Wednesday, March 17, 2010

माझा धरशिल का हातात...हात

मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय.

हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्‍ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय.

ही कविता म्या माझ्यावाले फेव्रेट आसलेल्ये शाहिर दादा कोंडके यांना अर्पण केल्येली हाय.
वाचा तर मंग आता.

माझा धरशिल का हातात...हात


माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात || घृ ||

येतिस का शेतात
आधी लोळूया मातीत
चढूया मग झाडावर
आपल्या या आंब्याच्या बनात || १ ||

तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

पळू पळू गोल पळू
धराधरी चल ग खेळू
मळलेलं अंग मग धुव्वूया
चल जवूया विहीरीच्या पाण्यात || २ ||

मग सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

मऊमऊ तुझ्या हातांनी
का दाबतीया माझ्या हातांना
गिरकी घेवून मग अंगात
का वीज नाचवती पायात || ३ ||

तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

खुसूखुसू का लावतीया
गाल तुझे हे माझ्या गालांना
फुलांचा गजरा डोक्यात
त्यानं श्वास कोंडला श्वासात || ४ ||

तवा सांग माझा धरशिल का हातात
हात माझा ग तुझ्या हातात ||

(आता हिरवीन म्हनतीया)

कायबी काय बोलतो रं
चोरून काय बघतो रं
आजुबाजू नाय कोनी बांधावर
का म्हनून असा येशी तु अंगावर || ५ ||

जवा म्या धरला र हातात
हात तुझा रं माझ्या हातात ||

- पाषाणभेद (आपला दगडफोड्या वो)

No comments: