Monday, May 23, 2011

सरकारी योजना

सरकारी योजना

माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो
उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो
घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

शाळा! म्हनं झेडपीची शाळा !!
मोफात शिक्षान, मोफात शाळा
मास्तर खिचडी शिजवीत शिकवीतो
तिच्यात टाकायला तेलतूप राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

सरकारी दवाखान्याची काय पन तर्‍हा
खाजगी दवाखानाच वाटं त्याच्यापुढं बरा
सरकारी दवाखान्यात तर डाक्टर राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

पुढारी फाडारी बेनं आसलं कसलं
त्यांनी मढ्याचं धोतार फेडलं आन नेसलं
बी बीयाण्यांच्या अनूदानात आमचाच वाटा न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

स्वातंत्र आलं, साठ वर्ष झाली
गुलामगीरीची स्थिती काय सुदरंना साली
भ्रष्टाचाराचं पाप आता थांबायचं नावचं घेत न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

*सवान= सारखा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/१०/२०१०

1 comment:

विजयकुमार देशपांडे said...

साठ वर्षानंतरही सरकार जास्त सुधारले नाही.आणि भ्रष्टाचार कमी झाला नाही! आशयाशी सहमत ;कविता आवडली .