळल्या गेलेल्या नियमांमुळे नागरीकांचे जगणे अधीक सुखावह होवू शकते.
वरील प्रस्तावना अजून समजली नसेल तर खालील लेख वाचून समजू शकते. थोडक्यात लेख आधी आणि वरील प्रस्तावना नंतर असे असते तर ते अधिक योग्य असते हे लक्षात यायला लेख वाचावा लागेल. लेखाची प्रकृती थोडी गंभीर आहे.
काल मी शहरातल्या उपनगराच्या रस्त्याने रात्री पायी जात होतो. तेव्हा समोरून वाहने येत होती. त्यात चारचाकी आणि दुचाकी होत्या. सदर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश हा सरळ डोळ्यांवर येत होता. एका वाहनाचा प्रकाश इतका तिव्र होता की माझेच नव्हे तर माझ्या मागे येणार्‍या पादचार्‍याचेही डोळे दिपले. त्याने आणि मी तेथेच थांबून घेतले. त्याच्या आणि माझ्यात डोळ्यांवर आलेल्या हेडलाईट संदर्भात संवाद झाला.
असाच मुद्दा आमच्या वाहनविषयक व्हाटसअ‍ॅप वर चर्चेला आला होता. त्या क्षणीक बीजचर्चेला या धाग्याच्या निमित्ताने सार्वजनीक रुप देण्याचा प्रयत्न आहे. ( सर्वसामान्यपणे तांत्रीक इंग्रजी प्रतिशब्द बोलतांना जास्त वापरले जात असल्याने लेखातही तेच वापरले आहेत.)
वाहनांचे हेडलाईट्स - हाय बीम - लो बीम - अप्पर लाईट - लोअर डिप्पर लाईट
वाहनांमध्ये जे हेडलाईट्स असतात त्यात दोन सेटींग असतात. बटन दाबून हेडलाईट्स हाय बीम - लो बीम - अप्पर बीम - लोअर बीम (डिप्पर) अशा प्रकारे ते चमकवता येवू शकतात. रात्रीच्या वेळी असे हेडलाईट शहरात - जेथे रस्त्यावरील (स्ट्रीट) लाईट्स असतात तेथे - वाहन कायम लो बीमवर चालवणे गरजेचे आहे. नव्हे तसा नियमच आहे. आणि असा नियम आहे हेच बहूदा बर्‍याच वाहनचालकांना माहीत नाही. केवळ कार किंवा मोठ्या गाड्याच नव्हे तर लहान अगदी दोन चाकी वाहनांचेही हेड लाईटस आताश: प्रखर असतात. अशा अपर बीममुळे समोरच्या वाहनधारकांचे डोळे दिपतात.
जेथे स्ट्रीट लाईट्स नसतात तेथे, ग्रामीण रस्त्यांवर अपर बीमवर वाहन चालवायला हरकत नाही. परंतू तेथेही समोरून वाहन येत असल्याचे दिसल्यास दोनही वाहनांनी डिपर किंवा लो बीमवर वाहन चालवावे. हाच नियम आपले वाहन इतर वाहनापासून साधारण २०० ते ३०० मिटर मागे असते तेव्हापासून आपले वाहन लो बीमवर चालवणे गरजेचे आहे असा समजायला हरकत नाही. असे केल्याने आपल्या वाहनाचे हेडलाईटस पुढच्या वाहनाच्या आतील मागे बघण्याच्या (IRVM) काचेमध्ये चमकत नाही.
वाहन कायम लो बीमवरच चालवणे हे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी गरजेचे आहे. आणि हा नियम असल्याने तो पाळायलाच हवा.
हाय बीम वाहन चालवणे आणि जंगली प्राणी सुरक्षा
हा एक नवा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. यात किती तथ्य असावे ते सांखिकीयदृष्ट्या आणि इतर संशोधनाने सिद्ध व्हावे लागेल याची मला कल्पना आहे.
तर आजकाल अज्ञात वाहनाच्या धडकेने जंगलातले प्राणी (हरीण, बिबटे किंवा इतर प्राणी) गतप्राण होण्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो आहे. लक्षात घ्या की या पृथ्वीवर आपला जसा हक्क आहे तसाच प्राणी, वनस्पती यांचाही हक्क आहे. रात्री वाहनचालक आपले वाहन अपर बीमवर चालवत असल्याने या जंगली प्राण्यांचे डोळे दिपतात. ते गोंधळून जातात आणि ते तेथेच उभे राहत असतील किंवा ते बचावासाठी  इतरत्र पळत असतील किंवा वाहनांवर हल्ला करण्याच्या हेतूने ते वाहनाकडे झेपावत असतील. कारण काही का असेना पण मानवाप्रमाणेच या प्राण्यांचे डोळे वाहनांच्या तिव्र प्रकाशाने दिपतात आणि ते वाहनाखाली येवून गतप्राण होतात.
पुन्हा सांगतो या मुद्यावर प्राण्यांची मानसीकता, त्यांचे प्रकाशाप्रती होणारे वर्तन या सर्वांगाने संशोधन होणे गरजेचे आहे.
वाहनातील हाय बीम - लो बीम हेडलाईट योग्य कसे वापरावे?
आपण येथ पर्यंत वाचत आलात तेव्हा आपल्याला हेडलँपमधील हाय बीम आणि लो बीम किती महत्वाचे आहे याचे महत्व पटले असेल. हाय बीम - लो बीम योग्य कसे वापरावे हे खालील प्रकारे समजावून घेता येते.
- जेथे स्ट्रीट लाईटस आहेत (शहरात) तेथे वाहन कायम लो बीमवरच चालवावे. यात चारचाकी तर येतातच पण दुचाकी वाहनेही येतात.
- ग्रामीण भागात वाहतूक नसेल तेव्हा हाय बीम ठिक आहे. पण तेथेही आजकाल वाहने जास्त धावत असल्याने लो बीमच योग्य आहे. वाहनाचा वेग विनाकारण न वाढवता वाहन चालवायचे असल्यास (डिफेन्सीव ड्रायव्हींग) हेडलँप लो बीमवर योग्य आहे.
- काही वाहनात डॅशबोर्डजवळ हेडलाईटचे सेटींग करायचे बटन असते. त्याची पोजीशन कायम शुन्य ठेवावी. ड्रायव्हरच्या उंचीनुसार एखादी पातळी वर किंवा खाली त्या त्या वेळी बदलली तर हरकत नाही. पण खरोखर तशी आवश्यकता नसते.
- समोरील वाहन किमान ५०० मिटर दुर असेल तर आपल्या वाहनाचे बीम लो करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- आपल्या पुढे एखादे वाहन असल्यास म्हणजेच आपण किमान ३०० मिटर मागे असल्यास आपल्या वाहनाचे दिवे हे लो बीम करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
- पासींग लाईटचा उपयोगदेखील आपण हाय बीमसाठी तात्पुरता करू शकतात.
- पासींग लाईट ओव्हरटेक करतांना योग्य भान ठेवून चमकवावा. दुसर्‍या वाहनाने आधी चमकवला असता आपण त्याला अनुमोदन (अ‍ॅक्नॉलेज) द्यावे आणि पहिल्यांदा त्याने पासींग मागीतले म्हणून आपण त्याला योग्य वाट करून द्यावी - ओव्हरटेक करू नये. हे देखील सभ्यपणाचे लक्षण आहे आणि चांगले वाहन चालवण्याच्या एथिक्समध्ये येते.
हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे
आजकाल वाहनांत हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे येतात. काही मॅन्यूफॅक्चररच ते नव्या वाहनात आधीच बसवून वाहन विकतात. ( यात कायद्याचे उल्लंघन होते का हे पाहणे आरटीओचे काम आहे. ते जबाबदारीने वागतात का हा वादाचा मुद्दा आहे.)
आपल्या वाहनांत जर असे दिवे आधीच बसवून आलेले असतील तर आपण ते दिवे काढून केवळ इतरांसाठी साधे पिवळे दिवे बसवू एवढे समाजाप्रती संवेदनशील आपण निश्चित नाही. ( हे वाक्य फार दु:खाने लिहावे लागते आहे.) पण आपले वाहन जुने असेल तर आपल्या वाहनात असे हॅलोजन किंवा पांढरा प्रकाश देणारे दिवे शक्यतो बसवू नये. जास्तीचे दिवे, फॉग लँप, मोटरसायकलींच्या हॅन्डलजवळ तिव्र प्रकाशाचे एलईडी लावणे असे प्रकार शक्यतो टाळावेत. (यात जास्त आवाजाचा सायलेंसर, रिवर्स हॉर्न आणि जास्त किंवा निराळा आवाज असलेले हॉर्न बसवणे देखील येते.) अशा प्रकारच्या दिव्यांची खरोखरच आवश्यकता आहे का हा प्रश्न मनाला विचारावा. इतरांनी केले म्हणून मी पण केले पाहीजे हि वृत्ती नसावी. अर्थात वाहन घेणे ही एक लग्झरी समजली जाते. ठिक आहे तसे समजा. वाहनाचा आतील भाग कितीही सजवा पण वाहनाच्या बाह्य भागात काही बदल करणे, इतरांना हानी पोहोचेल असे बदल करणे कायद्याने कितपत योग्य आहे त्याचा विचार करावा. नियम आणि कायदे हे आपल्या भल्यासाठी असतात. भले आपल्याला आपल्या जीवाची काळजी नसेल पण खाजगी वाहन रस्त्यावर आले तर ते सार्वजनीक होते. तेथे सामाजीक वर्तनच केले पाहीजे. समाजाप्रती आपली जी जाणीव आहे ती प्रगल्भ ठेवली पाहीजे.
पोलीस, आरटीओ - सरकारी खात्यांची कर्तव्ये
पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ यांनी वेळोवेळी निरनिराळ्या माध्यमातून या नियमांबद्दल जागरूकता आणणारे कार्यक्रम केले पाहीजे. भारतीय लोकांत - समाजात ब्रेनवॉश केल्याशिवाय एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरतच नाही. एखादा नियम, कायदा त्यांच्या डोक्यात भिनवावा लागतो तरच तो अंगवळणी पडतो. आरटीओ, पोलीसांनी झेब्रा क्रॉसींगबाबत बर्‍यापैकी जाणीव केली आहे. त्यामुळे वाहने जरी झेब्रा कॉसींगवर (अजूनही!) थांबत असतील पण कमीतकमी (!) झेब्राक्रॉसींगच्या पुढे तर थांबत नाहीत हा असल्या शिकवणूकीचा (की पोलीसांनी दंड घेतल्याचा) फायदाच समजायचा! (समजले नसेल तर वाक्य पुन्हा वाचा.)
असलीच जागरूकता, वारंवार सांगणे, ब्रेन वॉश करणे हे अपर बीम, लोअर बीम ( हाय बीम- लो बीम, अप्पर- डिप्पर), रिव्हर्स हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, पांढरे, हॅलोजन, तिव्र प्रकाश देणारे हेडलँप, टेल लँपला सजवणे, वाहनात बाह्य बदल करणे या बाबतीत पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ तत्सम शासकीय खाते आदींनी जनतेत केले पाहीजे. वेळोवेळी जनतेला सजग केले पाहीजे. अपर बीम आणि तत्सम नियम, कायदे वारंवार सांगितले पाहीजे.
मला एक आश्चर्य वाटते, आवाज मोठे असणारे सायलेंसर गाडीला लावतात तर मग त्याला सायलेंसर का म्हणतात. विनोद सोडा, पण आपण समाजाप्रती किती सिरीअस आहोत हेच ही बाह्य लक्षणे दाखवतात. असो.
या असल्या अपर लोअर, हाय लो बीम वर एक युट्यूबवर बंगलोरच्या आदीत्य कुमार - विषयम मेडीआ याने "EDUCATED SUTIYA... ARE YOU ONE OF THEM?" हे टायटल असणारा विडीओ अपलोड केला आहे. वाहनांविषयी, अपर बीम विषयी असलेल्या भारतीय मानसीकतेला "एज्यूकेटेड सुतीया....त्यातले आपण तर नाही ना?" हे शिर्षक अगदी परफेक्ट फिट होते आहे. या विडीओला फक्त ६०४ व्हूज, ५ लाईक्स, १ डिसलाईक आणि एक कमेंट मिळालेले आहेत. (तो एक डिसलाईक देणारा एज्यूकेटेड सुतीया असावा.) याच्या विरूद्ध "जेसीबीकी खुदाईला" या विडीओला किती लाईक्स आणि किती व्ह्यूज मिळाले असतील याची गणती आपल्यापैकीच बर्‍याच जणांच्या तोंडावर असेल. खरोखर आपण एज्यूकेटेड सुतीया आहोत का याच ज्याने त्याने विचार करायचा आहे. काल रात्री रस्त्याने जातांना माझे आणि माझ्या बरोबर चालणार्‍या पथीकाचे डोळे समोरच्या वाहनाच्या प्रकाशाने दिपले तेव्हा मी असलेच उद्गार काढले होते. माणसे शिकून शिक्षित झालीत पण सुशिक्षीत झाली नाहीत.
एका वाहन बनवणार्‍या कंपनीने डिप्पर या नावाने गर्भनिरोधक बाजारात आणले होते. कारण बर्‍याच ट्रक्सवर "Use Dipper at Night" हे स्लोगन लिहीलेले असते. यामुळे वाहनधारकांमध्ये कितपत आणि नक्की कोणत्या "विषयाची" जागरूकता झाली असेल याची आपल्याला कल्पना आली असेलच. हे असले धेडगूजरी आणि आपलाच फायदा होणारे जाहिरातीचे प्रयोग त्या त्या कंपन्यांनी थांबावावेत आणि या बाबतीवर खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी सत्कारणी लावावा. रस्ते अपघात खूप होत आहेत. या बाबतीत सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारला वाहनधारक, वाहनचालक, वाहन मॅन्यूफॅक्चरर आदींकडून खूप पैसा मिळतो आहे. त्यातील काही भाग हा सोशल अवेअरनेस या कारणाखाली खर्च करून या अशा न पाळल्या जाणार्‍या वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणली पाहीजे.
वाहतूक पोलीस रात्री ड्युटी संपवतात. वाहतूक पोलीस आपले मित्र आहेत. त्यांच्या कामाचे तास खूप आहेत याची मला जाणीव आहे. त्यांच्या संख्येत अधीक वाढ करून त्यातील अधीकचे पोलीस रात्री काही प्रमाणात शहरात नाकेबंदीसाठी नेमून करून असे नियम न पाळणारे वाहनधारक - जे अप्पर लाईट लावून, सायलेंसर बदलून किंवा प्रखर हेड लँप लावून, रिव्हर्स हॉर्न लावून वाहन चालवतात - त्यांना समज दिली पाहीजे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला पाहीजे. पण यात दंड वसूल करायला अजून एक निमित्त भेटले असे व्हायला नको. राज्यात स्पिडगन असलेल्या नव्या गाड्या पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. त्या देखील असे अपर बीम असलेली वाहने पकडू शकतात.
हा लेख शासनापर्यंत हस्ते परहस्ते जावा. शासन जे काही करते आहे त्यात सुयोग्य बदल व्हावा अशी या लेख लिहीण्यामागे प्रेरणा आहे. सोशल मिडीया फार अ‍ॅक्टीव्ह असल्याने मिसळपाव.कॉम सारख्या माध्यमातून तो लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे. या लेखाच्या भरपूर कॉपी होवोत. हा लेख कॉपीराईट वगैरे मुक्त आहे. कुणाचे नाव नाही लिहीले तरी चालेल. छोटी वाक्ये, परिच्छेद कॉपी झालेत तरी हरकत नाही. पण समाजाच्या तळापर्यंत वाहतूकीच्या नियमात असे काही आहे याची जाणीव होणे महत्वाचे आहे. कारण वाहतूकीचा किंवा वाहन चालवण्याचा परवाना कसा मिळतो हे आपण जाणतोच. त्यात वाहतूकीच्या नियमांबाबत शिक्षण किती होते या बाबतीत संशोधन करावे लागेल.
लेखात काही तृटी असतील तर त्या जरूर सांगा. आणि हा लेख संपल्यानंतर पहिले दोन परिच्छेद पुन्हा वाचा.
ट्रकवर जसे मागे लिहीतात तसे या लेखाच्या शेवटी लिहीतो की: Use Dipper at Night - रात के समय डिप्पर इस्तेमाल किजीए - आणि हो, या वाक्याचा कृपया योग्य तो अर्थ घ्या. हॅपी अ‍ॅन्ड सेफ ड्रायव्हींग!

Saturday, December 7, 2019

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)

न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर

थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर

इसीजी नका करू तुम्ही
पल्सही नका पाहू कोणी
लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर
काढा की माझे वेंटीलेटर

पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले
काळजी घेण्या नर्स नाही मग तुम्ही का दुर? 
इकडे या अन ऐका पलंगाची कुरकुर
काढा की माझे वेंटीलेटर
अहो काढाना!

(सदरचे उपचार या खाजगी रुग्णालयात हिंदीतही उपलब्ध आहेत. रुग्णांनी लाभ घ्यावा.)
- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो वेंटीलेटर

ओ डॉक्टर निकालो मेरा वेंटीलेटर
मुझे नही कुछ हुवा
चाहे तो लिखवा लो मुझसे लव लेटर
(कोरसः न न ना, इसे दे दो डिसचार्ज लेटर)

न मै बिमार हू न मै परेशान हू
सभी तरीकेसे मै तंदूरूस्त हू
फिर क्यू देते है मुझे इंजेक्शन?
निकालो मेरा वेंटीलेटर

थोडी दवाई मै खाती हू वो आप भी खा लो
दिलकी बिमारी मेरी थोडी आप ले लो
सलाईन ऑक्सीजन हटवा दो बढा है मेरा टेंपरेचर
निकालो मेरा वेंटीलेटर

इसीजी मत तुम देखो
पल्सही मत चेक करो
लॅब टेस्ट करने मत बोलो, बंद करो वो मॉनीटर
तुम बस निकालो मेरा वेंटीलेटर

स्पेशल रूम मे लेटी हू मै बिस्तर पर
नर्स भी नही यहां आप आ जावो इधर
सारे लोग करते है वो हम करे तो क्या है प्रॉब्लेम?
निकालो मेरा वेंटीलेटर
निकालो ना!

- डॉ. पाभे (हार्ट (फेल) तज्ञ)
०७/१२/२०१९

Friday, December 6, 2019

कव्वाली: तुला पाहिले की

कव्वाली: तुला पाहिले की

किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे
काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे
दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते
पण तुला पाहिले की काळजात धकधक होते

किती तू वार केले माझ्या हृदयावर
खोल जखमा वरून केल्या त्यावर
नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला
तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला
त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक
पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक
नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये
तुला पाहिले की काळजात धकधक होते

सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी
मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी?
तुझा चेहेरा समोर जेव्हा जेव्हा येतो
समोर तू नाही दिसत म्हणून विव्हल मी होतो
लाख येवोत इतर सुंदर ललना समोर माझ्या
तुझ्या सुंदरतेसमोर काय कथा त्यांची, त्या असती
सा-या फिक्या
नाक डोळे रंग रूप चेहेरा बोलणे चालणे वेगळे ग तुझे
तुझ्या वर मी मरतो लाख वेळा केवळ एकदा नव्हे ते

तू माझी प्रेरणा तू
नदी तू जीवन तू
माझे जगणे तू
माझे तगणे तू
माझे मरणे तू
मला तारणारी तू
तू माझे आकाश अन चांदणे तू
रात्रीच्या अंधारातील प्रकाश तू
डोंगरावरील घनदाट झाडी तू
गर्द उन्हातली माझी सावली तू
तू माझा आधार तू
माझ्या जीवनाची साथीदार तू

तुच माझ्या दिलाची धडधड धडधड
तुझ्याविना राहू कसा मी, होते तडफड
तुझा हात हाती यावा हिच मनाची तगमग
वाढते ती जेव्हा जेव्हा तू समोर माझ्या येते
तुला पाहिले की काळजात धकधक होते

- पाषाणभेद
५/१२/२०१९