Monday, November 11, 2019

आंघोळ : एक कंटाळवाणी क्रिया

सदर लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिपावळी २०१९ च्या दिवाळी अंकात छापला (हार्डकॉपी तसेच सॉप्टकॉपीत) गेला आहे.

(खालील लेख प्रचंड कंटाळवाण्या लेखकाचा अतिप्रचंड कंटाळवाणा आहे अन तो त्याने अगदी आळसात लिहिला आहे. लेख पूर्ण करण्यासही कित्येक दिवस - नव्हे, महिने लागलेले असल्याने तो आपणस कितपत रुचेल हे माहीत नसल्याने आपआपल्या जबाबदारीवर तो वाचावा. झोप येण्यासाठी वाचावयास उत्तम आहे. तरीही धीर करून वाचताना आळस आल्यास जिथल्या तिथेच थांबून एक आंघोळ करून यावी. किमानपक्षी तोंड धुऊन पुन्हा वाचनास बसावे. झालेच तर एक पाभेचा चहा मारावा. त्याही पुढे जाऊन वाचल्यास लेखाखाली प्रतिक्रिया देऊन आपण फारच सक्रिय आहोत असे सिद्ध करायच्या भानगडीत पडून नये. मस्तपैकी आळस करून लेखाला कचर्‍याची कुंडी दाखवावी किंवा ऑनलाइनच्या जमान्यातल्यासारखे 'इग्नोर' मारावे. लेख वाचून प्रचंड कंटाळा आल्यास याच लेखकाचा आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया हा लेख वाचून आंघोळ करून ताजेतवाने व्हावे.)
आंघोळीचा मला फार तिटकारा आहे. अगदी आळसच म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहानपणी मला बळजबरीने आंघोळ घालायचे. ते अगदीच लहानपणी असावे. शालेय वयात कित्येकदा मी आंघोळीची गोळी घेऊन शाळेत गेलो आहे. तसाही प्रत्येक बाबतीत आळस हा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. आंघोळीचेच पाहा ना! ती पाणी गरम करायची प्रक्रिया करा.. इलेक्ट्रिक हीटरचे बटण दाबा.. मग गरम पाणी येईल याची वाट पाहा. गॅस हीटरची तीच तर्‍हा. पूर्वी तांब्याचे बंब असायचे गरम पाण्यासाठी. आता तांब्याचे म्हणजे पाणी पिण्यासाठी तांब्या असतो तो नाही, तर तांबा हा धातू असतो. तुमच्यापैकी कुणी ते पाहिले नसतील. खेडेगावात अजूनही दिसतील. आताशा ते बंब गॅल्वनाइज पत्र्याचे असतात. पूर्वी ते तांब्याच्या धातूचे असायचे. एक दोन-अडीच फुटी उंचीचा अन दीड-पावणेदोन फुटी व्यासाचा तांब्याच्या पत्र्याचा दंडगोल असायचा अन मध्ये एक नळकांडे असायचे. खाली जाळी अन वरती झाकण असायचे. हा संच एका तिवईवर ठेवलेला असायचा. त्यात वरतून थंड पाणी घालण्याची सोय असायची अन खाली नळातून गरम पाणी बाहेर काढता यायचे. मधल्या पोकळ नळकांड्यात वरतून लाकडे टाकायची अन खालून ते पेटवायची, असा प्रकार असायचा.
हे बंब प्रकरण प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळवाणे काम असायचे. नळकांड्याच्या आत जाणारी लाकडे फोडून ठेवा.. ती लाकडे ज्याला बंबफोड म्हणत ते महिन्याच्या हिशोबाने वखारीतून आणा.. त्याचा साठा करा.. सकाळी उठून बंब पेटवा.. सगळ्यांच्या आंघोळी होईतो त्यात वेळोवेळी लाकडे अन थंड पाणी टाकत बसा.. गरम पाणी काढा.. राख काढा.. नसते उपद्व्याप. त्यापेक्षा मस्तपैकी आंघोळ न करता राहिलेले किती उत्तम! नको ती गरम पाण्यासाठी एवढी मरमर अन नको ती आंघोळ. मी तर कित्येक सकाळी अशा न-अंघोळीच्या घातलेल्या आहेत.* (*वाचकहो, हे वाक्य तीन-चार प्रकारे लिहिले होते. पण पुरोगामी टच असल्याचे हे योग्य वाटले आणि हेच कायम ठेवले.)
.
हे झाले बंबाच्या बाबतीत. बंब नसल्यास एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गॅसवर तापवावे लागते.. बादलीतून बाहेरून गार पाणी प्रथम आणायचे.. ते त्या भांड्यात ओतायचे.. मग तापलेले पाणी परत बादलीत घेऊन ती बादली मोरीत नेऊन अंघोळ करायची.. किती ते उपद्व्याप! त्यातल्या त्यात सोलर असेल तर ठीक असते. पण गॅस हीटर असो, सोलर हीटर असो किंवा इलेक्ट्रिकल हीटर असो, त्रास हा असतोच. एक नळ चालू करून ते गरम केलेले पाणी बादलीत काढा अन दुसरा थंड पाण्याचा नळ चालू करून आधीचे गरम पाणी कोमट करण्यासाठी त्यात थंड पाणी मिसळा. त्यासाठी गरम अन थंड पाण्याचे कॉक चालू करावे लागतात. असे दोन दोन नळ - एक गरम पाण्यासाठी अन एक थंड पाण्यासाठी सुरू करावे लागतात. कित्ती कित्ती कंटाळवाणे काम आहे की हा नळ गरम पाण्याचा अन हा थंड पाण्याचा हे लक्षात ठेवणे?* (*मटा - गूगल ट्रान्सलेशन मेथड.) अन त्यातही एक नळ घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने अन दुसरा नळ घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवावा लागतो. म्हणजे ते कंटाळवाणे कामही लक्षात ठेवा. परत गरम पाणी खूपच गरम असेल तर त्यात हात घालून किती गरम आहे ते पाहावे लागते. पुन्हा त्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूप्रमाणे गरमपणाचे प्रमाण कमी जास्त असते. त्या पाण्यात आपल्याला सोसवेल असे थंड पाणी योग्य प्रमाणात मिसळणे खूपच कंटाळवाणे काम आहे.
हे झाले बादलीत पाणी काढण्याबद्दल. शॉवरसाठी हीच क्रिया जास्त कंटाळवाणी होते. न भिजता शॉवरच्या बाहेर राहून दोन्ही नळ योग्य त्या प्रमाणात फिरवायचे. नंतर योग्य तापमानाचे गरम अथवा गार-कोमट पाणी येईपर्यंत वाट पाहायची. सकाळी सकाळी खरोखर कंटाळवाणे काम आहे हे. एवढे केल्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी कामगारांच्या भाषेतल्यासारखी 'चाल' भेटते. तुम्ही म्हणाल की आता बाजारात पाण्याचे तापमान दाखवणारे नळ आले आहेत ते. अहो, पण त्याचे तापमान आधी सेट करावेच लागेल ना? अन निरनिराळ्या ऋतूसाठी निरनिराळे तापमान कसे लक्षात ठेवायचे? आजकाल हवामान इतके बेभरवशाचे झाले आहे की एका दिवशी थंडी, दुसर्‍या दिवशी पाऊस अन तिसर्‍या दिवशी कडकडीत उनही पडते. एवढे कष्ट आंघोळीसाठीच्या पाण्यासाठी घ्यायचे फारच कंटाळवाणे काम आहे.
आता तुमचे (म्हणजे माझ्यासाठीचेच. शास्त्र असते ते म्हणण्याचे.) योग्य तापमानाचे पाणी काढून झाले तर मग प्रत्यक्ष आंघोळीला बसावे लागते. हे आंघोळीला बसणे फारच कंटाळवाणे काम आहे. त्यापेक्षा शॉवरखाली उभे राहणे हे एकदम सोपे आहे. पण शॉवरखाली उभे राहिले अन अंघोळीदरम्यान साबण हातातून सटकला, तर तो उचलायला खाली वाकणे खूपच कंटाळवाणे काम असते. साबण जर लांब घरंगळत गेलेला असला, तर तेथपर्यंत जाणे हे फरशीवरून सटकण्यालाही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे मनात ती धाकधूक असते. जरी डोके धुवायचे नसेल तरी पंचवीस टक्के डोके या शॉवरमुळे भिजतेच भिजते. मग ते आणखी जास्त टक्के डोके भिजणार नाही याची काळजी घेत आंघोळ करावी लागते. त्यापेक्षा पाटावर बसून व बादलीत पाणी घेऊन केलेली आंघोळ परवडते. शॉवरखाली आंघोळ ही जास्त जागरूक राहून करावी लागते अन पाटावर बसून केलेली आंघोळ जास्त आळशीपणात होते, हे माझे निरीक्षण आहे. बसून आंघोळ करण्यात साबण सटकला तर जास्त लांबवर घरंगळत नाही. आपल्या शरीराच्या परीघातच तो पडतो अन त्यामुळे चेहर्‍याला साबण फासला असतानाही अंदाजाने चाचपडत हाताने शोधता येतो. बसून केलेल्या आंघोळीमध्ये डोके ओले करायचे नसल्यास शंभर टक्के आपण त्यात यशस्वी होतो, हा मोठा फायदा आहे. डोके ओले न केल्याने पुढे आंघोळ संपल्यानंतर ते पुसण्याचा प्रश्नच येत नाही. वाचलेला वेळ इतर आळशीपणात घालवता येतो. तसेही डोके धुवायचे असल्यास शॅम्पू, कंडीशनर वगैरेच्या पुड्या ओल्या हातांनी कशा फाडायच्या? हा मोठाच प्रश्न असतो. कारण आंघोळीच्या सुरूवातीला आळशीपणा होत असल्याने त्या पुड्या कातरीने न कापण्याचा आळशीपणा या वेळेपर्यंत नडतो. मग दातांनी त्या पुड्या फाडाव्या लागतात. बसून आंघोळ केल्यास त्या पुड्या वेळेवर हाताशी, किमानपक्षी पायाशी येतात हा मोठा फायदाच आहे. आंघोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे टब बाथ. सर्वसामान्यांना याचा लाभ होत नाही, पण मग एखाद्या हॉटेलातल्या मुक्कामी याची चव बर्‍याच जणांनी चाखलेली असते. हा स्नानाचा एकदम शाही अन एकदम आळशी प्रकार आहे. पूर्ण टब पाण्याने भरून घ्यायचा. मग त्या पाण्यात शिरायचे. गुलाबाच्या पाकळ्या, साबणाचा फेस, जोडीने आंघोळ आदी सिनेमातल्यासारखे प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आलेही असतील.
.
आंघोळ एकदाची संपल्यास पाटावरून उठावे लागते किंवा शॉवरच्या बाहेर यावे लागते. मग टॉवेल शोधणे, अंग, डोके पुसणे इत्यादी क्रिया कराव्या लागतात. परदेशात ( म्हणजे अमेरिका हं) आतापर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवण्यासाठी जसा ड्रायर असतो, तसा माणूस सुकवण्याचा ड्रायर वापरातही आला असावा. मला हे परदेश म्हणजे अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, इंग्लंड आदी उत्तर गोलार्धातील देश फार आवडतात. तेथील थंड हवामानामुळे आंघोळीची गरज नसणे अन आंघोळ न करता आठवडेच्या आठवडे तसेच राहणे किती आनंददायक असू शकते, हे तेथे राहिल्यावरच समजेल.
अशी आंघोळ एकदाची पार पडल्यावर कोरडी अंतर्वस्त्रे परिधान करणे हा एक उपद्व्यापच असतो. अंडरपँटमध्ये पाय घालण्यासाठी एक पाय ओल्या फरशीवर - लादीवर असतो अन एक पाय आधांतरी हवेत असतो. दोन हातातली उघडी अंडरपँट तोंडाचा आ करून पायाचा घास घेण्याच्या तयारीत असते. या वेळी हटकून ओला पाय त्या पँटच्या कापडावर घासला जातो अन ती पँट ओली होते. त्यामुळे पाय लवकर त्यात जात नाही. बाथरूमध्ये शेकडा ६७.८९%* घसरून पडण्याचे प्रकार याच वेळेस होतात. (*अशी आकडेवारी लिहिल्यास अन त्यातही शेकडा, टक्केवारी आकडे वापरल्यास लेखक किती शास्त्रीय विचारसरणीचा आहे यावर वाचकांचा विश्वास बसतो. हे रहस्य मी तुम्हाला आपले जवळचे संबंध आहेत म्हणून सांगितले आहे. इतर कुणाला सांगू नका.)
आंघोळ झाल्यानंतर बाहेर येऊन इतर कपडे घालणे हे एक काम असते. ते आटोपल्यानंतर केस सुकवणे बाकी असते. आळस हा माझा मित्र असल्याने मी जास्त केस ओलेच करत नाही. मग ते कोरडे करणे आठवड्याच्या हिशोबाच्या मानाने कमी होते. तरीही आंघोळ केल्यानंतर किमान केस विंचरावे तर लागतातच. तेल लावणे होत असल्यास हात तेलकट होतात अन मग ते तेलकट हात हँडवॉशने किंवा साबणाने पुन्हा धुवावे लागतात. ते झाल्यानंतर पावडर लावणे, बॉडी डिओ मारणे करावे लागते. ते एक वाढीव काम असते. महिलांच्या बाबतीत नटणे, सजणे आदी प्रकार असल्याने त्याला वेळेचे बंधन नसते.
आपल्याला (की दुसर्‍याला?) कोणता सुवास आवडतो त्या सुवासाची पावडर, डिओ दुकानात जाऊन निवडणे हे आंघोळीच्या अनुषंगाने येणारे कंटाळवाणे काम आहे. साबण निवडतानाही तसेच होते. किती ते साबण, त्याचे प्रकार अन सुगंध! माणूस वेडाच होईल निवडताना. उत्तर कोरियातल्या किम जाँग सरकारने तेथल्या सर्वसामान्य नागरिकांना एकाच रंगाचे - शक्यतो राखाडी रंगाचे अन एकाच प्रकाराचे शर्ट-पँट शिवायची परवानगी दिली आहे. मोदी सरकारनेही या साबण, पावडर अन डिओ-सुगंध तयार करणार्‍या कंपन्यांवर असले निर्बंध येथे लादायला हवे. एकाच आकार, प्रकार अन सुगंधातील साबण, पावडर, शॅम्पू, डिओ तयार करण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी. त्यातून कितीतरी माणसांचे अन स्त्रियांचे मानवी तास/ वेळ या उत्पादनाच्या निवडण्याच्या वेळेतून वाचतील. नागरिक स्वच्छ भारत अभियानात या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करतील. तसेही आंघोळ करणे हे ही स्वच्छ भारतमध्येच गणले गेले पाहिजे. म्हणजे मोदी सरकारच्या अशा आकडेवारीत आणखी भर पडेल अन सरकार या उपक्रमाचे फुगवलेले आकडे ते आणखी फुगवू शकतील.
हे असले आंघोळीदरम्यानचे वेळखाऊ, कंटाळवाणे प्रकार करण्यापेक्षा आंघोळ न करता दिवसच्या दिवस आळशीपणात घालवणे हा एक उत्तम उपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. आंघोळ न करण्यामुळे पाणी वाचवले जाऊन पर्यावरणाच्या संवर्धनास आपण एक प्रकारे मदतच करत असतो.

No comments: