Wednesday, October 28, 2009

चड्डीवाला आणि माकडे

चड्डीवाला आणि माकडे

पुर्वप्रसिद्धी :http://www.misalpav.com/node/9291

एक नाना नावाचा टोपी विक्रेता होता. गावातले सगळे लोक नाना टोपीवाला असे म्हणत असत.
त्याच्या देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर त्याच्या देशात डोक्यात टोप्या घालण्याची फॅशन जरा कमी झालेली होती व लोकं एकमेकांनाच 'टोप्या घालू' लागली होती. आधीच टोप्यांची विक्री कमी व त्यातच
आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन वेगळा धंदा काहीतरी सुरु करायचे नानाच्या मनात होते. म्हणून आपल्या नानाने विजारीच्या आतुन घालतात तसल्या वेगवेगळ्या चड्डया आणि नाड्या विकण्याचा धंदा चालु केला. आताशा सगळे लोकं त्याला "नाना चड्डा" असे म्हणत असत.

त्याच्याकडे सर्व त-हेच्या, विविध मापाच्या, वाढत्या अंगाच्या, बदलत्या घेराच्या, फिट्ट बसणा-या, मोकळ्या चाकळ्या अशा विविध चड्ड्या नाड्यांसह रास्त दरात उपलब्ध होत्या. "इच्छुकांनी या चड्यांचा लाभ घ्यावा ही इनंती!" अशी कसलेल्या दुकानदाराची भाषा तो चड्ड्या विक्री करण्यासाठी गिर्‍हाईकांशी करत असे. नाना चड्डीवाला आपला गरीब स्वभावाचा, हसतमुख, डोक्यावर गांधी टोपी घालणारा व फारच विनोदी, उमद्या व्यक्तिमत्वाचा माणुस होता. त्याचे आधी लक्ष्मी पेठेत दुकान होते पण आर्थिक मंदीमुळे तंगी आली म्हणुन तो दुकानात एखाद्या माणसाला बसवून आपण स्वत: दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून डोक्यावर चड्ड्यांची पेटी घेवून गावोगावी "चड्ड्या घ्या हो चड्ड्या.... चड्ड्या घ्या हो चड्ड्या" असे ओरडून चाड्ड्यांची विक्री करत फिरत असे. गरीब बिचारा नाना. दिवसभर त्याला ह्या गावातून त्या गावात, उन्हातान्हात फिरावे लागत असे.

असेच एकदा तो पुणेगाव या गावातुन टाणेगावात चड्डी विक्रीसाठी जात होता. वाटेत त्याला भुक लागली. डोक्यावरची चड्ड्यांची पेटी खाली ठेवून नदीच्या काठावर आंब्याच्या झाडाखाली बसून त्याने बरोबर आणलेली चटणी भाकरी खाल्ली. पोट भरल्यावर अंमळ विश्रांतीसाठी तो पहूडला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोपच लागली.

बर्‍यापैकी झोप घेतल्यावर तो उठला व बघतो तर काय त्याची चड्ड्यांची पेटी उघडी ! तो हादरला. कोणी चोर वैग्रे आला होता की काय असला विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात त्याचे लक्ष झाडावर गेले. त्याला झाडावर खुपशी माकडे दंगामस्ती करत असतांना दिसली. सगळ्या माकडांनी त्याच्या पेटीतल्या चड्ड्या घातल्या होत्या!

ईकडे नाना विचारात पडला. त्या चड्ड्या माकडांकडुन परत कशा मिळवाव्या हा विचार त्याच्या मनात आला. त्याने डोके खाजविले. त्याचे पाहून माकडांनीही त्याची नक्कल केली. नानाने एक दगड माकडांकडे भिरकावला. माकडांनीही झाडावरच्या कैर्‍या नानाकडे फेकल्या. नानाच्या डोक्यात एक कल्पना आली. नानाने आपली विजार काढली. माकडांच्या आईवडीलांनी त्यांना "टोप्या विकणारा व माकडे" ही गोष्ट सांगीतलेली होती. त्यामूळे नाना आता पुढे काय करणार याची कल्पना माकडांना आली. ती वेळ न यावी म्हणून माकडांनी घाई करून त्यांनी घातलेल्या चड्ड्या लगेच खाली टाकल्या. नाना हसला व त्याने पटापट त्या सगळ्या चड्ड्या आपल्या पेटीत टाकल्या. नंतर चतूर नानाने खाली पडलेल्या कैर्‍या पण उचलल्या व तडक टाणेगावात चालता झाला.

तात्पर्य: नानाने जुन्या गोष्टीची पुनरावृत्ती केली. तो जुनी गोष्ट विसरला नाही. माकडेही जुनी गोष्ट विसरले नाहीत पण माकडांनीही काळाचा महिमा जाणून घेवून शिकून सवरून नविन मार्ग अवलंबिला.
म्हणजेच नविन गोष्ट करा पण जुनी गोष्ट पण लक्षात ठेवा.

No comments: