Friday, September 2, 2011

आंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेदला वाटेवरचा अर्थात प्रेमाला देशाची सीमा नाही


आंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेदला वाटेवरचा अर्थात प्रेमाला देशाची सीमा नाही

प्रमुख भुमीका: राजा, राणी, राजपुत्र, प्रधान, हवालदार, शिपाई, राजपुत्री, कोतवाल, दिवाणजी, हुजर्‍या, हवालदार, भालदार, चोपदार, दासी, नर्तीका, विदुषक, सोंगाड्या आदी.

लेखक, कवी: शाहीर पाषाणभेद

(पडदा उघडतो तेव्हा शाहीर गण सुरू करतात.)
-------------------------
गण
(चाल पारंपरीक)

देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||

रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||

रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी
तुज पुजीतो कलावंत आम्ही
मंगल कार्याआधी
गणाला गावूया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||२||

देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
------------------------
सोबती: वा वा शाहीर, गण तर लई फसकलास झाला. आक्षी आदर्श झाला बघा. मन लई परसन्न झालं. आता परंपरेनुसार गणानंतर गौळण बी झ्याक होवूंद्या. पब्लीक कसं खुष व्हाया पायजेल. आसं खुष, आसं खुष की त्येंनी सगळे घोटाळे, महागाई, प्रेटोल दरवाढ, भारनियमन, मुख्यमंत्री बदलाबदली समदं विसरायला पायजे, काय?

शाहीरः आसं म्हनता. मंग होवून जावूदे!

(बतावणी सुरू होते)

(ढोलकीचा ताल सुरू होतो अन त्या ठेक्यावर डोक्यावर माठ घेतल्याच्या आव आणत मावशी येते.)

मावशी: राधे आगं राधे चल निघ ना बाहेर. आतमधी काय करूं र्‍हायलीय. तिकडं मुन्नी बदनाम व्हईल ना. चल लवकर मथुरेच्या बाजाराला.

राधा: मावशे आगं तुझ्या जिभंला काही हाड हाय का न्हाई. आगं मुन्नी बदनाम कशी गं व्हईल?

मावशी: आगं राधे, तुझ्या आसं उशीर करण्यामुळं मुन्नी गवळणीचं दुध बाजारात विकाया नेण्याच्या आधीच नासलं तर ती बदनाम व्हईल आसं म्हनायचं व्हतं मला. चल आता लवकर. तो दह्याचा माठ घे डोक्यावर आन निघ. म्होरल्या चौकात मुन्नी आन शीला गवळणी वाट बघत असत्याल. तू चल म्होरं मी शब्बो शहाबादीलाबी आनती संगती.
(रंगमंचाच्या एका कोपर्‍यात दोन गवळणी उभ्या आहेत.)

एक गवळण: या बया, मावशी आन राधा काय येईना बया. किती येळ झाला आता.

दुसरी गवळणः मला तर वाटतं मावशीला कुणीतरी भेटल आसल वाटतं अन मावशी बसली आसल. तिला जिथं तिथं बसायची लई वाईट खोड हाय बघ.

मावशी: हे पुरींनो, आले बघा मी. म्या काय शेंट्रल रेल्वे हाय का उशीरा यायला? हि काय राधा बी आलीच. जमल्या ना सगळ्या? मुन्नी, शीला, शब्बो तुमीबी हायेत ना. मला वाटलं तुमी कुठं आयटम डॅन्सलाच गेल्या का काय?

राधा: मावशे आमी सगळ्यांनी दही, दुध, लोणी डोक्यावर घेतलंय. तु ग काय घेतलंस बाजारात विकाया?

मावशी: मला काय विकाया लागत नाही. मलाच कोनी विकत घेतयं का ते पहायला म्या बाजारात चालले. (तोंड वेंगाडून) म्हनं, तु ग काय घेतलंस बाजारात विकाया? कलमाडीची चौकशी करतात तसं तु विचारू राह्यलीस जनूं. चला गं बिगीबिगी.

गवळणः मावशे, जरा हात लाव गं?
(मावशी गवळणीलाच हात लावालया निघते.)

गवळणः ए मावशे आगं म्या माठाला हात लावाया सांगितला, मला नव्हं.

मावशी: मंग त्वा कुठं तसं सांगिटलं. आता लावते माठाला हात. ए बाकीच्या साळकायांनो, तुमी का त्यांड बघून र्‍हायल्यात? चला लवकर. न्हायतर बाजार सापडायचा न्हाई. चला माझ्या मागं, मी व्हती तुमच्याम्होरं.
(सर्व जणी डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेतल्याचा अभिनय करत रंगमंचावर गोल गोल फिरतात. तेवढ्यात पेंद्या येतो.)

पेंद्या: इश्टाप! इश्टाप!! इश्टाप!!!

मावशी: ए मुडद्या काय "इश्टाप इश्टाप इश्टाप" करतूया? इथं काय लपाछपीचा खेळ चालू हाय का?

पेंद्या: इश्टाप इश्टाप इश्टाप म्हंजे विंग्रजीत "Do not Start" आपनबी आता 'हासुरे' विंग्रजीचा क्लास लावलाय सध्या.

गवळणः ये बाबा जरा मराठीत समजल आसं बोल. नायतर मनसे बोलाया लावीन बघ.

पेंद्या: आगं बायांना मराठीत बोलतू "थांबा! थांबा!! थांबा!!"

मावशी: पाळणा "लांबवा लांबवा लांबवा"

राधा: बरं आमी थांबलो. तुझं म्हननं तरी काय ते तर सांगशील? का तुला आमचं दही दुध विकत घ्यायचंय?

पेंद्या: बरूबर. मला तुमच्यावालं दहि दुधच पाह्यजेल. पन विकत नाय काय.

मावशी: आमच्यावालं दहि दुध? येतोस का कोपच्यात? मंग देते तुला माझ्यावालं दहि दुध.

पेंद्या: ये बाबो. (घाबरतो). आगं तुमच्यावालं म्हनजे तुमच्या डोक्यावरल्या माठातलं दहि दुध म्हनायचं व्हतं ग मला.

मावशी: मंग, सरळ बोल की मेल्या. आनं काय रे तू कोन? आन आमाला का अडवितो?

पेंद्या: म्या पेंद्या हाय. आन किसनदेवाचा. म्या सरकारी शेवक हाय. माझ्या ह्या खाकी डेरेसवरनं तुमी वळखलं नाय? आहो खाकी म्हंजे खा की. नाशिकच्या मुन्शिपाल्टीत सरकारी मान्सं येईल ते खात्यात म्हनून आमचा डेरेस चा रंग बी खा की असलाच ठेवलाय. किसनद्येवानं सांगितलय की ह्या वाटनं कोनबी बाईम्हना मानूसम्हना आपाआपलं सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं. म्हजी मराठीत हप्ता भरावा लागलं.

मावशी: आरं तु म्हणतुयास "कोनबी बाईमानूस सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं". माझ्याकडं कायबी सामान न्हाई तर मी जावू का?

गवळणः मावशे तुझ्याकडं कायबी सामानसुमान नसनाका. पन आमाला मथुरेच्या बाजाराला नेयाची जबाबदारी तुझ्याकडं हाय हे विसरली का काय?

मावशी: आग माझे बाई, मी हा पेंद्या किती पान्यात हाय ते पाहन्यासाठी त्याची परीक्षा घेत व्हते.

पेंद्या: तर थोडक्यात तुमी बायांनी इथं टॅक्सच्या रुपात कायतरी द्यायला पाहिजे. आपला टॅक्स वेळेवर भरा व राष्ट्राच्या विकासात सहभागी व्हा. हि सुचना जनहितार्थ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रसारीत. सुचना समाप्त.

राधा: अरे बाबा हा टोल फ्री रस्ता आहे. आताच तर आण्णांनी हजारदा उपोषण करून हा रस्ता टोल फ्री केला होता ना?

पेंद्या: मला बाबा म्हणू नका, आबा म्हणू नका, दादाही म्हणू नका. मी काही पुढारी नाही. मी सरकारी माणूस आहे. अन हा रस्ता मुंबई-पुणे सारखा अजूनही टोलवालाच आहे. याचा वापर करणार्‍यांना टॅक्स द्यावाच लागतो.
(तेव्हढ्यात किसनदेव तेथे येतात.)

पेंद्या: देवा किसनदेवा, या गवळणी ह्या मावशीसंगट सामानासुमानासहीत या रस्त्यानं जात आहेत आन टॅक्सही भरत नाहीत.

किसनदेवः काय ग मावशे, हा काय म्हनतो आहे? अन तुमालातर टॅक्स द्यावाच लागेल. ते माठ खाली ठिवा आधी. किती येळ समईसारख्या उभ्या राहाल. उगाच मानेला आकडन यायची आन मानमोडी व्हायची.

राधा: पन आमी टॅक्स दिलाच न्हाई तर? सोड आम्हाला. येळ व्हतोय बाजाराला.

किसनदेवः तरीबी तुमाला टॅक्स द्यावाच लागल.

मावशी: आग ह्यो आसं नाय ऐकायचा. तु हो मागं. म्याच बघते तो काय म्हनते ते. कारं बाबा, आधीच बाजाराला जायाची येळ निघून गेली. आजकाल पब्लीक मॉलमधीच जातयं दहिदुध घ्यायला. मंग बाजारात कुत्रतरी सापडल का दहि विकाया? आन त्ये परराज्यातले भैये लोकंबी आधीच येतात माल विकाया. सोड आम्हास्नी.

किसनदेवः बरं बरं, तुमची इच्छा दहि दुध द्येयाची नसंल तरीबी ठिक हाय. तुमी मंग एखादं गाणं नाचून दाखवा. मंग आमाला आमचा कर मिळाला आसं आमी समजू. आन कराची रक्कम आमच्या खिशातून सरकारी खजिन्यात जमा करू.

राधा: ठिक आहे. आम्ही नाचतो. पण आम्हाला लवकर सोड.
(राधा अन गवळणी 'वगातली गौळण' सुरू करतात.)

का रे वाट अडवितो नंदाच्या कान्हा
आम्हा जावू दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||धृ||

दुध दही लोणी घेवून डोई
भार आता मला सहवेना
आम्हा दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||१||

राहीले गोकूळ दुर, जवळ नाही बाजार
उगाच छेडाछेडी करू नको ना
आम्हा दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||२||

ठावूक आहे मला, लोणी निमीत्त तूला
आम्हा पासून दुर राहवेना
हे खरे ना, खरे ना, खरे ना ||३||

का रे वाट अडवितो नंदाच्या कान्हा
आम्हा जावू दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||धृ||
(गौळण संपते.)

मावशी: चला ग बायांनो. आधीच उशीर झाला. ते माठ उचला अन चला बिगी बिगी बाजारला.

(सर्व गवळणी माठ उचलतात अन बाजाराला निघतात.)
(सगळे जण विंगेत जातात)
==========================

शाहीर रंगमंचावर येतात व गातात:

भावर्ता देश होता एक नगर त्यात अवंतिपुर
नगर मोठे सुंदर तेथे उंच उंच गोपुर
सोन्याचे कळस मंदिरांना, तोरणं दारोदार
नक्षीदार दिव्यांची झुंबरं हालती घरोघर ||

अवंतिपुर नगरीचा राजा होता चतूरसेन
दिलदार होता राजा उदार त्याचं मन
पसरली होती जगी किर्ती त्याची महान
कहाणी त्याची ऐका आता देवून तुमचे कान || जी जी जी

सेनापती चतुरांगण होता सैन्याचा प्रमुख
युद्धामध्ये जिंकण्याचा चढता होता आलेख
त्याच्या पदरी होते सांडणीस्वार, हत्ती अन घोडे
तसेच होते हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे || जी जी जी
(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
=======================

(रंगमंचावर दरबाराचा देखावा उभा केलेला आहे. राजा इकडून तिकडे फेर्‍या मारत आहे.)

महाराज: अजून कसं कोनी दरबारात आलेलं नाही? (हातावर हात मारतो.) श्या.. घड्याळात दहा वाजून दहा मिन्ट झालीत पन आजून एकबी दरबारी दरबारात नाही? थांबा. मला आता दरबारात पंच कार्ड मशीन न्हायतर अंगठा दाबून हजेरी घेनारं मशीनच लावावं लागलं.

(मोठ्याने आवाज देतो.) परधानजी...ओ परधानजी...

प्रधानजी: मुजरा असावा.

महाराज: असो असो. प्रधानजी, ही काय दरबारात येन्याची वेळ झाली का? आता दहा वाजून गेलं तरीबी दरबारात कोनीच कसं नाही. आन तुमीसुदीक लेट झालात? आता दोन झाडू आणा. एक तुमी घ्या अन एक माझ्या हातात द्या. अन करू सुरूवात आपण दोघं दरबाराच्या साफसफाईला.

प्रधानजी: हो महाराज.

महाराज: अरे परधान हाय का बारदान? मी बोलतो अन तुमी खुशाल हो म्हनताय. काय लाज? काय शरम वाटती का न्हाय?

प्रधानजी: अहो महाराज तुम्ही मला लेट झाल्याचे विचारल त्याला हो म्हटलो. खरं का नाय?

(तेवढ्यात तेथे हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे येतात. ते विनोदाने केवळ हाताचा पंजा खालीवर करून मुजरा करतात.)

हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे: मुजरा म्हाराज. म्हाराजांचा ईजय असो.

महाराजः असो असो.

महाराज: काय परधानजी, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

प्रधाजनी: काय रे, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

हवालदार हातमोडे: शिपाई पायमोडे, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

शिपाई पायमोडे: ठिक हाय हवालदार साहेब.

हवालदार हातमोडे: ठिक हाय परधानजी.

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): ठिक हाय म्हाराज.

महाराज: बरं काय चोरी मारी, खुन दरोडे?

प्रधाजनी: काय रे हातमोडे, काय चोरी मारी, खुन दरोडे?

हवालदार हातमोडे: काय रे पायमोडे, काय चोरी मारी, खुन दरोडे?

शिपाई पायमोडे: आजाबात नाय हवालदारसाहेब

हवालदार हातमोडे: आजाबात नाय परधानजी

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): नाय महाराज, आजीबात नाय.

महाराज: आवं मंग काय बलात्कार, विनयभंग तरी आसलं की?

प्रधाजनी: हवालदार काय बलात्कार, विनयभंग?

हवालदार हातमोडे: शिपाई पायमोडे काय बलात्कार, विनयभंग?

शिपाई पायमोडे: नाय अजाबात नाय साहेब

हवालदार हातमोडे: नाय अजाबात नाय प्रधानजी

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): अजीबात नाय महाराज.

महाराज: अरे हे काय चाललं आहे? मी प्रधानजींना विचारतो आन माझी आरडर लगेच खाली खाली जाते. मग शिपायालाच मी विचारतो डायरेक. तुमच्या मधल्यांचं काय काम रे?

प्रधाजनी: अहो महाराज यालाच तर संसदिय लोकशाही म्हनतात. फार आदर्श राज्यप्रणाली आहे ती. वरपासून फकस्त आरडरीच द्यायच्या. काम काहीच नाही.

महाराज: काय म्हणालात?

प्रधाजनी: काय नाय म्हटलं गुन्हे काहीच नाही महाराज आपल्या राज्यात.

महाराज: असोअसो. म्हणजे राज्यात हालहवाल एकदम ठिक आहे तर.

हवालदार हातमोडे: हो महाराज. एकदम ठिक आहे. सगळीकडे आबादी आबाद आहे. पाउसपाणी अमाप आहे. ४० पाण्याचे टँकर भाड्याने लावले आहेत. चोरी दरोडे खुन काहीच नाही. आणखी १० तुरूंगांना मंजूरी दिली आहे. रोगराई, आजारपण नावालाही नाही. आणखी ३० सरकारी दवाखाने ग्रामीण भागात काढायचे आहेत. गावात मारामार्‍या दंगली अजाबात नाही. तंटामुक्ती अभियान जोरात चालू आहे. लोकसंख्या नियंत्रणात आहे. नसबंदीसाठी माणसं गोळा करायला डॉक्टर लोकं गावोगाव वणवण फिरत आहेत. शिक्षण व्यवस्थीत चालू आहे. शिक्षक लोकं जनगणनेच्या कामात बिजी हायेत, आसलं समदं ठिक चालू आहे, महाराज.

महाराज: असो असो. एकुणच सगळीकडे आबादीआबाद आहे तर मग आमचा विचार आहे की आम्ही आता शिकारीला निघावं.

शिपाई पायमोडे: चला महाराज. आमी तर एकदम रेडी आहोत.

प्रधानजी: अवश्य महाराज. आपण आता शिकारीला गेलंच पाहीजे.

हवालदार: महाराज राज्यात वाघांची पैदास बी लय वाढली हाय. त्यासाठी मी तर कवाच बंदूक तयार ठिवलीय. शिकारी कुत्रे, हाकारे एकदम तयारीत आहे. झाडाला एक वाघबी बाधूंन ठिवेल आहे. तुमी फकस्त जायाचं आन वाघावर गोळी झाडायची की बास. फटू काढायसाठी प्रेस फटूग्राफर बी रेडी हाय. बातमीचा मसूदाबी रेडी हाय. तर कवा निघायचं महाराज?

महाराज: आम्ही आता राणीसाहेबांकडे जातो. थोडी विश्रांती घेतो. अन मग परवा तेरवा निघूना शिकारीला. काय घाई आहे.

हवालदार: महाराज मी बी येवू का तुमच्या संगती रंगमहालात. नाय जरा शेवा करावी म्हनतो मी राणीसाहेबांची...

महाराज (रागाने): हवालदार, काय बडबडत आहात तुम्ही?

हवालदार: अहो राणीसाहेबांची अन तुमची शेवा आसं म्हननार व्हतो मी. आमी तुमचे नोकर हाय ना मग? तुमी पुर्ण बोलूच देत नाई बगा.

महाराज: असो असो.

हवालदार: असो तर असो महाराज.

महाराज: चला तर तुम्ही व्हा पुढे अन शिकारीची तयारी करा. आम्हीही निघतो आता. दरबार बरखास्त झाला आहे.

(सगळेजण महाराजांना मुजरा करतात.)

(हवालदार, शिपाई एका विंगेतून जातात तर दुसर्‍या विंगेतून महाराज जातात.)

(प्रधानजी रंगमंचावर स्वगत बोलत आहेत.)

प्रधानजी (स्वगत): जा जा महाराज तुम्ही शिकारीला जा, राणीसाहेबांकडे जा. तेवढाच वेळ आम्हाला आमच्या चाली खेळण्यात मिळतो आहे. आत्ताच उग्रसेन राजाला निरोप पाठवतो अन त्याला सांगतो की अवंतिपुरावर आक्रमण करण्याला हिच संधी योग्य आहे.

(पंतप्रधान रंगमंचावरून जातो.)
===================================

शाहिर रंगमंचावर येतात व गातात:

चतूरसेनाची पत्नी होती निताराणी सुंदर
अप्सराच जणू स्वर्गीची आली पृथ्वीवर
नाकीडोळी निट तिचे, केस मोठे भरदार
साडीचोळी नेसून ती चाले डौलदार
चतुरसेन, निताराणी राहती नेहमी बरोबर
जीव लावी एकमेकां, प्रेम दोघांचे एकमेकांवर ||

दोघांनाही होता पुत्र नाव त्याचे शुरसेन
राजपुत्र देखणा होता नावाप्रमाणेच शुर
लढाई, घोडेस्वारी, भालाफेक, तलवार
सार्‍या विद्या अवगत, होता त्यात माहिर
होता तो युवक वय त्याचं वीस
हजर राही दरबारी बघे कामकाज || जी जी जी
(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
===================================

( हवालदार व शिपाई फिरत फिरत रंगमंचावर येतात.)

शिपाई: हवालदार साहेब आसं आपन कुठं फिरून राहीलो भटक्या कुत्रावानी? महानगरपालीकेवाले लोकं आले तर नसबंदीसाठी उगाच पकडून घेवून जातील तुमाला. अन मंग माझ्यावरच सगळी जाबाबदारी येईल ना?

हवालदार: आरे शिपाया काय मुर्खासारखं बोलतोया? आरं आपलं महाराज गेलं विश्रांतीला. मंग आपली डूटी नाय का चालू होत? आरं आपन सरकारी मान्स. त्ये बी राजाच्या दरबारची. आरं आपन गस्त घालत आहोत. उगाचच्या उगाच काय फिरत नाय काय आपन.

शिपाई: मी काय म्हनतो आसं फिरून फिरून माझ्या पायाचं पार मोडलंय बघा. आन मला लय भुका बी लागल्यात. मी त्या समोरच्या हाटेलीत जातो आन 'काय शिळंपाकं आसंल तर वाढ रे बाबा' वराडतो.

हवालदार: आरे पायमोड्या, आरं तू सरकारी मानूस आसूनही भिक मागतो पोटासाठी? (पाय वर करत) हानुका तुझ्या गा...

शिपाई (हात पाठीमागे धरून सावरतो): ए बाब्बो!

हवालदार (शिपायाच्या पार्श्वभागावर मारण्याचा अभिनय करत): हानुका तुझ्या गालावर एक चापट? आँ?

शिपाई (हात पाठीमागे नेत 'नको नको' चा अभिनय करत): आहो सायेब, मागल्या सहा महिन्यापासून तुमी आमचा नाष्ट्याचा अलाउंस पास करेल नाय आन मंग आमी कसा नशापानी आपलं नाष्टापानी करावा?

हवालदार: अरे ते काय आपल्या हातात हाय का? आपलं परधानजी कसं हायेत ते तुला चांगलंच ठाऊक नाय काय? तरी बरं, माझ्या शिफारसीवरून येळेवर पगार तरी व्हतेत. बरं मी काय म्हनतो, मला बी लय भुका लागल्यात. मी समोरच्या हाटेलीत जातो आन शिववडा खातो तु बाजूच्या हाटेलीत जा आन कांदेपोहे खावून लगेच ये.

शिपाई: आसं कसं? तुमी येगळी डीश आन मी येगळी डीश कशी खानार? म्या काय म्हनतो त्या समोरच्या हाटेलीत पिझ्झा बर्गर लय भारी मिळतो म्हनं चला तिथंच जावू आपन दोघंबी!

हवालदार: पायमोड्या, आरं आरं बाबा पिझ्झा बर्गर खावून आपल्या ढेर्‍या सुटतील ना? मंग डूटी कशी करता येईल? शुशिलसायेब म्हणत्यात की पोलीसांच्या ढेर्‍या सुटल्यात व्येयाम करा म्हून. त्यापेक्षा त्या झाडाखालच्या हातगाडीवर झुनकाभाकर लय झ्याक मिळती बघ. आपल्या पगारात तेच बसतंय. चल बाबा चल लवकर.

(रंगमंचावर गोल गोल फिरतात. नाष्टा करून परत येतात.)

शिपाई: मी काय म्हनतो हातमोडे साहेब, नाष्टापानी करून पोट थोडं जड झालंया. म्या घरला जातो आन इश्रांती घेतो जरा. काये की बायकोबी परवाच माहेराहून आली ना? कटकट करत होती ती की तुमी काय घरला थांबतच नाही म्हनून.

हवालदार: आसं म्हनतो? ठिक हाय तर मग. मी पण मैनावती कडे जावून थोडा श्रमपरीहार करतो. (विंगेत जातो)

शिपाई: ठिक हाय तुमी मोठे लोकं. तुमी श्रमपरीहार करा मी घरी फकस्त श्रम करतो.

(रंगमंचावरून शिपाई एका विंगेत जातो.)
=======================

(हवालदार हातमोडे मैनावती कडे येतो.)

मैनावती: आता ग बया, लय दिसांनी येळ मिळाला हवालदार सायबांनां?

हवालदार: आगं मी सरकारी मानूस.आमची डूटी चोवीस तास आसती. कवा कधी महालातून बोलावणं यायचं त्याचा भरवसा नाही. म्हणून येळ मिळतो तसं येतो आमी.

मैनावती: तुमी बसा. काय च्या पानी घेनार काय? नाश्टाबिश्टा?

हवालदार: च्या पानी, नाश्टाबीश्टा काय नको आमाला. आमी जेवनच करून जानार आज. लय भुक लागली आमाला.

मैनावती: आसं का? तुमी बाहेर येगयेगळ्या हाटेलीत खानारी मान्सं. निरनिराळ्या चवीची लय आवड हाय तुमाला.

हवालदार: हा ते बी खरं हाय मैनावती. पन म्या काय म्हनतो, तुझ्या हाताची चव लय निराळी हाय. म्हनून तर आमी तुझ्याकडं येतो.

मैनावती: मंग म्या आज तुमाला माज्या हातानं ताट करून भरवीन.

हवालदारः ते ठिक हाय. पन म्या काय म्हनतो, त्ये जेवायच्या आधी एक फर्मास नाचगाणं होवून जावू दे की?

मैनावती: आसं म्हनता? ठिक हाय! ऐका तर मग.

(मैनावती लावणी सुरू करते.)

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवल्याची पैठणी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||धृ||

जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर
नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार
लई दिसांची ईच्छा आहे मनी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||१||

आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा
कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा
आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी
आजच आणा मला येवल्याची पैठणी ||२||

नितळ काया माझी वर तुमची माया
जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया
आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी
आजच आणा मला येवल्याची पैठणी ||३||

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवल्याची पैठणी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||धृ||

(लावणी संपते. माडीच्या खाली गडबड गोंधळ ऐकू येतो.)

हवालदार: मैने, खाली काय गोंधळ चालू आहे गं? आन्नांचं उपोषण सुटलं का मायाबाईंनी राजीनामा दिला का आयपीएलचा धुरळा अजून बसला नाही खाली?

मैनावती: या बया? थांबा मी मावशीलाच पाठवते काय खाली काय झालं ते पहायला.

(मैनाबाई मावशीला हाक मारत विंगेत जाते. शिपाई रंगमंचावर फिरत असतो. तेवढ्यात मावशी पळत पळत येते अन हवालदारावर आदळते.)

हवालदार: ये बाबो! काय मावशे, केवढ्यानं आदळलीस तू माझ्यावर! मला वाटलं की इमान बिमान पडलं की काय?

मावशी: अहो बातमीच येवढी भयानक आहे की मला तर काहीच सुचेनासं झालंय. (हवालदाराच्या छातीवर डोकं टेकवते.)

हवालदार (घाबरून दुर होत): बरं, बरं नक्की काय झालं ते तर सांग.

मावशी: अहो व्हायंच काय? आपल्या राज्यावर शेजारच्या राज्याचा राजा उग्रसेन याचं सैन्य युद्धासाठी चाल करून येतोय अशी खबर हाय . म्हणून सगळे लोकं खाली चौकात घाबरून एकत्र झालेत.

हवालदार: अरे बाब्बो, हि तर लईच भयानक बातमी हाय ना. मग हे आधी नाही का सांगायच? चला आता आमाला युद्धाला निघावं लागलं.

(तेवढ्यात मैनावती तेथे येते.)

हवालदारः मैनावती आम्ही युद्धाला निघालो. चल आम्हाला धीरानं निरोप दे.

मैनावती: हवालदार साहेब, तुमी विजय मिळवून परत या. तवर मी तुमची वाट पाहीन.

(हवालदार एका विंगेत तर मैनावती, मावशी दुसर्‍या विंगेत जातात.)
=============================

(दरबार. दरबारात महाराज, पंतप्रधान, हवालदार शिपाई, राणी, राजपुत्र, चतुरांगण आदी चिंतीत मुद्रेने एकत्र बसलेले असतात.)

महाराज: आपल्या राज्याच्या शेजारचा राजा उग्रसेन अवंतिपुरावर चाल करून येतो आहे. आपण त्याच्याशी प्राणपणानं युद्ध केले पाहिजे. उग्रसेन अशा प्रकारे दगा देणार याची आम्हाला शंका कशी आली नाही याचेच आम्हाला नवल वाटते आहे. सेनापती चतुरांगण तुम्ही हवालदार, शिपाई व इतर सैन्याला घेवून राज्याच्या सीमेवर लढाईला निघा. आम्हीही जातीनं युद्धाला येण्याची तयारी करतो.

पंतप्रधान (मनातल्या मनात): आता कशी तयारी करतात तेच बघतो. म्हणे युद्धाला येण्याची तयारी करतो. हॅ.

राजपुत्र शुरसेन: बाबा, आम्हीही युद्धावर येणार अन त्या उग्रसेनाचा कायमचा बंदोबस्त करणार. आम्हालाही आपल्याबरोबर रणांगणावर येण्याची आज्ञा असावी.

निताराणी: बाळ शुरसेन, अरे तू अजून लहान आहेस युद्धावर जाण्यासाठी.

राजपुत्र शुरसेन: नाही आई. आम्ही आज वीस वर्षांचे आहोत म्हणजे काही लहान नाही. माझ्याही हातात बळ आहे ते उग्रसेनाला दाखवतोच.

महाराज: शुरसेन, अरे तुझी आई बरोबर बोलत आहे. तु तुझ्या राणीसरकारांबरोबर इथंच थांबावं. तुमच्या दोघांबरोबर प्रधानजी आहेत. अन बरं का प्रधानजी आमच्या माघारी आमच्या राज्याची निट काळजी घ्या.

पंतप्रधान: महाराज तुमी युद्धाला निवांत मनानं निघा. तुमच्या माघारी आमी राज्याची, राणीसरकारांची अन राजपुत्राची निट काळजी घेवू. तुमी काहीही काळजी करू नका.

महाराज: तर मग आजच युद्धभुमीवर निघण्याची तयारी करा.

निताराणी: काळजी, चिंता, युद्ध देवादिकांनाही चुकले नाही. आपण तर मानवप्राणी आहोत. महाराज आम्हाला फार काळजी वाटते. आपल्या राज्यावर शत्रूने आक्रमण केले आहे त्यामुळे तुम्ही युद्धावर जावू नका असे मी म्हणणार नाही. तुम्ही शत्रूवर विजय मिळवून लवकरात लवकर परत या. विजयानंतर मी तुमची पंचारतीने ओवाळण्याची वाट पाहीन.

प्रधानजी: राणीसरकार तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना. महाराज तुम्ही नक्कीच विजयी होवून परत याल, हो ना महाराज?

महाराज: हो हो, नक्कीच. चला तर आम्ही निघतो. आमच्या माघारी राज्याची निट काळजी घ्या. चला.

(सर्व जण महाराजांना मुजरा करतात अन युद्धभुमिवर निघतात.)


(प्रथम प्रवेशानंतरचा पडदा पडतो. मध्यंतर........ )

=========================

(दुसरा प्रवेश सुरू होतो.)

शाहिर रंगमंचावर येतात व गातात:

हा होता क्रौंधनिती, अवंतिपुरचा पंतप्रधान
खल कपट कृरकर्मा असले त्याचे गुण
राजा किर्तीमान पण दुष:किर्ती होती पंतप्रधानाची
अनीतीने तो वागे लुबाडणूक करी प्रजेची ||

उग्रसेन राजा होता उग्रनगरीचा
शेजार होता त्याला अवंतीपुराचा
कमालीचा उग्र राजा त्याची लई मोठी हाव
जमीनजुमला राज्यवाढवणे हेच त्याला ठाव ||

आता त्याने रचला अवंतिपुरावर हल्याचा डाव
सैन्याने तयारी केली अन सुरू केला सराव
हातमिळवणी केली त्यांने कपटी क्रौंधनितीशी
भ्रष्ट पंतप्रधान पाडेल का चतुरसेनाला तोंडघशी?
ऐका सज्जन नरनारी तुम्ही बसले सामोरी
वगनाट्य पाषाणभेद शाहीराचे
सादर करतो रंगमंदिरी || जी जी जी

(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
=====================

(बॅकग्राउंडला तलवारींचा खणखणाट. आरोळ्या, मारा, तोडा असले आवाज. तोफा बंदूकांचे आवाज होत असतात.)
(एखाद्या मिनीटाच्या अंतराने रंगमंचावर राजा चतूरसेन आणि चतुरांगण, हातमोडे, पायमोडे, अंगरक्षक आदी शत्रूच्या सैन्याच्या गराड्यात आहे असे दिसते. शत्रूसैन्याचा सेनापती त्याला दोरखंडाने बांधतो.)

हवालदार हातमोडे: अरे मुर्दाडांनो, हिंमत आसल तर मला मोकळं सोडा अन मग दावतो माजा हिसका. (शत्रूसैन्याकडून सुटण्याचा असफल प्रयत्न करतो.)

शिपाई पायमोडे: हवालदार साहेब बोलतात ते बरोबर हाय. वाघाला जाळ्यात पकडल्यावानी आमची अवस्था केलीया जनू तुमी लोकांनी.

शत्रूसैन्याचा सेनापती: ए! गप बसा रे सारे. महाराज चतुरसेन, आमचा विजय झालेला आहे. आम्ही तुमाला युद्धकैदी केलं आहे.

चतुसेन महाराज: अरं हॅट, म्हणे विजय झालेला आहे. अजून आमच्या राजधानीत प्रधानजी अन माझा मुलगा शुरसेन बाकी आहेत म्हटल. ते नक्कीच याचा बदला घेतील अन आम्हाला सोडवून विजय मिळवतील.

(तेथेच उग्रसेन राजा टाळ्या वाजवत येतो. )

उग्रसेन राजा: वा वा वा. सेनापती, तुम्ही महाराज चतुरसेनांना कैद करून चांगलीच कामगिरी केली आहे. आता बाकीची कामगिरी आमचे मांडलीक झालेले अवंतिपुरचे प्रधानजी क्रौंधनिती करतील.

महाराज चतुरसेन: काहीही काय बोलत आहेत उग्रसेन तुम्ही? बाकीची कामगिरी काय? मांडलीक झालेले अवंतिपुरचे परधानजी क्रौंधनिती काय?

उग्रसेन राजा: आम्ही बरोबर बोलत आहोत महाराज चतुरसेन. अहो तुम्हाला शिकारी करण्याचा लय छंद होता. त्यामुळं तुमाला तुमच्या राज्याकडं लक्ष देता आलं नाही. म्हणूनच तुमचे प्रधान क्रोंधनिती आम्हाला येवून मिळाले. आता आम्ही त्यांना आमचं मांडलीक केलेलं आहे. गुमान आता तुम्ही आमच्या तुरूंगाचा पाहूणचार करावा. तिकडं तुमच्या राणीसरकार अन राजपुत्राची काळजी प्रधानजी घेतीलच. चला. तुरूंगात डांबारे सगळ्यांना.

(महाराज चतुरसेनांना कैद करून सगळे जण रंगमंचावरून विंगेत जातात.)
==========================

(अवंतिपुरचा महाल. निताराणी खिडकीपाशी काळजीने उभी आहे. राजपुत्र शुरसेन तेथे येतो.)

शुरसेन: आई, तू काय काळजी करते. बाबा युद्धावरून लवकरच जिंकून परत येतील.

(प्रधान क्रौंधनिती मोठ्यानं हसत हसत तेथे येतो.)

प्रधानजी: हा हा हा हा हा... शुरसेना, अरे तुझे बाबा युद्ध हरले आहेत. त्यांना उग्रसेनाने कैदी केलं आहे. अवंतिपुरावर आता माझा ताबा आहे अन तुम्ही दोघंही माझे कैदी झालात. अवंतिपुरावर आमचीच सत्ता राहील.

निताराणी: अरे निचा. तुझा हा डाव माझ्या कसा लक्षात आला नाही.

प्रधानजी: म्हणूनच आता तुम्ही आमचे कैदी झालात. चला आम्ही तुमची तुरूंगात निट काळजी घेवू.

शुरसेन: प्रधानजी, खाल्या मिठाला तूम्ही जागला नाही. आम्ही तुमचा बदला जरूर घेवू.

प्रधानजी: अरे जा जा. अजून तुझे दुधाचे दातही पडलेले नाहीत अन म्हणे बदला घेवू. कोण आहे रे तिकडे? राणीसाहेबांना अन राजपुत्रांना कैद करून तुरंगात डांबा.

(दोन शिपाई राणीसाहेबांना अन राजपुत्रांना कैद करून घेवून जातात.)

राजपुत्र शुरसेन: हे बरोबर नाही परधानजी. आम्ही तुमचा बद्ला जरूर घेवू हे लक्षात ठेवा.

(शिपाई राजपुत्राला कैद करून घेवून जातात. राजपुत्र ओरड्त विंगेत जातो. प्रधानजी मोठ्यानं हसत दुसर्‍या विंगेत जातात.)
================================

(राजपुत्र तुरूंगात आहे. राणीसरकारही दुसर्‍या तुरूंगात आहेत.)

(दृष्यः तुरूंगातला राजपुत्र रात्री झोपेत असलेल्या तुरूंग रक्षकाकडच्या किल्या पळवतो व तुरूंगाचा दरवाजा उघडून पळतो. फाटलेले कपडे, वाढलेली दाढी अशा अवस्थेत राजपुत्र शुरसेन उग्रनगरीत प्रवेश करतो.)

राजपुत्र शुरसेन (स्वगत): चला एकदाची सुटका करून आपण उग्रनगरीत प्रवेश तर केला आहे. काहीतरी अक्क्लहुशारीने आता उग्रसेनाच्या महालात प्रवेश मिळवून वडिलांची सुटका करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. सर्वात पहिल्यांदा माझा अवतार बदलून चांगले कपडे घातले पाहिजे.

(उग्रसेनाचा दरबार. दरबारात मंत्री तसेच उग्रसेनाची मुलगी सुनयना उपस्थीत आहेत. राजपुत्र शुरसेन एक शत्रविक्रेता बनून आलेला आहे.)

राजपुत्र शुरसेन: मुजरा महाराज. मी शारंगधर एक शत्रविक्रेता आहे. देशोदेशी मी चांगल्या दर्जाची, आधुनिक शत्रे विकत असतो. आपणही माझ्या गोदामातील धारदार तलवारी, ढाली व बंदूका बघाव्यात.

राजा उग्रसेन: वा वा, आम्हाला शत्रास्त्रांचा मोठा शौक आहे. बरं झालं तुम्ही आलात ते. आता आलाच आहात तर आजच्या दिवस मुक्कामाला थांबा आमच्या राजमहालात. उद्या सकाळी आपण तुमच्या शत्रास्त्रांच्या कोठारावर जावू अन खरेदी करू. बरं, ही आमची राजकन्या सुनयना. बाळ तू आज यांची व्यवस्था बघ बरं.

राजकन्या सुनयना: हो बाबा. मी यांची व्यवस्था बघते. चला शारंगधर, तुमच्या विश्रांतीची सोय करून देते.
============================

(सगळे जण विंगेत जातात. दुसर्‍या विंगेतून शारंगधर (राजपुत्र शुरसेन) व राजकन्या सुनयना येतात.)

सुनयना: शारंगधर, ही तुमची खोली.

शारंगधर: वा वा. छानच आहे ही खोली. पण मी शिपायाकडून असे ऐकलेय की या खोलीपासून जवळच राजकैद्यांना ठेवण्याचा तुरूंग आहे म्हणे?

सुनयना: काही काळजी करू नका तुम्ही शारंगधर. घाबरू नका (हसत) अहो ते तुरूंगातले कैदी काही तुरूंग फोडून तुमच्याकडे येणार नाहीत.

शारंगधर: हो ते पण खरं आहे म्हणा. पण मी कैद्यांना थोडा घाबरतो, म्हणून विचारतो आहे.

सुनयना: एक शस्त्र विकणारा अन तुरूंगातल्या कैद्यांना घाबरतो! मला खरं वाटत नाही. आणखी एक, तुम्हाला दरबारात बघितल्यापासून मला सारखी शंका येते आहे. राग येणार नसेल तर विचारू का?

शारंगधरः अहो तुमचा कसला राग. बिनधास्त विचारा जे काय विचारायचे ते.

सुनयना: तुमच्या बोलण्यावरून अन दिसण्यावरून तुम्ही काही शत्रांस्त्रांचे व्यापारी दिसत नाही. तुम्ही खरंच कोण आहात?

शारंगधर: सुनयना, तुला खरं सांगण्यात आता काही हरकत नाही. मी तुमच्या शेजारच्या राज्याचा, अवंतिनगरीचा राजपुत्र शुरसेन आहे. तुझ्या वडिलांनी आमच्या राज्याव्रर हल्ला केला अन माझ्या वडिलांना त्यांच्या अंगरक्षकांसहित कैद केले. तिकडे आमचे प्रधानजी तुमचे मांडलीक झाले अन त्यांनी मला व माझ्या आईला कैद करून तुरूंगात टाकले. एके दिवशी मी तुरंगातून माझी सुटका केली अन येथे आलो. आता माझे एकच लक्ष आहे. माझ्या वडिलांची सुटका करायची. त्यानंतर आईची सुटका करून आमचे राज्य मला परत मिळवायचे आहे.

सुनयना: शुरसेन, दरबारात पाहिल्यापासून तु मला आवडला आहे. माझ्या वडिलांना संपत्तीचा, जमीनजुमल्याचा फार हव्यास आहे. शेजारच्या राजाची संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी माझा विवाह शेजारच्या वृद्ध राजाशी करून देण्याचा हट्ट धरला आहे. मी पण तुझ्याबरोबर आहे शारंगधर. तुझ्या वडिलांची सुटका करण्यात मी तुला मदत करते. आजच रात्री मी तुरूंगाच्या किल्या मिळवते व तुझ्या वडिलांची, अंगरक्षकांची सुटका करते.

शुरसेन: सुनयना, माणसाचा हेतू चांगला असला की परमेश्वर त्याला मदत करतो असे म्हणतात. तुझा मला मिळालेला पाठिंबा पाहून मलाही तसेच वाटत आहे. मी मध्यरात्री मुख्यद्वाराजवळ थांबतो. तेथेच तुम्ही सगळेजण या. आणखी एक, मलासुद्धा तुझा उमदा स्वभाव आवडला आहे. तु आमच्याबरोबर अवंतिपुरला आलीस तर मला आनंद होईल. आपले लग्न तेथेच करावे अशी माझी ईच्छा आहे. तुझी काही हरकत तर नाही ना?

सुनयना: नाही माझी कसलीच हरकत नाही. अरे तुझ्यासारखा शुरविर राजपुत्र मला मिळतो आहे हा खुप मोठा आनंद आहे. नंतर मी माझ्या वडिलांची समजूत घालीनच. ठिक आहे तर मग आज रात्री ठिक बारा वाजता मी तुझ्या वडिल व इतरांना घेवून मुख्यद्वाराजवळ येते. तु पण तेथेच थांब. आता तू आराम कर. येते मी.

(सुनयना, शुरसेन वेगवेगळ्या विंगेत जातात.)
=========================

(इकडे रात्री सुनयना राजा चतूरसेनाची त्याच्या अंगरक्षकांसहीत सुटका करते व ते सगळे मुख्यद्वाराजवळ येतात.)

सुनयना: शुरसेना, ठरल्याप्रमाणे मी तुझ्या वडिलांची सुटका केली आहे.

शुरसेन: बाबा!! (आनंदानं त्याच्या वडिलांना मिठी मारतो.) चला बाबा, आता तुमची सुटका झाली आहे. लवकरात लवकर आपण सगळे वेशांतर करून अवंतिपुरला निघूया. तिकडे भ्रष्ट प्रधानाने आईला तुरूंगात डांबलेले आहे. तिची सुटका केली पाहीजे.

महाराजः काय, क्रोंधनितीने राणीसरकारांना तुरूंगात डांबलेले आहे? हा अस्तनीतला निखारा आपलाच वैरी झाला. निच, पाजी हरामखोर पंतप्रधानाचा चांगलाच बदला घेतला पाहिजे.

हातमोडे हवालदार: चला चला महाराज. मलाही त्या प्रधानाचा बदला घेतला पाहिजे. त्याच्यामुळेच हे सगळं झालंय.

पायमोडे शिपाई: चला महाराज, मलाही माझा टिए, डीए, जेवणाचा भत्ता मंजूर न केल्याचा बदला घ्यायचा आहे. लयी सळवलं व्हतं त्या परधानानं.

(सर्वजण विंगेत जातात.)
==========================

(दृष्य: वेशांतर केलेले सारे जण- महाराज, राजपुत्र शुरसेन, राजपुत्री सुनयना व चतूरसेनासहीत अंगरक्षक, हातमोडे हवालदार, पायमोडे शिपाई अवंतिपुरला येतात. राजमहालात प्रवेश करतात.)

प्रधानजी: हे काय! महाराज तुम्ही कैदेतून सुटून आलेले दिसतात! (तलवार काढतो)

महाराज: (तलवार काढत चवताळून) कपटी प्रधाना, आता तुझा खेळच संपवतो.

शुरसेनः महाराज, याचा वध माझ्याच हातून लिहीलेला आहे. तुम्ही बाजूला व्हा बाबा.

(शुरसेनाची परधानाशी लढाई होते. त्या लढाईत शुरसेन प्रधानाला ठार करतो.)

शुरसेनः बाबा, आता कपटी प्रधान क्रौंधनितीचा वध झालेला आहे. लगेच चला. आपण तुरूंगात असलेल्या आईची सुटका करण्यास जावू.

(सगळे जण विंगेत जातात.)
================================

(महाराजांचा दरबार. महाराज चतुरसेनासहित सारे जण राजवेशात.)

चतुरसेन: चला सगळे आता एकत्र आलेत. आपलं राज्यही पुन्हा आपल्याला मिळलं आहे. राजपुत्र शुरसेन, हे सगळे तुझ्या शुरपणामुळे झालेले आहे.

निताराणी: हो हे खरेच आहे. माझा मुलगा शुर आहे, हुशार आहे. अक्कलहुशारीने त्याने सगळे जमवून आणलेले आहे. अन ही मुलगी कोण आहे रे बाबा ते तर सांगशिल की नाही?

शुरसेन: आई मी काही सगळे जमवलेले नाही. हे सगळं या मुलीने जमवून आणलं आहे. ही शेजारच्या राजाची म्हणजे आपल्या शत्रूची मुलगी सुनयना.

निताराणी:(आश्चर्याने) काय उग्रसेनाची मुलगी? अन ती येथे कशी?

चतूरसेन: मी सांगतो राणीसरकार. अग ह्या सुनयनाने अन शुरसेनाने सुत जमवले. अन मग दोघांनी माझी सुटका केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी येथे येवून शुरसेनाने भ्रष्ट प्रधानाचा वध करून तुझी सुटका केली. अन बरं का राणीसरकार, आता ते दोघंही लग्न करणार आहेत.

हातमोडे: मंग राणीसरकार, आहे की नाही हुशार तुमचा मुलगा अन सुन!

निताराणी: हो तर आहेच आपला मुलगा अन सुन हुशार. हो की नाही महाराज? चला एखादा चांगला मुहूर्त पाहून लग्न उरकून टाकू दोघांचं.

चतूरसेन: हो तर. आणि त्याच दिवशी राजपुत्र शुरसेनाचा राज्याभिषेक करून आम्ही राजा करणार आहोत.

शिपाई पायमोडे: काय महाराज, म्हणजे लग्नाचे लाडू अन राज्याभिषेकाची मिठाई एकाच दिवशी का? नाय म्हणजे येगयेगळ्या दिवशी हे समारंभ ठेवले असते तर दोन दिवसांची जेवायची सोय झाली असती. काय?

(सगळे जण हसत हसत असतांना पडदा पडतो.)
===============================

(उग्रसेनाचा दरबार. एक शिपाई सुनयनाच्या लग्नाची बातमी आणतो.)

शिपाई (मुजरा करत): महाराज महाराज, राजपुत्री सुनयना अवंतिपुरचा राजपुत्र शुरसेनाशी लग्न करणार आहे अशी बातमी आहे.

उग्रसेन: काय! सुनयना अन शुरसेनाचं लग्न! आमचा तर विश्वासच बसत नाही. सुनयना पळून गेली हे एकवेळ ठिक होतं पण आता शुरसेनाशीच लग्न! नाही.....(उद्विग्न होतो.).....
....हं.... (पश्चातापाने) तिचंच बरोबर आहे म्हणा. मी मुर्खपणामुळे अन संपत्तीच्या हव्यासामुळे तिचं लग्न शेजारच्या वृद्ध राजाशी लावून देत होतो. मला माझ्या मुर्खपणाची लाज वाटते आहे. ते काही असो, माणसाच्या संपत्तीच्या हावेला सीमा नसते तसेच प्रेम करण्यासाठीही देशाच्या सीमा त्यावर बंधन आणू शकत नाही. प्रमाला देशाची सीमा नाही हेच खरे. चला सुनयना चांगल्या राजघराण्यात पडली हाच आनंद आहे....
......(हाक मारतो) दिवाणजी....अहो दिवाणजी....

दिवाणजी: जी महाराज....

उग्रसेन: आताच्या आता अवंतिनगरीला निरोप पाठवा की आम्हाला आमच्या वागणूकीचा पश्चाताप झालेला आहे. आमचे राज्य आम्ही अवंतिपुरात विलीन करत आहोत अन राजपुत्र शुरसेनाचा जावई म्हणून स्विकार करत आहोत. अन त्यांना असाही निरोप पाठवा की, हा शानदार लग्नसमारंभ उग्रनगरीतच होईल म्हणून.

(दरबारातील सगळेजण आनंदाने अन आश्चर्याने महारांजकडे पहातात.)

दिवाणजी: जशी आपली आज्ञा महाराज.

उग्रसेन: चला सगळेजण झाडून लग्नाच्या तयारीला लागा. इतर सगळ्या राज्यांना विवाहाचे निमंत्रण पाठवा. अन आपल्या राज्यातली सगळी प्रजा लग्नाला हजर पाहिजे. काय हवे नको ते जातीने पहा दिवाणजी. चला लागा कामाला.

दरबरातील सगळे जण: महाराजांचा विजय असो.

(मुजरा करतात अन विंगेत जातात.)
=========================
(विंगेतून सगळे कलाकार रंगमंचावर येतात. त्यात राजपुत्र शुरसेन व सुनयना वधुवराच्या वेशात आहेत. गळ्यात फुलांच्या माळा आहेत. सर्व कलाकार भैरवी होत असतांना हात जोडून उभे राहतात.)

भैरवी:

गणेशा, नमन करतो,
आशीर्वाद द्या द्या ||
कलावंत आम्ही,
कला सादर केली
गोड मानूनी घ्या घ्या ||
(भैरवी होत असतांना पडदा पडतो)

समाप्त.
{{ सदर वगनाट्य रंगमंचावर सादर करतांना फार मोठेमोठे सेट, सजावट असण्याची आवश्यकता नाही. प्रस्तूत वगनाट्यात लावणी, गण गौळण आहे. प्रयोग करतांना मुळ नाट्याचे भान ठेवून इतर अ‍ॅडिशन्स टाकल्या तरी चालतील.

प्रस्तूत वगनाट्यात प्रसंगानुरूप अजून काही लावण्या टाकता येतील. त्या परिशिष्ठात आहेत. }}

- पाषाणभेद
०८/०४/२०११

No comments: