Saturday, November 30, 2019

संदीपची हुषारी

"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतन हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला.
"मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत",
सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते.
पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे. त्यांना बोलायलाही सवड नसे. शेतामध्ये ऊस, कांदे अशी पिके ते घेत. झालेच तर सोबतीला टमॅटो, भाजीपालाही करत. शेतीत गडीमाणसे असल्याने त्यांच्यावर फार लक्ष ठेवून कामे करवून घ्यावी लागत. आताची साखर कारखान्यात जाण्याची लगबग म्हणजे तेथे जनरल बॉडी मिटींग होती अन सर्जेराव तांत्रीक संचालक होते. नवीन क्रशर कशापद्धतीने बसवायचा म्हणजे ऊसाचे गाळप वेगाने चांगले होईल यावर त्यांना आज बोलायचे होते.
"आता साखर कारखान्यावर जातच आहात तर या महिन्याची साखरही घेवून या. ड्रायव्हरकडे कार्ड दिलेय मी. तो आणेल. पण त्याला तेवढा वेळ द्या म्हणजे तो गेटवर जाईल अन घेवून येईल", सौ. रंजना सर्जेराव कवडे गृहीणीच्या काळजीने बोलल्या. साखर कारखान्याचे सभासद असल्याने त्यांना दर महिन्याला त्यांच्या शेअर्सवर त्या वाट्याची साखर मिळत असे. आता कारखान्यावर चक्कर होतच आहे तर साखरही आणणे होईल या हिशोबाने त्या बोलल्या.
"आणि हो, संदीपच्या शाळेत या पंधरा तारखेला, पुढच्या आठवड्यात, शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन आहे. कमीतकमी तो दिवस तरी मोकळा ठेवा."
"पाहू. शनिवारचे तसे नियोजन करतो घरीच थांबण्याचे. पण ऐनवेळी काही काम निघाले तर सांगता येत नाही", सर्जेराव सावध बोलले. कामाच्या गडबडीतून बाहेर पडून संदीपचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल का या बाबतीत ते शाशंक होते.
"संदीप घरी आला की त्याला परवा आपल्या फॅक्टरीत मी घेवून जाईन याची आठवण दे", सर्जेराव पायात बूट चढवित म्हणाले अन ड्रायव्हरला गाडी साखर कारखान्याकडे घ्यायला सांगितली.
संदीप - सर्जेरावांचा धाकटा मुलगा इयत्ता आठवीत तालूक्याला जात असे. आपल्या मुलाच्या स्नेहसंमेलनातील नाटकातील भाग वडिलांनी पहावा अशी संदीपच्या आईची इच्छा असल्याने शनिवारी मोकळा वेळ ठेवण्याची तिने सर्जेरावांकडे आग्रह धरला होता. संदीप जात्याच हुषार अन लहाणपणापासून चपळ होता. निरनिराळे खेळ अन अभ्यासात तो दर इयत्तेत त्याची चुणूक दाखवत असे. त्यामुळे चांगले शिक्षण भेटावे म्हणून सर्जेरावांनी त्याला तालूक्याच्या चांगल्या शाळेत घातले होते. अर्थात तालूका अन शाळा फार काही लांब नव्हती. किंबहूना त्यांचे गाव हे तालूक्याच्या गावाचे उपनगरच गणले जात होते. घरापासून शाळा केवळ पाच सहा किलोमिटर अंतरावर होती. शाळेसाठीचे इतके दुरचे अंतर तर शहरातदेखील असते. शाळेत जा ये करण्यासाठी घरापर्यंत शाळेची बस यायची. त्यामुळे त्या बाबतीत संदीपच्या आईला काही काळजी नव्हती. सकाळी डबा घेवून संदीप सात सव्वासातला घरून निघत असे अन दुपारी साडेतीन पर्यंत घरी येत असे. संदीप वेळच्यावेळी अभ्यास करत असल्याने त्याच्याकडे सर्जेराव अन रंजनाबाईंना लक्ष द्यायची गरज नव्हती.
सर्जेराव कामात व्यस्त जरी असले तरी त्यांचे घराकडे लक्ष होते. संदीपपेक्षा मोठी मुलगी दहावीला होती. अन सर्वात मोठा मुलगा इंजिनीअरींग च्या दुसर्‍या वर्गात होता. मोठा मुलगा आपला स्वत:च्या फॅक्टरीकडे बघेल अशा हिशोबाने त्याला मॅकॅनिकल शाखा घ्यायला लावली होती. झालेच तर त्याने पुढे जावून साखर कारखान्यात मशीन पार्ट्स पुरवठा करण्याचे काम मिळवावे अशीही त्यांची इच्छा होती. आतापासून संदीपलाही ते अधून मधून कारखान्यावर घेवून जात असत.
स्नेहसंमेलनातल्या नाटकात भाग घेतल्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर संदीप त्याच्या नाटकातल्या भागाची तयारी करत असे. घराच्या बाजूला अंगणात एका मोबाईलमध्ये नाटकाचे संवाद मोठ्याने लावून तो त्याबरोबर बोलत हालचाली करत असे. बाजूला एक दोन गडी माणसे त्याचे श्रोते होत असत. मग संदीपची आई
कामाचा खोळंबा होत आहे असे पाहून त्या गडीमाणसांना बोलून कामाला लावत असे. या शनिवारचा संदीपचा कार्यक्रम बघण्यासाठी त्याच्या घरातले सदस्य आतूर झाले होते. तो कार्यक्रम पहायला संदीपचा आतेभाऊ सतिश गुरूवारीच आला होता. सतिशदेखील संदीपच्याच वयाचा सातवीतला विद्यार्थी होता. आपल्या मामेभावाच्या तालमीला संध्याकाळी तो हजर होता. संदीपच्या पाठांतराची त्याने जातीने तयारी करून घेतली. पाठांतर अर्थातच छान झाले होते. रात्री जेवण करतांना संदीपच्या वडिलांना उद्या संदीपला सुटी असल्याचे समजले. जेवण संपत आले तेव्हा त्यांनी संदीपला उद्या शुक्रवारी बँकेत एक चेक जमा करायला सांगितला. संदीपला बँकेच्या व्यवहाराची माहिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. संदीपनेही आनंदाने होकार भरला अन जेवणानंतर टिव्ही बघून तो अन सतिश झोपले.
दुसर्‍या दिवशी, शुक्रवारी स्नेहसंमेलनाच्या आदला दिवसाची सुटी असल्याने संदीप जरा उशिरा उठला. आईने केलेला उपमा अन दूध पिवून तो अन सतिश बँकेत जायला तयार झाले. खांद्यावरील बॅगेत त्याने चेकचे पाकीट अन पिण्याच्या पाण्याची बाटली घेतली. मग संदीप आणि सतिश यांची जोडगोळी सायकलीवर बँकेत जायला निघाली. जिल्हा सहकारी बँकेची शाखा तशी जवळच बाजारपेठेतील गल्लीत होती. बैठ्या इमारतीत बँकेचे कामकाज चाले. लहान गाव असल्याने बँकेच्या शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत सारे जण संदीपला सर्जेरावांचा मुलगा म्हणून ओळखतच होते. या आधीही संदीप किरकोळ कामे करायला बँकेत आलेला होता. बाजूला अंगणात वाहने थांबवायची जागा केलेली होती तेथे त्यांनी सायकल उभी केली. मुख्य मार्ग लोखंडी दरवाजा आणि त्याला साखळी अशा रचनेचा होता. तेथे बँकेत सुरक्षारक्षक असलेले रामभाऊ चौरे हे आपली बंदूक घेवून उभे होते. त्यांनी संदीपला आज तुझे बाबा नाही आले का तुझ्या बरोबर? असे विचारून त्याच्या सोबत असलेल्या सतिशची चौकशी केली. त्यांना उत्तर देवून हे दोघे भाऊ आत शिरले. सकाळचे सव्वादहा वाजायची वेळ असल्याने अजून बँकेत फारशी वर्दळ नव्हती. सगळा स्टाफ आलेला होता. मॅनेजरसाहेब त्यांच्या कॅबीनमध्ये कुणाशीतरी बोलत होते. कॅश काऊंटरवर चार पाच जण उभे होते. कॅशीअर कॅश मोजण्याच्या कामात मग्न होता. बाजूला तिन क्लार्क त्यांच्या कामात होते. त्यापैकी दोघांसमोर एक एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली होती.  
संदीपने आपल्या बॅगेतून पेन आणि चेक काढला आणि कॅश काऊंटरच्या बाजूला भरणा करण्याच्या स्लिप असलेल्या टेबलकडे गेला.  सतिशही त्याच्या बाजूला असलेल्या बाकावर बसण्याच्या तयारीत होता. संदीपने बॅग सतिशकडे दिली आणि तो चेक जमा करण्याचे चलन लिहू लागाला. तेव्हढ्यात मुख्य दारातून एक दाढी राखलेला व्यक्ती आत शिरला आणि आत येताच त्याने हातातील पिस्तूल दाखवत ओरडला,
"खबरदार, कुणीच हलू नका. जागेवर उभे रहा. कुणी मोबाईलदेखील काढू नका. नाहक मला गोळ्या झाडाव्या लागतील."
या अशा ओरडण्याने बँकेत उपस्थित असणार्‍या सर्व लोकांच्या मनात भिती दाटली. बँकेत दरोडा पडलेला होता. नक्की काय करावे हे कुणालाच सुचेनासे झाले.
त्यानंतर आलेल्या आणखी दोन जणांनी सुरक्षारक्षक असलेल्या रामभाऊंच्या हातातली बंदूक हिसकावली आणि एकजण त्यांच्या जवळच थांबला. उरलेला दुसरा व्यक्ती मॅनेजरसाहेबांच्या कॅबीनकडे पळाला. कॅश काऊंटरवर त्यांचा एक साथीदार आधीच रांगेत पैसे भरण्याच्या बहाणा करत उभा होता. तो कॅशिअरवर ओरडला, "गडबड करू नको. आहे ती कॅश ड्रावरमधून काढून वर टेबलावर काढून ठेव." त्याने हाततल्या पिशवीत पैसे भरण्याची तयारी केली.
कॅश काऊंटरजवळ हि गडबड उडाली असतांनाच सतिश आणि संदीपने पाहिले की मधल्या मोकळ्या जागेत एक जण हातात पिस्तूल घेवून उभा आहे आणि दुसरा मॅनेजरच्या कॅबीनकडे पळत जात आहे. त्या दरोडेखोराने पळत जावून मॅनेजर साहेबांसमोरील व्यक्तीला खुर्चीतच बसायला सांगितले आणि मॅनेजरसाहेबांना त्यांच्या खुर्चीला दोरखंडाने बांधले. इकडे तो दाढी असलेला इसम हातातील पिस्तूल रोखत कॅशीअरकडे जाण्यासाठी वळाला. तेव्हढ्यात संदीपने त्या दरोडेखोराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून चपळाईने सतिशला बाकावरून उठवले आणि तो बाक मोठ्या ताकदीनिशी त्या पिस्तूलधारीच्या पायाकडे ढकलला. ते ढकलत असतांनाच तो मोठ्याने ओरडला, "सतिश पळ, रामभाऊकाकांना सोडव."
संदीपच्या ओरडण्याने सतिशलाही क्षणभर काय करावे ते समजले नाही. पण तो तात्काळ सावरला आणि दरवाजाकडे पळाला. संदीपच्या आवाजाने आणि सतिशच्या पळण्याने दाढी असलेला दरोडेखोर भांबावला. तेवढ्यात त्याच्या पायांवर संदीपने ढकललेला बाक आदळला. त्या वेदनेने तो कळवळला आणि तोल जावून खाली पडला. तेव्हड्या वेळात सतिश रामभाऊंकडे पोहोचला होता. रामभाऊंची बंदूक घेतलेला दरोडेखोर थोडा आरामातच होता. सतिशने त्याला धक्का दिला. रामभाऊही संधी बघतच होते. त्यांनी तात्काळ शेजारच्या दरोडेखोराकडून आपली बंदूक हिसकावली आणि बंदूकीच्या दस्त्याने त्या दरोडेखोराला मारले. त्याचा ताबा आता रामभाऊंनी घेतला होता.
मुख्य पिस्तूलधारी दरोडेखोर बाकामुळे पडलेला पाहून आणि रामभाऊंनी एका दरोडेखोराला ताब्यात घेतलेले पाहून बँकेच्या दोन कर्मचार्‍यांनी काऊंटरवरून उडी मारून त्याच्या हातातले पिस्तूल ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. बँकेत आलेल्या एका ग्राहकाने त्या दरोडेखोराच्या हातावर जोरदार पाय मारला. त्या दणक्याने ते पिस्तूल त्या दरोडेखोराच्या हातातून गळून बाजूला फेकले गेले. एका कर्मचार्‍याने ते पिस्तूल ताब्यात घेतले.
इतक्या वेळात मॅनेजरसाहेबांनी संधी साधून पायाच्या गुढग्याने त्यांच्या टेबलाखाली बसवलेल्या संकटकाळी सायरन वाजवायचे बटन दाबले. तात्काळ सायरनचा भोंगा वाजू लागला. हे सर्व इतक्या कमी क्षणात घडले की कॅश काऊंटरवरचा आणि मॅनेजर साहेबांच्या कॅबीनमधले दोघेही दरोडेखोर भांबावून गेले. भोंगा वाजायला सुरूवात होताच बँक ज्या रस्त्यावर होती तेथील आजूबाजूच्या दुकानातील लोक काय घडले हे पाहण्यासाठी बँकेच्या दिशेने धावले. त्यात जे पुढे होते त्यांना घडलेला प्रकार तात्काळ लक्षात आला. त्या लोकांनी प्रथम रामभाऊंच्या ताब्यातील दरोडेखोराला पकडले. सर्वत्र आरडाओरड चालू झाली. त्या गर्दीतील कुणीतरी व्यक्तीने पोलीसांना फोन केला.
आता ते चारही दरोडेखोर गावातल्या आणि बँक कर्मचार्‍यांच्या ताब्यात होते. मॅनेजरसाहेबही आता दोरखंडातून सुटलेले होते. बाहेर वाहनाचा सायरन वाजवत पोलीस आले. त्यांनी ताबडतोप परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले आणि चारही दरोडेखोरांना ताब्यात घेतले.
पोलीस इन्स्पेक्टरांना बँकेच्या मॅनेजरांनी घडलेली सारी गोष्ट सांगितली. दरोडेखोर कसे आले, त्यांनी लोकांना कसे धमकावले आणि संदीप व सतिश यांनी ज्या चतूराईने धावपळ करत बाजू उलटवली ते ऐकून इन्स्पेक्टर अगदी आश्चर्यचकीत झाले. इतक्या कमी वयाच्या संदीपने बाक फेकून आपल्या धाकट्या आतेभावाला ज्या सुचना दिल्या ते ऐकून त्यांनी संदीपच्या चतूराईचे कौतूक केले. सतिशनेही त्याची कामगिरी चोख बजावलेली होती. त्याच्या धावपळ करण्याने इतर दरोडेखोरांचे लक्ष पांगले होते. इन्स्पेक्टर साहेबांनी त्या दोघा मुलांचे तोंडभरून कौतूक केले. त्यांनी तात्काळ संदीपच्या वडीलांना फोन करून हि बातमी सांगितली. सरकारदरबारी उच्चपदी या दोन मुलांच्या धाडसाची बातमी मी स्वतः सांगून शुर बालकांसाठी असलेल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस आणि त्यासाठी पाठपुरावा करेन याचे आश्वासन दिले.
दुसर्‍या दिवशी संदीपच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात संदीप आणि सतिशचा भव्य सत्कार करण्यात आला. कधी वेळ न मिळणारे सर्जेराव या सत्कारसमारंभाला आणि संंदीपच्या नाटकाला आवर्जून उपस्थित होते हे सांगणे न लगे.

Monday, November 25, 2019

यशाचे आता गा मंगल गान

यशाचे आता गा मंगल गान

विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान     ||धृ||

बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||

युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी,  ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||

- पाषाणभेद
२५/११/२०१९

Monday, November 18, 2019

वेदनाच मला मिळू दे

नकोत आनंददायी संवेदना
हे प्रभो वेदनाच मला मिळू दे
हरवू दे माझा मी पणा
त्यासाठी मजला धिर दे
सुख असे हे की डाचते मला ते
तेच ते कणखर मनाला पंगू बनवते
भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे
ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही
कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही
तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे
तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या
त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या
घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे
- पाषाणभेद
१७/११/२०१

Tuesday, November 12, 2019

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ||

देशासाठी कितीक झटले
कितीक हुतात्मे अमर जाहले
स्मृती तयांची आज येतसे
स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१||

हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा
गर्जले सैनीक पुढे चला लढा
शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले
ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२||

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||धृ||

- पाषाणभेद
१२/११/२०१९

Monday, November 11, 2019

मी पुन्हा येईन

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील 
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

- पाषाणभेद
११/११/२०१९

आंघोळ : एक कंटाळवाणी क्रिया

सदर लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिपावळी २०१९ च्या दिवाळी अंकात छापला (हार्डकॉपी तसेच सॉप्टकॉपीत) गेला आहे.

(खालील लेख प्रचंड कंटाळवाण्या लेखकाचा अतिप्रचंड कंटाळवाणा आहे अन तो त्याने अगदी आळसात लिहिला आहे. लेख पूर्ण करण्यासही कित्येक दिवस - नव्हे, महिने लागलेले असल्याने तो आपणस कितपत रुचेल हे माहीत नसल्याने आपआपल्या जबाबदारीवर तो वाचावा. झोप येण्यासाठी वाचावयास उत्तम आहे. तरीही धीर करून वाचताना आळस आल्यास जिथल्या तिथेच थांबून एक आंघोळ करून यावी. किमानपक्षी तोंड धुऊन पुन्हा वाचनास बसावे. झालेच तर एक पाभेचा चहा मारावा. त्याही पुढे जाऊन वाचल्यास लेखाखाली प्रतिक्रिया देऊन आपण फारच सक्रिय आहोत असे सिद्ध करायच्या भानगडीत पडून नये. मस्तपैकी आळस करून लेखाला कचर्‍याची कुंडी दाखवावी किंवा ऑनलाइनच्या जमान्यातल्यासारखे 'इग्नोर' मारावे. लेख वाचून प्रचंड कंटाळा आल्यास याच लेखकाचा आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया हा लेख वाचून आंघोळ करून ताजेतवाने व्हावे.)
आंघोळीचा मला फार तिटकारा आहे. अगदी आळसच म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहानपणी मला बळजबरीने आंघोळ घालायचे. ते अगदीच लहानपणी असावे. शालेय वयात कित्येकदा मी आंघोळीची गोळी घेऊन शाळेत गेलो आहे. तसाही प्रत्येक बाबतीत आळस हा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. आंघोळीचेच पाहा ना! ती पाणी गरम करायची प्रक्रिया करा.. इलेक्ट्रिक हीटरचे बटण दाबा.. मग गरम पाणी येईल याची वाट पाहा. गॅस हीटरची तीच तर्‍हा. पूर्वी तांब्याचे बंब असायचे गरम पाण्यासाठी. आता तांब्याचे म्हणजे पाणी पिण्यासाठी तांब्या असतो तो नाही, तर तांबा हा धातू असतो. तुमच्यापैकी कुणी ते पाहिले नसतील. खेडेगावात अजूनही दिसतील. आताशा ते बंब गॅल्वनाइज पत्र्याचे असतात. पूर्वी ते तांब्याच्या धातूचे असायचे. एक दोन-अडीच फुटी उंचीचा अन दीड-पावणेदोन फुटी व्यासाचा तांब्याच्या पत्र्याचा दंडगोल असायचा अन मध्ये एक नळकांडे असायचे. खाली जाळी अन वरती झाकण असायचे. हा संच एका तिवईवर ठेवलेला असायचा. त्यात वरतून थंड पाणी घालण्याची सोय असायची अन खाली नळातून गरम पाणी बाहेर काढता यायचे. मधल्या पोकळ नळकांड्यात वरतून लाकडे टाकायची अन खालून ते पेटवायची, असा प्रकार असायचा.
हे बंब प्रकरण प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळवाणे काम असायचे. नळकांड्याच्या आत जाणारी लाकडे फोडून ठेवा.. ती लाकडे ज्याला बंबफोड म्हणत ते महिन्याच्या हिशोबाने वखारीतून आणा.. त्याचा साठा करा.. सकाळी उठून बंब पेटवा.. सगळ्यांच्या आंघोळी होईतो त्यात वेळोवेळी लाकडे अन थंड पाणी टाकत बसा.. गरम पाणी काढा.. राख काढा.. नसते उपद्व्याप. त्यापेक्षा मस्तपैकी आंघोळ न करता राहिलेले किती उत्तम! नको ती गरम पाण्यासाठी एवढी मरमर अन नको ती आंघोळ. मी तर कित्येक सकाळी अशा न-अंघोळीच्या घातलेल्या आहेत.* (*वाचकहो, हे वाक्य तीन-चार प्रकारे लिहिले होते. पण पुरोगामी टच असल्याचे हे योग्य वाटले आणि हेच कायम ठेवले.)
.
हे झाले बंबाच्या बाबतीत. बंब नसल्यास एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गॅसवर तापवावे लागते.. बादलीतून बाहेरून गार पाणी प्रथम आणायचे.. ते त्या भांड्यात ओतायचे.. मग तापलेले पाणी परत बादलीत घेऊन ती बादली मोरीत नेऊन अंघोळ करायची.. किती ते उपद्व्याप! त्यातल्या त्यात सोलर असेल तर ठीक असते. पण गॅस हीटर असो, सोलर हीटर असो किंवा इलेक्ट्रिकल हीटर असो, त्रास हा असतोच. एक नळ चालू करून ते गरम केलेले पाणी बादलीत काढा अन दुसरा थंड पाण्याचा नळ चालू करून आधीचे गरम पाणी कोमट करण्यासाठी त्यात थंड पाणी मिसळा. त्यासाठी गरम अन थंड पाण्याचे कॉक चालू करावे लागतात. असे दोन दोन नळ - एक गरम पाण्यासाठी अन एक थंड पाण्यासाठी सुरू करावे लागतात. कित्ती कित्ती कंटाळवाणे काम आहे की हा नळ गरम पाण्याचा अन हा थंड पाण्याचा हे लक्षात ठेवणे?* (*मटा - गूगल ट्रान्सलेशन मेथड.) अन त्यातही एक नळ घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने अन दुसरा नळ घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवावा लागतो. म्हणजे ते कंटाळवाणे कामही लक्षात ठेवा. परत गरम पाणी खूपच गरम असेल तर त्यात हात घालून किती गरम आहे ते पाहावे लागते. पुन्हा त्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूप्रमाणे गरमपणाचे प्रमाण कमी जास्त असते. त्या पाण्यात आपल्याला सोसवेल असे थंड पाणी योग्य प्रमाणात मिसळणे खूपच कंटाळवाणे काम आहे.
हे झाले बादलीत पाणी काढण्याबद्दल. शॉवरसाठी हीच क्रिया जास्त कंटाळवाणी होते. न भिजता शॉवरच्या बाहेर राहून दोन्ही नळ योग्य त्या प्रमाणात फिरवायचे. नंतर योग्य तापमानाचे गरम अथवा गार-कोमट पाणी येईपर्यंत वाट पाहायची. सकाळी सकाळी खरोखर कंटाळवाणे काम आहे हे. एवढे केल्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी कामगारांच्या भाषेतल्यासारखी 'चाल' भेटते. तुम्ही म्हणाल की आता बाजारात पाण्याचे तापमान दाखवणारे नळ आले आहेत ते. अहो, पण त्याचे तापमान आधी सेट करावेच लागेल ना? अन निरनिराळ्या ऋतूसाठी निरनिराळे तापमान कसे लक्षात ठेवायचे? आजकाल हवामान इतके बेभरवशाचे झाले आहे की एका दिवशी थंडी, दुसर्‍या दिवशी पाऊस अन तिसर्‍या दिवशी कडकडीत उनही पडते. एवढे कष्ट आंघोळीसाठीच्या पाण्यासाठी घ्यायचे फारच कंटाळवाणे काम आहे.
आता तुमचे (म्हणजे माझ्यासाठीचेच. शास्त्र असते ते म्हणण्याचे.) योग्य तापमानाचे पाणी काढून झाले तर मग प्रत्यक्ष आंघोळीला बसावे लागते. हे आंघोळीला बसणे फारच कंटाळवाणे काम आहे. त्यापेक्षा शॉवरखाली उभे राहणे हे एकदम सोपे आहे. पण शॉवरखाली उभे राहिले अन अंघोळीदरम्यान साबण हातातून सटकला, तर तो उचलायला खाली वाकणे खूपच कंटाळवाणे काम असते. साबण जर लांब घरंगळत गेलेला असला, तर तेथपर्यंत जाणे हे फरशीवरून सटकण्यालाही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे मनात ती धाकधूक असते. जरी डोके धुवायचे नसेल तरी पंचवीस टक्के डोके या शॉवरमुळे भिजतेच भिजते. मग ते आणखी जास्त टक्के डोके भिजणार नाही याची काळजी घेत आंघोळ करावी लागते. त्यापेक्षा पाटावर बसून व बादलीत पाणी घेऊन केलेली आंघोळ परवडते. शॉवरखाली आंघोळ ही जास्त जागरूक राहून करावी लागते अन पाटावर बसून केलेली आंघोळ जास्त आळशीपणात होते, हे माझे निरीक्षण आहे. बसून आंघोळ करण्यात साबण सटकला तर जास्त लांबवर घरंगळत नाही. आपल्या शरीराच्या परीघातच तो पडतो अन त्यामुळे चेहर्‍याला साबण फासला असतानाही अंदाजाने चाचपडत हाताने शोधता येतो. बसून केलेल्या आंघोळीमध्ये डोके ओले करायचे नसल्यास शंभर टक्के आपण त्यात यशस्वी होतो, हा मोठा फायदा आहे. डोके ओले न केल्याने पुढे आंघोळ संपल्यानंतर ते पुसण्याचा प्रश्नच येत नाही. वाचलेला वेळ इतर आळशीपणात घालवता येतो. तसेही डोके धुवायचे असल्यास शॅम्पू, कंडीशनर वगैरेच्या पुड्या ओल्या हातांनी कशा फाडायच्या? हा मोठाच प्रश्न असतो. कारण आंघोळीच्या सुरूवातीला आळशीपणा होत असल्याने त्या पुड्या कातरीने न कापण्याचा आळशीपणा या वेळेपर्यंत नडतो. मग दातांनी त्या पुड्या फाडाव्या लागतात. बसून आंघोळ केल्यास त्या पुड्या वेळेवर हाताशी, किमानपक्षी पायाशी येतात हा मोठा फायदाच आहे. आंघोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे टब बाथ. सर्वसामान्यांना याचा लाभ होत नाही, पण मग एखाद्या हॉटेलातल्या मुक्कामी याची चव बर्‍याच जणांनी चाखलेली असते. हा स्नानाचा एकदम शाही अन एकदम आळशी प्रकार आहे. पूर्ण टब पाण्याने भरून घ्यायचा. मग त्या पाण्यात शिरायचे. गुलाबाच्या पाकळ्या, साबणाचा फेस, जोडीने आंघोळ आदी सिनेमातल्यासारखे प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आलेही असतील.
.
आंघोळ एकदाची संपल्यास पाटावरून उठावे लागते किंवा शॉवरच्या बाहेर यावे लागते. मग टॉवेल शोधणे, अंग, डोके पुसणे इत्यादी क्रिया कराव्या लागतात. परदेशात ( म्हणजे अमेरिका हं) आतापर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवण्यासाठी जसा ड्रायर असतो, तसा माणूस सुकवण्याचा ड्रायर वापरातही आला असावा. मला हे परदेश म्हणजे अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, इंग्लंड आदी उत्तर गोलार्धातील देश फार आवडतात. तेथील थंड हवामानामुळे आंघोळीची गरज नसणे अन आंघोळ न करता आठवडेच्या आठवडे तसेच राहणे किती आनंददायक असू शकते, हे तेथे राहिल्यावरच समजेल.
अशी आंघोळ एकदाची पार पडल्यावर कोरडी अंतर्वस्त्रे परिधान करणे हा एक उपद्व्यापच असतो. अंडरपँटमध्ये पाय घालण्यासाठी एक पाय ओल्या फरशीवर - लादीवर असतो अन एक पाय आधांतरी हवेत असतो. दोन हातातली उघडी अंडरपँट तोंडाचा आ करून पायाचा घास घेण्याच्या तयारीत असते. या वेळी हटकून ओला पाय त्या पँटच्या कापडावर घासला जातो अन ती पँट ओली होते. त्यामुळे पाय लवकर त्यात जात नाही. बाथरूमध्ये शेकडा ६७.८९%* घसरून पडण्याचे प्रकार याच वेळेस होतात. (*अशी आकडेवारी लिहिल्यास अन त्यातही शेकडा, टक्केवारी आकडे वापरल्यास लेखक किती शास्त्रीय विचारसरणीचा आहे यावर वाचकांचा विश्वास बसतो. हे रहस्य मी तुम्हाला आपले जवळचे संबंध आहेत म्हणून सांगितले आहे. इतर कुणाला सांगू नका.)
आंघोळ झाल्यानंतर बाहेर येऊन इतर कपडे घालणे हे एक काम असते. ते आटोपल्यानंतर केस सुकवणे बाकी असते. आळस हा माझा मित्र असल्याने मी जास्त केस ओलेच करत नाही. मग ते कोरडे करणे आठवड्याच्या हिशोबाच्या मानाने कमी होते. तरीही आंघोळ केल्यानंतर किमान केस विंचरावे तर लागतातच. तेल लावणे होत असल्यास हात तेलकट होतात अन मग ते तेलकट हात हँडवॉशने किंवा साबणाने पुन्हा धुवावे लागतात. ते झाल्यानंतर पावडर लावणे, बॉडी डिओ मारणे करावे लागते. ते एक वाढीव काम असते. महिलांच्या बाबतीत नटणे, सजणे आदी प्रकार असल्याने त्याला वेळेचे बंधन नसते.
आपल्याला (की दुसर्‍याला?) कोणता सुवास आवडतो त्या सुवासाची पावडर, डिओ दुकानात जाऊन निवडणे हे आंघोळीच्या अनुषंगाने येणारे कंटाळवाणे काम आहे. साबण निवडतानाही तसेच होते. किती ते साबण, त्याचे प्रकार अन सुगंध! माणूस वेडाच होईल निवडताना. उत्तर कोरियातल्या किम जाँग सरकारने तेथल्या सर्वसामान्य नागरिकांना एकाच रंगाचे - शक्यतो राखाडी रंगाचे अन एकाच प्रकाराचे शर्ट-पँट शिवायची परवानगी दिली आहे. मोदी सरकारनेही या साबण, पावडर अन डिओ-सुगंध तयार करणार्‍या कंपन्यांवर असले निर्बंध येथे लादायला हवे. एकाच आकार, प्रकार अन सुगंधातील साबण, पावडर, शॅम्पू, डिओ तयार करण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी. त्यातून कितीतरी माणसांचे अन स्त्रियांचे मानवी तास/ वेळ या उत्पादनाच्या निवडण्याच्या वेळेतून वाचतील. नागरिक स्वच्छ भारत अभियानात या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करतील. तसेही आंघोळ करणे हे ही स्वच्छ भारतमध्येच गणले गेले पाहिजे. म्हणजे मोदी सरकारच्या अशा आकडेवारीत आणखी भर पडेल अन सरकार या उपक्रमाचे फुगवलेले आकडे ते आणखी फुगवू शकतील.
हे असले आंघोळीदरम्यानचे वेळखाऊ, कंटाळवाणे प्रकार करण्यापेक्षा आंघोळ न करता दिवसच्या दिवस आळशीपणात घालवणे हा एक उत्तम उपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. आंघोळ न करण्यामुळे पाणी वाचवले जाऊन पर्यावरणाच्या संवर्धनास आपण एक प्रकारे मदतच करत असतो.

Saturday, November 2, 2019

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय


चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा
बोल की आता आमचं ठरलयं
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ||

नको कानडी सोन्याचा घास
लावील तो आम्हाला फास
किती मार आता सहन करायचा?
मुकाट अन्याय किती सोसायचा?
सरकारनं अपमानाचं जीणं केलंय
म्हणूनचं आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१||

आमचंच आहे कारवार निपाणी
बिदर खानापूर भालकी
कोणाची टाप नाय म्हणण्याची
बेळगावसगट हे पण घेवूच की
सहीशिक्कामोर्तब आम्ही केलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||२||

आमच्या आजानं खाल्ली काठी
आमच्या बापानं खाल्ली लाठी
नाही घाबरत आम्ही त्याला
जरी पडली ती आमच्या पाठी
तिन पिढ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||३||

कानडी गड्या घे आता ऐकून
सीमाभाग हा माझाच सांगतो ठासून
शस्त्राविना हि लढाई मी लढणार
मराठीभाषीक शेवटी एक होणार
जय महाराष्ट्र कधी बोलतोय असं मला झालंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||४||

- पाषाणभेद
एक नोव्हेंबर (सीमाभागासाठीचा काळा दिवस) २०१९