रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Wednesday, January 19, 2011
स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला नैसर्गीक फिल्टर
पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडचणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.
हां, आता लहान मुले, महीलावर्गाची यात कुचंबणा होणार, पण निसर्गापूढे कोणाला जाता येते का?
दुर्देवाने या साथीत ज्यांचे म्रुत्यू झाले आहेत त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांबद्दल सहानुभूती बाळगून मी म्हणतो की त्यांच्या (माणसांच्या) शारीरीक (मिशी) ठेवण्याबाबत जर काही संख्याशास्त्रीय डाटा उपलब्ध केला गेला तर मला वाटते की या माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आढळेल.
आपल्याला काय वाटते?
(पुर्वप्रकाशीत)
- पाषाणभेद
एसटी पुराण
एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली. आपल्यातल्या जुन्या लोकांपैकी बर्याच जणांनी असल्या जुन्या बस बघीतल्या असतील. त्यानंतर बर्याच बसेस आल्या अन गेल्या. त्यांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलले. सार्वजनिक प्रवासासाठी महामंडळ अस्तित्वात आले. प्रवासास अनेक सुखसोई असणार्या बसेस आल्यात.
६० ते ८० च्या दशकाच्या शतकात एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे हाच एक पर्याय होता. त्यानंतरच्या काळात खाजगी लक्झरी बस प्रवासासाठी उपलब्धझाल्यामुळे प्रवास बराचसा सुखकर झाला अशी प्रवाशांची समजूत झाली.
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे फॅशन झाल्यासारखे वाटते. काही प्रमाणात शहरी भागात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामिण भागात प्रवासासाठी एसटी बस शिवाय पर्याय नाही. 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी' हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. ती सवलत नाकारली तर महामंडळाचा नफा बर्याच प्रमाणात वाढू शकतो. तरीही केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. सरकारने महामंडळाप्रती आपली दृष्टी बदलली पाहीजे. बर्याचदा खाजगी वाहतूकदार करणारे हे राजकारणी अन मोठे लोक असतात. ते सुद्धा महामंडळाची अडवणूक करतात. त्या त्या रुट वर कमी प्रमाणात गाड्या चालविल्या जातात. हे सार्वजनिक प्रवासास अहितकारक आहे.
भारतातल्या प्रत्येक राज्यात अशी एसटी धावते. तुम्ही त्या त्या राज्यात जर अशा एसटी बसने प्रवास केला तर तुम्हास आपल्या राज्यातील बससेवाच कशी चांगली आहे हे पटेल. काही प्रमाणात गैरसोई असतील तरीही सामायीक विचार केला असल्यास वरचे विधान आपणास पटेल.
आता बसबद्दल. माझ्या लहाणपणापासून मी लालपिवळी बस बघत आलेलो आहे.
त्यातून प्रवासही केला आहे. नंतरच्या आशियन गेम च्या काळात आशियाड बस सुरू झाल्या.
त्यांचा रंग हिरवा पांढरा होता.
आता जनता बस चा रंग लाल असतो.
शिवनेरी एसी बसचा रंग निळा आहे.
बसेसचे सिटस, अंतर्गत व्यवस्था आरामदायी झालेली आहे. तरीही त्यातल्या त्यात मला आपली लालपिवळी जुन्या बॉडीची बसच आवडते. जुन्या बसचे सीट सलग आहे. त्यात आशियाड बस सारखी तुटक सीटस असलेली आसनव्यवस्था नाही. ३+२ अशी आसन व्यवस्था जुन्या लाल पिवळ्या बसेस मध्ये असते. सीटस च्या पुढे (अन पुढल्या सीट च्या मागे) एक मोठी आडवी दांडी सलग असते. तिच्यावर डोके टेकून मस्त झोप लागते.
आशियाड अन आताच्या नविन जनता बस मध्ये अशी सोय नाही.
आशियाडमध्ये पुढला आडवा दांडा नसतो. एक छोटे हँडल आहे. सीटही तुटक तुटक असतात. त्यामध्येही हात ठेवण्याचे हँडल बसण्याच्या आड येते. सीटला पायबर मोल्डींग मध्ये बनवत असल्याने घमेल्यासारखा आकार आपल्या सीटच्या सोईसाठी दिलेला असतो. त्यात काही सीट 'मावतात' तर काही बाहेर 'सांडतात'. आशियाड बसमधले प्रवासी शक्यतो शेजार्यांशी बोलत नाही. केवळ नाईलाज म्हणून आम्ही आशियाड 'बस' मध्ये बसतो अन्यथा लक्झरी बस आम्हास परवडते/ आवडते अशी त्यांची गोड तक्रार असते. खरे म्हणजे त्या प्रवाशांनी खाजगी लक्झरी बसची 'गोडी' कधीतरी चाखलेली असते. खाजगी बसच्या प्रवास करण्याच्या वेळेचा भोंगळपणा, वेळकाढूपणा, त्यांचे टेक ऑफ पॉईंट्सवर थांबणे, सक्तीचे 'शहर दर्शन' हे त्यांनी घेतलेले असते. एसटी बस ही त्यातल्या 'दगडापेक्षा मऊ' वृत्तीने अन गॅरंटीड वेळेवर सुटणे-पोहचणे, सुरक्षीत असणे या गुणांवर ते आशियाड मध्ये बसलेले असतात.
एकूणच ज्याने प्रवास केलेला आहे त्याला आशियाड बस पेक्षा लालपिवळी बस चांगली वाटू शकते. लाल पिवळ्या बसमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे पण ते ग्रामिण भागातल्या बसमध्येच. शहरी भागात लालपिवळी बस सुद्धा (तुलनेने) स्वच्छ असते.
गावाकडच्या बसने प्रवास करण हा एक अनुभव असतो. कंडक्टर ड्रायव्हरला त्यांचे नेहमीचे प्रवासी ओळखीचे झालेले असतात. गावात शेवटची बस असेल तर ते अशा प्रवाशासाठी थांबतात. तो आल्यानंतरच बस निघते. बाजाराची बस म्हणजे एक जत्राच असते. भाजीपाला, घरगुती सामानसुमान, फावडे, पहारी, विळे, कुदळ, खताची पोती, चादरी विक्री करणार्यांच्या थैल्या आदी आसनांवर आसनांखाली विराजमान होतात. वरच्या टपावर भाज्यांची मोठी पोती, सायकली, एखादा पलंग ठेवलेला असतो. कंडक्टर त्या सगळ्यांची लगेजची तिकीटे विचारून काढत असतो. त्याचा या गर्दीत हिशेब जुळतो हे पाहून मला तर तो एखाद्या चार्टड अकाउंटपेक्षा मोठा वाटायला लागतो.
तर असे हे एसटी पुराण. यातल्या छोट्या छोट्या एककांबद्दल (units) नंतर कधीतरी लिहू. तुर्तास विस्तारभयास्तव येथेच थांबणे योग्य.
(लेखातील छायाचित्रे त्या त्या संकेतस्थळाच्या सौजन्याने)
- पाषाणभेद
०६/०८/२०१०
Tuesday, January 18, 2011
वाट बघतोय रिक्षावाला
चला सिबीएस, शालिमार...
लगेच निघेल...
चला बसा...
शालिमार... शालिमार...
ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?
विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.
चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?
किती दोन का?
बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
सिबीएस?
पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा
बंदच करतो. ठिक?.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.
चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?
बसा.
हो. तुमाला कुठे जायचे आहे?
त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.
हे काय लगेच. शिट तर भरू द्या.
हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.
नविन आहे का तुम्ही.
पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार ते नविन सिडकोचा आहे.
सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्या दिवशी लेवल करावी लागते.
कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.
पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....
अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?
नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.
चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....
जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.
१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.
अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.
पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....
हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.
चला आता गिर्हाईक आलं. लगेच निघतो बघा.
पवननगर का?
चला बसा.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०८/२०१०
शालिमार चौक, नाशिक
Thursday, January 13, 2011
कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?
आवडते म्हणूनी लोणी मागतो
माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो
उगाच माझी खोडी काढूनी
तुम्ही लोणी मज देत नाही
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?
दही दुध शिंक्यात टांगले
हाती माझ्या न लागे असे ठेवले
संवंगड्यासवे काढाया जाता
म्हणता दही मी चोरून खाई
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?
पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता
उगाचच तुमची वस्त्रे विसरता
न जाणोनी कोठे शोधीता
आळ मजवर मग का घेई?
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०१०
Tuesday, January 4, 2011
मळ्यातली सहल
मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.
आपल्यासाठी काही छायाचित्रे:
मळ्यातले घर
"माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलाय लळा"- यांच्याच ताज्या दुधाचा चहा घेतला
तसच पाळीतो मी रानपाखरं
गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं" (माझ्या जमीनीचं गाणं)
शेती उपयोगी जनावरे कपिला गाय, राजा व सर्जा बैल
"गाय वासरू - .... नका विसरू!"
लावीतो कधिमधी हरभरा
पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर "
८ तुकडे बाजरी लावलेली आहे. मी गेलो तेव्हा निंदणी चालू होती.
बांधावरून फिरतांना राणी कुत्री आमच्या बरोबर आली.
या कुत्रीला माणसांचा फार लळा होता. फोटोसाठी खास पोज दिली तिनं!
हे गावीत काका. हे शेतातच राहतात अन देखभाल करतात. मिरचीला नुकतेच खत टाकलेले होते. त्याची पाहणी चालू आहे.
"एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास" - जनावरांसाठी लावलेला घास
हे मिरचीच्या वावराचे तुकडे. मी गेलो तेव्हा २ हप्ते काढलेले होते.
मिरचीची रोपे
हे आणखी वेगळे रोप मिरचीचे. ही तिखट जातीची अन मोठ्या आकाराची मिरची होती.
गावित काकांनी मग वानोळा घेवून जाण्यासाठी इतक्या मिरच्या तोडल्या की माझ्या मोटरसायकलची डिक्की तर भरूनच गेली. शेवटी मीच काही मिरच्या कमी केल्या.
नंतर गाईचे दुध काढतांना उशीर झाला. अंधारायला आलेले होते. पावसाचे वातावरण असल्याने मी मग घाईघाईने शेतातून निघालो.
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
पडती मनामधी तुफानी पाउस धारा ||धृ||
लाटांवर लाट येई उंच उसळून
तालात त्यांच्या घेई मला लपेटून
भरती आली माझ्या मनाच्या समिंदराला
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||१||
भरल्या वादळी नाव वल्हवू मी कशी
माझ्या होडीची वल्ह दिली तुझ्या हाती
जोशात हाक नाव पोचव सागर तीराला
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||२||
जाळं टाकलं पाण्यात गावंना मला मासोळी
आले तुझ्याच जाळ्यात मीच झाले मासोळी
घरला ने मला बरोबरीनं काढीन जलम सारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||३||
-पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०७/२०१०