Monday, March 29, 2010

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'.

'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो.

नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो. समिरला नचादादाला पुण्याला शिकायला आणायचे असते. तो त्याच्या आईला तसे सांगतो. नचादादालाही आग्रह करतो. नचादादा प्रतिसाद देत नाही. सम्याला त्याचा फार राग येतो. तो त्याच्याशी संवाद साधत नाही. पण मनातून त्याच्याशी नचादादाच बोलेल अन नचादादाला सम्याच त्याच्याशी बोलेल असे वाटते. सम्या पोहोण्याच्या स्पर्धेसाठी शहरात येतो. सम्या स्पर्धेहून परत येतेवेळी नचादादाचा विहीरीत मृत्यू झालेला असतो. त्याच्या मामाला त्याने (मामाने) नचादादाला सांगड ढिली बांधल्याची खंत जाणवते. सम्याला नचादादा गेल्याचे काही पटत नाही. तशातच त्याच्या मावशीचे लग्न लागते. तो कुटूंबासह पुण्यास येतो. तरीही वारंवार सम्या नचादादाचा विचार करतो. त्याचे अस्तित्व त्याला नेहमी जाणवत राहते. कुटूंबातील इतर जण कुणी गेल्यानंतर आपले नेहमीचे व्यवहार कसे करू शकतात याचे त्याला कोडे पडते.
नचादादाच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर तो पेढे वाटून आनंदही व्यक्त करतो.
शेवटी एक दिवस तो नचादादाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. त्याला नचादादाला केवळ एकदाका होईना भेटायचे असते. एकदोन दिवस भटकल्यानंतर त्याला एक मेंढपाळ (विठ्ठ्ल उमप) भेटतो. तो त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगतो. त्यानंतर सम्या पुन्हा गावी जातो. तो मनापासून नचादादाला हाक मारतो. त्याच वेळी नचादादा त्याला विहीरीच्या काठावर दिसतो. शेवटी हा सगळा भास असतो. सम्या पुन्हा नेहमीचे जगणे जगतो का हे त्याने प्रेक्षकांवर सोडलेले आहे.

बाकी चित्रपटातील तंत्राबद्दल, दिग्दर्शनाबद्दल, कलाकारांबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

असा हा चित्रपट पाहिल्यानंतर सम्याबद्दल खुपच कणव निर्माण झाली. एकीकडे त्याच्या भावनांशी आपण एकरूप होवू पाहतो तर त्याच वेळी अनेक अनुत्तरीत प्रश्न तो सोडून जातो.

मला चित्रपटातील काही बाबी समजल्या नाहीत. मेंढपाळ अन सम्यातले संवाद फारच कमी आहेत.
१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)
२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?
३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो?
४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.
५) सम्या नच्याला शोधण्यासाठी २/३ दिवस फिरल्यानंतरही त्याच्या अंगावरची बंडी एकदम कोरी करकरीत कडक इस्त्रीची दिसते. नचादादाच्याही शर्टाची इस्त्री बर्‍याच द्रूष्यांत नजरेला टोचते.
६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे:
"Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!"
समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?

काहीही असो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर हातात काही लागलं नाही तरीही जे हातात आलं नाही ते शोधण्यासाठी मेंदूने विचार जरूर केला. यातच हा चित्रपट करणार्‍यांचं यश आहे.(माझा पुण्यातील एक लांबचा भाऊ अगदी समिरसारखा दिसतो. न कळत त्याच्याशी रिलेट होत गेलो. गावी जाण्याची हुरहूर, बरोबरीचे भाऊ भेटण्याची ओढ अनुभवलेली असल्याने हा आपलाच चित्रपट आहे असे जाणवले.)

समिरच्या मनातील द्वंद, प्रश्न, संभ्रम आपले होवून जातात.

चित्रपट संपल्यानंतर बर्‍याच जणांच्या तोंडून "च्यायला, काय समजलं नाय बुवा" असे उद्गार एकण्यात आले. तशीच परिस्थीती माझीही होती. पण ते न कबूल करायची मध्यमवर्गीय मनस्थिती माझीच होती. एवढा अंतराष्ट्रीय स्तरावरचा गाजलेला हा चित्रपट आपल्याला समजला नाही आपला कमीपणा की हेच त्या चित्रपटाचे यश? खरेच विहीर फारच खोल अन गुढ आहे, अंधारी, काळीकुट्ट, खोल खोल, सगळ्यांना कवेत घेणारी.

विहीर:
दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी, कथा-पटकथा - गिरीश कुलकर्णी, सती भावे
छायालेखन - सुधीर पलसाने, संकलन - नीरज वोरालिया, संगीत - मंगेश धाकडे
कलावंत - मदन देवधर, आलोक राजवाडे, रेणुका दप्तरदार, डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, सुलभा देशपांडे आणि अन्य.

अवांतर: एबी कॉर्प निर्मित जरी ही विहीर असली तरी सगळी छाप ही मराठीच आहे. अमीताभ ने काही ढवळाढवळ केलेली दिसत नाही. (की केवळ मराठीच्या तथाकथित प्रेमापोटी झाले? काहीही असो. एक चांगली कलाकृतीची निर्मीती झाली हे नक्की. मराठीचा झेंडा असाच उत्तरोउत्तर उंच जावो अन विहीर सारखे विचार करायला लावणारे चित्रपट निर्माण होवो याच अपेक्षा.)

कुणास हा चित्रपट पुर्ण समजला असेल, किंवा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा.

No comments: