अकबराचा मोबाईल हरवतो
नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती.
बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते. दरबार सुरू होता तेव्हा बादशाह प्रसन्न दिसत होता. अगदी न्यायालयीन कलमांच्या कंटाळवाण्या अन न-समजणार्या चर्चेतदेखील त्याने रस दाखवला होता. पण त्या चर्चेनंतरच अकबराचा चुळबूळपणा वाढला होता. एकदोन वेळा त्याने अंगरख्याच्या खिशातही हात घातला होता.
दरबारी नाष्टा अन चहा झाल्यानंतर बिरबलाने कधी नव्हे ते स्व:तहून दासीला बोलावून अकबराला जर्दापान दिले. तरीपण अकबराचा मुड काही खुलला नव्हता. त्याच्याकडून नेहमीप्रमाणे होणारे विनोद, दरबार्यांची खेचाखेची होत नव्हती.
तेव्हढ्यात अकबर बादशाहाने वैतागून मोठ्याने हुजूर्याला आज्ञा केली की, "अरे माझा मोबाईल शोध बाबा". नंतर अकबराने सार्या दरबाराला ऐकू जाईल अशा आवाजात सांगितले त्याचा मतितार्थ असा की आज दरबारात येण्यापुर्वी राणीच्या महालात असेपर्यंत बादशाहाचा मोबाईल त्याच्या अंगरख्याच्या खिशात नेहमीप्रमाणे होता. दरबाराची वेळ झाली अन नाईलाजाने तो राणीमहालातून दरबारात हजर झाला होता. नंतर चर्चेदरम्यान एकदोन वेळा त्याने मोबाईल मध्ये काही मेसेज वैगेरे बघण्यासाठी खिशात हात घातला तर मोबाईल तेथे नव्हता. म्हणजेच अकबराचा मोबाईल गायब झाला होता.
प्रत्यक्ष अकबर बादशाहाचा मोबाईल गायब झाला हे पाहून सार्या दरबार्यांची मोबाईल शोधासाठी धावपळ सुरू झाली. राणीसाहेबांच्या हाती मोबाईल चुकून हाती लागला तर त्या मोबाईलमधील नको त्या गोष्टी पाहतील अन मग रात्री खरडपट्टी घेतली जाईल हे मनात येवून अकबरालाही त्याच्या मोबाईलची काळजी वाटू लागली.
बादशाहाचे सिंहासन, बाजूचे पानाचे व पाण्याचे टेबल, दरबारात येण्याचा मार्ग, इतर दरबार्यांच्या जागा आदी सार्या ठिकाणी सेवकांनी लगबग करत मोबाईलचा शोध घेतला. मुख्य सुरक्षा सचिवाने राजवाड्याचे मुख्य द्वार बंद करण्याचे आदेश दिले. बादशाहाचा मोबाईल सापडेपर्यंत कुणीही राजवाड्याच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. सार्या दरबार्यांनी संध्याकाळी उशीरा घरी येवू असल्या अर्थाचे एसएमएस घरी पाठवले. काहींच्या मनात मोबाईल चोरी तर झाला नसेल ना असली शंकाही आली. अकबराच्या शालकाने चतूराई नजरेत यावी म्हणून अकबराच्या मोबाईलवर रींग दिली तर मोबाईलवर रींग जात होती. म्हणजेच मोबाईल कमीतकमी बंद झालेला नव्हता.
अकबराने त्याचा मोबाईल सगळ्यात शेवटी राणीदरबारात वापरला होता व त्यानंतरच तो नाहीसा झाला या निष्कर्षापर्यंत सारे दरबारी आले. आता राणीच्या दरबारात खास विश्वासू सेवक व दरबार्यांपैकी बिरबलालाच प्रवेश होता हे सार्यांना माहीत होते. संशयाची सुई आपल्याकडे वळत आहे हे पाहून मोबाईल शोधाची सगळी सुत्रे बिरबलाने आपल्या हातात घेतली.
बादशाहाला त्याने विचारले, "महाराज, आपण मोबाईल शेवटचा कधी हाताळला?"
"हाताळला म्हणजे तसा तो नेहमी हातातच असतो", तसल्या गंभीर प्रसंगातही आपली विनोदीबुद्धीची चुणूक दाखवत अकबर पुढे म्हणाला, "पण दरबारात येण्यापुर्वी मी राणीसाहेबांच्या महाली गेलो होतो. थोड्या गप्पा झाल्या, राणीसाहेबांच्या हातून पान खाल्ले अन तेवढ्यात दरबारात येण्यासाठी लावलेल्या वेळेच्या अलर्टने रसभंग केला. अलर्ट बंद करून मोबाईल मी नेहमीप्रमाणे सायलेंट मोडवर टाकला अन तडक दरबारात हजर झालो. रस्त्यात कुठेही थांबलो नाही की काही नाही. असा चालताचालता मोबाईल हरवतो म्हणजे काय?", अकबराने थोड्या रागातच सांगितले.
"महाराज, आपण मोबाईल शेवटचा कधी चार्ज केला होता? अन बॅटरीचा काही प्रॉब्लेम तर नाही ना? म्हणजे बॅटरी लवकर संपणे वैगेरे?" बिरबलाने पुढला प्रश्न विचारला.
"असे बिरबल, हा माझा मोबाईल अगदी लेटेस्ट आहे म्हणजे होता बघ. काही बॅटरीबिटरीचा प्रॉब्लेम नाही. फक्त तो हरवायला नको अन कुणाच्या हातातही पडायला नको. मोबाईल कंपनीला सांगून सिमकार्ड ब्लॉक करता येईल मोबाईल लॉक करता येईल पण त्यात असणार्या डेटाचे काय? अन मी तर त्याला पासवर्डही ठेवला नव्हता. काही जोक असलेले मेसेजेस मी राणीसरकारांनाही वाचायला मोबाईल त्यांच्या हातात तेवढ्यापुरता द्यायचो." बादशाहाने काळजीपोटी खाजगी आवाजात बिरबलाला सांगितले.
बिरबल थोडा विचारात पडलेला दिसल्याने अकबराने त्याची रडकहाणी बंद केली. बिरबल बराच वेळ काही बोलत नाही हे पाहून बादशाहा उसासून म्हणाला, "बिरबल, काहीही करून तो मोबाईल मिळव बाबा. मोबाईल न मिळाल्यास मी तूला तुरूंगात टाकीन."
अर्थात 'तुरूंगात टाकीन' वैगेरे ह्या पोकळ धमक्या असतात हे सवयीने बिरबलाला माहीत होते, आता दुपारचे तीन वाजून गेले असूनही मोबाईलचा शोध न लागल्याने अन भुकेने पोटात कावळे ओरडत असल्याने बिरबल थोडा काळजीत होता.
बिरबल काय बोलतो हे ऐकण्यासाठी सार्या दरबाराचे कान बिरबलाकडे लागले. बादशाहाच्या शालकाच्या मनात बिरबलाविषयी असलेल्या असूयेने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.
शेवटी बिरबल निर्धाराने बोलला, "महाराज, सार्या दरबारातल्या अधिकार्यांना व सेवक, दासदासींना घरी जाण्याची परवानगी द्यावी. तुम्हीही जेवून घ्या मी पण जेवण करून आलो की मी तुम्हाला तुमचा मोबाईल मिळवून देईन."
बादशाहासकट दरबारातील उपस्थितांना हायसे वाटले. मोबाईल संकट तात्पुरते तरी टळले होते. उद्याचे उद्या बघता येईल असा विचार करून दरबार बरखास्त करण्यात आला. अकबर बादशाहा मुदपाकखान्यात अन बिरबल जेवायला त्याच्या घरी गेला.
पाच वाजेच्या सुमारास बिरबल पुन्हा दरबारात हजर झाला. मोबाईलचा शोध नक्की कसा घेतला जातो याची उत्सूकता लागून इतर दरबारी लांब अंतरावर थांबले. येतांना बिरबलाने मुख्य इलेट्रीशियनला बरोबर आणले होते. येथे मोबाईल शोधाची मारामार असतांना इलेट्रीशियनचे काय काम? का तो हवेत मोबाईल चार्ज करेल? असे विचार बादशाहाच्या मनात आले पण काय घडते हे पाहाण्याचे त्याने ठरवले.
उन कलल्यानंतर सूर्य बुडण्याच्या सुमारास बिरबलाने राणीमहालाच्या काही विश्वासू दासींना व इलेट्रीशियनला घेवून राणीमहालाकडे कुच केले. बरोबर बादशाहाही होताच. राणीमहालात आल्या आल्या बिरबलाने दासींना दरबाराचे दरवाजे, खिडक्या, त्यावरील पडदे बंद करण्यास फर्मावले. सारे जण श्वास रोखून बिरबल नक्की काय करतोय ते पाहत होते.
आता बिरबलाने मुख्य इलेट्रीशियनला राणीमहालाचा मेन स्विच बंद करण्यास सांगितले. मेन स्विच बंद केल्यानंतर राणीमहालात अंधार पसरला. अकबराने ताबडतोप राणीचा हात घट्ट धरला. बिरबल बाजूलाच उभा होता. झालेल्या अंधारात काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात बिरबलाने त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल काढला अन अकबराच्या हरवलेल्या मोबाईलचा नंबर डायल केला. जशी पहिली रींग गेली तसा राणीच्या मंचकाकडून उजेड येवू लागला. राणीच्या मंचकाच्या उशीकडची बाजू प्रकाशाने भरून गेली. मोबाईलमधून पुर्ण रींग संपण्याच्याआत बिरबलाने मंचकाच्या दिशेने झपझप पाऊल टाकून उशीजवळचा अकबर बादशाहाचा मोबाईल हस्तगत केला.
आता बिरबलाने मोठ्याने आवाज देवून मुख्य इलेट्रीशियनला मेन स्विच चालू करण्यास सांगितले. मेन स्विच चालू करताच राणीमहाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. बादशाहाला खेटून उभी असलेली राणी संकोचाने बाजूला झाली. बिरबलाने हसत हसत अकबराचा सापडलेला मोबाईल अकबराच्या हवाली केला.
अकबराने मोबाईल घाईघाईने बिरबलाकडून घेतला व पहिल्यांदा सायलेंट मोड ऑफ केला. मोबाईल राणीच्या किंवा इतर कुणाच्याही हातात न गेल्याचे पाहून त्याचा जीव भांड्यात पडला होता.
आपला हरवलेला मोबाईल अशा प्रकारे चतूराईने शोधून दिल्याबद्दल खुश होवून अकबराने पुर्ण वर्षाचा टॉक टाईम बिरबलाच्या मोबाईलसाठी जाहीर केला.
2 comments:
Mast
क्या बात है
Post a Comment