कहाणी राजपुत्राची
आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.
घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले.
असाच भटकत असतांना त्याला एका झर्याच्या काठी एक साधू दिसला. इतक्या दिवसांत कुणीतरी भेटले याचा त्याला आनंद झाला. त्याने नमस्कार करून जंगलाच्या बाहेर जाण्याचा मार्ग कोणता या अर्थाचा प्रश्न साधूस विचारला. साधूने राजकुमाराबरोबर झालेला प्रसंग मनातून ओळखला. त्याने उपाय सांगितला. "याच झर्याचा उगमाकडे काही अंतरावर गेल्यास दरी लागेल. स्वत: झर्यात स्नान करून दरीतून पडणार्या झर्याचे पाणी प्राशन कर. म्हणजे तुझ्या चिंता संपतील". राजपुत्राने साधूस नमस्कार केला असता साधू तथास्तू म्हणून चालता झाला.
साधूने सांगितल्याप्रमाणे राजपुत्र झर्याच्या उगमाकडे गेला. तेथे त्याला एक नवयौवना दिसली. राजकुमाराने स्नान करण्यास झर्यात उडी मारली असता तो एका डोहात बुडू लागला. ते पाहून त्या युवतीने त्यास पकडले व त्यास डोहाबाहेर काढले. दोघेही पाण्यात असतांना राजपुत्राने त्याच्यावरील कोसळलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. युवतीस झर्याचा प्रवाह माहित असल्याने तिने त्या राजपुत्रास कोसळणार्या झर्यापर्यंत पोहोचण्याचे मार्गदर्शन केले. राजपुत्राने जंगलातून मुक्त होण्यासाठी अधीरतेने कोसळणार्या झर्याचे पाणी प्राशन केले. ते पाणी प्राशन करताच राजकुमार व ती युवती राजधानीतील राजवाड्यात अवतिर्ण झाले. हा चमत्कार कसा झाला हा प्रश्न राजपुत्राने युवतीस विचारला असता तिने त्यास सांगितले की, 'मी मध्यदेशाची राजकन्या आहे. एका तपश्चर्यामग्न साधूस मी लहाणपणी चिडवीले असता त्याने मला शाप देवून जंगलात पाठविले. मी त्याची क्षमा मागितली असता एक राजपुत्र तुझ्याकडे पाणी पिण्याबद्दल विचारेल व ते सत्कृत्य तू करताच शापमुक्त होशील असा उ:शाप दिला. योगायोगाने आज तसे घडले व मी शापमुक्त झाले'.
राजाला ही बातमी समजताच त्याने आपल्या परतलेल्या पुत्रास अत्यानंदाने मिठी मारली. त्याबरोबर आलेल्या राजपुत्रीच्या आईवडीलांना तिची हकीकत कळवीली. पुढे सर्वसंमतीने राजपुत्र व राजकन्येचा विवाह थाटात संपन्न झाला.
ज्याप्रमाणे साधूचा आशीर्वाद राजपुत्र आणि राजकन्येस मिळाला त्याप्रमाणे तुम्हांआम्हास मिळो. ही साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी संपुर्ण.
- पाभे