नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.
आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो. वेळ होताच त्यामुळे पहिल्यांदा न्युयॉर्क शहर बघायला घेतले. क्विन्स डोमेस्टीक ऐअर पोर्टवर आमची सामानाची बॅग सापडत नव्हती. म्हणून आम्ही तेथील काउंटरवर उभे असतांना एक मुलगी आमचे नाव पुकारत आली. तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत. येथे येण्याच्या आधी ते भारतात बंगळूरू येथे कामाला होते. मुलगीही तेथेच कामाला होती. तेथेच त्यांनी एकमेकांचे लग्न जुळवले. असो.
तर थोडक्यात आमचे सामान आम्हाला परत विनासायास मिळाले. आम्ही न्युयॉर्क शहर भटकण्यासाठी काही ठिकाणी टॅक्सी केली तर बर्याचदा शहर बससेवा वापरली. शहरबसमधले (City Bus) दरवाजे ड्रायव्हर अॅटोमॅटीक पद्धतीने उघडतो. येथे तिकीट आधीच काढावे लागते. पुण्यातल्या सिटीबससारखे येथे कंडक्टर नसतात. बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो.
M9 या क्रमांकाच्या बसने आम्ही ब्रॉडवे येथे फिरत होते. तेथे एका स्टॉपवर आम्ही उतरून पायी पायी उंच इमारती पाहत चाललो असतांना समोरून एक माणसांचा घोळका येत होता. त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. हातात तिरंगी ध्वज आणि बॅनर्स होते. आमच्या जावयांना तो ध्वज भारताचा वाटला. त्यांनी तसे मला बोलून दाखवले. आमचे 'हे' म्हणाले की कदाचीत तो नायजर या देशाचा ध्वज असावा. (पण नंतर तो भारताचाच ध्वज होता हे समजले. आमच्या जावयांना दुरूनही ध्वज ओळखता आला त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटला. असो.) तो जमाव जवळ आला तर त्यांच्या गांधी टोप्यांवर 'मी आण्णा आहे' असे लिहीलेले होते. म्हणजे ते इंग्रजीत "I am Aana" असेच होते पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले. त्यातील बरेचसे चेहेरे भारतीय होते. आमच्या जावयांनी चौकशी त्यातील लोकांशी चर्चा केली. त्यातून समजले की भारतात त्यावेळी आण्णा हजारेंचे दिल्लीत भ्रष्टाचार, लोकपाल याबाबत उपोषण चालू आहे व येथील भारतीय लोकांनी त्याला पाठींबा म्हणून हा मोर्चा काढला होता. हळूहळू तो मोर्चा पुढे निघून गेला. मलाही त्या मोर्चात जावेसे वाटले पण आम्हाला शहर बघायचे असल्याने तो मोह टाळला.
तो मोर्चा पुढे निघून गेल्यानंतर तेथे एक छोटा ध्वज खाली पडलेला दिसला. तेव्हड्यात आमच्या शेजारी मोर्चा बघत उभा असलेला एक गोरापान अमेरिकन युवक तेथे गेला अन त्याने तो ध्वज उचलला. त्यानंतर तो ध्वज त्याने माझ्या हातात दिला. त्याने मी भारतीय आहे हे माझ्या नेसलेल्या साडीवरून ओळखले असावे असा माझा अंदाज आहे. आम्ही तो ध्वज हातात घेतला व नंतर तो व्यवस्थित घडी घालून आमच्या बॅगेत ठेवला.
एका अमेरिकन युवकाने दुसर्या देशाच्या ध्वजालादेखील योग्य सन्मान दिल्याचे पाहून मला त्याचा अभिमान वाटला.
नंतर आम्ही बरीच अमेरीका पाहिली. त्यांच्यावरचे लेख नंतर कधीतरी.