Sunday, July 28, 2019

इंद्रधनू

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरखली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले 
अहा!
चला बाबा बघा 
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा 
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पर्जन्याचा अधिपती नरेश
भेट जलाचे देई धरेस
त्याच समयी ये सामोरी भास्कर
किरणांस भिडता थेंब नीर
गोफ इंद्राचा घेई आकार

मज न ठावूक; 
राहील न राहील ते काळ किती
ये वायू मग जाय क्षिती
साठवूनी घ्या लोचनी
त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी

- पाषाणभेद
२८/०७/२०१९

Tuesday, July 16, 2019

वरुणच्या जाण्याच्या निमित्ताने - आभासी जगातील प्रत्यक्ष कट्याचे, भेटीचे महत्व

वरुणच्या जाण्याने सगळ्यांनाच दु:ख झाले आहेत. त्यांचे वय काहीच नव्हते. माणूस धडाकेबाज होता. बहूआयामी होता. असे कशामुळे झाले ते नक्की समजले नसले तरी आजारपण अन त्यातून सावरले न जाणे हे मुख्य कारण आहे.

येथे जवळपास बहूतेक जण आभासी नावे घेतलेले आहेत. येथेच नाही तर चेपू, काय्यप्पा, चिवचिवाट आदी ठिकाणी असलीच किंवा इतर नावे धरून आपण वावरतो. एकमेकांशी संवाद, विसंवाद, चर्चा करतो. भांडतो, एकेरीवर येतो, शिव्याही देतो. तरी पण त्यामागे एक माणूस आहे. तोच माणूस माणूसपण जगतांना हे लिहीतो, चर्चा करतो, संवाद साधतो, प्रतिसाद देतो. सार्‍यांशी बोलतो कारण आपण आपल्या मराठीत व्यक्त होवू शकतो म्हणून. कदाचित मिपा मध्यम इंग्रजीत असते तर आपण तेथे व्यक्त नसतो झालो. माझ्या बोलण्याचा, धागा लेखनाचा हा हेतू नाही पुढे तो येईलच.

वरुणच नव्हे तर त्या आधी तात्या, बोका-ए-आझम त्याही आधी कुलकर्णी (नाशिक - यांचे नाव विसरलो. पण अंत्यसंस्काराला गेलो होतो) अन त्याही आधी यशवंत कुलकर्णी यांचे अचानक जाणे झाले.
या सार्‍यांशी आपला परिचय होता. भले आपण प्रत्यक्ष भेटलेलो नसू अन नावानिशी ओळखत नसू परंतु एक प्रकारचा जिव्हाळा होता. प्रत्येकाच्या जाण्यामागे काही ना काही कारण असेल. आपल्याला त्यात पडायचेही नाही. त्यामागची कारणमिमांसाही करायची नाही.

शेवटी वैद्यकियदृष्ट्या मृत्यू हा शारिरीकच होतो. परंतु त्या आधी शारिरीक कारणे सोडली तर मानसीक कारणांनीसुद्धा माणूस आधी मरणपंथाला लागतो. अगदी शेवटची पायरी जरी नसेल तरी काही शारिरीक व्याधी, नोकरी-व्यवसायातील प्रश्न, कौटूंबिक प्रश्न यातून अशा जिव्हाळ्याच्या व्यक्तींना मार्गदर्शन होवू शकते. शेवटच्या मार्गाने जाण्यातून आपण पाहीले अन त्यांना आपण रोखू शकलो तर?
वरुणच्या जाण्यानंतर जी काही चर्चा झाली अन त्याच्या आधी जे परिचित गेले त्यांच्याविषयी जे काही समजले त्यात त्यांच्या त्या मरणपंथाला लागण्याचे कारण कदाचित सापडू शकते असे वाटते. आपण त्यांना परावृत्त करू शकतो अशी दिशा दिसते.

लक्षात घ्या, मी वर बोललो आहे की आपण येथे (किंवा इतरही आभासी माध्यमांत) आपण व्यक्त होतो. आपल्या मराठीत लिहीतो. ज्या गोष्टी आपण घरातही सांगत नाहीत त्या गोष्टी आपण या आभासी जगतात व्यक्त करतो.
काही जण म्हणतील की अशा परिचितांना जाण्यापासून आपण काय करू शकतो? आभासी जगतातले बोलणे अन त्यांची सांगड प्रत्यक्ष जीवनात परिचित समोर आला तर घालावी का? निश्चितच नाही किंवा कदाचित हो. थोडक्यात परिस्थिती सांगत असेल तर योग्य.

म्हणजे असे की य.कू. गेला त्याच्या आधी तो असंबद्ध बोलत होता. कुणा बाबाची त्याने दिक्षा घेतली होती. वय नसतांनादेखील तो जास अध्यात्माचे बोलत होता. आपल्यापैकी कुणीतरी त्यास तो जाण्याआधी भेटणारही होते. भेटणार्‍या व्यक्तीला तशी कुणकुणल लागली होती, परंतु ती भेटीची ती वेळ त्यांना साधता आली नाही. नाशिकचे कुलकर्णी गेले तो तर खरोखर अपघात होता. त्याला कुणीच टाळू शकले नसते. बोकाशेठ गेले त्यानंतर त्यांच्या आजारपणाबद्दल समजले. तात्या गेला तेव्हा त्याचा येथेच काय पण इतरांशीही त्याचा संपर्क नव्हता. आता वरुण गेला तेव्हा तो आजारपणातून नुकताच सावरत होता. अगदी लोकसभा निवडणूका संपल्यानंतर कर्जतला कट्टा करण्याइतपत तो उत्साही होता. अगदी दोन दिवस आधीपर्यंत तो फोनवरून कुणाच्या ना कुणाच्या संपर्कात होता. त्याच कट्याच्या बोलण्यात काहीतरी सापडले असते असे मला वाटते. तो कट्टा आधी झाला असता तर?
तर मुद्दा असा की असल्या अभासी जगतात मरणपंथाला लागण्याच्या आधी ती व्यक्ती कदाचित त्या दृष्टीने लिहू शकते. ते वाचणार्‍या सर्वांना जरी समजले नसले तरी एखाद दुसर्‍या जाणकाराला बरोबर समजू लिहू, किंवा तशी शंका तरी येवू शकते. प्रत्यक्ष भेट, कट्टा झाला तर ती व्यक्ती समोर असू शकते. त्यावेळी आपण त्याची प्रत्यक्ष खात्री करून घेवू शकतो. तो बोलतो कसा? वागतो कसा? त्याचे जेवणखाण कसे आहे? आहार विहार कसा आहे? आधीपेक्षा त्याच्यात शारिरिक- मानसिक किती बदल झाला? त्याच्या लिखाणातून काही धागा लागतो का? असा मी जरी विचार करणार नसेल परंतु इतर दुसर्‍याने आधीच केला असेल अन त्याबाबत त्या व्यक्तीला तेथे किंवा लिखाणाच्या माध्यमातून त्यास त्या धोक्याबाबत आधीच सुचीत करता येईल. कट्यात सहभागी झाला तर ती व्यक्ती कदाचित त्याच्या कोषातून बाहेरही पडेल. नवा मार्ग सापडेल. जे त्याच्या सख्या मित्रांना समजणार नाही, घरच्यांना समजणार नाही ते आभासी मित्रांना समजेल अन तेच आभासी मित्र कट्यात प्रत्यक्ष भेटले तर? अभासी जगतातले असंबद्ध वागणे त्याच्या जवळच्यांपर्यंत पोहोचले तर? खाजगी आयुष्यात आपण तेवढी ढवळाढवळ करणार नाही असा व्यावसायीक दृष्टीकोन काही पाळतील पण एखाद्याने जरी नाही पाळला तरी त्यायोगे तशी व्यक्ती गैरमार्गाला लागणे किंवा अगदी थेट मरणाच्या दारातून एखादा बाहेर पडण्यास मदत तरी होईल.
जग खुप वेगाने पुढे जात आहे. कामासाठी कुणाला वेळ अपुर्ण पडतो. त्यात शहरीकरणामुळे अन नोकर्‍यांमुळे घनिष्ठ मित्र दुरावत चालले आहे. म्हणूनच मिपा काय चेपू, काय्यपा अशा माध्यमांतून आपण व्यक्त होतो. त्यातही कट्टा केला तर अपरिचित व्यक्तीचा परिचय चांगल्या कामात रुपांतरीत होवू शकतो.

कालपासून विचार करून माझे मन थार्‍यावर नसल्याने हे लिखाण कदाचित विस्कळीत असेल. मार्गदर्शन - कौन्सिलिंग करण्याचा मी व्यावसायीक नसल्याने माझा मुद्दा निट मांडला गेला नसेल परंतु त्यात काही तथ्य असू शकते. योग्य विचार नसतील तर धागा उडवला तरी काही हरकत नाही.

वरुणला आदरांजली.

निर्झर

निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||


- पाषाणभेद
१५/०७/२०१९

पावसाविषयी असूया

पावसाविषयी असूया

पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले

गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग

पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली

ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला

गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले

- पाषाणभेद
०७/०७/२०१९

असा पाऊस

असा पाऊस


नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस

धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस

झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस

कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस

हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस

अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस

ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस

गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस

- पाभे
३०/०६/२०१९