Monday, September 30, 2019

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.

एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली. इंद्राने त्याला 'पृथ्वीवर तू चांगले काम करशील अन मगच पुन्हा स्वर्गात येशील', असा उषा:प दिला.

त्यानंतर पृथ्वीवर धुके पसरले. त्या धुक्यातून तो ढग पृथ्वीवरील एका राजाच्या राज्यात मानव रुपाने उतरला. तो आता एक सामान्य मानव झाला होता. राज्यातील एका गावात तो लोहाराचे काम करू लागला. निरनिराळे औजारे बनवणे, घराच्या उपयोगी वस्तू बनवणे असली कामे तो करू लागला. परंतु त्या राज्याची जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली होती. गेली सलग काही वर्षे तेथे पाऊसच पडला नव्हता. पाऊस नसल्याने त्या राज्यात दुष्काळ पडला होता. जनता वाटेल ती कामे करून पोटासाठी अन्न मिळवत होती. रोगराई अन भूक यामुळे जनता चोर्‍या करणे, लुबाडणे या गोष्टी करू लागली होती. राज्यात अदांधुंदी माजली होती. राज्याचे होणारे हाल पाहून राजाला खंत वाटत होती. प्रजेची काळजी घेणारा राजा असल्याने प्रजेची स्थिती पाहून तो दु:खी झाला. जो कुणी राज्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढेल त्याला योग्य ते इनाम देण्याची घोषणा राजाने केली. या लोहाराने ही घोषणा ऐकली आणि राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे असे त्याला वाटू लागले.

दुसर्‍या दिवशी तो तरूण लोहार राजाकडे गेला. राज्याच्या दुष्काळाबद्दल मदत करण्याबाबत त्याने राजाकडे इच्छा प्रगट केली. राजाने त्या तरूणाकडे पाहीले अन राजाला त्याबद्दल आशा वाटू लागली. त्याच्या बाबत राजाचे चांगले मत बनले. राजाने त्याला लागेल ते संसाधने देण्याची तयारी दर्शवली पण दुष्काळ हटला पाहीजे अशी मागणी केली. त्या तरूणाने राज्यातील तरूण आणि शेतकर्‍यांची मदत घेवून झाडे लावण्याची तयारी केली. झाडांसाठी खड्डे खणले. बी बियाणे तयार केले. डोंगरउतारांवर चर खणले. आहे त्या नद्या स्वच्छ केल्या. त्या नद्यांची खोली वाढवली. धरणांतला गाळ काढून तो गाळ शेतांमध्ये टाकला.

या कामानंतरच्या हंगामात पावसाळ्यात त्या राज्यात थोडा पाऊस पडला. त्या तरूणाच्या प्रयत्नाने दुष्काळावर मात करण्याच्या झालेल्या कामांमुळे पाऊस जरी थोडा पडला होता तरी त्या पावसाचे पाणी स्वच्छ अन खोल केलेल्या नद्यांमधून वाहीले. ते पाणी निरनिराळ्या धरणांमध्ये साठून राहीले. राज्यात शेतांमध्ये असलेल्या विहीरींना पाणी लागले. त्या हंगामात शेतात चांगली पिके आली. राज्यातील दुष्काळ हटला. लोकांना खायला अन्न अन जनावरांना चारा भेटू लागला. लोक आनंदाने आणि समृद्धीने राहू लागले. गुन्हेगारी नष्ट झाली. रोगराई पळून गेली. आधीच ठरल्याप्रमाणे राजाने त्या तरूणाला शेतीसाठी जमीन बक्षीस रुपाने एका गावात दिली.

इकडे इंद्र आकाशातून त्या राज्याकडे पाहत होता. तरूणाच्या रुपात शाप असलेल्या ढगाने दुष्काळ हटवण्याचे केलेले प्रयत्न पाहून तो आनंदी झाला. त्याने त्या तरूण असलेल्या सरदार ढगाला शापमुक्त केले आणि पुन्हा वर स्वर्गात बोलवून घेतले. तेव्हापासून तो ढग पावसाचे पाणी घेवून पुन्हा पाऊस पाडू लागला.

३०/०९/२०१९

Saturday, September 28, 2019

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

तो: हॅलो.

ती: हं बोला.

तो: काय गं, झोप झाली का?

ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.

तो: हं.

ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.

तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?

ती: तुमचा तोच व्हाटसअ‍ॅप चा मेसेज वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना तेच बोलत आहात ना?

तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटसअ‍ॅपचा मेसेज नाही.

ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा.

तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप?

ती: एसएमएस नाही वाचला. वाचते.

तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना?

ती: हं

तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर?

ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी.

तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय.

ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो.

तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील?

ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल.

तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता.

ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला.

तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू.

ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून.

- पाभे

तुझ्या भेटीला आलो दत्ता

तुझ्या भेटीला आलो दत्ता
सत्वरी या आता ||
तुझ्या मंदीराची केली वाट सोपी
नसे काही चिंता, मनी आस मोठी
वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा ||
भक्तांची दु:खे करुनीया दूर
दिले जीवनात सुख भरपूर
सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता ||
पाहूनिया रुप होईल मनाची शांती
नसे आस कसली, तिच विश्रांती
सखा तूच गुरू तूच तूच होई दाता ||
ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती
तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी
रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां ||
- पाषाणभेद
२८/०९/२०१९

पाहूणा पाऊस

मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी
ब-याच दिवसात भेटला नाही
तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा
पण तूच माझ्याशी बोलत नाही


मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले
अगदी जवळ गेल्यासारखे भासविले
पण त्याचे मनात काही वेगळेच असेल
जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले

Tuesday, September 24, 2019

पाभेचा चहा

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले. मला आठवते ब्रूक ब्राँडचा चहा एका लाल रंगाच्या तिन चाकी हातगाडीवर आठवडे बाजारात विकायला यायचा. तो घ्यायला गर्दी व्हायची.
बरे चहाचे प्रकार तरी किती? साधा चहा, स्पेशल चहा, सुंठ घातलेला चहा, मसाला चहा पत्ती चहा, भरपुर दूधाचा चहा, काढा, तुळशी अन गवत टाकलेला गवती चहा, आयुर्वेदीक चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हर्बल टी, पिवळा चहा, बॉबी, कट, टक्कर, मारामारी, अगदी मनमाडी चहा देखील आहे.
तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्‍हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्‍हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्‍हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.
अनेक देशोदेशी चहा तयार करण्याचे अन तो पिण्याचे तंत्र निरनिराळे असते. चिनी चहा, कोरीयातला चहा, जपानमधला चहा, अमेरीकेतला चहा.
चहाची बहीण कॉफी अगदी निराळी. तिने तर मोठमोठ्या कॉफीशॉपच्या कंपन्या काढल्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्या. पण कॉफी हा लेखाचा विषय नाहीये.
चहा हा ताजा केलेला असेल तरच चांगला. उकळून कडक झालेला चहा हा अ‍ॅसीडीटीला आमंत्रण ठरतो. काही जण चहा अजिबात पित नाही. अर्थात असे लोकं विरळेच. मग ते दूध तरी घेतात. हातावरचे पोट असणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी चहा पितात. काही जण चहाबरोबर पाव, टोस्ट, बटर, खारी, नानकटाई, स्लाईस आदी खावून भूक भागवतात. चहासाठी लोकं फिरायला जातात. लोक निमित्त काढून चहा पितात. काही जण दिवसाला दहा बारा कप चहा पितात. चहा प्यायला बोलावणे हा आदरसत्काराचा भाग मानल्या जावू लागला. एखाद्याला भेटायला घरी गेलो अन चहा दिला नाही तरी लोक नाराज होतात. चहाचे पाणीदेखील पाजले नाही असा उल्लेख करतात.
जुनी गोष्ट आहे. खरी आहे. माझ्या पाहण्यात एक चहा विक्रेता आहे. नव्वदच्या दशकातली. तो सायकलवर चहा खेड्यापाड्यात विकत असे. आमच्या गावाजवळ रेल्वे जाते अन तेथल्या नदीवर रेल्वेपुलआहे. एकदा रेल्वे पुलावरून तो सायकल ढकलत चालला होता. तिकडून रेल्वे आली अन हवेच्या झोतामुळे तो उंच पुलावरून खाली कोसळला. नदीत पाणी वगैरे होते की नाही ते माहीत नाही. पण तो जबर जखमी झाला. नंतर हॉस्पीटलात राहीला. त्यानंतर त्याला कोणतेही अन्न पचेनासे झाले. काहीही खाल्ले तर ते बाहेर पडत असे. नंतर त्याच्या घरच्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा त्याचेवर प्रयोग केला. काहीच पचेनासे झाले. नंतर शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आले की त्याला चहा पचतो! मग सुरूवातीला चहाचे पाणी अन नंतर काही दिवसांनी थोड्या जास्त दूधाचा चहा हाच त्याचा आहार झाला. बरे एवढाच आहार असूनही ती व्यक्ती शारीरिक कष्ट करत असे. किराणा दुकान चालवत असे. सायकल चालवत असे. तर चहा विकतांना अपघात झाला अन शेवटी चहाच त्याचा आहार बनला. जवळपास दहा एक वर्षे ती व्यक्ती चहावरच होती. तुम्हाला खोटे वाटेल हे. नंतर आम्ही गाव बदलले. त्या व्यक्तीनेही गाव अन व्यवसाय बदलला. मध्ये काही काळ गेला अन ती व्यक्ती शहरातल्या एमआयडीसीत एका कंपनीत सायकलवर जेवणाचे डबे पुरवतांना दिसली. शारीरिक ठेवण तशीच शिडशीडीत राहीली होती. असो.
खेडेगावात दूधाची कमतरता असते. जे दूध निघते ते सकाळीच शहरात विकायला पाठवले जाते. मग एखाद्या लहानग्याला हातात पेलाभर किंवा पाच दहा रूपयाचे दूध घ्यायला ज्याचे घरी दूभते असते त्याकडे पाठवतात. तर एकदा एका ठिकाणी मी पाहूणा गेलो होतो. खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. अशासाठी की आलेल्या पाहूण्याला बिन दूधाचा, बिन साखरेचा चहा पाजला. त्याच्याच जवळपासचा अनुभव असा की एका माऊलीने चहा बनवला. तेथेही दूध नव्हते. साखरेचे नाही आठवत पण त्या माऊलीने पावडरचे दूध बनवले अन मग मला चहा पाजला.
चांदवडला आम्ही लहान असतांना देवीच्या दर्शनाला गावातून पायी गेलो. येतांना ढग भरून आले. अन जोरात पाऊस चालू झाला. आम्ही पूर्ण भिजलो. गाव तर लांब होते. आडोशाला काहीच नाही. रस्त्यात एका झोपडीत आम्ही गेलो. तेथे विस्तवाचा उबारा भेटला. तेथे त्या मालकाने चहा करून दिला. पण तेव्हढ्यात जोराचा वारा आला अन त्या वार्‍याने झोपडीचे एका बाजूचे कूड उघडे पाडले. आम्हाला वीजच कोसळली की काय असे वाटले पण तसे काही झाले नव्हते. असा प्रसंग लक्षात ठेवणारा चहा अन असे चहाचे अनुभव.
आताशा अनेक चहाचे ब्रांड तयार झालेले आहेत. अमूक चहा, अमृततुल्य इत्यादींची फ्रांचायजीचा धंदा झाला आहे. (म्हणूनच या लेखाला मी "पाभेचा चहा" असे नाव दिले आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तर आपण आता आपला लेखक पुढे काय म्हणतो आहे ते पाहूया.)
तर अशा ब्रांडांच्या किंवा फ्रांचायजींच्या चहाच्या दुकानात पु.ल. म्हणतात तसे आपले खायचे पान घेवून पानाच्या दुकानासारखे पान तयार करण्यासारखे वाटते. तेथे आपूलकी नसते. विक्रेता केवळ किती कप धंदा झाला याचा विचार करतो. एका कपात दोन जण चहा पिवू शकत नाही. उभे राहून चहा पिणे अन तेथून निघून जाणे एवढेच साध्य होते. चहा बरोबर गप्पा होत नाहीत. किंबहूना गप्पांसाठी चहाच्या दुकानात गेले तर त्याची लज्जत काही औरच असते. या नव्या कार्पोरेट चहाच्या दुकांनात हे साध्य होत नाही. उकळीचा चहा तेथे भेटत नाही. आधीच उकळलेला अन थर्मासमधला रेसेपीदार, त्यांचा प्रोप्रायटरी फॉर्मुला असणारा चहा तेथे भेटतो. त्यामुळे तसला फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो हा माझा अनुभव आहे. उकळीच्या चहातली मजा नाही त्यात. तो चहा फक्त पोटात जातो. त्याने पोट भरत नाही. ते चहाचे दुकान म्हणजे त्या दुकान मालकाची अधिकची आर्थिक गुंतवणूक असते. अन टपरीवरचा चहा म्हणजे त्या दुकानदाराचा संसार असतो.
असो. चहात पाणी टाकतात किंवा पाण्याचा फुळकट चहा असतो तसे लेखात अनेक संदर्भ येवून हा चहावरचा लेख मोठा होवू शकतो. चहा पोहे अन त्या बरोबरचे किस्से, चहा बरोबर खायचे पदार्थ घेवून केलेला लेख, चहा कशात घेतात त्या वस्तू, त्यांची ठेवण. असे केले तर हा लेख म्हणजे चहाचा मळाच होईल. म्हणून असो.
चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो. आणि असेच धागे काढत काढत अन ते विणून विणून त्याचे असले लेखवस्त्र होते.
अन हो, तुम्ही प्रतिक्रीया देवूनही हा चहालेख वाढवू शकतात ना!
( हा चहाचा लेख मागच्या आठवड्यात लेखनाच्या आधनावर ठेवला होता. मग एक एक अनुभवाच्या, प्रसंगांची सामग्री यात टाकत गेलो. अन आज हा चहा लेख उकळी पावला अन तो तुम्हाला गाळून (मुद्रीतशोधन करून) देतो आहे. त्याचे प्राशन करा अन कसा झाला आहे तेही सांगा.)
- पाषाणभेद
२४/०९/२०१९

Thursday, September 5, 2019

दोरीवरचे कपडे

दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?

शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)

पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत

नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे

साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत

किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल

दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर
वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर

गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय
त्यात बाई घातली अन गाऊन खाली सरकला तर काय?

कपडे वाळत असतांना आपण बाहेरून बघतो
पण वा-याची मात्र मजा असते, तो आतून पाहतो

- पाषाणभेद
०४/०९/२०१९

Monday, September 2, 2019

पाय सरावले रस्त्याला

पाय सरावले रस्त्याला
मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||
खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||
अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||
"कसा आहेस तू
ठिक आहेस ना?"
"मदत लागली काही तर
मी तयार आहे ना!"
ना कुणी अशी उभारी दिली
काय करायचे त्या ओळखीला?
पाय सरावले रस्त्याला ||३||
मीच माझी केली मदत मग
हात केला मलाच पुढे
घेतला हातात हात
डाव्या हातात उजवा पडे
माझाच मी वाटाड्या झालो
इतर न कुणी आले सोबतीला
पाय सरावले रस्त्याला ||४||
- पाषाणभेद
०१/०९/२०१९