Sunday, April 25, 2010

करीते मी विडा

रसीक मंडळी, खास आपल्यासाठी बैठकीची लावणी सादर आहे. दाद द्या

खालील रचनेतील धृपद घोळवून घोळवून म्हटले असता आपसूक चाल बांधली जाते.


बैठकीची लावणी: करीते मी विडा

पांढरा चुना लावूनी काथ करीते मी विडा
हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा
पांढरा चुना... ||धृ||

हिरवं पान हे घेवूनी हाती
बैठकीत मी बसली असता
अवचीत तुम्ही मागं येवूनी
पदर माझा हा सोडा ||१||

हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा
पांढरा चुना... ||धृ||

विडा घेवूनी जवळी बसता
विचार करते रातंदिवसा
विडा खावूनी ओठ रंगवूनी
उपास तुम्ही आता सोडा ||२||

हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा
पांढरा चुना... ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०४/२०१०

Wednesday, April 21, 2010

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

हिरो:
अग ए मैना जरा इकडं ये ना
जावूया राना नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना

गोड गोड पोळं झाडावर उभं
काढायंचं कसं म्हणतीस का गं
कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं
टपटप मध चोखून घे ना
चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना

आता नको नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना


हिरवीन:
नको रे सजना आले मी राना
कुणा सांगता विना
सांगल कुणी तर माझा बा येईल ना
(दांडकं घेवून माझा बा येईल ना)

हिरो:
हा विट्टी अन दांडू तु घे गं
खेळायंच कसं विचारतीस तू का गं
हे आस्सं घेवून जोरात टोलव ना
ईट्टी शोधाया वेळ लावतो मी गं
राज्य माझ्यावरं आलं तर येवू दे ना


हिरवीन:
नको रे सजना आले मी राना
कुणा सांगता विना
सांगल कुणी तर माझा बा येईल ना

हिरो:
आता नको नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना

चल तू लप तिकडं मग मी बी लपतो इकडं
चल शोध मला तू गं आता
मग मी पन शोधीलं तु लपता
आसं कटाळा करून कसं चाललं
एकमेकांचा शोध घ्यायचा आहे ना


हिरवीन:
नको रे सजना आले मी राना
कुणा सांगता विना
सांगल कुणी तर माझा बा येईल ना

हिरो:
आता नको नको म्हणू नको ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना


हिरवीन:
आले आले रे सजना आले मी राना
न खेळून मी बाई जाईना
कोनी बघल तर बघल पुढंच पुढं पाहू ना
आता तू जरा ईकडे येना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना

दोघं:
ला ला ला ला ला ला ला ला ला हं हं हं हं हं हं हं हं हं
टारा रा रा रा रा रा रा टारा रा रा रा रा रा रा रा
ढींग च्याक ढींग च्याक ढींग च्याक ढींग


- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०४/२०१०

Sunday, April 18, 2010

एक गिअर मेला

एक गिअर मेला.
तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो.
मी म्हणतो तो गिअर मेलाच.
असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला.
दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार?
तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे.
बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन.
आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्‍यांची.

तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये.
अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच. सगळे एकजात सारखेच पणे चालणारे.

ह्या गिअरवर अवलंबून लहान मोठे असे ५/६ गिअर्स होतेच.
अन तो एका मुख्य मोटरने जोडलेला असल्याने मुख्य म्हणायचे इतकेच.

हातात हात घालून तो चालत होता, अन जोडलेल्या इतर लहानमोठ्या गिअर्सला चालवत होता.

आताशा त्याला त्याच्या कामाचे ओझे वाटू लागले होते. त्याच्या वरचे गिअर्स आता खुप अवलंबून राहत होते.
त्याला मोटरकडून मिळणारी उर्जा कमी कमी होत होती. तो तरी किती उर्जा परावर्तीत करणार.
हळूहळू त्याचा एकएक दात झिजत होता. वंगण कमी पडत होते. त्याच्या अन इतर गिअरमध्ये अंतर पडू लागले.
त्याच्यामुळे इतरांचा खोळंबा होवून कामे रखडू लागली. उत्पादन कमी पडू लागले.

शेवटी व्हायचे तेच झाले. म्हणजे त्यालाही त्याची कल्पना होतीच. पण ती वेळ इतक्या लवकर येणार नाही ही आशा होती.
एके दिवशी त्याला मालकाच्या सांगण्यावरून काढून टाकण्यात आले.
फॅक्टरीत लागल्यापासून त्याला ओळखणारी मेंटेनन्स ची माणसे आता वेगळीच वागली.
खसाखसा पाने, हातोड्यांचे वार केले गेले अन त्याला बाहेर काढून भंगारात टाकले गेले.
त्याला लावलेली पिन, नट अन बोल्ट काढून त्याच्याच अंगावर फेकले गेले.

आता तो गिअर अगदी गलितगात्र झालेला होता. दात काढलेल्या नागासारखा. असूनही काहीच उपयोगाचा नसण्याचा.
.....................................................................................
मंडळी, म्हणूनच म्हटलो होतो, "एक गिअर मेला!" हो मेला!"

अहो, एखाद्या कामगाराला व्हि.आर.एस. घ्यायला लावली म्हणजे त्या कामगाराचे अन त्याच्यावर अवलंबून असणार्‍यांचे मरणच नाही तर काय?

म्हणूनच म्हटलो होतो,
"एक गिअर मेला!"
"एक गिअर मेला!"

Saturday, April 17, 2010

कान्हा रे कान्हा असे काय करी

कान्हा रे कान्हा असे काय करी

(चाल १):
दही विकाया गोपी निघाल्या मथूरेच्या बाजारी
वाट अडवून कान्हा बसला म्हणे दही कर द्यावा करी
प्रिती पाहूनी कान्हाची आपल्यावरी
गोपीका त्या वरवर रागावती
लटका लटका नकार देती परी मनी सुखावती

वाट अडवूनी कान्हा त्यांची छेड काढी
कारण करूनी कान्हा मडके फोडी
कान्हा मडके फोडी

(चाल बदलून):
कान्हा रे कान्हा असे काय करी
दुधा दह्याचे मडके असे का फोडी
फोडीलेस तर सोडीव मज ती गोडी ||धृ||

विरहाची सवय होत असतांना
मला तुझ्याकडे पुन्हा का ओढी?
ओढीत असता वस्त्रे न माझे फेडी ||२||

कान्हा रे कान्हा असे काय करी
दुधा दह्याचे मडके असे का फोडी ||धृ||

संसारी या पडता मी रे विसरले होते तुला सख्यारे
आज तू छेडीता सुर मुरलीवरी रे छेडीलेस तू पुन्हा पुन्हा मला रे
छेडाच्या खेळात दंग संसारी एकटी का सोडी ||२||

कान्हा रे कान्हा असे काय करी
दुधा दह्याचे मडके असे का फोडी ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०४/२०१०

Friday, April 16, 2010

आणा मला येवला पैठणी

आणा मला येवला पैठणी

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवला पैठणी ||धृ||

जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर
नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार
लई दिसांची ईच्छा आहे मनी
आजच आणा मला येवला पैठणी ||१||

आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा
कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा
आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी
आजच आणा मला येवला पैठणी ||२||

नितळ काया माझी वर तुमची माया
जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया
आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी
आजच आणा मला येवला पैठणी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०४/२०१०

Wednesday, April 14, 2010

मोबाईल चार्ज करा तुमचा

मोबाईल चार्ज करा तुमचा

मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा
काम करायचं ना तुमाला तर मग नुसता मिस कॉल का हो देता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||धृ||

कोरस:
हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा
ओ आम्दार उगा मिशीवर मारू नगा
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा


कालच्याच दिशी आली वाड्यावर
इस्कोट झाला तुमी असल्यावर
पैकं द्या म्हनलं तर निसतं एटीएम कार्ड काय दावता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||१||

गुलूगुलू बोलायच आसंल
फोटू बिटू काढायाचा आसलं
तर लांबून हात काय हालवता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||२||


आत्ता ग बाई काय करू तरी काही
गोड गुलाबी पत्र न देता
नुसता ऐशेमेस काय पाठवता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||३||

कोरस:
हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा
ओ खास्दार उगा मिशीवर मारू नगा
ओ टोपीवाले उगा मिशीवर मारू नगा
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा

Tuesday, April 13, 2010

शेत देईल पिवळं सोनं...

शेत देईल पिवळं सोनं


एक दिलानं काम करूया, झाडून सारे घाम गाळूया
हात उचला बिगीनं रं बिगीनं
शेत देईल पिवळं सोनं...
शेत देईल पिवळं सोनं...

रांग धरा ही आडवी आडवी
पुढे जायची मारा मुसंडी
आडवं करा रे पिक त्यातून
शेत देईल पिवळं सोनं...
शेत देईल पिवळं सोनं...


विळा चालवा सरसर सरसर,
कणसं आणा खळ्यात एकदम
रास करा उफनूनं दाणं रं दाणं
शेत देईल पिवळं सोनं...
शेत देईल पिवळं सोनं...

थ्रेशर चाले थडथड थडथड
जोंधळे येती त्यातून भरभर
भरा पोती कमरेत लवूनं रं लवूनं
शेत देईल पिवळं सोनं...
शेत देईल पिवळं सोनं...


-पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०४/२०१०

Monday, April 12, 2010

लावणी: टाकून द्या ह्या वंगाळ सवयी

लावणी: टाकून द्या ह्या वंगाळ सवयी


(सरकारी झैरातीत असल्या कविता असतात का?)

दारू पिवून शरीराचा नाश तुमी का करता मला समजत नाही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||धृ||

दारूमुळं सौंसाराची धुळधाण होई,
तिला सोडाया नका करू पण परंतू
उगा आजार लावून घ्याल,
सांगा माझं म्हनन खरं आहे का नाही?
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||१||

असलीच सवय हाये पान तंबाकूची,
अन त्ये खावून जागीच थुंकायची
दुसरं कायतरी काम करा,
उगा म्हनं तंबाकूबिगर येळ माजा जात नाही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||२||

पाहून राहिली मी तुमी खोकताय मघापासनं,
का सिग्रेटी पिता निसतं मग तुम्ही ओ पाव्हनं
काळजी वाटतीया म्हनून सांगतीया,
करू नका इस्पितळात जायची घाई
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||३||

{{ ह्ये आताच पहा मोबाईल वाजला तुमचा किती मोठ्यानं,
झोपलेली दचकून जागी व्हतील त्याच्या रिंगटोनीनं
रिंगटोन बदला नायतर आवाज शांत ठेवा
ऐकताय का माझं तुमी काही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी }} ||४||

कवन ऐकवीते रसिक जनांना करूनी वंदन,
तुम्हास सांगते द्या मज अनुमोदन,
जीवनमान सुधराया,
चांगल्या सवयी अंगी बाणवा बाई
टाकून द्या ह्या वंगाळ सवयी, लावून घेता कशापायी ||५||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०४/२०१०

लावणी: मुंबईची सहल

लावणी: मुंबईची सहल


नागपुर पाहून झालं , नांदेड पाहून झालं , अमरावती पाहून झाली, लातूर पाहून झालं....
अहो इकडे बीड झालं, नगर झालं, नाशिक झालं, पुणं पाहून झालं....
तिकडे कोलापूर पाहून झालं, सांगली झाली, सोलापुर ही पाहून झालं....
आख्खा महाराष्ट्र पाहून झाला.....

कोरस : आसं का?

व्ह्यय तर मग....
अहो नागपुर पाहून झालं, नाशिक झालं, पुणं झालं ठाणं झालं, आता पाळी हाये मुंबईची
इथं फिरून फिरून अंग माझं दमलं सवय नाही घामाची
उपाय करा काही लाज राखून या गोड हुकूमाची
अन मला चाखवाना कुल्फी थंडगार मलईची

रगडा खाउन झाला, पॅटीस झालं, चाट झाली, चटकदार भेळ झाली चौपाटीची
बंदूकीनं फुगे फोडून झालं, वाळूत लोळून झालं, हौस झाली घोड्यावरच्या रपेटीची
मजा बघितली हवेत उडणार्‍या फुग्याची
अन मला चाखवाना कुल्फी थंडगार मलईची

दादर पाहून झालं शिवसेनेचे भवन पाहून झालं
क्रिकेटची मॅच पाहून झाली शिवाजी पार्काची
राजगड ला भेटून आलो शिवाजी महारांजांना वंदून झालं
कपड्यांची खरेदी केली फॅशन श्ट्रिटवरची

ताजमहाल हाटेल पाहून झालं, सहल झाली घारापुरीची
चर्चगेट पाहून झालं, आताचं सीएसटी झालं, हद्द ओलांडूनी गेट वे ऑफ इंडियाची
मजा पाहिली उंच उंच बिल्डींगींची

हुतात्मा स्मारकाने आठवण करून दिली हुतात्मांची
प्रभादेवीचा सिद्धिविनायक पावला, महालक्ष्मीचं दर्शन झालं
वांद्रे वरळी सेतू पाहून आरती केली मुंबादेवीची

सेंट्रल लोकल झाली, वेस्टर्न झाली, हार्बरच्या लोकलची गर्दी झाली
बेस्टची बस झाली फेरीची बोट झाली
हौस झाली जुन्या व्हिक्टोरीयाची

तारांगण देखून झालं, पाहून झाली बाग राणीची
संग्राहालय पाहून झालं, मंत्रालय पाहून झालं, मत्सालय फिरून झालं
रेसकोर्सला शर्यत पाहीली घोड्यांची

हाटेलीतलं खाणं झालं, कुल्फीचं चाखून झालं, मनाची शांती झाली
दमून झालं, भागून झालं, सवय नाही मला असल्या गर्दीची
चला आता चला घरी, सर नाही कशाला आपल्या गावाची

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०४/२०१०

नाच नाचूनी नाचू मी किती

नाच नाचूनी नाचू मी किती

पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||

सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||

काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||

----------------------------------------------

*****************************
(पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
काळाचे चक्र चालू आहे. त्यात सेकंदा सेकंदाची भर पडत आहे. | "नाचतांना" म्हणजे जीवन जगतांना भान हरपून गेले ||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
हे सगळे थांबायची (शेवटाची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? ||

सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
बालपण/ तरूणपणी मी अवखळ होतो. | मी माझ्याच गुर्मीत होतो. ||

नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||
जीवन जगण्याचा छंद लागला | तेच मला आवडू लागले. ||

काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
जन्मा आलो ते मरण (काळी चंद्रकळा) घेवून | जन्मानंतर फक्त जगण्याचा आनंद होता ||

मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||
मरणानंतर मी जगदिशाशी एकरूप झालो | त्याची अन माझी मिती एकच झाली (One Dimension)||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
हे सगळे थांबायची (शेवटची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? || )
*****************************

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०४/२०१०

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||




मी रोगजर्जर, असूनी पंगू, मरण समोर उभे, काळ
अपेक्षीत तुला मी अजूनी रहावा थोडा वेळ
दैवगती ही अशीच राहे, जीवन मिटे हे, न जगता


का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

तू नच अभागी, मीच कमनशीबी, अर्धीच आयुष्यरेषा
अधूरेच आयुष्य ,जगलो, उरली न काही आशा
शोक नको, जन्मेन पोटी पुन्हा, असशील तू माझीच माता ||२||


का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

(वरची एक ओळ अशीही वाचता येईल : अधूरेच आयुष्य जगलो, उरली न काही आशा)

हे माते, कुरवाळ पुन्हा, अश्रू पडू दे डोई, थापटता
नंतर आक्रंदू नको, वात्सल्य संपवू नको, राख माझ्याकरता
हलकेच हातांनी भरवण्याचा हट्ट पुरव आता जाता जाता ||३||


का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०४/२०१०

आडवाटंनं जाता जाता

मंडळी, परवापासून तुमी लावन्या वाचू वाचू कटाळला असाल. तवा एक युगलगीत ऐका. हिरो आन हिरवीन आपले त्येच हायती. पन ती काय आता लावनी म्हनत नाय. तवा ऐका जरा कान देवून त्ये काय म्हनत्यात त्ये. उगा आडकाठी आनू नका त्येंच्यात म्हंजे झालं.


आडवाटंनं जाता जाता


ती:
आडवाटंनं....आडवाटंनं....आडवाटंनं....

आडवाटंनं जाता जाता तू रं मला अडिवलं
तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||


ती:
डोईवरी असतांना गवताचा भारा
मनामधी त्या इचारांना नको देवू थारा
चालतांना रं...चालतांना रं...चालतांना रं....
पाऊल माझं अडलं... ||१||

तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||


तो:
रानी तू ग माझी आलीस या ग रानी
तू अन मी आपन दोघं, तिसरं नाय कुनी
कुना सांगू नगं...कुना सांगू नगं...कुना सांगू नगं...
इथं काय घडलं... ||२||

तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||


ती:
तुझ्या प्रितसागरात पडले मी मासोळीवानी
नाही मनात माझ्या, तुझ्या वाचून दुसरं कोनी
जवळी तू घेता...जवळी तू घेता...जवळी तू घेता...
भान जगाचं मला पडलं... ||३||

तुला पहाताच काळीज माझं धडधडलं ||धृ||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०४/२०१०

Tuesday, April 6, 2010

लावणी : उसाचा रस तुमी पाजा

सिच्युयेशन: आपल्या हिरो चं रसाचं दुकान हाये. त्यो रस काढत आसतो. तवाच हिरवीन तहानेनं व्याकूळ होवून त्याच्या दुकानी येती. उन्हामुळं हिरवीन पानी प्याया मागते. हिरो तिला रसाच्या दुकानात पाहूनशान लय गोंधळून जातो. त्याला काय करावं त्येच समजत नाय. तवा हिरवीनंच उसाचा रस कसा काढायचा त्ये सांगते आन पुढं काय व्हतं त्ये पहा:

लावणी : उसाचा रस तुमी पाजा


गरम उन्हाळ्याचा दिस हा तापला
निसत्या पान्यानं न भागे तहान
राया आता घाई करूनी;
उसाचा गार रस तुमी पाजा
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||धृ||


कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा


नाक्यावरलं दुकान हे आपलं
रस काढाया चरक हे असलं
आलेलिंबासहित रस काढूनी;
पुढ्यात तुमी माझ्या बसा
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||१||


कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा


{हिरो आन हिरवीन टेबलासमोर बसलेले आहेत. उसाचा रस त्यांच्या पुढ्यात ग्लासमध्ये आलेला आहे. डोळ्यात डोळे टाकून हिरवीन काय म्हणते पहा:-}

तुमची न माझी जोडी जमली
ऐन ज्वानीची काया फुलली
मदनाच्या ताब्यात जाण्याआधी;
हालहवाल तुमी माझी पुसा
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||२||


कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा


{हिरो आन हिरवीन एकमेकांत धुंद झालेले आहेत. तो त्याचा ग्लास तिच्या ओठांना लावतो ती तिचा ग्लास त्याच्या ओठांना लावते अन मग काय म्हणते ते पहा:-}

तगमग तगमग करते काया
झुरतो जीव हा लागली वेडी माया
असं असतांना रस प्यावया;
ठेवू उगा कुणावर भरवसा?
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||३||


कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा


- सचिन बोरसे
९८२३४०२५५४
०६/०४/२०१०

नाडी घ्या नाडी

(मिपावरील नाडीसंदर्भात जी चर्चा चाललेली आहे त्यास अर्पण....)

स्ट्राँग स्ट्राँगर स्ट्राँगेस्ट डिस्क्लेमर: हे लेखन केवळ मौजमजेसाठी आहे. कोणाचाही वैयक्तीक नावे घेण्याचा उद्देश नाही. मिपा अन इतरत्र असलेली नावे अन या लेखात असलेली नावे, त्यांच्या स्वभावांचा, वैशिष्ठ्यांचा गुणधर्मासहीत कोणास समान वाटत असतील तर तो योगायोग समजावा. कोणाचीही मानहानी करण्याचा आमचा हेतू नाही. तरीही काही हेवेदावे, तक्रार अर्ज असतीलच तर ते नाडी (आमचीच) पाहूनच सोडवीले जातील.

नाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी
हलकी नाडी भारी नाडी

चढायची असेल तुम्हां माडी
सोडावी लागेल तुम्हां नाडी
जाड नाडी बारीक नाडी
सोडा एखादी साडी
वेगळ्या ढंगातली निराळी साडी
पोलीस दिसला तर करा तडजोडी
घरी मिळेल तुम्हांला शालजोडी
नाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी

साहित्यसंमेलनात असते तंबाखूची पुडी
आमच्या येथे मिळते घट्ट बांघायची नाडी

नाडी आधी तपासून पाहून घेणे
नंतर बदलून दिली जाणार नाही, आम्हास दोष न देणे ( - हुकूमावरून)

रंगीत नाडी एकदम मॅचिंग नाडी
फिट्ट नाडी, फ्लेक्झीबल नाडी
नाडी मिळेल हव्या त्या आकाराची
कामात येईल कपडे बांधायसाठी

अहो नाना नाडी तुम्ही घ्याना
अहो तात्या, अहो राजे, ओ बिका
अहो देवा, अहो प्रा., अहो मुक्त अन आनंदी, हर्ष तुम्ही पण, गणपा गणपा तुम्ही पण,
नाडी घेवून जा राहू नका कोणीपण

चतूरंगांचे मोठे पोट
पेशल नाडी बनवायची केली त्यांनी नोट

आणिबाणीचा शासनकर्ता आला
आणिबाणीत न दिसता नाडी घेवून गेला

३३% वाल्यांनो शु..चि डू नका,
तुमची नाडी तुम्हालाच मिळेल बरका

एक स्वाती गात येत होती,
तिची नाडी मिळाली म्हणून नाचत होती

प्राजूताई आपली लवकर येई
तिची नाडी ती घेवून जाई

आली आली जयवी
नाडी हवी म्हणे लाघवी

बाकी सार्‍याजणींना तुम्ही घेवून या
नाडी घेवून क्रांती घडवा

अ (रूं)दिती सांगू तुला किती लवकर याया,
नाडी घ्यायला किती उशीर करतात या बाया!

तुम्ही सगळे या ना
अगदी झाडून ईथले, "ति"थले पण याना
तुमच्या तुमच्याच नाड्या निवडाना

अहो अहो पका काका
तुमची नाडी तुम्ही घेवून टाका

तु पण येरे तु पाषाणा
तुझी नाडी तु घे ना
नाडी तुझी मस्त
नानाकडून घेतलेली चड्डी बसेल फिट्ट

अभय आला
नाडी घेवून गेला

मदण आला
बाण मारूनी नाडी जिंकला

पुणेरी जन आले
लगबग नाडी ल्याले

पराने धमुल मजा केली
म्हणे तो नाडी आली.. नाडी आली

ठाणेरी जन आले
ठण ठण ठण करत नाडी घेवून लोकलने गेले

पिवळे आले, निळे आले, अगदी काळेही आले
हिरव्या देशातले आले, हिरव्या माजाचे आले,
विरजणवाले आले, लोणी चोळणारे आले
संपादक आले, उप(रे) संपादक आले,
कंपूबाज आले, कंपूबाहेरचे आले, पाट्यावरचे आले, काठावरचे आले,
वाचणारे आले, लिहीणारे आले, प्रतिसाद देणारे आले, न देणारे आले,
वादी आले, दैववादी आले, विज्ञानावाले आले,
अ ते झ अन A to Z वाले सगळे आले
आलेरे आले सगळेच आले
नाडी तपासून पाहू लागले

तरीही राहीले असेल कोणी तर...
नाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी
हलकी नाडी भारी नाडी

विज्ञान अन निसर्गाची द्या सोडूनी
म्हटले आहे का कुणी?
"नाडी पाहूनी काय होशी?"
सच्च्या मार्गाने न गेले तर नाडीमय होशी

Sunday, April 4, 2010

माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला.

खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की

एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का?

माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.

नका अंगचटीला येवू

मंडळी, पुन्यांदा रामराम.
आज परत ही लावनी ऐका.
आजची लावनी लिहूनशान म्या या आयपीएल किरकेट च्या मॅचेमधी जशी हॅट्रीक करत्यात तशी सलग तीन दिवस ३ लावन्या लिहूनशान हॅट्रीकच केलीया. तुमी म्हनाल या सुक्काळीच्या पाषानाला काय लावनी चावली का लावनीवालीनं धरलं.

पन काय सांगू मंडळी, आहो खिशात 'लय शिरीयस' मुक्तछंदी परकृतीच्या ४/५ कवितांचे ड्राफ्ट हायती. पन मन ह्ये लावनीकडंचं वळतया पगा. माझ्यासारख्या दगडफोडी करनार्‍या मान्साला आसं लय इचार करूं करूं लागलं म्हंजे माझं टाळकं कसं पहार लावल्येल्या कातळागत फुटतंया पगा. काय करावं आन काय नायी त्ये तुमीच सांगा बाबांहो.

तर ही लावनी वाचूनशान तुमीच सांगा आपली होरो आन हिरवीनीची जोडी आशी का पळूं र्‍हायलीय ते? कसं?

नका अंगचटीला येवू


आडवाटंना जाता जाता नका अंगचटीला येवू
गाववाले मागं वळू वळू र्‍ह्यायलेत पाहू ||धृ||



कालच्या दिसापासूनी फिरतोया आपन जोडीनी
जातोया दुसर्‍या गावी पहिलं गाव सोडूनी
खोटं पडलं तुमी, उगा म्हनं आज खंडाळ्याला जावू
जा मी न्हाई येत आता, कारन....
गाववाले मागं वळू वळू र्‍ह्यायलेत पाहू ||१||

कोरस:
ते प्रवासी मागं वळू वळू र्‍ह्यायलेत पाहू
तो डायवर मागं वळू वळू र्‍ह्यायलाय पाहू
तो कंडक्टर मागं वळू वळू र्‍ह्यायलाय पाहू


एस्टी मधी बसबसूनी कंबर माझी धरली
एका स्टँन्डावर थांबूनी वाट पाहूनी पुढली
निसतं एकाजागी बसूनी, कटाळा लागला मला येवू
जा मी न्हाई जात सच्यासंगती आता, कारन....
गाववाले मागं वळू वळू र्‍ह्यायलेत पाहू ||२||

कोरस:
ते प्रवासी मागं वळू वळू र्‍ह्यायलेत पाहू
तो डायवर मागं वळू वळू र्‍ह्यायलाय पाहू
तो कंडक्टर मागं वळू वळू र्‍ह्यायलाय पाहू


- पाषाणभेद
०३/०४/२०१०

Friday, April 2, 2010

दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

मंडळी, लावणी म्हटली की ती शृंगाराची असावी/असते असा आपला समज. पण लावणी ही त्या पलिकडे जावून आध्यात्मिक किंवा सामाजिक पद्धतीचीही असू शकते. खालील लावणीत आपली नेहमीची हिरवीन थोडं वेगळं बोलतेय. ती काय म्हणते ते बघा तर खरं:


दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

काम करोनी म्हेनत घ्येवूनी आपन वाढवू सौंसारा
गरज तुमची चिल्यापिल्यांना तशीच गरज आहे मला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||धृ||


जांभ्याचा खडक आहे कातळ मजबूतीला भारी
अंदाज घेवूनी उभं र्‍हावूनी विचार करू नका काही
ताकदीनं फोडूनी त्याला ढिगावर ढिग ह्यो झाला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||१||


पथ्थर काळा मुरमाड माती पहार घेवूनी हाती
मजबूतीनं ठोका त्याला दणक्यानं ठिकर्‍या उडती
घामानं छाती भिजली अंगरखा झाला ओला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||२||


फावडं ओढा माती भरा जागा धरून कुदळ मारा
धुरळा उडतो मोठा दांडगा पहार लागता खडकाला
माती जाईल डोळ्यामधी लावून घ्या आता त्याला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||३||


शिसवी शरीतात ताकद भारी मर्दाचा ह्यो तोरा
मरवणूक माझी झाली तुमच्यासंगती इथं येता
येळेचा विचार करूनी घराचाबी ईचार कवातरी करा
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||४||

- सचिन बोरसे,
९८२३४० २५५४
०२/०४/२०१०

Thursday, April 1, 2010

घाट चढा आता

मंडळी, आपली हिरो अन हिरवीन प्रवासाला निघालेय. त्यांची गाडी जोरात जावू द्यायची की हळूहळू ते आपणच ठरवूया.
सादर आहे "घाट चढा आता" लावणीच्या दोन आवृत्या एकाच वेळी, एकाच धाग्यात... (ढॅण.. ढॅण्...ढॅणाण...)

हळूहळू घाट चढा आता


घाई नगा करू सबूरीनं घ्येवा
चढाईचा चिकना ह्यो रस्ता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||धृ||


खाली अन वर अवघड घाट
मधी हाये ही सपाट वाट
आक्शिलेटर दाब दाबूनी...
आक्शिलेटर दाब दाबूनी, वैताग आलाय नुसता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||१||

कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...



दोन बाजूंचे डोंगर दोन मधून जातीया वाट
झर्‍यालाबी पानी सुटलं वाहे दुथडी पाटं
थांबा थोडं हितं जरासं...
थांबा थोडं हितं जरासं, कंटाळा आलाय नुसता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||२||


कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...


मंदिर हाये माथ्यावरती कळस दिसतोया लांबून
ज्येवन खानं करायचं का तिथं थोडं थांबून
ताट करायची तयारी करते...
ताट करायची तयारी करते, ज्येवाया तुमी बसा
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||३||


कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...



बगा ह्ये ताट तयार झालं
बघूनशान तोंडाला पानी सुटलं
तुमच्या हातानं लाडीगोडीनं...
तुमच्या हातानं लाडीगोडीनं, घास भरवा की आता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||४||


कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...


मंडळी, ह्यी झाली पयली लावनी. गाडी लय हळूहळू जात व्हती घाटातनं. कोनाला जोरात गाडी हाकायची आसल तर धृपदात खालीलप्रमानं बदल करा अन जोशात घ्येवून जावूद्या गाडी. काय?

घाई जरा करा, पटकन जावा
चढाईचा चिकना ह्यो रस्ता
अहो राया तुमी जोरात घाट चढा आता
अहो सजणा तुमी जोशात घाट चढा आता ||धृ||


-
तुमचाच,
पाषाणभेद (आपलं दगडफोड्या वो)
०१/०४/२०१० (हे एप्रिल चे प्रथम फुल वाचकांना अर्पण करतो.)