Friday, May 20, 2011

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ||

अवखळ नजरेला नजर भेटे वरचेवरी
गाली हसतांना पडे त्यावर खळी
होतसे काय काळजात कुणाला ठावे
लक्कन हाले ते एवढेच मला जाणवे
नकळत तुझ्या पाशात का गेलो ओढलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||१||

तू बरोबर चालतांना मी चाले जसा स्वर्गात
स्मित नेहमी फेके माझ्याकडे तू हर्षात
कधीकधी हातामध्ये हात तू घेतला
त्याच हातातला रोमांच मला जणवला
तुझ्या प्रेमात मी का इतका वेडा झालो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||२||

आठवते का गेलो होतो सहलीला आपण
तुझ्याबरोबर मी होतो माझ्याबरोबर तू पण
इतर सारे जण बरोबर होते आपल्या
वाटा त्यांच्या अन आपल्या वेगळ्या झाल्या
आठव जरा तेथे कितीतरी आनंदलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||३||

कितीतरी स्वप्ने जोडीने पाहीली होती
अर्थ एकच होता त्यांची शंकाच नव्हती
तू अन मी राहू जोडीने, होती इच्छा दोघांची
काय घडले असे की वेळ आली वेगळे होण्याची
न भेटल्यासारखे आपण वेगळे का झालो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||४||

नको आता आशा पुन्हा भेटण्याची
भिती वाटते जखमेची खपली निघण्याची
भळभळती जखम घेवूनी मी मिरवीतो आहे
दु:ख काव्यातूनी सारे वदतो आहे
शेवटी तुझ्या प्रेमाला पोरका झालो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||५||

"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०

No comments: