"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतन हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला.
"मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत",
सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते.
सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते.
पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे. त्यांना बोलायलाही सवड नसे. शेतामध्ये ऊस, कांदे अशी पिके ते घेत. झालेच तर सोबतीला टमॅटो, भाजीपालाही करत. शेतीत गडीमाणसे असल्याने त्यांच्यावर फार लक्ष ठेवून कामे करवून घ्यावी लागत. आताची साखर कारखान्यात जाण्याची लगबग म्हणजे तेथे जनरल बॉडी मिटींग होती अन सर्जेराव तांत्रीक संचालक होते. नवीन क्रशर कशापद्धतीने बसवायचा म्हणजे ऊसाचे गाळप वेगाने चांगले होईल यावर त्यांना आज बोलायचे होते.
"आता साखर कारखान्यावर जातच आहात तर या महिन्याची साखरही घेवून या. ड्रायव्हरकडे कार्ड दिलेय मी. तो आणेल. पण त्याला तेवढा वेळ द्या म्हणजे तो गेटवर जाईल अन घेवून येईल", सौ. रंजना सर्जेराव कवडे गृहीणीच्या काळजीने बोलल्या. साखर कारखान्याचे सभासद असल्याने त्यांना दर महिन्याला त्यांच्या शेअर्सवर त्या वाट्याची साखर मिळत असे. आता कारखान्यावर चक्कर होतच आहे तर साखरही आणणे होईल या हिशोबाने त्या बोलल्या.
"आणि हो, संदीपच्या शाळेत या पंधरा तारखेला, पुढच्या आठवड्यात, शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन आहे. कमीतकमी तो दिवस तरी मोकळा ठेवा."
"पाहू. शनिवारचे तसे नियोजन करतो घरीच थांबण्याचे. पण ऐनवेळी काही काम निघाले तर सांगता येत नाही", सर्जेराव सावध बोलले. कामाच्या गडबडीतून बाहेर पडून संदीपचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल का या बाबतीत ते शाशंक होते.
"संदीप घरी आला की त्याला परवा आपल्या फॅक्टरीत मी घेवून जाईन याची आठवण दे", सर्जेराव पायात बूट चढवित म्हणाले अन ड्रायव्हरला गाडी साखर कारखान्याकडे घ्यायला सांगितली.
संदीप - सर्जेरावांचा धाकटा मुलगा इयत्ता आठवीत तालूक्याला जात असे. आपल्या मुलाच्या स्नेहसंमेलनातील नाटकातील भाग वडिलांनी पहावा अशी संदीपच्या आईची इच्छा असल्याने शनिवारी मोकळा वेळ ठेवण्याची तिने सर्जेरावांकडे आग्रह धरला होता. संदीप जात्याच हुषार अन लहाणपणापासून चपळ होता. निरनिराळे खेळ अन अभ्यासात तो दर इयत्तेत त्याची चुणूक दाखवत असे. त्यामुळे चांगले शिक्षण भेटावे म्हणून सर्जेरावांनी त्याला तालूक्याच्या चांगल्या शाळेत घातले होते. अर्थात तालूका अन शाळा फार काही लांब नव्हती. किंबहूना त्यांचे गाव हे तालूक्याच्या गावाचे उपनगरच गणले जात होते. घरापासून शाळा केवळ पाच सहा किलोमिटर अंतरावर होती. शाळेसाठीचे इतके दुरचे अंतर तर शहरातदेखील असते. शाळेत जा ये करण्यासाठी घरापर्यंत शाळेची बस यायची. त्यामुळे त्या बाबतीत संदीपच्या आईला काही काळजी नव्हती. सकाळी डबा घेवून संदीप सात सव्वासातला घरून निघत असे अन दुपारी साडेतीन पर्यंत घरी येत असे. संदीप वेळच्यावेळी अभ्यास करत असल्याने त्याच्याकडे सर्जेराव अन रंजनाबाईंना लक्ष द्यायची गरज नव्हती.
सर्जेराव कामात व्यस्त जरी असले तरी त्यांचे घराकडे लक्ष होते. संदीपपेक्षा मोठी मुलगी दहावीला होती. अन सर्वात मोठा मुलगा इंजिनीअरींग च्या दुसर्या वर्गात होता. मोठा मुलगा आपला स्वत:च्या फॅक्टरीकडे बघेल अशा हिशोबाने त्याला मॅकॅनिकल शाखा घ्यायला लावली होती. झालेच तर त्याने पुढे जावून साखर कारखान्यात मशीन पार्ट्स पुरवठा करण्याचे काम मिळवावे अशीही त्यांची इच्छा होती. आतापासून संदीपलाही ते अधून मधून कारखान्यावर घेवून जात असत.
स्नेहसंमेलनातल्या नाटकात भाग घेतल्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर संदीप त्याच्या नाटकातल्या भागाची तयारी करत असे. घराच्या बाजूला अंगणात एका मोबाईलमध्ये नाटकाचे संवाद मोठ्याने लावून तो त्याबरोबर बोलत हालचाली करत असे. बाजूला एक दोन गडी माणसे त्याचे श्रोते होत असत. मग संदीपची आई
कामाचा खोळंबा होत आहे असे पाहून त्या गडीमाणसांना बोलून कामाला लावत असे. या शनिवारचा संदीपचा कार्यक्रम बघण्यासाठी त्याच्या घरातले सदस्य आतूर झाले होते. तो कार्यक्रम पहायला संदीपचा आतेभाऊ सतिश गुरूवारीच आला होता. सतिशदेखील संदीपच्याच वयाचा सातवीतला विद्यार्थी होता. आपल्या मामेभावाच्या तालमीला संध्याकाळी तो हजर होता. संदीपच्या पाठांतराची त्याने जातीने तयारी करून घेतली. पाठांतर अर्थातच छान झाले होते. रात्री जेवण करतांना संदीपच्या वडिलांना उद्या संदीपला सुटी असल्याचे समजले. जेवण संपत आले तेव्हा त्यांनी संदीपला उद्या शुक्रवारी बँकेत एक चेक जमा करायला सांगितला. संदीपला बँकेच्या व्यवहाराची माहिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. संदीपनेही आनंदाने होकार भरला अन जेवणानंतर टिव्ही बघून तो अन सतिश झोपले.
कामाचा खोळंबा होत आहे असे पाहून त्या गडीमाणसांना बोलून कामाला लावत असे. या शनिवारचा संदीपचा कार्यक्रम बघण्यासाठी त्याच्या घरातले सदस्य आतूर झाले होते. तो कार्यक्रम पहायला संदीपचा आतेभाऊ सतिश गुरूवारीच आला होता. सतिशदेखील संदीपच्याच वयाचा सातवीतला विद्यार्थी होता. आपल्या मामेभावाच्या तालमीला संध्याकाळी तो हजर होता. संदीपच्या पाठांतराची त्याने जातीने तयारी करून घेतली. पाठांतर अर्थातच छान झाले होते. रात्री जेवण करतांना संदीपच्या वडिलांना उद्या संदीपला सुटी असल्याचे समजले. जेवण संपत आले तेव्हा त्यांनी संदीपला उद्या शुक्रवारी बँकेत एक चेक जमा करायला सांगितला. संदीपला बँकेच्या व्यवहाराची माहिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. संदीपनेही आनंदाने होकार भरला अन जेवणानंतर टिव्ही बघून तो अन सतिश झोपले.
दुसर्या दिवशी, शुक्रवारी स्नेहसंमेलनाच्या आदला दिवसाची सुटी असल्याने संदीप जरा उशिरा उठला. आईने केलेला उपमा अन दूध पिवून तो अन सतिश बँकेत जायला तयार झाले. खांद्यावरील बॅगेत त्याने चेकचे पाकीट अन पिण्याच्या पाण्याची बाटली घेतली. मग संदीप आणि सतिश यांची जोडगोळी सायकलीवर बँकेत जायला निघाली. जिल्हा सहकारी बँकेची शाखा तशी जवळच बाजारपेठेतील गल्लीत होती. बैठ्या इमारतीत बँकेचे कामकाज चाले. लहान गाव असल्याने बँकेच्या शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत सारे जण संदीपला सर्जेरावांचा मुलगा म्हणून ओळखतच होते. या आधीही संदीप किरकोळ कामे करायला बँकेत आलेला होता. बाजूला अंगणात वाहने थांबवायची जागा केलेली होती तेथे त्यांनी सायकल उभी केली. मुख्य मार्ग लोखंडी दरवाजा आणि त्याला साखळी अशा रचनेचा होता. तेथे बँकेत सुरक्षारक्षक असलेले रामभाऊ चौरे हे आपली बंदूक घेवून उभे होते. त्यांनी संदीपला आज तुझे बाबा नाही आले का तुझ्या बरोबर? असे विचारून त्याच्या सोबत असलेल्या सतिशची चौकशी केली. त्यांना उत्तर देवून हे दोघे भाऊ आत शिरले. सकाळचे सव्वादहा वाजायची वेळ असल्याने अजून बँकेत फारशी वर्दळ नव्हती. सगळा स्टाफ आलेला होता. मॅनेजरसाहेब त्यांच्या कॅबीनमध्ये कुणाशीतरी बोलत होते. कॅश काऊंटरवर चार पाच जण उभे होते. कॅशीअर कॅश मोजण्याच्या कामात मग्न होता. बाजूला तिन क्लार्क त्यांच्या कामात होते. त्यापैकी दोघांसमोर एक एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली होती.
संदीपने आपल्या बॅगेतून पेन आणि चेक काढला आणि कॅश काऊंटरच्या बाजूला भरणा करण्याच्या स्लिप असलेल्या टेबलकडे गेला. सतिशही त्याच्या बाजूला असलेल्या बाकावर बसण्याच्या तयारीत होता. संदीपने बॅग सतिशकडे दिली आणि तो चेक जमा करण्याचे चलन लिहू लागाला. तेव्हढ्यात मुख्य दारातून एक दाढी राखलेला व्यक्ती आत शिरला आणि आत येताच त्याने हातातील पिस्तूल दाखवत ओरडला,
"खबरदार, कुणीच हलू नका. जागेवर उभे रहा. कुणी मोबाईलदेखील काढू नका. नाहक मला गोळ्या झाडाव्या लागतील."
या अशा ओरडण्याने बँकेत उपस्थित असणार्या सर्व लोकांच्या मनात भिती दाटली. बँकेत दरोडा पडलेला होता. नक्की काय करावे हे कुणालाच सुचेनासे झाले.
त्यानंतर आलेल्या आणखी दोन जणांनी सुरक्षारक्षक असलेल्या रामभाऊंच्या हातातली बंदूक हिसकावली आणि एकजण त्यांच्या जवळच थांबला. उरलेला दुसरा व्यक्ती मॅनेजरसाहेबांच्या कॅबीनकडे पळाला. कॅश काऊंटरवर त्यांचा एक साथीदार आधीच रांगेत पैसे भरण्याच्या बहाणा करत उभा होता. तो कॅशिअरवर ओरडला, "गडबड करू नको. आहे ती कॅश ड्रावरमधून काढून वर टेबलावर काढून ठेव." त्याने हाततल्या पिशवीत पैसे भरण्याची तयारी केली.
कॅश काऊंटरजवळ हि गडबड उडाली असतांनाच सतिश आणि संदीपने पाहिले की मधल्या मोकळ्या जागेत एक जण हातात पिस्तूल घेवून उभा आहे आणि दुसरा मॅनेजरच्या कॅबीनकडे पळत जात आहे. त्या दरोडेखोराने पळत जावून मॅनेजर साहेबांसमोरील व्यक्तीला खुर्चीतच बसायला सांगितले आणि मॅनेजरसाहेबांना त्यांच्या खुर्चीला दोरखंडाने बांधले. इकडे तो दाढी असलेला इसम हातातील पिस्तूल रोखत कॅशीअरकडे जाण्यासाठी वळाला. तेव्हढ्यात संदीपने त्या दरोडेखोराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून चपळाईने सतिशला बाकावरून उठवले आणि तो बाक मोठ्या ताकदीनिशी त्या पिस्तूलधारीच्या पायाकडे ढकलला. ते ढकलत असतांनाच तो मोठ्याने ओरडला, "सतिश पळ, रामभाऊकाकांना सोडव."
संदीपच्या ओरडण्याने सतिशलाही क्षणभर काय करावे ते समजले नाही. पण तो तात्काळ सावरला आणि दरवाजाकडे पळाला. संदीपच्या आवाजाने आणि सतिशच्या पळण्याने दाढी असलेला दरोडेखोर भांबावला. तेवढ्यात त्याच्या पायांवर संदीपने ढकललेला बाक आदळला. त्या वेदनेने तो कळवळला आणि तोल जावून खाली पडला. तेव्हड्या वेळात सतिश रामभाऊंकडे पोहोचला होता. रामभाऊंची बंदूक घेतलेला दरोडेखोर थोडा आरामातच होता. सतिशने त्याला धक्का दिला. रामभाऊही संधी बघतच होते. त्यांनी तात्काळ शेजारच्या दरोडेखोराकडून आपली बंदूक हिसकावली आणि बंदूकीच्या दस्त्याने त्या दरोडेखोराला मारले. त्याचा ताबा आता रामभाऊंनी घेतला होता.
मुख्य पिस्तूलधारी दरोडेखोर बाकामुळे पडलेला पाहून आणि रामभाऊंनी एका दरोडेखोराला ताब्यात घेतलेले पाहून बँकेच्या दोन कर्मचार्यांनी काऊंटरवरून उडी मारून त्याच्या हातातले पिस्तूल ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. बँकेत आलेल्या एका ग्राहकाने त्या दरोडेखोराच्या हातावर जोरदार पाय मारला. त्या दणक्याने ते पिस्तूल त्या दरोडेखोराच्या हातातून गळून बाजूला फेकले गेले. एका कर्मचार्याने ते पिस्तूल ताब्यात घेतले.
इतक्या वेळात मॅनेजरसाहेबांनी संधी साधून पायाच्या गुढग्याने त्यांच्या टेबलाखाली बसवलेल्या संकटकाळी सायरन वाजवायचे बटन दाबले. तात्काळ सायरनचा भोंगा वाजू लागला. हे सर्व इतक्या कमी क्षणात घडले की कॅश काऊंटरवरचा आणि मॅनेजर साहेबांच्या कॅबीनमधले दोघेही दरोडेखोर भांबावून गेले. भोंगा वाजायला सुरूवात होताच बँक ज्या रस्त्यावर होती तेथील आजूबाजूच्या दुकानातील लोक काय घडले हे पाहण्यासाठी बँकेच्या दिशेने धावले. त्यात जे पुढे होते त्यांना घडलेला प्रकार तात्काळ लक्षात आला. त्या लोकांनी प्रथम रामभाऊंच्या ताब्यातील दरोडेखोराला पकडले. सर्वत्र आरडाओरड चालू झाली. त्या गर्दीतील कुणीतरी व्यक्तीने पोलीसांना फोन केला.
आता ते चारही दरोडेखोर गावातल्या आणि बँक कर्मचार्यांच्या ताब्यात होते. मॅनेजरसाहेबही आता दोरखंडातून सुटलेले होते. बाहेर वाहनाचा सायरन वाजवत पोलीस आले. त्यांनी ताबडतोप परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले आणि चारही दरोडेखोरांना ताब्यात घेतले.
पोलीस इन्स्पेक्टरांना बँकेच्या मॅनेजरांनी घडलेली सारी गोष्ट सांगितली. दरोडेखोर कसे आले, त्यांनी लोकांना कसे धमकावले आणि संदीप व सतिश यांनी ज्या चतूराईने धावपळ करत बाजू उलटवली ते ऐकून इन्स्पेक्टर अगदी आश्चर्यचकीत झाले. इतक्या कमी वयाच्या संदीपने बाक फेकून आपल्या धाकट्या आतेभावाला ज्या सुचना दिल्या ते ऐकून त्यांनी संदीपच्या चतूराईचे कौतूक केले. सतिशनेही त्याची कामगिरी चोख बजावलेली होती. त्याच्या धावपळ करण्याने इतर दरोडेखोरांचे लक्ष पांगले होते. इन्स्पेक्टर साहेबांनी त्या दोघा मुलांचे तोंडभरून कौतूक केले. त्यांनी तात्काळ संदीपच्या वडीलांना फोन करून हि बातमी सांगितली. सरकारदरबारी उच्चपदी या दोन मुलांच्या धाडसाची बातमी मी स्वतः सांगून शुर बालकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस आणि त्यासाठी पाठपुरावा करेन याचे आश्वासन दिले.
दुसर्या दिवशी संदीपच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात संदीप आणि सतिशचा भव्य सत्कार करण्यात आला. कधी वेळ न मिळणारे सर्जेराव या सत्कारसमारंभाला आणि संंदीपच्या नाटकाला आवर्जून उपस्थित होते हे सांगणे न लगे.