Saturday, July 31, 2010

शिक्षणसंस्थांची पैसे कमविण्याची पद्धत

मागच्या आठवड्यातील स्थानिक दैनिक. त्यातील जाहिरात. एका खाजगी डी.एड. कॉलेजला शिक्षक पाहिजे म्हणून.
जाहिरातीत त्याच्यांकडलाच छापील अर्ज करावा अशी सुचना. त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नाही.

माझा जवळचा मित्र एम.ए. बी.एड. झालेला. त्याने आज मला-शनिवारी सुटी-असल्याने मुलाखतीस बरोबर येण्याची विनंती केलेली. सकाळी १० वाजता नाशिकरोडला निघालो. कॉलेजच्या स्थळी ह्ह्ह्ह्ह्ही गर्दी. ५००-६०० जण/ जणी.

मित्राला अर्जासाठी रांगेत उभे केले अन आस्मादीक रिकामपणाची कामगीरी करण्यासाठी मोकळी झाली. एका खिडकीत अर्ज देणे चालू होती. रांगेच्या तोंडाशी गेलो. कुण्ण्णीच 'ओ मागे व्हा, आम्हीपण लायनीत आहोत' असे ओरडले नाही. आश्चर्य वाटले. रांगेच्या तोंडाशी असलेल्या एका मुलाला विचारले, "काय रे बाबा, अर्ज फुकट आहे का?" त्याने उत्तर दिले, "नाही हो, रु. १०० ला अर्ज मिळतो आहे". टाळकेच सटकले.

पुन्हा मित्राकडून जाहिरात घेतली अन काळजीपुर्वक बघीतली. त्यात अर्जासाठी कुठेही किंमत लागेल असा उल्लेख नव्हता. एका जणाकडून अर्जाचा नमूना बघीतला तर ती एक झेरॉक्स होती. अन त्यात कोठेही "अर्जाची किंमत: रु. १००/-" असा उल्लेख नव्हता. रांगेच्या तोंडाशी बराच वेळ उभा राहिलो. मित्राचा अर्ज मीच विकत घेवू शकत होतो पण मित्राचा नंबर जवळच आलेला होता अन नक्की काय चालले आहे याचा मला तपास करायचा होता. आतील कारकून अर्ज रू. १००/- घेवून देत होता अन तसा त्याच्या रजिस्टरमध्ये नावाची नोंद करत होता.

माझा असलाच मागचा अनुभव जिव्हारी लागलेला होता. आज नडायचेच ठरवले.

निट बघीतले की, अर्ज विक्री करून तो कारकून अर्जाच्या किंमतीची स्थळपावती देत नव्हता. तसेच भरलेला अर्ज स्विकारून त्याची स्विकृती पावतीही देत नव्हता. अन वर सांगितल्याप्रमाणे त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नव्हती.

मित्राने अर्ज घेतला अन मी त्याला 'तू अर्ज तर भर तोपर्यंत आलोच' म्हणून मी तडक प्रिंसीपलच्या कॅबीन कडे गेलो. एक शाळकरी मुलगी आत जावू नका म्हणत होती. टाळलं तिला.

प्रिंसीपलांना विचारले की 'सर अर्जाची किंमत कोठेही नाही, रिसीट नाही, अ‍ॅक्नॉलेजमेंट नाही' काय करायचे? इंटरव्हूनेच भरती होईल ना? की इतर संस्थांसारखी नावाला जाहिरात अन नावाला मुलाखत. प्रिंसीपल बोलले, "तुम्हाला अर्ज घ्यायचा असेल तर घ्या. इंटरव्ह्यू होईल मगच निवड. अर्ज घेण्याचा आग्रह नाही". पुन्हा टाळके सरकले.

पत्रकार मेव्हण्यांना फोन लावला. बोलणे झाले. दोनच पर्याय. माहीतीचा अधिकार- एक दिड महिना थांबणे किंवा पोलीसात तक्रार- लगेच अ‍ॅक्शन. कोरा कागद घेतला. पोलीसांना अर्ज रखडला-बेकायदेशीर रित्या अर्ज विक्री चालू आहे. अर्ज लिहीतांना मित्राचे ४ मोबाईल आले. त्याला 'गाडीचे इंजीन ऑयल बदलतो आहे' असे सांगितले. तेव्हढ्यात तिन जण डोकावले. त्यांचाही संताप होत होता. आग वाढलेली होती.

इकडे माझे फोनवर फोन चालू होते. मनसेच्या श्री. प्रमोद वझरेंना ला फोन लावला. त्यांनी "५ मिनीटात परत तुला फोन करतो सांगितले".

ईकडे आम्ही चौघे तयार झालो अन पोलीस स्टेशनात आलो. पोलीस स्टेशनात ठाणे अंमलदाराकडे जा, सब इन्सेक्टरसाहेबांकडे जा सुरू झाले. एकाने त्याच्या ओळखीच्या पोलीसाला फोन लावला. एक इन्सेक्टरांनी अर्ज वाचायला घेतला. तक्रार अर्जाची डुप्लीकेट साठी झेरॉक्स आणायला सांगितली. मी लगेच झेरॉक्ससाठी पळालो. भारनियमन. दोन दुकानांचे झेरॉक्स मशीन बंद. नविन भाग. माहीत नाही. पळतच चालू झेरॉक्स शोधले.

तेव्हढ्यात वझरेंचा फोन: "अरे नाशिकरोड चे मनसेचे विभागीय अध्यक्ष संजय गायकवाड साहेबांना फोन करून सांगितलेले आहे. हा हा त्यांचा नंबर घे. त्यांना फोन कर." लगेच फोन केला. ते म्हटले की "मी निघालोच आहे. तू कोठे आहे. लगेच ये."

मी अन एक जण पोलीस स्टेशनातून निघालो अन कॉलेजवर आलो. ते अन त्यांचे सहकारी श्री. सुदाम ताजनपुरे, श्री. राजेश पंडित आदी वाटच पाहत होते. त्यांनी अर्ज, जाहिरात बघीतली. बॉल आपल्या कोर्टात होता. सगळे सरळ इंटरव्ह्यु चालू असलेल्या रूम मध्ये गेलो. प्रिंसीपल साहेब, शाळकरी मुलगी, आणखी एक नन चा ड्रेस घातलेली मुलगी अन एक जण इंटरव्ह्यू घेत होते. काय मुलाखत होते ते आपल्याला माहितच आहे. फालतूगिरी सगळी.

संजय गायकवाड साहेबांनी सरळ मुद्यालाच हात घातला. 'सर अर्जाची किंमत कोठे आहे? अर्जाची रिसीट कोठे आहे? आदी.' सर गोलमाल उत्तर देत होते. 'जाहिरातीत अर्जाची किंमत छापायचे राहून गेले, संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा विसरलो' आदी. बोलाचाली वाढली होती. माझा संताप झाला होता. प्रिंसीपलांना मी सगळी परिस्थीती समजावून सांगितली. इतरांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला.

सरांना त्यांची चुक समजलेली होती तरीही आपलाच मुद्दा लावून धरत होते. 'अर्ज तर फुकट देणे चालू आहे' असेही ते बोलले. माझ्या बरोबरीचे तिघे उमेदवार बोलले की सर आम्ही तर अर्जासाठी शंभर रुपये दिलेत. सर खोटे पडले. सर म्हणाले काय करायचे मग आता? तुम्ही सांगाल तसे करू. संजय गायकवाडांनी तोडगा काढला. सर, अर्जाची घेतलेली किंमत तुम्ही सगळ्या मुलांना परत करा. अन त्यांच्याही मुलाखती घ्या. शाळकरी मुलगी बोलली की मागे इतरही संस्थांनी अशा जाहिराती दिल्या होत्या. तिला तिथल्यातिथे गप्प केल. शेवटी सरांनी कारकूनाला बोलावले. त्याला अर्ज फुकट देण्यास व पैसे परत करण्यास सांगितले.

माझ्या मित्राला आता तेथे मुलाखतीस रस उरला नाही. त्याने लगेच पैसे परत घेतले. अन आम्ही निघालो. इतक्यात पोलीस स्टेशनातून इतर दोघे तक्रार अर्ज परत घेवून आले.

श्री. संजय गायकवाड लगेचच मला अन मित्राला 'शिक्षक उपसंचालकांकडे' घेवून गेले. त्यांना गायकवाड साहेबांनी परिस्थीती समजावून सांगितली. त्यांनी लगेचच संस्थेची मान्यता आहे की नाही याचे तपासणीचे आदेश दिले तसेच असले पैसे घेण्याचे काहीही अधिकार संस्थांना नसल्याचे स्पष्ट केले.

श्री. संजय गायकवाड यांनी मग लगेच तक्रार अर्ज घेतला अन "मी पोलीसांकडे जातो" असे सांगितले. त्यांनी तक्रार अर्ज पोलीस निरीक्षक श्री. सपकाळ साहेबांकडे दिला आहे. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. आता पुढील कार्यवाही चालू आहे.

एका संस्थेत तर टक्कर दिली. पैसे परत मिळवून अर्धी लढाईच जिंकल्यासारखे वाटते. जेव्हा असले प्रकार पुर्णपणे बंद होत नाही तेव्हा पुर्ण लढाई जिंकली असे होईल.

ज्या विद्यार्थ्यांना नोकरी नाही त्यांच्या कडून मग्रूर संस्थाचालक साध्या अर्जाचीही किंमत घेता अन एक प्रकारे विद्यार्थ्यांना लुबाडतात. मागच्याच महिन्यात नाशकातल्या एका मोठ्या संस्थेने हजारो अर्ज विक्री करून लाखोंची माया जमवीलेली होती.

आता या सगळ्या कारभारात काही प्रश्न उद्भवतात.

१. सामाजीक शिक्षणसंस्थांचे असले 'छापील अर्जांचे' प्रकार म्हणजे धंदेवाईक प्रकार आहेत हे आपण म्हणू शकतो काय?

२. मी तो अर्ज बघीतला तर त्यात काही जगावेगळी माहीती विचारलेली नव्हती. तेच ते रकाने जे सर्वसामान्य अर्ज भरायला लागतात तेच होते. तो अर्ज छापायला केवळ १ ते १.५० रु खर्च आला असता. त्याच अर्जाची किंमत रु. १००/- होवू शकते काय? त्यात 'मला आपल्या संस्थेच्या सगळ्या अटी मान्य आहेत' असा उल्लेख होता अन मुख्य म्हणजे अटीच दिलेल्या नव्हत्या. हे म्हणजे कोर्‍या कागदावर सही करण्यासारखे होते.

त्याचबरोबर अर्जासोबत सगळ्या कागदपत्रांच्या ३ प्रतीलीपी आणि उमेदवाराचे ३ छायाचित्र जोडायचा खर्च पण ध्यानात घ्या.

५. माझ्या माहीतीप्रमाणे बि.एड, डि.एड. पदवी धारक बेरोजगारांची संख्या ध्यानात घेवून व असलेल्या जागा बघून कमीतकमी ५०० अर्ज जरी पकडले तरी 'विद्यामंदिरास' रू. ५००००/- ची घसघशीत कमाई होणार होती.

६. बी.एड, डि.एड. पदवी धारक हा काही निरीक्षर नसतो. त्यास कमीतकमी अर्ज तर 'लिहीता' येतच असणार. असे असतांना 'छापील अर्जाची' गरज काय? त्यांना अर्जाचे छापील स्वरूपच हवे होते तर पेपरध्येच तशा अर्जाचे स्वरूप देवून व ते बेरोजगारांनी टाईप करून घेवून - बेरोजगारांच्या पालकांचे पैसे वाचवता आले नसते काय?

मान्य आहे की, एवढे अर्ज स्वि़कारणे, प्रोसेस करणे, नोकरी देणे हे 'शिक्षणसंस्थेचे' 'काम' आहे. पण ते काही फुकट काम करणार नाहीत. नोकरी लागलेल्या (किमानपक्षी जाहीरात येण्याआधीच लागलेल्या) उमेदवारांकडून काही लाख घेतलेच असतील ना?

अशा प्रकारे एका मोठ्या एक नोकरीसाठी अर्ज विक्रीचा पायंडा पाडला जातोय त्याचे काय? अगदी सरकारी अर्ज देखील आजकाल रूपये २५०/- च्या ड्राफ्ट सोबत जोडले जातात.

सरकार बेरोजगारांची दखल घेईल काय?

- सचिन बोरसे (पाषाणभेद उर्फ दगडफोड्या)
३१/०७/२०१०

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर.
टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....

मोठी आरोळी: एsssss डबा बाटली भंगार वालाssssss वह्या पुस्तक रद्दी पेपर वालाsssssss

(चाल सुरू.....)

अहो ताई, अहो माई....

घरातले न वापरते सामान काढून टाका
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||धृ||

घर साफसुफ केले का हो ताई
आज नसेल केले तर जरा करा घाई
दसरा दिवाळी आली जवळ
राहती जागा चकाकती राखा
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||१||

उन्हातान्हाची आणली गाडी दुपारी ढकलून
रद्दी पेपर जुने वह्या पुस्तके आणा घेतो मोजून
मोकळे करा सांधीकोपरे
भाव लावतो मी चोख बाजारभावाचा
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||२||

असतील जरी तुटके प्लास्टिक, फुटके पाईप नळ
कोणाकडे असतात गंजलेले पत्रे, रबरी वस्तू अन घमेलं
राहतात रिकाम्या "औषधी बाटल्या"
लगोलग आणा, नाही म्हणू नका
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||३||

मोठी आरोळी: एsssss डबा बाटली भंगार वालाssssss वह्या पुस्तक रद्दी पेपर वालाsssssss

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०६/२०१०

Sunday, July 25, 2010

आम्ही तर एक्स्पोर्ट होणारी रिक्षाच घेणार

link

नैनो (तेच ते हो हिंदी भाषिक... निट उच्चारही करता येत नाही त्यांना... सुरेश ला सुरेस म्हणतात....शंकरला संकर म्हणतात....काय संकर करतात शंकरच जाणे...) तर नैनो .... आपली नॅनो म्हणायचं हो मला... आपलीच म्हणायची... कारण तिचा जन्म आपल्या पुण्यातच झाला ना? आता सासरी म्हणजे गुजरात मध्ये गेली म्हणून काय झाले? तर नॅनो ही कार आपल्याला काही परवडणार नाही. आपण तर बुवा मस्त रिक्षा घेणार. अहो नैनोमध्ये (ऐ गपे... मराठी शिकवू का?) सॉरी अहो नॅनोमध्ये किती माणसं बसतात? सांगा सांगा.. ४ च ना? म्हणजे १+३ ना? १ म्हणजे डायवर अन बाकी ३. बळजबरी केली तर १+४ चं पासिंग मिळेल तिला.

आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. या रिक्शावाल्याचा स्वभाव अन शंकरभगवान यांचा स्वभाव एकदम खटकू. नगास नग. कधी काय होईल सांगता येत नाही. कधी हात दाखवून वळेल तर कधी तिसरा डोळा मारेल.. आपलं उघडेल.. भस्म हो साक्षात भस्म. जळून राखुंडी. कधी गांजा/ भांग पिलेले डोळे तर कधी सोमरस प्राशन. असो.

तर रिक्षात पुढे ३ जण.. ग्रामिण भागात ५ जण. आता पुढे मोजा. मागे ४ जण बसतीलच. व्हा पुढेमागे. बसा खेटून. किती झाले? ७ की ९? अहो शहरी भागात ७. ग्रामिण भागात ९. पुढे मोजा. बच्चेकंपनी असेल तर मागे बाल्कनीत २ जण. सामानसुमान पायाशी. एखादी बॅग पुढे किक च्या हँडल जवळ. (काय कॉम्बीनेशन आहे. किक पायाची अन हँडल हाताचे.)

नै.नॅनो अन रिक्षाचा अ‍ॅव्हरेज सारखाच. स्पिडही सारखाच. रिक्षात वेळीअवेळी पेट्रोलचा डोस देवून रॉकेलही चालू शकते. रिक्षा हवेशीर आहे. दार खिडकी नाही. खा अन पचाक. खा अन पचाक. खा अन पचाक. अरे बस कर बाबा.

पार्किंग ला जागा कमी लागते. टर्नींग रेडीयस कमी. गल्लीबोळात जाता येते. रिक्षात लाखभर पैसे मळक्या पिशवीत ठेवले तर कुत्रेही हुंगत नाही. अन मुख्य म्हणजे ती पण आपल्या पुणे-३५ मध्येच तयार होते. बॉडी दणकट आहे. सरळ अंगावर घालता येते. गॅरेजचा खर्च कमी येतो. अ‍ॅक्शीलेटर वायर २५ रुपयात भेटते. आहे का तुमच्या नै..नॅनोचा पार्ट स्वस्त? टेप मस्त धकधक लावता येतो. झंकार नाय तर टकारा सर्कीट टाकल तर शकिराही नाचेल. वका वका. काही शक? मातीच्या मडक्यात नुसते स्पिकर ठेवा महाराज. घुंगरूही ऐकू येतील.

रिक्षा चालवत असल्याने बाकीचे वाहनधारक सहसा नादी लागत नाही. लागलाच तर आवाज चढवता येतो. परमिट घेतले तर डबल बिजनेसही करता येतो. रिक्षाच्या हुडवर जाहिरात करता येते.
आता तुम्ही सांगा त्या नै...नॅनोमध्ये आहेत काय एवढ्या सुविधा?

अहो पोरीदेखील म्हणतात, "मला रिक्षावाला नवरा पायजे...मला रिक्षावाला नवरा पायजे..."

म्हणून म्हणतो आम्ही तर एक्स्पोर्ट होणारी रिक्षाच घेणार.

- पाभे (रिक्षावाला)

Saturday, July 17, 2010

पाऊस आला

पाऊस आला


पाऊस आला पाऊस आला पडू लागल्या धारा
थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा ||

अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव
वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव
क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१||

नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब
धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब
हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२||

- पाषाणभेद
१७/०७/२०१०

Saturday, July 10, 2010

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||

उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||

राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||

पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०

Thursday, July 8, 2010

लावणी: सोन्याची अंगठी मजला आणुन द्या

सोन्याची अंगठी मजला आणुन द्या

तुमची माझी प्रित जडली
आठवण राहू द्या
प्रितीची निशाणी म्हणून
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||धृ||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)

साडी चोळी आहे मजला
नको दुसरे काही
श्रॄगांराची टिकली बांगडी
उगाच मागत नाही
सोनाराकडे आजच जावू या, नको की उद्या
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||१||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)

राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही
कशाला कधी केलं नाही कमी
घाटदार पाच तोळे चोख वजनी
अंगठी साखरपुड्याला घेवूनी
भेटा सगळ्यांसमोर तेव्हा, आता जावूद्या
सोन्याची अंगठी मजला आणुन द्या ||२||
न्हाई म्हनू नका (चालीत समेवर येणे)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०६/२०१०

Tuesday, July 6, 2010

गीत: गरमी चा आलाय उन्हाळा

गरमी चा आलाय उन्हाळा

गरमी चा आलाय उन्हाळा
उन काय सोसवेना
तगमगीची काहीली आली
उपाय काही तरी करा ना ||

गारगार वारं अंगाला
नाही लागत आता
घामाच्या धारा सुटल्यात
जीव घाबरा होई निसता
उगाच बोलन्यापरीस
पंख्याची हवा मला घाला ना ||

आंबट चिंबट खाऊ वाटते
पन रानात एकटी जावून
करवंद, जांभळं, आंबा अन कैर्‍या
पाडायची भिती मला वाटते
रानचा रानमेवा लुटायला
सोबतीला बरोबर तुम्ही या ना ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०६/२०१०

(पोटभर जेवणासोबत एक चमचमीत दिवस: काही सुचतंय?)

http://www.misalpav.com/node/12769 या लेखाचे विडंबन

माननीय मिपाकरहो,

या पूर्वी मी काही उपयोगी धागे काढले म्हणून कौतूक केले त्यामूळे जाहीर आनंदून मी हा धागा काढत आहे. तसे माझ्यासमोर इतरही पर्याय होते! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला नाही आहे असे नाही.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी देवळातून बाहेर येणार आहे आणि मला माझ्या जीभेला एक चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग खावू घालायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही खाल्लं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे.

इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही हॉटेलमध्ये मध्ये किंवा मुंबईतल्या एखाद्या गल्लीतून (भिक मागून) परत (देवळात) येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये अस्सल भिकार्‍याचा गेटप उपलब्ध आहे. रूपांतर करण्यात मी एक्स्पर्ट आहे. लेडी भिकारीण चा गेटप उपलब्घ आहे पण मी लेडी नाही. मी मुंबईचा आहे त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक आहेत. माझं भिकेचं बजेट आहे १० दिवसांचं. अर्थात तेवढे मिळालेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास दाता असेल असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा शिळेपाकेआहारी असून तिलाही शुद्ध चटकदार, टेसदार, चमचमीत, खमंग अन्न नेहमी लागते.

आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे:

१. ताज कॉन्टीनेंटल ब्रंच: ताज कॉन्टीनेंटला जाण्याची ही योग्य वेळ आहे का? कर्जत पासूनची लोकल जुलैमधल्या पानकाळ्यात चालू असते का? इंटरनेटवरील साईट वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. आपोलो बंदर पर्यंत जाण्यास लंगडत जावे किंवा घसरगाडी वापरावी की भीक मागत मागत लोकलने? लंगडत जाण्यास मजा येईल की वाट लागेल? भीकेचं काय? भीक कमी मिळाली तर लंगडत जाणे शक्य आहे का?

२. गुजराथी थाळी : गुजराथी थाळी मध्ये मटण, कोंबडी आणखी काही मांसाहारी असते का? मस्त नळीतोड १२ नं मिळेल?

३. भात: पदार्थ छान आहे पण आख्खे १० दिवस भातच खावून करायचे काय हा प्रश्न आहे.

४. धर्मशाळा / अन्नछत्र/ सदावर्त: तिथे जाऊन परत शिळेपाके अन्न काय खायचे असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही.

फक्त अन्नपदार्थांच्या डिशच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही पदार्थ असतील तर उदा. रानभाज्या - टेरी (पावसाळी आळू), सुकं मटण / (व्हेज व्हर्जन), पुदिना पुलावइतर पदार्थ (आठवा तुम्ही चापलेले/ तुम्ही खावू घातलेले चमचमीत पदार्थ) तर ते पण सांगा.

अनुभवी मिपाकर खवय्यंना/ खिलवयांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल रेसेपी लिहायला वेळ नसेल तर जाताजाता मेनूकार्डावरचे पदार्थ सांगितलीत तरी चालेल.
भीक द्यायची नसेल तर नका देवू हो पण चमचमीत हादाडण्याचा जेवणाचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा.

आणखी काय मागू? भीकेच्या अपेक्षेत !

~
भिकमांग्या

(उद्यापरवा हनिमुन ला काही मदत लागलीच तर अशीच चौकशी करेल)