Wednesday, October 28, 2009

स्वप्न

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9820

स्वप्न
(चाल: एखादी शालेय कविता)
स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे

बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे        || ध्रू ||



      होत्या बोटी, छोटी बेटे

             महाल होता पलीकडे

      त्यावर होती, चमकत नक्षी

             स्वर्गच भासे मला गडे

गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे        || १ ||



      निळे आभळ वरती वरती

             सुर्यकिरण हे सोनेरी झरती

      पक्षांची जाय उडत रांग

             आनंदाला येतसे भरती

होवुनी स्वार वार्‍यावरती मन माझे हे पळे        || २ ||



      मउशार त्या गवतामध्ये

             लाल गुलाबी फुले उमलली

      फुलपांखरे रंगबीरंगी,

             उडे तयांच्या अवतीभवती

बघण्या संदर देखावा हा नजर माझी वळे        || 3 ||

माकडा माकडा हुप

माकडा माकडा हुप


पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9607

माकडा माकडा हुप
तुझ्या शेंडीला पावशेर तुप

तुप जाय चाटीत
चिंचा दे पाटीत

चिंचा आहेत लांबट
तोंड झाले आंबट

आपण दोघ बागेत फिरू
मग मला दे पेरू

पेरू आहे गोड मोठा
अरे पळ पळ, आला माळीदादाचा सोटा

-पाषाणभेद

बोलत होता मोबाईलवर

बोलत होता मोबाईलवर


आरे त्या देवळात करुंन र्‍ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच.
- सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्‍याला सांगत होता मोबाईलवर.

"हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर.

आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?
- सुदाम मुकादम बोलत होता त्याच्या मोबाईलवर.

अरे, कॉलेजमध्ये नको, त्याच्या समोरच्या आइस्क्रीमच्या शॉप मध्येच येना. तेथे वरती गर्दी पण नसते काही. चल हट, मागच्या वेळेसारखं काही करायच नाही हं, चल ठेवते, बाय!
-शिल्पा आपल्या मित्राला सांगत होती मोबाईलवर.

अरे, काय क्लिनीकमध्येच आहेस ना? मी बाफणा नावाच्या पेशंटला पाठवतो आहे तुझ्याकडे. हं, टाईप २ डायबेटीक विथ लेफ्ट व्हेंन्ट्रीक्यूलर हायपर्ट्रूफी. जरा बघून घे. हो.. हो... बिजनेसमन आहेत. अन तुझी नवीन जागा कशी आहे? माझे काय रे, सध्या सिझन चालू आहे. रविवारी बसू सगळे. चल बाय.
- डॉ. गोगटे डॉ. शहांशी बोलत होते मोबाईलवर.

भाऊराव, ३ वाजत आले, आता तरी माघार घ्या. नाय बंडखोरी आम्हीपन केली आसती हो, पन आम्ही तुमचं सगळं सांभाळून घेवू. महामंडळाच अध्यक्षपद देवू. चला आता कलेक्टर हापिसात या आन माघारी अर्जावर सह्या करा.
- पक्षाचे अधिकृत उमेदवार बंडखोर भाऊरावांना सांगत होते मोबाईलवर.

आरे गेनू, लवकर ये बाबा. २ पोती जास्त आन शिंच्या. आज लोकांनी जास्त नारळ अन फुलांच्या माळा वाहील्यात देवीला. येतांना मागच्या दाराने ये अन हो पैसे पण घेवून ये हो.
देवीचे पुजारी मंदीराबाहेरच्या गेनू दुकानदाराला सांगत होते मोबाईलवर.

ए आई, आता तू जास्त काम करत जावू नको. बाबांना घरीच रहायला सांगत जा. प्रकृतीची काळजी घेत जा. मी पैसे पाठवतोच आहे. तुझी सुनबाई मजेत आहे येथे. धर आता तुझ्या नातवाशी फोनवर बोल.
- एनआरआय आयटीतला मुलगा आपल्या भारतातल्या आईशी बोलत होता मोबाईलवर.

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9478

प्रिय ताई,

माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे. आता दिवाळीपर्यंत देवळात तो माझ्याशेजारीच बसणार आहे. ईंग्रजी शब्द मारून तो जास्त कमाई करतो. (हे हल्ली असे होते.) तर पुन्हा असो.)

आता भादवा संपला, म्हणजेच पित्तरपाटाही संपला. परत जेवणात कॉस्ट कटिंग करावी लागत आहे. मी नेहमी जाड जाड जिन्स पँन्ट घालतो. माझ्या लाईफस्टाईल मध्ये अजून काही कॉस्ट कटिंग करता येईल का असे माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राला विचारले असता त्याने कपडे धूण्यावर जास्त मेहनत न घेण्यास सांगितले. असेही मला घंद्यासाठी कपडे मळकेच घालावे लागतात. त्याचे मी बर्‍याचदा एकतो तरी पण आपला सल्ला घ्यावासा वाटला म्हणून हे पत्र लिहीत आहे.

तर जिन्स कपडे न धुतले न ईस्त्री केले तर पैसे वाचतात का? माझ्या आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने पण असेच काहीतरी वेबसाईटीवर वाचले होते असे तो म्हणत होता. ताई, तुझा काय सल्ला आहे?

ताईचा सल्ला:
अरे दादा, तु फारच चांगला सल्ला मागितला आहेस. तुझ्या विचारण्याने अनेक लोकांचाही फायदा होईल. अरे परदेशात जिन्स शर्ट, पॅन्ट, जिन्स कपडे महीना महीना न धुण्याची व ईस्त्री न करण्याची फॅशनच आली आहे. तसेच युनायटेड नेशन्स एन्व्हारमेंट प्रोग्राम ने (United Nation Environment Program= UNEP) तर यावर एक अ‍ॅड्व्हर्टाईज पण तयार केली आहे. ती तू तुझ्या आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राबरोबर बघ. हि बघ त्याची लिंक. http://www.youtube.com/watch?v=vYprgHH7Zrw हि पण बघ. http://www.grist.org/article/un-says-dont-iron-your-jeans आणि हि पण बघ http://udtacheetah.targetgenx.com/never-wash-your-jeans/

अरे, या मुळे पाणी, विज तुझी मेहनत वाचेल. तुझ्या धंद्याला हे फार गरजेचेच आहे. त्यामूळे पर्यावरणावरचा ताण वाचेल. तू हा सल्ला तुझ्या ईतर मित्रांनापण दे, म्हणजे काहितरी समाजीक काम केल्याचे पुण्य तुझ्या पदरात पडेल.

असेच काही प्रश्न तुला पडलेले असतील तर बेधडक विचार. अरे हे वर्तमानपत्रातील "ताईचा साप्ताहिक सल्ला" हे सदर तर तुमच्यासाठीच सुरू केले ना? यात नाव पण गुप्त ठेवले जाते.

विचारशील ना पुढचा सल्ला? जरूर विचार. ( आमचे संपादक तात्या हे सदर बंद करायचा विचार करत आहे, त्यामूळे तु तर आठवड्याला काहितरी जरूर विचारत जा.)

तुझीच ताई.

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9436

लोकांचे एका ओळीच्या कौलांची संख्या व गुणवत्ता बघून मला पण कौलं काढायची हौस झाली. त्यामूळे मी खालील आगामी कौलं माझ्या नावे राखून ठेवत आहे. गरजू कौल लेखक खालील एक एक कौल त्यांच्या एकास एक लेखाच्या बदल्यात माझ्याकडून मागून घेवू शकतात. गरजूंनी या पत्यावर संपर्क साधावा. (आमच्या येथे पाहिजे तसे कौलं पाडून मिळतील. किंमत व्यक्तिपरत्वे/ स्थान परत्वे बदलेले. महाराष्ट्रीय रहिवाश्यांना खास सवलत. त्वरा करा.)

१) कौलाचे अनेकवचन काय? कौल च/ कौलं / कौले/ कौल्स इ.
२) तुम्हाला मिपा आवडते काय?
३) तुम्हाला मिपा संकेतस्थळ आवडते काय?
४) तुम्हाला (खायची) मिसळपाव आवडते काय?
५) तुम्हाला मिसळ आवडते काय?
६) तुम्हाला मिसळ पावासहीत आवडते काय?
७) तुम्ही श्वास घेतात तेव्हा काय करतात?
८) तुम्ही श्वास घेतात काय?
९) तुम्ही वास घेतात काय?
१०) तुम्ही घरी शर्ट वर असतात की बनीयनवर? (महिला मंडळ प्रश्न (यापुढे : ममंप्र) : साडी - गाउन )
११) तुम्ही अंघोळ करतात काय?
१२) तुम्ही रोज अंघोळ करतात काय?
१३) तुम्ही चित्रकार / गायक/ नट / नर्तक / पाककला निपूण आहात काय?
१४) तुमचा कॉम्पुटर चांगला चालतो का?
१५) तुमचा मोबाईल चांगला चालतो का?
१६) तुमचा स्वयंपाकाचा गॅस चांगला चालतो का?
१७) तुम्हाला साडी आवडते की ड्रेस? (ममंप्र)
१८) तुम्ही बसने जाता की रिक्षाने? (भारतीयांसाठी)
१९) तुम्ही वॉलमार्ट मधून गव्हाचे पिठ आणतात की दुसरीकडून आणतात? (अनिवासी भारतीयांसाठी)
२०) तुम्हाला भविष्य पहायला आवडते का? व का? (उत्सूकांसाठी)
२१) महाराष्ट्र हा शब्द कसा बनला.
२२) भारत हा शब्द कसा बनला.
२३) तुम्हाला काका / काकू म्हटलेले आवडते का?
२४) तुम्ही ट्रक चालवता काय?
२५) आपण सगळे लेख वाचतात काय?
२६) वेळ जात नाही म्हणून कौल काढावा काय?
२७) कौल काढल्यावे वेळ जातो (टाईमपास) जातो काय?
२८) वेळ जाणे म्हणजे काय?
२९) या कौलाला (प्रत्यू)त्तर द्यायचे काय?

अशाच प्रकारे मिक्स अँन्ड मॅच करून मला पाककृतीत पण पंचविशी/ पन्नाशी/ शंभरावी/ हजारावी गाठायची आहे.

डोंबारी

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9363

आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो.

ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका.

जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट.

लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट.

Dombari
डोंबारी १

Dombari2
डोंबारी २
निवीदा सुचना

साबुदाण्याच्या गोळ्यांच्या लोणच्याच्या भाकरीच्या मटणाच्या पुरणाच्या पोळीचे शिकरणासाठीच्या रेसीपीची निवीदा सुचना

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/9329

"अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" त्यांच्या तुरुंगातील बांघवांसाठी खाणावळ चालवणार्‍या बचत गटातर्फे वरील नावाच्या रेसीपीसाठी खालील खाद्य पदार्थ तयार रेसीपी, दर माणशी प्रमाणानुसार (कैद्याचे अ‍ॅव्हरेज वजन: 60783489 मिलीग्राम, उंची: 0.001041 माईल्स, उमर: 14600 दिवस, १३.५२ महिने) मागवण्यात येत आहेत. हे खाद्य पदार्थ आपण आपल्या खर्चाने आम्ही सांगू त्या त्या तुरूंगात आपण दर आठवड्याला सप्लाय केले पाहीजे. आम्ही ईतर रेसीपीपण कैदी बांधवांना खायला देतो. त्या साठी लागणारे पदार्थ, कृती, प्रमाण यासाठी आपण आमच्या संपर्कात रहावे. वेळोवेळी आम्ही यासाठीचे टेंडरे याच ठिकाणी प्रसिद्ध करू. त्यासाठी आपण आमची वेबसाईट नेहमी वाचत रहा.

नियम व अटी :-

१) सर्व साहित्य ISO ९००० /९००२ प्रमाणपत्र धारण करणार्‍या उत्पादक कंपन्यांचेच असले पाहीजे असे काही नाही.
२) CMM level Certified कंपन्यांनी आवेदन पत्र सादर करू नये. त्यांचे रेट फारच महाग असल्याने व त्यात ते कटींग मागत असल्याने त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत.
३) सर्व पदार्थ पॅकबंद व ताज्या स्थितीतीलच पाहिजे.
४) वजन, मापे परिमाण याबाबर काही शंका असल्यास आपण आमच्या रेसीपी डिझाईन डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.
५) आपले रेट हे सिलपॅक लिफाफ्यात, ३ लिफाफे पद्धतीत सादर केले पाहिजे.
५) छापील टेंडर किंमत रु. ४२०/- मात्र देवून मिळतील. पोस्टाद्वारे पाहिजे असल्यास रु. १००/- अधिक.
६) टेंडर उघडण्याची तारीख: ३० फेब्रूवारी
७) टेंडर उघडण्याच्या तारखेत व ठिकाणात बदल होईलच. आमच्या संपर्कात रहावे.
८) निवीदा नाकारण्याचा हक्क राखून ठेवलेला आहे.
९) चुकभुल देणेघेणे.

साहित्य:
पाव किलो साबुदाणा (उपासाचा)
१/२ किलो मटण (डॉक्टर (नाना मेड) सर्टीफाईड बोकड्याचे )
८००.८४७६३८४७३८३ ग्राम कच्चे पुरण (इतकेच मोजून मापून घ्यावे. जास्त घेवू नये. नाहीतर आपण करतोय ती कढी आंबट होते.)
०.०००५९३ टे.स्पून नावडतीचे ब्रांड मिठ
२ टे.स्पून गालावरची ब्रांड तीळ
१ तोंडाला पुरेल अशी खसखस, हसण्याची
१/४ टी.स्पून हळद पी अन हो गोरी मेक
१ टे.स्पून गरम मसाला चित्रपट
१ टे.स्पून चोरांसाठीची मिरची पूड
१/४ टी.स्पून आलंगेल्याची पेस्ट
१/४ टी.स्पून ओमशांती ब्रांड लसूण पेस्ट (दुसरा ब्रांड नको.)
अर्धी जुडी डेकोरेशनची कोथिंबीर (चायनीज)
०.००००००९८७६ चमचा डाएट तेल
१ अर्धकच्चा पिकलेला लिंबू (वजन ४२०.७३७३ मि.ग्राम चालेल.)
१२.७६५७ से.मी. x ४ सेमी व्यास केळी x १ नग / प्रती माणूस
१/२ वाटी दुध
२ पुरणाच्या पोळ्या ( ४.८३६३ सेमी त्रिज्या असणार्‍या व ४०० मायक्रॉन इतका जाड काठ नसलेल्या. सप्ल्याय झालेल्या पोळ्या व्हर्नियर कॅलीपरने मोजून घ्याव्यात, अन्यथा रिजेक्ट कराव्यात.)
२०० ग्राम लोणचे (सिंगलडेकर, (डबल=बे)डेकर, खोडकर, आदी ब्रांड चे असल्यास लोणचे असल्यास उत्तम. आधीच तयार केलेले व बरणीवर फोटो नसल्याने मट्णाचे लोणचे असल्यास अधीकच उत्तम.)
0.264172 गॅलन पाणी


कृती:

१.पी अन हो गोरी मेक हळद, नावडतीचे मीठ व अगदी थोडे पाणी घालून मट्णाचे लोणचे शिजवून घ्यावे.
२.गालावरची ब्रांड तीळ व हसण्याची ब्रांड खसखस ओले करून कोरडे होण्याइतपत भाजून घ्यावे.
३.हाताने गालावरची ब्रांड तीळ व केळी कुस्करून घ्यावे, तीळ तीळ करावा.
४. गालावरची ब्रांड तीळ व हसण्याची ब्रांड खसखस, गरम मसाला, तिखट, पी हळद, नावडतीचे मीठ, आले-लसणाची पेस्ट, भाकरी, पुरणाच्या पोळ्या,कोथिंबीर हे सर्व घालून चांगले मिक्सरमध्ये फिक्स करावे.
५.मट्णाचे मटण शिजल्यावर ते काढून घेऊन, कढईत थोडे तेल घालून थोडे थोडे मटण घालून तळून घ्यावे.
६.नंतर तळलेले मटण आणि वरील सर्व मसाला घालून त्यावर लिंबू पिळावे. वरून कोथिंबीरीने डेकोरेशन करावे.

वरील पाककृती एका कैद्यासाठी आहे.

सदर रेसीपीचे हक्क "अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" राखलेले आहेत. सदर रेसीपी पेटंट पेंडींग आहे.
----------------------------------------------------------------------------------
सदर निवीदा सुचना "अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" तयार केली गेली व मिपा तर्फे प्रकाशीत केली गेली.

चड्डीवाला आणि माकडे

चड्डीवाला आणि माकडे

पुर्वप्रसिद्धी :http://www.misalpav.com/node/9291

एक नाना नावाचा टोपी विक्रेता होता. गावातले सगळे लोक नाना टोपीवाला असे म्हणत असत.
त्याच्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्या देशात डोक्यात टोप्या घालण्याची फॅशन जरा कमी झालेली होती व लोकं एकमेकांनाच 'टोप्या घालू' लागली होती. आधीच टोप्यांची विक्री कमी व त्यातच
आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे नानाच्या मनात होते. म्हणून आपल्या नानाने विजारीच्या आतुन घालतात तसल्या वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला. आताशा सगळे लोकं त्याला "नाना चड्डा" असे म्हणत असत.

त्याच्याकडे सर्व त-हेच्या, विविध मापाच्या, वाढत्या अंगाच्या, बदलत्या घेराच्या, फिट्ट बसणा-या, मोकळ्या चाकळ्या अशा विविध चड्ड्या नाड्यांसह रास्त दरात उपलब्ध होत्या. "इच्छुकांनी या चड्यांचा लाभ घ्यावा ही इनंती!" अशी कसलेल्या दुकानदाराची भाषा तो चड्ड्या विक्री करण्यासाठी गिर्‍हाईकांशी करत असे. नाना चड्डीवाला आपला गरीब स्वभावाचा, हसतमुख, डोक्यावर गांधी टोपी घालणारा व फारच विनोदी, उमद्या व्यक्तिमत्वाचा माणुस होता. त्याचे आधी लक्ष्मी पेठेत दुकान होते पण आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन तो दुकानात एखाद्या माणसाला बसवून आपण स्वत: दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून डोक्यावर चड्ड्यांची पेटी घेवून गावोगावी "चड्ड्या घ्या हो चड्ड्या.... चड्ड्या घ्या हो चड्ड्या" असे ओरडून चाड्ड्यांची विक्री करत फिरत असे. गरीब बिचारा नाना. दिवसभर त्याला ह्या गावातून त्या गावात, उन्हातान्हात फिरावे लागत असे.

असेच एकदा तो पुणेगाव या गावातुन टाणेगावात चड्डी विक्रीसाठी जात होता. वाटेत त्याला भुक लागली. डोक्यावरची चड्ड्यांची पेटी खाली ठेवून नदीच्या काठावर आंब्याच्या झाडाखाली बसून त्याने बरोबर आणलेली चटणी भाकरी खाल्ली. पोट भरल्यावर अंमळ विश्रांतीसाठी तो पहूडला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोपच लागली.

बर्‍यापैकी झोप घेतल्यावर तो उठला व बघतो तर काय त्याची चड्ड्यांची पेटी उघडी ! तो हादरला. कोणी चोर वैग्रे आला होता की काय असला विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात त्याचे लक्ष झाडावर गेले. त्याला झाडावर खुपशी माकडे दंगामस्ती करत असतांना दिसली. सगळ्या माकडांनी त्याच्या पेटीतल्या चड्ड्या घातल्या होत्या!

ईकडे नाना विचारात पडला. त्या चड्ड्या माकडांकडुन परत कशा मिळवाव्या हा विचार त्याच्या मनात आला. त्याने डोके खाजविले. त्याचे पाहून माकडांनीही त्याची नक्कल केली. नानाने एक दगड माकडांकडे भिरकावला. माकडांनीही झाडावरच्या कैर्‍या नानाकडे फेकल्या. नानाच्या डोक्यात एक कल्पना आली. नानाने आपली विजार काढली. माकडांच्या आईवडीलांनी त्यांना "टोप्या विकणारा व माकडे" ही गोष्ट सांगीतलेली होती. त्यामूळे नाना आता पुढे काय करणार याची कल्पना माकडांना आली. ती वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या. नाना हसला व त्याने पटापट त्या सगळ्या चड्ड्या आपल्या पेटीत टाकल्या. नंतर चतूर नानाने खाली पडलेल्या कैर्‍या पण उचलल्या व तडक टाणेगावात चालता झाला.

तात्पर्य: नानाने जुन्या गोष्टीची पुनरावृत्ती केली. तो जुनी गोष्ट विसरला नाही. माकडेही जुनी गोष्ट विसरले नाहीत पण माकडांनीही काळाचा महिमा जाणून घेवून शिकून सवरून नविन मार्ग अवलंबिला.
म्हणजेच नविन गोष्ट करा पण जुनी गोष्ट पण लक्षात ठेवा.

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

* हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ !
* ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे.
* हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत.

आधार : अर्थातच, आंतरजाळ