Monday, September 30, 2019

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात.

एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली. इंद्राने त्याला 'पृथ्वीवर तू चांगले काम करशील अन मगच पुन्हा स्वर्गात येशील', असा उषा:प दिला.

त्यानंतर पृथ्वीवर धुके पसरले. त्या धुक्यातून तो ढग पृथ्वीवरील एका राजाच्या राज्यात मानव रुपाने उतरला. तो आता एक सामान्य मानव झाला होता. राज्यातील एका गावात तो लोहाराचे काम करू लागला. निरनिराळे औजारे बनवणे, घराच्या उपयोगी वस्तू बनवणे असली कामे तो करू लागला. परंतु त्या राज्याची जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली होती. गेली सलग काही वर्षे तेथे पाऊसच पडला नव्हता. पाऊस नसल्याने त्या राज्यात दुष्काळ पडला होता. जनता वाटेल ती कामे करून पोटासाठी अन्न मिळवत होती. रोगराई अन भूक यामुळे जनता चोर्‍या करणे, लुबाडणे या गोष्टी करू लागली होती. राज्यात अदांधुंदी माजली होती. राज्याचे होणारे हाल पाहून राजाला खंत वाटत होती. प्रजेची काळजी घेणारा राजा असल्याने प्रजेची स्थिती पाहून तो दु:खी झाला. जो कुणी राज्याला दुष्काळी स्थितीतून बाहेर काढेल त्याला योग्य ते इनाम देण्याची घोषणा राजाने केली. या लोहाराने ही घोषणा ऐकली आणि राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे असे त्याला वाटू लागले.

दुसर्‍या दिवशी तो तरूण लोहार राजाकडे गेला. राज्याच्या दुष्काळाबद्दल मदत करण्याबाबत त्याने राजाकडे इच्छा प्रगट केली. राजाने त्या तरूणाकडे पाहीले अन राजाला त्याबद्दल आशा वाटू लागली. त्याच्या बाबत राजाचे चांगले मत बनले. राजाने त्याला लागेल ते संसाधने देण्याची तयारी दर्शवली पण दुष्काळ हटला पाहीजे अशी मागणी केली. त्या तरूणाने राज्यातील तरूण आणि शेतकर्‍यांची मदत घेवून झाडे लावण्याची तयारी केली. झाडांसाठी खड्डे खणले. बी बियाणे तयार केले. डोंगरउतारांवर चर खणले. आहे त्या नद्या स्वच्छ केल्या. त्या नद्यांची खोली वाढवली. धरणांतला गाळ काढून तो गाळ शेतांमध्ये टाकला.

या कामानंतरच्या हंगामात पावसाळ्यात त्या राज्यात थोडा पाऊस पडला. त्या तरूणाच्या प्रयत्नाने दुष्काळावर मात करण्याच्या झालेल्या कामांमुळे पाऊस जरी थोडा पडला होता तरी त्या पावसाचे पाणी स्वच्छ अन खोल केलेल्या नद्यांमधून वाहीले. ते पाणी निरनिराळ्या धरणांमध्ये साठून राहीले. राज्यात शेतांमध्ये असलेल्या विहीरींना पाणी लागले. त्या हंगामात शेतात चांगली पिके आली. राज्यातील दुष्काळ हटला. लोकांना खायला अन्न अन जनावरांना चारा भेटू लागला. लोक आनंदाने आणि समृद्धीने राहू लागले. गुन्हेगारी नष्ट झाली. रोगराई पळून गेली. आधीच ठरल्याप्रमाणे राजाने त्या तरूणाला शेतीसाठी जमीन बक्षीस रुपाने एका गावात दिली.

इकडे इंद्र आकाशातून त्या राज्याकडे पाहत होता. तरूणाच्या रुपात शाप असलेल्या ढगाने दुष्काळ हटवण्याचे केलेले प्रयत्न पाहून तो आनंदी झाला. त्याने त्या तरूण असलेल्या सरदार ढगाला शापमुक्त केले आणि पुन्हा वर स्वर्गात बोलवून घेतले. तेव्हापासून तो ढग पावसाचे पाणी घेवून पुन्हा पाऊस पाडू लागला.

३०/०९/२०१९

No comments: