पावसाळी ढग आकाशात होते. समोर जॉगींग ट्रॅक आणि मधले खेळाचे मैदान होते. आज कुणीच खेळत नसल्याने मोकळे होते ते. त्या शांत वातावरणात मी भरभरून मोकळा श्वास घेतला. शहरातल्या त्या जॉगींग ट्रॅकवर पावसाळ्यामुळे गर्दी बरीच कमी होती. एका कोप-यात बसलो. लहान मुलं खेळत होती. काही व्यक्ती चालत होत्या. काहीपावसाळ्यामुळे, ग्रीन जीम करत होत्या. मी पावसाळ्यात तयार झालेल्या हिरव्यागार गवताच्या काठावर बसलो होतो.
समोर असणारे रानटी गवत पाहून मला माझ्या लहाणपणाचे दिवस आठवले. सहावी सातवीत असेन तेव्हा. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत तालूक्याचे न्यायालय होते. तेथे मोठे मोकळे आवार होते. त्यात मुख्य न्यायालाची बैठी कौलारू इमारत होती. जुन्या काळातली, दगडी लाकडी बांधकाम होते ते. तसे त्या आवारातल्या सार्या कचेर्या ह्या दगडीच होत्या. बहूदा पन्नासातल्या दशकातल्या असाव्यात. बाजूलाच वकीलांची बार रुम. दुरवर कस्टडी मिळालेल्या किंवा कोर्टाची तारीख असणार्या आरोपींना ठेवायची रुम होती. बाकीच्या इमारती कौलारू होत्या पण आरोपी ठेवण्याची कोठडी पत्र्याच्या छताची होती. त्या खोलीच्या बाजूलाच त्या आवाराची राखण करायच्या रखवालदाराची राहण्याची खोली होती. त्याने मोठ्या हौशीने फुलझाडे, आणि अळूची रोपे अंगणात लावली होती. त्या अंगणातच एक पाण्याचा नळ होता.
संपुर्ण कोर्टाच्या आवाराला दगडी भिंतीचे उंच कंपाऊंड होते. आम्ही गल्लीतील मुले त्या भिंतीवर चढून पुर्ण चक्कर मारत असू. त्यावरून आपण पडू वैगेरे भिती कधी जाणवली नाही त्या वेळी. सुटीत किंवा न्यायालयाचे कामकाज बंद असतांना आम्ही तेथे खेळायला जात असल्याने मोठे प्रवेशद्वार बंद असे. पण त्याच्या बाजूलाच एक गोल फिरणारे लोखंडी दार होते. त्यावर उभे राहून गोल फिरण्याचा आनंद मिळत असे.
आवारातच एक मारूतीचे मंदीर होते. छोटेसे, दगडी. बहूतेक ( की सगळ्याच?) न्यायालयाच्या आवारात मारूतीचे मंदीर (का)असते.(?) तसेच हे देखील. दर शनीवारी माझ्या घरासमोरील माझ्याच वयाचा मित्र त्या मारूतीला तेल आणि उडदाची दाळ वहायला जात असे. त्याचे पाहून माझी आईदेखील मला त्याच्याबरोबर तेल, दाळ वहायला पाठवत असे. संध्याकाळच्या वेळी न्यायालयाचे कामकाज आटोपल्यामुळे सारे आवार रिकामे असे. संपुर्ण शांतता असे. त्या विस्तीर्ण आवारात झाडे असल्याने आजूबाजूच्या घरे, इमारती दिसत नसत. पुर्ण एकांत, शांतता त्या परिसरात असे.
सुटीच्या दिवशी आमच्या शाळेला आणि न्यायालयादेखील सुटी असे. उन्हाळ्यातदेखील शाळेसारखी न्यायालयाचे मोठी सुटी असते हे आत्ता मोठे झाल्यावर माहीत झाले. कारण शनिवार रविवारची सुटी असो की मे महिन्यातली मोठी सुटी असो आम्ही गल्लीतली मुले न्यायालयाच्या आवारातच खेळायला जात असू. आमचे तेथील खेळ म्हणजे झाडावर चढणे, आवारातल्या भिंतींवर चढणे, जांभळे तोडणे, गवतात पळणे, गवतफुलांवर उडणारी पिवळी फुलपाखरे पकडणे, रंगीत भुंगे पकडून त्यांच्या पायांना दोरा बांधून उडवणे किंवा काडेपेटीत जमा करणे, मारामार्या करणे, विटीदांडी, पावसाळ्यात चिखल मातीमध्ये लोखंडी कांबी- गज खुपसणे आदी कमी खर्चाचे होते. न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या मागे बरीच मोठी पडीक जागा होती. तिचा वापर नसल्याने गवत तेथे कायम माजलेले असे. त्या गवताची जात काहीशी वेगळी असल्याने ते उंच होते. साधारणतः लहान मुलाच्या गुढग्या-मांड्यांच्या वर ते असे. त्यात फुलपाखरांना पकडण्यासाठी पळावे लागे. आता विचार केला असता ते किती धोक्याचे होते ते लक्षात येते. कारण त्या उंच गवतात साप, विंचू इतर जनावरे असण्याची शक्यता होती. पण आम्हाला अटकाव करणारे त्या आवारात कुणीच नसल्याने आम्ही लहान मुले बिनधास्त त्या गवतात खेळत असू. कधी कधी न्यायालयाचे कामकाज सुरू असण्याच्या दिवशीही तेथे खेळणे झाल्यास बाररूममधील वकीलांनीही आम्हा मुलांवर कधी ओरडल्याचे आठवत नाही.
बाररूमच्या बाजूलाच, मंदीराच्या समोर एक उंच जांभळीचे झाड होते. त्यावर थोड्या अंतरावर चढता येत असे पण तेथे जांभळे नसत. मग आम्ही खाली पडलेल्या जांभळाच्या सड्यांमधून जांभळांचा आस्वाद घेत असू. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एक मोठे विलायती चिंचेचे झाड, कौठाचे होते. तिकडे फारसे खेळणे होत नसल्याने विलायती चिंचा कधी पाडल्याचे आठवत नाही पण एक दोन आषाढी कार्तीकी किंवा महाशिवरात्रीच्या उपासांच्या आधीमधे कौठाची फळे पाडल्याचे आठवते. त्या झाडांच्या पलीकडेच तालूक्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डाव्या बाजूला सरकारी शाळांच्या बैठ्या कौलारू इमारती होत्या. कंपाउंडच्या भिंतीवर चक्कर मारतांना तो परिसर, तेथील रुग्ण आदींचे दर्शन होई. शाळेचे आवार मोठे होते. जवळपास चार बैठ्या इमारतींच्या मध्ये दोन मोठी खेळण्यासाठी मैदाने होती. तेथे आम्ही क्रिकेट खेळत असू. खेळायला दगडी चेंडू असल्याने कुणी यष्टीरक्षणाला तयार होत नसे. मग मीच यष्टीरक्षक होत असे. न्यायालयाच्या उजव्या बाजूला, आरोपींच्या खोलीच्या मागे रांगेने गुलमोहोराची झाडे होती. त्यांच्या शेंगा वाळल्यावर तलवारीसारख्या खेळण्याच्या कामात येत. कधी कधी गुलमोहोराच्या फुलांचा तुरा खाणे होई.
काही कालावधीनंतर मंदीरामागच्या मोकळ्या जागेत एका कोपर्यात तालूकान्यायमुर्तींसाठी सिमेंटचे घर बांधले गेले. अर्थात ते घर एका कोपर्यात असल्याने आणि त्यात राहणार्यांनीही आमच्या खेळण्यावर कधी आक्षेप घेतला नाही. कधीतरी पुढल्या वर्षात तेथे राहणार्या न्यायमुर्तीच्या मुलाने शाळेत माझ्या वर्गात प्रवेश घेतला. त्याची भाषा काहीशी वेगळी होती आणि तो अबोल असल्याने त्याच्याशी मैत्री होवू शकली नाही.
असेच एकदा आमच्या शाळेतच मोठ्या वर्गात असणार्या एका विद्यार्थ्याशी काही कारणामुळे शाळेत भांडण झाले. तो आमच्या गल्लीच्या पुढल्या गल्लीतच रहायला होता. त्याने शाळेतील भांडणाचा बदला घेण्याच्या हेतूने मला न्यायालयाच्या आवारात गाठले. मग त्याची अन माझी मारामारी सुरू झाली. तो काहीसा बुटका पण मजबूत असल्याने अधीक कालावधीसाठी मारामारी चालू राहीली. ठोसे, बुक्या आदींचा दोन्हीकडून मारा झाला. नंतर कुणीतरी मोठ्या व्यक्तीने मारामारी सोडवली. नंतर तो मुलगा वरचेवर दिसत असे पण मग त्याने अन मीही जुना वाद उकरून काढला नाही. नंतर शहरात तो एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला लागला तेव्हा त्याच्याशी भेटणे, बोलणे झाले.
वय वाढले तसे पुढे मोठ्या वर्गात गेल्यानंतर त्या न्यायालयाच्या आवारात खेळण्यासाठी जाणे कमी होत गेले. कधीतरी मधूनच लहर आली तर मारूतीच्या मंदीरात दर्शनासाठी जात असे. त्यावेळीही तेथे आधीसारखीच शांतता असे. आता मी ते गाव सोडले आहे. त्या गावाला अन पर्यायाने न्यायालयाच्या त्या आवाराला भेट देणे झाले नाही. इतक्या वर्षांनंतर तेथे खुप बदल झाला असणारच. न्यायालयाची इमारत जुनी झाली किंवा जागा कमी पडते या कारणामुळे पाडून नवी काँक्रीटची इमारतदेखील बांधली गेली असेल. तेथील झाडे, गवत आदी देखील नसणार. मारूतीचे मंदीर मात्र असेल पण त्यातही बदल झाला असेल. कधीकाळी तेथे जाणे झालेच तर तो परिसर कसा असेल याची उत्सूकता आहे. काळानुरूप बदल होत जाणारच. गतकाळातील तेथील आठवणी मात्र माझ्यासोबत नेहमी असतील.