Friday, May 20, 2011

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

हिरो:
तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब
तुझ्या डोईचे केस हाय लांब
तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग
तू कोनाची प्वार हाय सांग ||१||

हिरोईन:
तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब
वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब
माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम
माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२||

हिरो:
तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं
पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चालन्यानं
वळख द्यावी घ्यावी, विचारपुस करावी
म्हनून पोरी सांग तूझं नाव नाव नाव
पोरी सांग ग तूझं नाव ||३||

हिरोईन:
नाव गाव इचारनारा तू एकलाच न्हाई
सार्‍या गावाला मी ओळखून हाई
इचारपुस करनारं कितीक आलं कितीक गेलं
तू जातूस इथून, का काढू पायाची व्हान व्हान व्हान?
काढू का पायाची व्हान? ||४||

हिरो:
आगं गावचा पाटील इथंला मी हाय
वाड्यावर ग माझ्या काय कमी न्हाय
उस धा एकरी, केला द्राक्षबाग मळा
तालूक्यात हाय मोठं माझं रान रान रान
हाय मोठं ग माझं रान ||५||

हिरोईन:
तुझा मोठा वाडा बँकेत गहान हाय
जळला उस तुझा अन द्राक्ष गोडच न्हाय
तुझी तोंडपाटीलकी लई बास झाली
तुझ्या रानात न्हाय एकाबी झाडाचं पान पान पान
रानात न्हाय एकाबी झाडाचं पान ||६||

हिरो:
तुझ्या बापाचा जावई मी ग होईन
मिरवत येवून तुला घेवून मी जाईन
प्रिती तुझी माझ्यावर, मला माहीत हाय
हो माझी रानी, ऐक देवून कान कान कान
रानी ऐक देवून कान ||७||

(इथे हिरो हिरोईनच्या कानाजवळ जातो अन कानात बोलून तो त्याच्या चेहर्‍याच्या नकली दाढी मिशा काढून टाकतो. नंतर पुढे.........)

हिरोईन:
आत्ता ग बया, तुमी हाय काहो
जवळ नका येवू आसं, कुनी बघल नाहो
लग्नामधी घ्या माझं नावं
मी जशी तुमची सिता अन तुमी माझं राम राम राम
मी सिता अन तुमी माझं राम ||८||

हिरो:
है है...तू सिता अन मी राम...
है है...तू सिता अन मी राम...
है है...तू सिता अन मी राम...
ढिंग च्याक......ढिंग च्याक.......ढिंग च्याक......ढिंग...

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०२/१०/२०१०

No comments: