रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Sunday, January 29, 2012
संसर्गजन्य जिवाणू
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.
तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.
इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.
मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.
तो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.
Saturday, January 28, 2012
माझ्या मना
माझ्या मना तू माझ्या मना
मला तू तरी समजून घे ना
उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना
न ऐकले तुझे अन भेटलो तिला
का भेटलो तेव्हा ते मला कळेना
दुर ती गेली निघूनी सोडून मला
आठवण तिची कधी काढू नको ना
होती का काही तिची मजबूरी?
ती तरी का सांगेल कोणा?
असेल का रे स्थिती तिची अशीच
माहीती का तुला? तू मला सांग ना!
- पाषाणभेद
Friday, January 27, 2012
सरदार सरदार
सरदार सरदार तुम्ही माझं अंमलदार
काळजी तुमची करते लवकर परतावं
सवत चाकरी झाली माझी
ओढून नेई तुम्हा युध्दावर
वाट पाहिल तुमची दारी दासी
सेवा करीते थोडं शेजघरी पडावं
तुम्हाविण व्याकुळ चिमणा जीव
काय घडलं तेथे कुणी सांगावं
मन लागेना कामी दिसभर
घास जाईना ओठी काय करावं
धिर करून देते निरोप आता
माझी काळजी आहे उलीशी
महाराष्ट्राचा पसारा मोठा
पुर्या ताकदीनिशी युध्द लढावं
चला नाही अडवीत, तुम्ही जावं
तेज तलवारीनं दुष्मना मारावं
मस्तकी मोती शिरपेच खोचावं
विजयी विराला पंचारतीनं ओवाळावं
- पाषाणभेद (दगडफोड्या)
Wednesday, January 25, 2012
नाईट शिफ्ट
आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय इतर क्षेत्रात नोकरी करत असणार्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगार असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा आयटी नोकरदारांच्या सर्वच कंपन्यादेखील जास्त पगार देणार्या नसतात. कामाच्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. इतर क्षेत्रातली अन आयटी क्षेत्रातली काम करण्याची पद्धत भिन्न असते. असो.
असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती. उगाचच आयटी, नॉनआयटी, जास्त पगार, कमी पगार आदींवर चर्चा होवून ती वादात रूपांतरीत व्हायची. म्हणून असो.
तर मंडळी मी तुम्हाला माझी खाजगी गोष्ट सांगत होतो. अहो ही आमची नाईट शिफ्ट हो. फार वैताग असतो नाईट शिफ्ट म्हणजे. तुम्हाला सांगून समजणार नाही. नाईट शिफ्टचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागेल तुम्हाला. अन आयटीमधली नाईट शिफ्ट मेकॅनिकल इंडस्ट्रीजमधल्या नाईट शिफ्टपेक्षा सर्व अर्थाने निराळी असते. कामाची वेळ एकतर दुसर्या देशांच्या हिशोबाने तयार केलेली असते. म्हणजे युके शिफ्ट, युएस शिफ्ट असल्या शिफ्ट असतात. म्हणजे इतर लोकं ढाराढूर झोपतात तेव्हा आमच्यातले काही जण भुतासारखे कंपनीच्या गाडीची वाट पाहत चौकात उभे असतात तर आमच्यातले काही लोकं काम संपवून कंपनीच्या गाडीतून गल्लोगल्ली सांडत असतात. काही जण झोपायची तयारी करतात तर काही जण जागण्याची, काही जण जेवणाची (दुपारच्या की रात्रीच्या ??) तयारी करतात. बरं हे (दुष्ट)चक्र पुन्हा काही दिवसांनी बदलणार असतं हो. म्हणजे एखाद्याची युके शिफ्ट बदलून युएस शिफ्ट होणार असते किंवा एखाद्याची सेकंड शिफ्ट बदलून मॉर्नींग किंवा नाईट शिफ्ट होणार असते. याशिफ्ट बदलाच्या सत्रामुळे घरच्यांना (किंवा बाहेरच्यांनाही!) वेळ देता येत नाही. सगळीकडे वेळेची अॅडजेस्टमेंट करावी लागते. पुन्हा असो. कारण हा ही विषय माझ्या गोष्टीचा नव्हताच.
तर मंडळी, कालपर्यंत गेल्या महिनाभरापासून मी नाईट शिफ्ट करत होतो. आमचा एक प्रोजेक्ट गो लाईव्ह होणार असल्याने जबाबदारीचे काम होते. त्यामुळे खरोखरच्या कामात गुंतलो होतो. शिफ्टच्या वेळेपेक्षा दोन एक तास लवकरच घरातून निघावे लागत होते. कामावरून येण्याची वेळदेखील निश्चित नव्हती. म्हणजे रात्री दहाच्या सुमारास निघून सकाळी साडेसातला कंपनीतून निघावे लागे. कधी कधी कंपनीतून निघण्याचे सकाळचे साडेआठही होत. घरची मंडळी (म्हणजे आमची सौ. हो!) फारच वैतागली होती. एकतर नविनच लग्न झालेले त्यात बंगलूरू सारखे अनोळखी भाषा असलेले शहर. घरातली तशी कामे काही नव्हती पण मुख्य कारण म्हणजे माझी सोबत तिला मिळत नव्हती. आता नविनच लग्न झालेल्या जोडप्याला विरह अन त्यातही रात्रीचा एकटेपणा म्हणजे काय असतो याचा ज्याने त्याने आपआपल्या अनुभवावरून विचार करावा. तिची मानसिक स्थिती मला समजत होती पण मी तरी काय करू शकत होतो. काहीतरी टाईमपास व्हावा आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून तिच्या नोकरीसाठी दोन एक ठिकाणी सांगितलेही होते. पण आता लगेचच काही तिच्या नोकरीचे काम होणार नव्हते. नाही म्हणायला ती कलाकुसरीची कामे घरातच करत होती. शिवणकामात तर एखाद्या फॅशन डिझायनरच्या तोंडात मारावी अशी कला तिच्या हातात होती. तिचे पंजाबी ड्रेसेस, बाजूच्या लहान मुलांचे कपडे, ब्लाऊजेस ती हौसेखातर घरी दिवसभर शिवत बसे. पण कदाचित रात्रीच्या एकटेपणाला ती वैतागत असावी.
कारण गेल्या पंधरा एक दिवसापासून तिची घरातली धुसफुस वाढली होती. माझी नाईट शिफ्टची वेळ अन ती कधी बदलेल याची काही शक्यता नव्हती. बरे, नाईट करून मी शारिरीक अन मानसिक थकलेलो असल्याने दुसर्या दिवशी दिवसभर काहीच 'कामाचा' रहायचो नाही. मी दिवसा झोप घेत असतांना एकदोन वेळा तिने शिलाई मशीन चालवली. पण आवाज होतो म्हणून मी तिला ती मशीन बंद करायला लावली. मला डिस्टर्बन्स नको म्हणून टिव्ही देखील ती म्युट करून पहायची. मलाही पुर्ण दिवस झोपून काढावा लागायचा इतका शारिरीक थकवा आलेला असायचा. काही काम नाही की कोठे फिरणे नाही. बहूदा त्यामुळेच ती वैतागली असावी असा माझा समज झाला.
आता कालचीच गोष्ट. मी सकाळी घरी साडेआठला पोहोचलो. रात्री आमचा प्रोजेक्ट संपल्याने मला मोकळीक मिळाली होती आणि पुढच्या पंधरवड्यासाठी माझी शिफ्ट बदलून फार क्वचित मिळणारी जनरल शिफ्ट झाली होती. कामाचा ताण कमी करण्यासाठी मी शनिवार रविवार जोडून तीन दिवस रजादेखील मंजूर करून घेतली होती. आज जरा खुशीतच सकाळी घरी आलो. आल्याआल्या बायकोला चहा करण्यासा सांगितले. जनरली नाईट करून आल्यानंतर झोप उडू नये म्हणून मी चहा कधीच घेत नसे. आज मात्र मी चक्क चहा टाकण्यास सांगितले. आता दिवसा झोप घेण्याची गरज नव्हती. मस्तपैकी नविन लग्न झालेल्या जोडप्याचे फुलपाखरी दिवस (अन रात्रीही!) अनुभवता येईल असा माझ्या मनात विश्वास आला होता. मन आनंदाने उचंबळत होते.
"अग, एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला", चहा घेतल्यानंतर मी तिला बोललो.
"काय?" तिने थोड्या नाराजीनेच पण चेहेर्यावर तसा भाव न दाखवता विचारले.
"अगं, माझी नाईट शिफ्ट आज संपली. आता चारएक दिवस चांगली विश्रांती घेवून मग दिवसाच्या शिफ्टमध्ये कामावर जाणार आहे", मी मनातले मांडे मनात खात मोठ्या आनंदाने चित्कारलो.
"काय!" ती पण आनंदाने मोठ्या आवाजात उद्गारली.
माझ्या मनात जे काही रंगीत संगीत विचार येत होते तसलेच विचार तिच्याही मनात असावेत हे समजून माझ्या मनाला अगदी बरे वाटले. माझ्य मन आनंदाने उचंबळून आले. एखादा जलप्रपात जलाने ओतप्रोत भरून जसा वाहवेल अन कड्यांवरून कोसळत नदीच्या मिलनाकडे धावेल तसे माझे मन त्याच विचारांच्या दिशेने धावू लागले. प्रसिध्द लेखकांसारखे किंवा कविंसारखे असलेच हळूवार, तरल विचार माझ्या मनी उमटू लागले. पण मी काही लेखक किंवा कवी नाही.
"खरंच तुलाही आनंद झालाय?" मी साध्या सरळ माणसासारखा अ-साहित्यीक प्रश्न तिला विचारला.
"खुप बरं वाटलं मला...." ती पुढे काय बोलते ते ऐकण्यासाठी माझे प्राण कानाशी आले.
".... बरं झालं तुमची नाईट शिफ्ट संपली ते. फार वैतागले होते मी त्या नाईट शिफ्टला. दिवसभर तुमची झोप झोप. काम नाही की काही नाही. माझी घरातली कामे किती अडली होती. आता मी मनमोकळेपणे शिलाई मशीन चालवू शकेल. माझ्या चार नव्या साड्यांवरचे ब्लाउजेस शिवायचे बाकी आहेत. शेजारचे दोन तिन कपडेही शिवायचे आहेत. झालंच तर घरातली साफसफाई करायची आहे. बरं झालं ते तुमची नाईट शिफ्ट संपली ते."
तिचे ते बोलणे ऐकून माझ्या मनातला निर्झर पावसाळा संपल्यानंतर लगेचच हिवाळ्याच्या सुरूवातीलाच सुकावा तसा सुकला हे काय मी तुम्हाला सांगावं का?
(डिस्क्लेमर: कथेतील व्यक्ती, घटना, प्रसंग, ठिकाण लेखकाचे असतीलच असे नाही. त्या घटना, प्रसंग, ठिकाणांत तुम्ही स्वत: त्यातील पात्र असल्याचीही कल्पना करू शकतात.)
Monday, January 23, 2012
काय सैपाक काय करू मी बाई
घरधनी उठलं सकाळी रामपारी
उसतोडीची आमी केली तैयारी
न्यारी डब्यासाठी आंग खंगाळूनी
चुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी
हाताशी पोळपाट परात घेवूनी
जाळ केला चुलीवर तवाठेवूनी
धुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी
पाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी
भाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी
ठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी
"घाई कर" म्हनं पोराला उठवूनी
रडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी
सारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी
चला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी
पिठाचा डबा घेई हाती करूनी घाई
पाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही
ऐन वक्ताला काय करावं सुधरंना
बावरली मी खायाला काय नाहीना
त्याच येळेला शेजारीन आली धावूनी
एक शेर उसनं पिठ घेई तिच्या कडूनी
बडवल्या भाकर्या उलट्यापालट्या करूनी
पिठलं टाकलं ठेचा केला मिरच्या भाजूनी
घाईतच डबा झाला भाकर्या फडक्यात बांधूनी
कपाळी कुकू लावूनी आली झोपड्यातूनी
निघालो सम्दी सारी बैलगाडीतूनी
घरधनी म्हणे "येळ का ग येवढा होई"
सांगीतलं त्याला खरं खोटं बोलले नाही
आवो डब्यामधी बाजरीचं पिठच नाही
आग येडी का खुळी तू हाई
मला सारं कालच व्हतं म्हाईत
सकाळीच शेजारी मीच गेलो पहिलं
शेजारणीला संसाराच रडगाणं सांगीतलं
तिच्याकडं हिच होती परिस्थिती सारखी
तरी बी तीच म्हणे पिठ देते चटदिशी
म्हणून तीच आली बघ तुझ्याकडं धावूनं
पिठ दिलं भाकर्यांसाठी तुझी काळजी पाहूनं
"चला तुम्ही म्हणजे लईच हाईसा" म्या बोलली लाजून
संसाराची काळजी तुम्हालाबी हाये आलं मला समजून
फाटक्या संसाराची विटक्या लुगड्याची लाज मला नाही
उद्याला तिचं तिचं पिठं तिला देवून देई
तिच्याकडं बी कधी पिठं नसतं तेव्हा मी पिठं देई
ती बी कधी मधी तेल मिरच्या पिठं घेवूनी जाई
तिच्या डब्यामधीबी बाजरीचं पिठ राहत नाही
- पाभे
नको रे कान्हा
नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी
नको लगट दावू उगीचच खेटूनी ||
नार मी भोळी साधी सरळ हरणी
रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी
सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले
अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी ||
गोरी माझी काया तू रे सावळा
मनात दुजे काही चेहेरा भोळा
नको छेडाछेडी दिसे मग सार्यांना
ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी ||
श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा
केशव मुरलीधर माधवा गोविंदा
अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी
विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी ||
तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण
तुझ्याविण जग सारे होई वैराण
यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले
तुझ्यासवे त्यात गेले चिंब न्हाऊनी ||
- पाभे
Thursday, January 19, 2012
चांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं
प्रेरणा: चांदराती हासली तू
चांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं
पायी वाजे रुनुझुनु रुनुझुनु पैंजनं
रूप माझं कसं दिसंल पाहण्या
तुमी समोर धरा नजरेचा आईना
लाज लाजून धुंद झाल्या दाही दिशा
मुक्यामुक्यानं बोलण्यात आली नशा
काल राती तुमी ओठ चावून गेला
भानावर राहणं जमेना बघा मला
तुमी ओ धाडीलं डोळ्यातून आवतण
पलंगावर बसता मनी सुरू झालं रण
- पाभे
Wednesday, January 18, 2012
थंडी माघाची
थंडी पडलीया माघाची
राया माघाची
घाई करा तुमी येण्याची ||धृ||
लवकर या हो
जवळ घ्या हो
जरातरी फिकीर करा वेळेची ||
नका नका आसं करू नका
जिव माझा फुका जाळू नका
एकटेच का दुर र्हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची ||
थंडीनं जिव केला येडापिसा
उन उन उबेला जवळी बसा
हातावर हात आन पायावर पाय
पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||
कालचा दिस आठवा ना
रुसवा गोडीनं मिटवा ना
आणलय काय दावून जरा
मुठ उघडा हाताची ||
- पाभे
Sunday, January 15, 2012
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.
सुरूवातीची चढण
सरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो.
यावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.)
विस्तीर्ण पठारावर
येथे थोडी झाडी आहे.
उंच वाढलेले गवत
पाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे.
येथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते.
वरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो.
याच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे.
गुहा
पुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली!
येथून वरती जाण्यासाठी पायर्या खोदलेल्या आहेत.
क्षणभर विश्रांती...
पहिला दरवाजा
येथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो.
किल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा.
हे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती.
थोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला.
राहण्यासाठी खोदलेल्या गुहा
प्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला.
येथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत.
उतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली.
जरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.
Monday, January 9, 2012
युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले
तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले
तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली
ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले
तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती
तरंगातूनी काय कोणता संदेश वदती
ती:
शांत पाण्याला जीवन देण्या
तरंग असले आले जन्मा
जळात ते जवळी राहून
लडीवाळ काही गोड गुपीत बोलले
तो:
फुले माळलीस तू या वेणी
गंध तयांचा गेला रानी
ती:
भ्रमर झाला बघ तो वेडा
जवळी आला रस घेण्या चुंबूनी
भ्रमर कुणी का तो नसे काही वेडा
बोल प्रितीचे मी त्यातून ऐकले
- पाभे
पांडूरंग माझा गरीब राहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या
गरीब राहू द्या
गरीबांना पाहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ||
नका अर्पू त्याला सोने अन नाणे
त्याला नसे त्याचे देणे घेणे
आपलीच श्रीमंती
आपलीच श्रीमंती
उगा जगाला का दावता ||१||
नका लावू त्याला सुखाचे डोहाळे
नका करू त्याचे उत्सवी सोहळे
तोच दाता असता
तोच दाता असता
कशाला त्याला देणगी तुम्ही देता? ||२||
भक्तासाठी देव पहा थांबला विटेवरी
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको दुजे काही देणे
नको दुजे काही देणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता ||३||
- पाभे
Monday, January 2, 2012
लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स
(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा. )
शत्रूला पळून जावू द्यायचं नाय
परेडss विश्रामs
शत्रूकडे लक्ष ठेवण्याचं करा काम
हिलो मत मतलब हिलो मत
एकदम ताठ उभे रहा सख्त
परेडss लाईन बनs
नाहीतर देईन दणादण
परेडss तेज चलs
हात हलवत पाऊल उचल
परेडss आराम से चल
गडबड गोंधळ कर कम
हरकत नही....हरकत नही
बुटात बोटे हलवायचे नाही
परेडsss दहिने / बायें/ पिछे मुड
व्हेरी गुड व्हेरी गुड
परेडsss दहिने / बायें/ सामने देख
तेज नजर फेक
परेडss कदम ताल
एक सुर में पैर लगाव
परेडss सलामी शस्त्र
रायफल सिधी पकड
परेडss बगल शस्त्र
ट्रीगर गार्ड मधे उंगली दबोच
परेडss परेड थाम
सांगतो ते ऐकायचे करा काम
परेडss लाईन तोड
जवान आपापल्या जागा सोड
Sunday, January 1, 2012
नको रे दिवा
नको रे दिवा
तू मालवू असा
उजेड का नकोसा
उलघाल मनाची होई
लाज आली अशी
थोडी वेडी पिशी
जरा थांबलीस का
वेळ निघूनी जाई
मोहरून येई जवळी
स्पर्श घेई करूनी
का उगाच अंगी
काटा फुलूनी येई
चढली ही रात्र
थकले रे गात्र
चिंब यौवन मात्र
तुझ्या हाती येई
नको रे तू असा
नको करू राजसा
हातामधे तुझ्या
नकळत का हात जाई
नको रे तू असा
नको करू राजसा
हात हातामधे
नकळत का जाई
ऐक गोड गुपीत हे
सांगतो मी कानी
सखी तूच माझी
आता एकरूप होई
- पाभे